‘चित्रपटामुळे महात्मा गांधी जगाला माहीत झाले’ ही बातमी (लोकसत्ता – ३० मे) वाचली. पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य वास्तववादी नाही. १९३० ते १९८० या काळात माध्यमांचे वर्चस्व नव्हते, तरीही गांधींची ख्याती जगभर होती. बर्ट्रान्ड रसेल, आईनस्टाईन, रोमारोला, टॉलस्टॉय अशा प्रसिद्ध बुद्धिवंतांमध्ये गांधीजींबद्दल अतिशय आदर निर्माण झाला होता. त्यांनी गरिबांना लढण्यासाठी सविनय कायदेभंग हे शस्त्र दिले. ते हिंसक नव्हते. लष्करी सामर्थ्याच्या तुलनेने काहीच नव्हते. (अर्थात, अनेक जण असेही होते ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वैयक्तिक हिंसेचा प्रयोग केला. चाफेकर बंधू आणि देशातील इतर भागांमध्ये विशेषत: बंगालमध्ये इतरही अनेक जण सशस्त्र क्रांतीच्या कल्पनेने भारावून गेले होते) परंतु सामान्य जनतेला जागे करून आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी सज्ज करणे, त्यामध्ये स्त्रिया, आबालवृद्धांनाही सामावून घेणे यात गांधीजींचे अद्वितीय योगदान केवळ भारतासाठीच नव्हे तर मानवतेसाठीही महत्त्वाचे होते.

मार्टिन ल्युथर किंग यांनी आणि नेल्सन मंडेला यांनीही वंशवादाविरोधात लढा देताना गांधीजींचा आदर्श समोर ठेवला. पॅलेस्टाईनमध्येही अहिंसा, सत्याग्रहाचा मार्ग चोखाळला गेला असता, तर तेथील चळवळीलाही नक्की यश आले असते, असे वाटते. सुभाषचंद्र बोस यांनीही जपान व जर्मनीकडून शस्त्रास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केला. काही काळापुरती ही तडजोड करण्यास त्यांची हरकत नसावी, मात्र तेही लोकशाहीवादी देशभक्त होते.

rahul gandhi
“राजकारणात जय, पराजय होत असतो, पण…”; स्मृती इराणींना ट्रोल करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट!
Vice President question on P Chidambaram criticism about Parliament print politics news
आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल
keir starmer to replace sunak as uk prime minister after labour party massive victory
सुनक यांचीच ब्रेग्झिट! ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पराभव; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”
What Rahul Gandhi Said?
“पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना आपण झुकलात”, राहुल गांधींचा आरोप; ओम बिर्लांचं तिखट उत्तर
The israeli supreme court s historic verdict on hardline jews military service is compulsory
विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?

हेही वाचा >>> लोकमानस : वचक ठेवणे हे नागरिकांचे कर्तव्यच

हिंदू राष्ट्रवाद्यांची देशभक्ती हा वेगळा विषय आहे. त्यांच्या राष्ट्रवादाला धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही अशा उदारमतवादी तत्त्वांचा पाया नाही, ज्यावर जगभरातील अनेक देश उभे आहेत. आज जुन्या पायावर उभे राहून हिंदू राष्ट्रवादाचे प्रयोग सुरू आहेत. आपले ध्येय साध्य करण्यासाठी हिटलर आणि मुसोलिनी किंवा टोजो यांच्यासारख्या हिंसक पद्धती वापरल्या जात नाहीत. कदाचित याला हिंदू आचारपद्धती म्हणता येईल. गेल्या १० वर्षांत जे मुस्लिमांचे झुंडबळी गेले ती विकृती होती. पण मुळापासून विचार केला तर हिंदू राष्ट्रवाद ही संकीर्ण, संकुचित प्रणाली आहे. त्यामध्ये गांधींजींना अभिप्रेत असलेला जागतिक पातळीवरील मानवतावादी दृष्टिकोन नाही. जनतेने केलेला अहिंसात्मक सत्याग्रह हे त्याचे स्वरूप असामान्य होते. आज जगामध्ये शस्त्रास्त्रे विपुल आहेत आणि अण्वस्त्रांची त्यात भर पडत आहे. अन्यायाविरुद्ध कसे लढता येते हे गांधींजींनी दाखवून दिले आहे. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि ओपेनहॅमरसारख्या अनेकांनी त्याचा अंगीकार केला आणि तोही सिनेमा तयार होण्यापूर्वी. अटेनबरोने केलेला सिनेमा हा गांधीजींना मानाचा मुजरा होता. गांधीजींचा हिमालयाएवढा मोठेपणा अनेक शतके जोपासला जाईल आणि अनेक खंडांमध्ये त्याचे महत्त्व जाणवत राहील हे नक्की. म्हणूनच पंतप्रधानांनी थोडा विशाल दृष्टिकोन धारण करावा आणि अशी संकुचित वक्तव्ये टाळावीत.

