अमेरिकी सरकारच्या अखत्यारित असलेल्या ‘स्मिथसोनियन’ इन्स्टिट्यूटकडून संशोधन क्षेत्रात अनेक भली कामे झाली. त्यातले एक महत्त्वाचे म्हणजे ‘स्मिथसोनियन’ नावाचे मासिक. १९७० साली ‘लाइफ’ मासिकातून एडवर्ड के थॉम्प्सन निवृत्त झाले. या संस्थेने त्यांच्या हाती आपल्या मासिकाची जबाबदारी सोपवली. इतिहास, विज्ञान आणि संशोधन या विषयावर या मासिकाने उत्तमोत्तम लेखन दिले. मुुुद्दा हा की, या मासिकाचा ताजा अंक हेमिंग्वेच्या ‘द सन ऑल्सो रायझेस’ या कादंबरीची शंभरी साजरी करणारा. स्पेनमध्ये हेमिंग्वे सपत्नीक कसा गेला. तिथल्या ‘बुल रनिंग’ महोत्सवानंतर त्याने कादंबरी कशी लिहायला घेतली, त्याचा तपशिलात रिपोर्ताज येथे वाचता येईल. या मासिकाच्या संकेतस्थळावर अर्काइव्ह्ज या विभागात हेमिंग्वेवर भरपूर संशोधनपर लेखांचे भांडारच सापडते. हेमिंग्वेविषयी इतके बक्कळ लिहिले गेले असताना, ‘बुल रनिंग’ महोत्सवात सहभागी होऊन मांडलेले हे नवे लेखन मात्र ताज्या अंकातील.
https:// tinyurl. com/3 tammwfe
झुम्पा लाहिरींचे कथावाचन…
‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाचा वर्षभर प्रतीक्षेत राहणारा ‘समर फिक्शन’चा खास अंक या आठवड्यात आला. यंदा न्यू यॉर्करच्या शताब्दीनिमित्ताने त्यांच्या कथामंडळाने नवाच प्रयोग केला. तीन कथालेखिकांना न्यू यॉर्करमधील पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आवडीच्या कथांवर प्रेरित नवी कथा रचायला सांगितली. त्यांत एप्रिल १९७६ च्या अंकात मॅव्हिस गॅॅलण्ट यांच्या ‘व्हॉयसेस लॉस्ट इन द स्नो’ या कथेचा गाभा घेऊन झुम्पा लाहिरी यांनी ‘ज्युबिली’ ही ताजी कथा लिहिली. गेल्या काही वर्षांपासून लाहिरी इटालियन भाषेतच लिहीत आहेत. न्यू यॉर्करच्या निमंत्रणामुळे बऱ्याच अवकाशानंतर त्यांची इंग्रजी कथा वाचायला मिळणार आहे. न्यू यॉर्कर आणि समर फिक्शन अंकांतील कथांचा विस्तृत आढावा ‘बुकमार्क’मध्ये लवकरच वाचायला मिळेल. तोवर झुम्पा लाहिरी यांनी वाचलेली कथा ऐकण्यासाठी पॉडकास्ट.
https:// tinyurl. com/4 asev8 ua
भारतीयांच्या पुस्तक फडताळाची चर्चा…
वाचनाची सवय भारतीयांना जितकी अधिक, तितकीच त्यात कथनात्मक पुस्तके कमी आणि अकथनात्मक पुस्तके अधिक. त्यामुळे भारतीय वाचकांची फडताळं कथा-कादंबऱ्यांनी कमी भरलेली दिसतात. सर्व समाजमाध्यमांनी व्यापलेल्या आजच्या युगात वाढलेल्या व्यापांत वाचन झगडा सुरू असताना खुद्द भारतीय कथात्मक साहित्य फडताळात अधिकाधिक असायला हवे काय, त्यात गुणवत्ता किती, ते वाचले जावे काय, याची चर्चा करणारा अगदीच ताजा लेख.
https:// tinyurl. com/ bpa5 pppb