ज्यांच्या लेखनामुळे साहित्यजाणिवा समृद्ध झाल्या अशा देश-विदेशांतील लेखकांचे विचार ऐकण्याची, साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याची, या क्षेत्रातील नवे वारे अनुभवण्याची संधी येत्या नोव्हेंबरमध्ये मुंबईकरांना मिळणार आहे. नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ‘लिटरेचर लाइव्ह! द मुंबई लिटफेस्ट’ होणार असून महोत्सावाचे हे सोळावे वर्ष आहे.

महोत्सावात प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार आणि कवी विनोद कुमार शुक्ल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने, तर प्रख्यात गुजराती कवी सीतांशु यशश्चंद्र यांचा ‘गोदरेज लिटरेचर लाइव्ह कवी पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येणार आहे. शुक्ल हे साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांची ‘दीवार में एक खिडकी रहती थी’, ‘नौकर की कमीज’, ‘कविता से लंबी कविता’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत.

गुजराती कवी सीतांशु यशश्चंद्र यांचाही याआधी साहित्य अकादमी आणि पद्माश्री पुरस्काराने गौरव झाला आहे. त्यांचे लेखन वास्तववादी आहे, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सीतांशु यशश्चंद्र यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स आणि पीएचडी केले आहे. मिठीबाई महाविद्यालयासह देश-विदेशांतील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांत त्यांनी अध्यापन केले आहे.

दहा देशांतील शंभरहून अधिक लेखक, वक्ते आणि कलाकार महोत्सवात सहभागी होतील. यानिमित्ताने विविध विषयांवरील विचार ऐकण्याची, एकाच विषयाचे विभिन्न पैलू जाणून घेण्याची आणि विविध भाषा संस्कृतींशी संबंधित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही महोत्सवात सर्वसमावेशकता केंद्रस्थानी ठेवण्यात आली असून नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

कथा, कविता, आरोग्य, इतिहास, उद्याोग, विज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर महोत्सवात चर्चा केली जाईल. नेहमीप्रमाणेच मुंबई हा विषय असणार आहेच. अनिंदिता घोष, अशोक अलेक्झांडर, अशोक वाजपेयी, अतुल दोडिया, धनंजय चंद्रचूड, फे डिसोझा, जीत थायिल, जेरी पिंटो, जिमी वेल्स, लिलेट दुबे, ओमर मुसा, परोमिता व्होरा, रूपा कुडवा, सॅम डालरिम्पल, शबनम मिनवाला, शशी थरूर, शेहान करुणातिलका, शिरीन भान, शोभा डे, शुभांगी स्वरूप, सोहा अली खान, वेंकटरमण रामकृष्णन, यांग शुआंग झि आदी मान्यवर महोत्सवात सहभागी होतील.

‘द ग्रेट डीबेट’, ‘बुक इन फोकस’, विविध सादरीकरणे, पुस्तक प्रकाशन, कार्यशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘कॅम्पस आउटरिच’ असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. लहान मुलांसाठी ७ आणि ८ नोव्हेंबरला द लिट्ल फेस्टिव्हलही आयोजित करण्यात आला आहे. त्यात बालसाहित्यासाठीचे विनोद कनोरिया पुरस्कार जाहीर करण्यात येतील. मुलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जीवनगौरव पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना विनोद कुमार शुक्ल म्हणाले, ‘लेखन हा व्यक्त होण्याचा, स्वत:चा आवाज शोधण्याचा प्रयत्न असतो. अभिव्यक्तीच्या या शोधात आपण प्रतीके, प्रतिमा आणि रूपकांची मदत घेतो. जर आपण उत्तमोत्तम साहित्याचे वाचन केले, तर आपली प्रगती होत राहते. म्हणूनच, आपला मूळ आवाज ओळखणे आणि पुन:पुन्हा त्याकडे परतणे आवश्यक आहे. माझ्या लेखनाची सुरुवात कवितेपासून झाली होती आणि शेवटही कवितेनेच होईल, हे माझ्यापुरते अंतिम सत्य आहे.’ तर ‘लिटरेचर लाइव्ह! २०२५ कवी पुरस्कार हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. माझ्या दृष्टीने तो पुरस्कार नाही, तर ते पारितोषिक आहे. पुरस्कारात ‘पुरस्करण’ अभिप्रेत असते. त्यातून इतरांसमोर आपले स्थान अधोरेखित होते. माझ्यासाठी ही माझ्यासारख्याच काही समकालीन लेखकांनी अनुभवलेल्या ‘परितोषा’ची म्हणजेच आनंदाची अभिव्यक्ती आहे,’ अशा शब्दांत सीतांशु यशश्चंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.