मोदी हे अतिशय कर्तबगार, खूप कष्ट घेणारे आणि निवडणुकांमध्ये धडाक्याने प्रचार करून जिंकून दाखवणारे नेते आहेत हे त्यांचे यश आम्ही मान्य करतो. पण त्यांचे योगदान तेवढेच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

● अशोक दातारमाहीम (मुंबई)

देदीप्यमान इतिहास कलुषित करण्याचा प्रयत्न

देशाच्या पंतप्रधानांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची बातमी वाचली. नरेंद्र मोदींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महानायकांची अशी बदनामी करण्याचा काडीमात्र अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांना अमर्यादित अधिकार भारतीय राज्यघटना देत नाही. अशा वक्तव्यांतून देशाचा देदीप्यमान इतिहास कलुषित करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या पदाला शोभत नाही. मात्र या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना नरेंद्र मोदींनी अनेकदा अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. याआधीच्या पंतप्रधानांनी जपलेला आणि वाढवलेला वारसा पुढे नेणे तर सोडाच पण मोदींनी आपल्या अशा बेताल वक्तव्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठाही धुळीला मिळविली आहे.

मोदी म्हणाले की, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला जसे जगाला माहीत आहेत तसे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी माहीत नाहीत. अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग यांच्या घराच्या अंगणात महात्मा गांधींचा पुतळा आहे, नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात महात्मा गांधींना महत्तम स्थान दिले आहे. जगभर महात्मा गांधींचे पुतळे आहेत, त्यांचे विचार शिकवले जातात, महात्मा गांधींना ‘टाइम पर्सन ऑफ दी इयर’ हा मानाचा सन्मान १९३०मध्येच आदराने देण्यात आला. आज जगातील इतर देशांतील कोणताही पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुख भारतभेटीसाठी आला तर राजघाट म्हणजेच महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जातो. अशा या जागतिक कीर्तीच्या विचारवंताकडून जग अनेक वर्षे प्रेरणा घेत आले आहे. त्यामुळे आपण अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याऐवजी या महात्म्याचे विचार अंगीकारले पाहिजेत.

● अमितकुमार सोळंके, अंबाजोगाई (बीड)

हेही वाचा >>> लोकमानस :आंतरराष्ट्रीय सन्मानाची वाट का पाहावी?

सारे काही चित्रपटामुळे?

कर्तृत्वानेसुद्धा प्रतिमा निर्मिती होऊ शकते याची जाण नसणाऱ्याचे ‘चित्रपटामुळे महात्मा गांधी जगाला माहिती झाले’ हे विधान आश्चर्यजनक नाही. ८४ देशांत मिळून गांधीजींचे ११० पुतळे आहेत, अनेक देशांनी गांधीजींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे काढली आणि रस्त्यांना त्यांचे नाव दिले. गांधींचा जन्मदिवस हा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा होतो. आईनस्टाईनने जी गांधीजींची प्रशंसा केली होती ती गांधी चित्रपट पाहून नव्हे. त्यांचा गांधीवादी आविर्भाव खोटा आहे हे स्पष्ट झाले.

● परेश बंगमूर्तिजापूर (अकोला)

बेजबाबदार आणि अतार्किक विधान!

चित्रपटामुळे महात्मा गांधी जगाला माहीत झाले’ ही बातमी वाचली. सत्तेची लालसा आणि हव्यासापोटी अलीकडे राजकीय नेते अतार्किक विधाने करताना दिसतात. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग हे महात्मा गांधींना आदर्श मानत होते. ‘गांधी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीसुद्धा महात्मा गांधी हे जागतिक स्तरावर नावाजलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी तर महात्मा गांधी यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व जगामध्ये होऊन गेले यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही असे वक्तव्य केले होते.

