‘स्वागतार्ह!’ हे संपादकीय (२८ जुलै ) वाचले. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने स्वतंत्रपणे युरोपबाहेरील देशाशी केलेला हा सर्वात मोठा आर्थिक करार समजला जातो. खरे तर भारतीय अर्थव्यवस्थेने नुकतेच ब्रिटनला मागे टाकून जगात पाचवे स्थान मिळविले. हा एका अर्थाने दोन्ही देशांसाठी समृद्धीचा करार आहे. भारतासाठी ही केवळ निर्यात संधी नसून जागतिक पातळीवरील व्यापारातील नवा आत्मविश्वास निर्माण करणारे पाऊल आहे. या करारामुळे दोन्ही देशांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकेल.

या करारामुळे भारतातील कृषी उत्पादने व अन्न प्रक्रिया उद्याोगांसाठी ब्रिटिश बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध होणार आहे. विशेषत: कोकणातील आंबा, फणस बागायतदार तसेच द्राक्ष बागायतदार आणि सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होईल. हळद, काळीमिरी आणि वेलचीला जागतिक पातळीवरील बाजारपेठेत चांगला नफा मिळू शकेल. विकसित देशांच्या बाजारपेठेत भारताची प्रवेश क्षमता वाढेल. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ३४ अब्ज डॉलर्सने वाढेल अशी अपेक्षा आहे. हा ब्रिटनचा कोणत्याही देशाबरोबरचा सर्वांत मोठा व्यापार करार आहे. या करारानंतर भारताची युरोपीय देशांत विश्वासार्हता आणि आर्थिक प्रभाव वाढेल आणि भारताचे

● सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

विरोधकांशी जवळीक अंगलट आली

‘मोदींना आव्हान देण्याचे (कु) परिणाम!’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लाल किल्ला’ या सदरातील लेख वाचला. मोदीजींच्या मर्जीविरुद्ध अधिकार गाजविता येत नाही, हे उपराष्ट्रपती धनखड जाणून होते. ईडीचा धाक दाखवून विरोधकांचा अख्खा तंबू रिकामा करण्याचे श्रेय मोदींच्या खात्यात जमा असताना, काँग्रेस नेत्यांसमोर मोदी आणि शहा यांच्याबद्दल चर्चा करण्याचे धाडस अखेर त्यांच्या अंगलट आले. त्यातूनच उपराष्ट्रपतींना दुर्दैवी प्रसंगास सामोरे जावे लागले, असे दिसते. आपल्या उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात धनखड यांनी सदैव भाजपचे लांगूलचालन केले. सनातन धर्माचे समर्थन केले, ‘एक देश एक निवडणूक’ ला प्राधान्य दिले, संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांसंदर्भात भाजपला अनुकूल वक्तव्ये केली, न्यायाधीश नेमणुकीच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. पण, यातून धनखड अनावश्यक वादांच्या भोवऱ्यात अडकत गेले आणि पडद्यामागील घडामोडींचे बळी ठरले.

● डॉ. नूतनकुमार पाटणी, चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर)

आत्महत्या हा उपाय ठरू शकत नाही

‘आत्महत्यांचे आत्मपरीक्षण’, हा ‘अन्वयार्थ’ वाचला. पालकांनी मुलांना वेठीला धरू नये. अवाजवी अपेक्षा बाळगू नयेत. यामुळे मुले एकलकोंडी होतात. आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात. उलट मुलांना त्याच्या कुवतीप्रमाणे जे यश मिळेल, त्यात पालकांनी समाधान मानले पाहिजे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, या अपयश आले म्हणजे, सर्व काही संपलेच हे समजणे चुकीचे आहे. पुन्हा परीक्षेला बसणे, एखादा वेगळा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे मार्गक्रमण करणे हे पर्याय आहेतच. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय ठरू शकत नाही. त्याऐवजी त्या समस्येविषयी नातेवाईकांशी, मित्रांशी बोलून मन मोकळे केल्यास समस्या सुटण्यास मदतच होते.

● गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)

दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक

‘आत्महत्यांचे आत्मपरीक्षण’ हा ‘अन्वयार्थ’ (२८ जुलै) वाचला. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरील उपाययोजना वाटतात तितक्या सहजसुलभ नाहीत. कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. बहुतेक पालकांचा कल कुटुंब त्रिकोणी ठेवण्यावरच आहे. अशा त्रिकोणी कुटुंबातील एकुलत्या एक तरुण मुलाचे किंवा मुलीचे आत्महत्या, आजारपण किंवा अपघाताने अकाली निधन झाल्यास संबंधित जोडप्याने पुढील आयुष्याची वाटचाल कोणत्या आशेवर करायची, हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. दुसरे मूल होण्याची शक्यता नसलेली ही कुटुंबे पाल्यवियोगाचे दु:ख गिळून एकमेकांना आधार देत दिवस ढकलतात. भारतात अशा पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या समस्येचे गांभीर्य समाजशास्त्रज्ञांनी सरकारच्या लक्षात आणून द्यावे आणि सरकारनेही समाजशास्त्रज्ञांच्या, मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने सदर समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात.

● जगदीश आवटे, पुणे</strong>.

