भारत सरकारचे माजी नौवहन सल्लागार, नौवहन क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘वरुण पुरस्कारा’चे मानकरी आणि नवी मुंबईच्या ‘टी.एस.चाणक्य मॅरिटाइम अकॅडमी’मध्ये वर्षाचा मुंबई विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे नौवहन क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ कॅप्टन पुरुषोत्तम शंकर बर्वे यांचे २४ ऑगस्ट रोजी मुंबईत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ते मूळचे पुण्याचे. पुण्यातील मुले दर्यावर्दी होण्यास फार उत्सुक नसत अशा काळात वयाच्या १४ व्या वर्षी- १९४८ साली ते नौवहन प्रशिक्षणाच्या ‘डफरीन’ या नौकेवर कॅडेट म्हणून गेले. पहिल्या – सेकण्ड मेटच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. ‘सिंदिया’ नाविक कंपनीच्या जहाजांवर अधिकारी म्हणून १९५१ ते १९६१ या काळात त्यांनी अनुभव घेतला. भारत सरकारच्या व्यापारी नौवहन विभागात (मर्कंटाइल मरिन डिपार्टमेंट) १९६१ मध्ये नॉटिकल सर्व्हेयर या पदावर ते रुजू झाले. तेव्हा फक्त इंग्लंडमध्ये असणारी ‘एक्स्ट्रा मास्टर’ परीक्षाही ते सर जॉन कॅस कॉलेजातून उत्तीर्ण झाले. त्यांनी १९७० च्या दशकात नौवहन परीक्षक म्हणून काम पाहिले. भारतात कॅप्टन बर्वे सेकंड मेट, फर्स्ट मेट आणि मास्टरच्या परीक्षांचे परीक्षक होतेच. पण इंग्लंडमधील एक्स्ट्रा मास्टर परीक्षेचे मुंबई केंद्र झाल्यावर तोंडी परीक्षेसाठीही त्यांची नेमणूक झाली.
लंडनहून परतल्यावर भारत सरकारचे नौवहन सल्लागार हे पद त्यांना देण्यात आले. जहाजातून एलपीजी अथवा निम्नतापी (क्रायोजेनिक) माल उतरवण्यासाठी कार्यपद्धती, बंदराबाहेर जहाजांवर पायलट चढता उतरतानाची सुरक्षा पद्धत, जहाजांवर अधिकाऱ्यांची कमतरता होऊ नये म्हणून उपाययोजना, मुंबई आणि जेएनपीटी बंदरांसाठी एकत्र पायलट पद्धत अशा अनेक प्रकारे या पदावरून त्यांनी योगदान दिले. एखादे जहाज असुरक्षित आढळले तर महासागरी प्रवासास जाण्यास सुरक्षित होईपर्यंत ते थांबवून ठेवणे हा अवघड निर्णय ते खंबीरपणे घेत असत. जहाज काही तास जरी थांबले तरी जहाज मालकाचे काही लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते, पण सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड बर्वे करत नसत. नौपरिवहन अधिनियम, जहाज बांधणी, दुरुस्ती, नौवहनासाठी वापरली जाणारी उपकरणे, जहाजांना होणारे अपघात अशा तांत्रिक विषयांवरची नियमावली तयार करणे व ती यशस्वीपणे राबवणे यातही त्यांचा वाटा मोठा आहे.
पश्चिम भारतातील नौवहन प्रशिक्षणाची प्रगती ‘डफरीन’ या नौकेपासून ‘ट्रेनिंग शिप राजेंद्र’ आणि पुढे १९९१ साली ‘राजेंद्र’च्या ऐवजी नवी मुंबईतील नेरुळमध्ये ४० एकर जागेत स्थापन झालेली ‘टी.एस.चाणक्य’ ही मॅरिटाइम अकॅडमी अशी झाली आहेत. या अकॅडमीच्या उभारणीत कॅप्टन बर्वे यांचा सल्ला अनेकदा मोलाचा ठरला. या नव्या संस्थेत तीन वर्षांचा मुंबई विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास त्यांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे होते. हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचाच व्हावा, यासाठी कोणतीही कसूर न सोडता जपानी इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन एजन्सीकडून ‘सिम्युलेटर’ मिळवण्यासाठी त्यांनी वाटाघाटी केल्या. सरकारी सेवेत त्यांची बंदरविकास, दीपगृहविकास वगैरे समित्यांवर नेमणूक झाली होती. तिथे त्यांची मते नेहमी महत्त्वाची समजली जात. नौवहन उद्याोगासाठी लोकसभेच्या खासदार समितीच्या चर्चांमध्ये त्यांचे सहकार्य घेतले जाई, ‘आयएमओ’तर्फे अन्य राष्ट्रांना मार्गदर्शन करण्यासाठीही त्यांना पाचारण केले जात असे.