भारतामध्ये बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाच्या समस्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, खासगीकरण आणि भांडवलशाहीला प्रोत्साहन यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान आणि राजकीय नेते बेजबाबदार वक्तव्य करताना दिसतात. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संकुचित वृत्तीमुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि विकासात मोठे योगदान दिलेल्या काँग्रेस पक्षाशी निगडित पं. जवाहरलाल नेहरू आणि अन्य व्यक्तिमत्त्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. काँग्रेसचे देशाच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान होते हे कुणीही नाकारू शकत नाही. देशाचा जो काही विकास झाला तो फक्त मागील दहा वर्षांमध्ये झाला, हा दावा भोळसटपणाचे लक्षण आहे. कोणत्याही पक्षाशी निगडित असलेल्या आणि सामान्यांच्या मनात आदर असलेल्या नेत्यांनी व्यर्थ आणि बेजबाबदार वक्तव्ये टाळावीत. त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित धोरणे, समस्या आणि प्रश्नांवर विचार आणि मत मांडणे जास्त उद्बोधक ठरेल.

● राजेश नंदनवरेछत्रपती संभाजीनगर

मग गांधींची अवहेलना का खपवून घेता?

चित्रपटामुळे गांधी जगाला माहीत झाले’ ही बातमी वाचली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान जागतिक स्तरावर देशाचे प्रतिमाहनन करणारे आहे. हिंसेने ग्रासलेल्या जागतिक वातावरणात अहिंसेच्या मार्गानेच शांतता प्रस्थापित होऊ शकेल हा महात्मा गांधींचा विचार जगाने आदर्शवत मानला. सध्या पंतप्रधान निवडणुकीच्या निमित्ताने रोज खळबळजनक विधाने करत आहेत. अशा सवंग प्रचारात राष्ट्रपित्याला गोवण्याचा प्रकार पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा आहे, याचेही त्यांना भान राहिलेले नाही.

आज गांधींचा विचार जगाला माहिती व्हावा यासाठी आपल्या मनात किती तळमळ आहे, हे सांगणारे मोदीजी आपल्या कार्यकाळात देशात गांधी विचारांची किती अवहेलना होत आहे, याची मात्र अजिबात चिंता करत नाहीत. गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणे, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण, फाळणीला महात्मा गांधीजींना जबाबदार ठरवून विकृत विचार समाजमाध्यमांवर पेरणे इ. प्रकार उघडपणे सुरू आहेत. अशा स्थितीत त्यावर कारवाई तर सोडाच पंतप्रधान सोयीस्करपणे मौन बाळगत मूकपाठिंबा व्यक्त करतात. त्यांचे गांधीप्रेम बेगडी आहे.

● सतीश कुलकर्णी मालेगावकरनांदेड

गोडसेचा दृष्टिकोन!

स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांत- कॅलिफोर्नियात गांधी जागतिक शांती स्मारक बांधले गेले ते काय या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला होता म्हणून? मुद्दाम एखादा जुना राजकीय, धार्मिक मुद्दा काढून वाद निर्माण केले जात आहेत. ‘या’ वक्तव्यामुळे जगाला मोदींची ओळख ‘चांगलीच’ पटली असेल. मोदींनी मुळात गांधींना गोडसेच्या नजरेतून न पाहता सुजाण भारतीय नागरिकाच्या नजरेतून पाहिले तर गांधींची लोकप्रियता कधीचीच सर्वदूर पसरली आहे, हे त्यांच्या नक्कीच लक्षात येईल.

● अमोल इंगळे पाटीलनांदेड

अभ्यासक्रम आराखड्यावरील टीका गैरसमजातून!

राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्र राज्याचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा ‘अभ्यासक्रम आराखडा संक्षिप्त आवृत्ती’ प्रसिद्ध करण्यात आली. त्यावरील टीकेबाबत खालील मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे.-

या आराखड्यात कोठेही मनुस्मृती कोणत्याही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे, त्याची परीक्षा घेतली जाणार आहे असा उल्लेख नाही. अभ्यासक्रमाच्या संक्षिप्त आराखड्याच्या एका प्रकरणाची माहिती देताना मनुस्मृतीतील एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे. सदर श्लोकाचा अर्थ असा की, ‘‘ज्येष्ठांचा, गुरुजनांचा, मातापित्यांच्या आदर, सन्मान करावा ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होते.’’