पदोन्नतीद्वारे आयएएस झालेले उजवे

‘आयएएस’पदी अपरिपक्व अधिकारी असू नये!’ ही बातमी (२८ जुलै) वाचली. आयएएस अधिकारी सचिव असलेल्या संस्थेत मी स्वत: मागील २१ वर्षांपासून नोकरीस आहे. संस्थेत आतापर्यंत तीन थेट आयएएस व चार पदोन्नतीद्वारे आयएएस असलेले अधिकारी सचिव होते. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन थेट आयएएस झालेले व महाराष्ट्र शासनाकडून पदोन्नतीद्वारे आयएएस झालेले अधिकारी यांच्यात प्रशासन चालविताना त्रयस्थपणे बघितल्यास पदोन्नतीद्वारे झालेले आयएएस अधिकारी उजवे ठरतात. प्रशासनाशी व राजकारण्यांशी जुळवून घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी विलक्षण असते. त्या मानाने थेट आयएएस झालेले अधिकारी हे मनमर्जीप्रमाणे वागताना, प्रशासनातील अंतर्गत गटबाजीला बळी पडताना, दैनंदिन काम करताना नेहमी बचावात्मक पवित्रा घेतात व वेळ मारून नेतात. अशामुळे संस्थेचा बहुमूल्य वेळ वाया जातो. प्रशासनात जी-हुजुरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते. सध्या मंत्रालयातील बाबूगिरी किती शिरजोर आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवीन नियमावली, असे म्हणता येईल. वास्तविक मंत्रालयातील अधिकाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणारे अधिकारी नक्कीच आपले काम करताना भूमिकेस न्याय देतील यात शंका नाही.

● संतोष वर्पे, वावी (नाशिक)

देवळातला देव ठरावीक दिवशी वेगळा?

अलीकडे कोणत्याही उत्सवातील गर्दी आणि मृत्यू हे समीकरण झाले आहे. हाथरस येथील चेंगराचेंगरीनंतरही धार्मिक समारंभांतील गर्दी नियंत्रणात येण्याचे लक्षण नाही. मृतांना दोन ते पाच लाख आणि जखमींना ५० हजार दिले म्हणजे प्रश्न सुटत नाही. आपण सर्व जण पुन:पुन्हा त्याच चुका करीत आहोत. कितीही पोलीस फौज उभी केली तरी आपण स्वत:हून गर्दी करणे टाळत नाही तोपर्यंत या दुर्घटना संपणार नाहीत. देवळातला देव एका ठरावीक दिवशी वेगळा असतो का? देवाचे आशीर्वाद सदासर्वकाळ तेच राहतात. आपली सरकारेसुद्धा धार्मिक भावनांचे राजकारण करून जनतेला भरीस घालत आहेत.

● नीता शेरे, दहिसर (मुंबई)

पात्र होऊ देण्यात अडथळे कुणी आणले?

‘जातगणना कराल; पात्रता कशी आणाल?’ हे लोकमानसमधील पत्र (२८ जुलै) वाचले. पत्रातील ‘घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, परंतु घोड्याला स्वत:च पाणी प्यावे लागते’ या वाक्यातून पत्रलेखकाचे मानस आणि मानसिकता कोणत्या वर्णाची आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शतकानुशतके सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक तळ्यांची ‘चौकीदारी’ कुणाकडे होती आणि या घोड्यांना पाणी पिण्यापासून कुण्या सामाजिक वर्णीयांनी ‘वंचित’ ठेवले? घोड्यांना धर्माच्या, वर्णाच्या, जातींच्या पागेत कुणी बंदिस्त केले होते? गरजवंत घोड्यांना पाणवठे कुणी अडवून ठेवले होते? ब्रिटिश आल्यावर या उपेक्षित घोड्यांना थोडी चंदी आणि पाणी मिळू लागल्यावर जळफळाट कोणाचा झाला?

भारतीय राज्यघटनेने घोड्यांना समानतेचे हक्क बहाल केले असले तरी बहुसंख्याक घोड्यांना पाण्यापासून आणि पाणवठ्यांपासून येनकेनप्रकारेण दूर ठेवण्याचे प्रयत्न कोण करतात, हे साऱ्या जगाला माहीत आहे. गोरगरिबांच्या शाळा पटसंख्या कमी आल्याचे सांगून खेड्यापाड्यातील शिंगरांना शिक्षणाच्या पाणवठ्यांपासून वंचित ठेवण्याचे काम कोण करत आहे? एकदा बरोबरीची संधी देऊन बघा, मग कळेल कोण घोडे, कोण खेचरे आणि कोण गाढवे आहेत ते! अवघ्या अमृतकाळात सामाजिक, सांस्कृतिक स्वयंघोषित पखाल्यांना घोड्यांची इतकी भीतीदायक काळजी वाटत असेल तर एकदा होऊन जाऊ द्या घोड्यांची ‘कोलनिहाय’ गणना! पाणवठ्यांवर चौक्या बसवून माऱ्याच्या जागांवर आपले शिपाई नेमायचे आणि वरून म्हणायचे की, ‘घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल; पण पाणी कसे पिणार?’ ‘आधी एक देश, एक पाणवठा!’ करा मग बघा घोडी पाणी पितात की नाही ते!

● शाहू पाटोळे, खामगाव (धाराशिव)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.