असाच दुसरा मुद्दा- भगवद्गीता अध्याय, मनाचे श्लोक विद्यार्थ्यांनी अभ्यासावे असा आराखड्यात उल्लेख आहे. खरे तर शाळांमध्ये या संदर्भातील उपक्रम अभ्यासक्रमपूरक म्हणून अनेक वर्षांपासून राबविले जातात, स्पर्धा होतात, मात्र त्यावर आधारित कोणतीही परीक्षा शालेय स्तरावर होत नाही. शालेय वयात विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम साहित्य वाचण्यात चूक काय? अन्य धर्मीय साहित्य परंपरेत असे संस्कारक्षम साहित्य असल्यास त्याचाही समावेश करावा, यात दुमत असण्याचे कारण नाही. आणखीन एक वादाचा मुद्दा- मराठी भाषा शालेय स्तरावर शिकवण्याबाबतचे धोरण. महाराष्ट्रात दहावीपर्यंत मराठी भाषेचा अभ्यास अनिवार्य आहे. आराखडा मांडणीत समजण्यास अवघड शब्दरचना आहे, त्यातून हा घोळ निर्माण झाला असेल, तर तो वाचणाऱ्याच्या आकलनातील दोष आहे.

या अभ्यासक्रम आराखड्याला होत असलेला विरोध केवळ राजकीय आहे. सर्व संबंधित माध्यमकर्मी व राजकीय नेत्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुळातून वाचले पाहिजे. तसेच राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद अधिकारी यांनी सदर धोरण, आराखडा जनतेसमोर मांडताना परिपूर्ण स्वरूपात मांडणे आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज, वादविवाद यास शिक्षण अधिकारी जबाबदार ठरतील. राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करून अभ्यासक्रम आराखड्याविषयी सकारात्मक चर्चा होणे आणि गैरसमज दूर केले जाणे गरजेचे आहे.

● धनंजय कुलकर्णीमाजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे</p>

परिसंस्थेचे भान राखावे!

पर्यटकांच्या सापळ्यात वाघ!’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख (३० मे) वाचला. वाघांच्या क्षेत्रात ‘जंगली पर्यटकां’ची घुसखोरी होत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरल्याने वर्षाला दोन लाख पर्यटक येथे येतात. वाघाचे दर्शन झाल्याखेरीज आपल्या जंगल-पर्यटनाचे सार्थक झाले, असे त्यांना वाटत नाही. यात हौशा-नवशा पर्यटकांची संख्या मोठी असते. परिणामी निसर्गावर आणि विशेषत: वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण होताना दिसते. जंगल सफारी आणि तेथील परिसंस्था ढासळते. याची दखल घेऊन वन विभागाने सुयोग्य नियंत्रण ठेवले पाहिजे. अशीच स्थिती हिमालयातील अनेक शिखरांवर दिसते. ट्रेकर्समुळे रस्त्यांवर गर्दी होते. यात पर्यटक हकनाक प्राण गमावतात. प्रतिवर्षी सात लाख पर्यटक हिमालयात जातात. एकूणच आपल्याकडील पर्यटकांच्या उत्सवप्रियतेला वरचेवर उधाण येते, ज्याला आवर घालण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण, निसर्गाचा समतोल राखून प्राण्यांचा अधिवास बिघडू न देता मानवाची सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे.

● डॉ. विकास इनामदारपुणे

अभयारण्याच्या मूळ उद्देशालाच तडा

पर्यटकांच्या सापळ्यात वाघ’ हा लेख वाचला. विदर्भात पर्यटनाला व्यापारी रूप आले आहे. शेजारच्या गावांमधील लोकांची शेते विकत घेतली गेली. गावांतील तरुण जिप्सी चालक किंवा अभयारण्य मार्गदर्शक झाले. काहींनी पर्यटकांसाठी चहा-पाण्यासारखे छोटे-मोठे व्यवसाय स्थापले. एवढ्या वरच गावकरी खुश आहेत. मोठे व्यापारी अग्रेसर आहेत. आता तर व्यावसायिक अभयारण्य मार्गदर्शक आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा विपरित घटना घडल्यानंतर काही मार्गदर्शक, जिप्सी चालक यांच्यावर कारवाई केली जाते, परंतु मोठ्या अधिकाऱ्यांवर कधीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.अशा प्रश्नांमुळे अभयारण्य स्थापनेच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.

● अरुण लाटकर

न्यायच नव्हता तिथे न्यायदेवता कशी असेल?

रोमन न्यायदेवीऐवजी भारतीय न्यायदेवतेसाठी मोहीम!’ (लोकसत्ता,३० मे ) ही बातमी वाचली. भारतातील काही तथाकथित उच्चवर्णीय घटक आणि त्यांच्या नादी लागलेले काही लोक आजही पराभूत मानसिकतेत जगत आहेत. याच वर्गाच्या पूर्वजांनी परकीय आक्रमकांच्या चाकऱ्या केल्या. त्याच वेळी आक्रमकांना विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती. हे तेच लोक आहेत ज्यांना हाती सत्ता असूनही नवीन काही करता आलेलं नाही आणि पूर्वसुरींनी उभारलेलं मात्र हे विकायला निघाले आहेत. नावं बदलून, बारशांचे सोहोळे साजरे करून कर्तृत्व केल्याचं भासवत आहेत.

जर भारतीय सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत न्यायदेवतेचं एखादं चांगलं प्रतीक असतं तर ब्रिटिशांनी नक्कीच ते न्यायदेवतेची प्रतिमा म्हणून घेतलं असतं. त्यांचा कसलाही संबंध नसलेल्या रोमन देवतेची प्रतिमा न्यायदेवता म्हणून का निवडली असती? ब्रिटिश जरी परकीय होते तरी त्यांच्याकडे थोडीबहुत तरी समन्यायी आणि समसामाईक कायदा करण्याची दृष्टी होती. न्यायदेवतेचं प्रतीक बदलून नवीन प्रतीक आणण्याचा खटाटोप करणाऱ्यांनी सध्याच्या न्यायदेवतेच्या प्रतिमेत कोणती खोट किंवा उणिवा आहेत, हे तरी सांगावं. जे जे भारतीय आणि जे वैदिक धर्माशी निगडित ते ते श्रेष्ठ असेल तर मग धोतर नेसून बैलगाड्यातून, रथांमधून संचार करावा.

ज्यांना भारतीय वेद, धार्मिक ग्रंथ, पुराणं, कथा, पोथ्यांत भारताची महान संस्कृती ठासून भरलेली दिसते, त्याच लोकांना भारतीय राज्यघटनेपेक्षा मनू व मनुस्मृती श्रेष्ठ वाटते; हे तेच लोक आहेत जे सामाजिक विषमतेचे कळत-नकळत पुरस्कर्ते आणि पाठीराखे आहेत.

ब्रिटिशपूर्व काळात जंबुद्वीप जरी सलग भूखंड असला तरी या भूवर अनेक स्वतंत्र राजे आणि त्यांची संस्थानं होती. त्या त्या संस्थानातील संस्थानिक जे म्हणतील तोच तिथं कायदा होता. ज्यांनी कुणी मनुस्मृती वाचली असेल त्यांना हे तर माहीतच असेल की, एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी मनुस्मृतीत वर्णनिहाय व जातीनिहाय वेगवेगळा न्याय देण्याची तरतूद आहे. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या, गतजन्मी केलेल्या पापाची फळं या जन्मी भोगावी लागतात असं प्रत्येकाच्या मनावर बिंबविणाऱ्या धर्मात आणि धर्मग्रंथात न्याय ही संकल्पना कशी असू शकेल? जिथल्या धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा पायाच विषमतेवर उभारलेला आहे तिथं आमच्याकडे समन्याय होता किंवा न्याय ही संकल्पना होती हे सांगणं हाच एक मोठा विनोद आहे!

न्याय असता, तर जशी सरस्वती वा लक्ष्मीची मूर्ती उपलब्ध आहे तशी न्यायदेवतेचीही मूर्ती वा प्रतीकं असतीच ना! जे आपल्याकडे कधीच नव्हतं ते बळजबरीने लादण्याचा हा आणखी एक प्रयोग यशस्वी करतीलसुद्धा; पण त्यातून त्यांना कोणतं समाधान मिळणार आहे? समान नागरी कायदा आणून मुस्लीम स्त्रियांना न्याय मिळवून दिल्याच्या बढाया मारणाऱ्यांनी एकदा मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय सांगितलं आहे हेही वाचावं.

अलीकडच्या काळातील पेशवाईतील रामशास्त्री प्रभुणे यांचं एकमेव उदाहरण देणाऱ्यांनी; असतील तर न्यायाची आणखीही उदाहरणं द्यावीत. ही आणखी एक नसती उठाठेव असून मूळ मुद्द्यांवरून सामान्यांचं लक्ष हटविण्याचं कारस्थान आहे! ● शाहू पाटोळे, खामगाव (धाराशीव)