scorecardresearch

खबरदार, विचार कराल तर..

कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्यासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा अिहसेवर विश्वास असणाऱ्यांनी विचारांचे डावे-उजवेपण सोडून एकत्र यावयास हवे.

कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्यासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा अिहसेवर विश्वास असणाऱ्यांनी विचारांचे डावे-उजवेपण सोडून एकत्र यावयास हवे. परंतु तेवढी वैचारिक सचोटी आजच्या महाराष्ट्रात नाही. हत्या कोणाचीही होवो, हल्ला कोणावरही होवो, विचारी जनांनी एकत्र येऊन अशा घटनांचा निषेध करून त्यामागे असणाऱ्या शक्तींना उघडे पाडणे आवश्यक आहे..

आजचा महाराष्ट्र हा विचारांना घाबरू लागला आहे, हे गेले काही वष्रे दिसत होतेच. दीड वर्षांपूर्वी पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्राच्या दिवाभीत अवस्थेचा पहिला मोठा साक्षात्कार झाला आणि सोमवारी कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्यावरील हल्ल्याने ती अवस्था अधोरेखित केली. कॉम्रेड पानसरे आपला सकाळचा दैनंदिन फेरफटका मारून घरी परतत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. कॉम्रेड पानसरे हे राज्यातील डाव्या चळवळीचे ज्येष्ठ नेते. सहकार क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यातही पानसरे यांचा मोठा वाटा आहे. गेली काही वष्रे ते कोल्हापूर परिसरातील अन्याय्य अशा टोलविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. अलीकडेच त्यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नांविरोधात ठाम भूमिका घेतली होती. तेव्हा त्यांचे अहित चिंतणारे अनेक असू शकतात, हे उघड आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे दुचाकीवरून आले आणि गोळ्या झाडून पळून गेले. ही घटना दाभोलकरांवरील हल्ल्याची आठवण करून देणारी. त्यांच्यावरही असाच सकाळी हल्ला झाला. तेही असेच सकाळी फेरफटका मारत होते. त्यांचेही मारेकरी असेच दुचाकीवरून आले आणि गोळ्या झाडून निघून गेले. परंतु या दोन हल्ल्यांतील साम्य येथेच संपावे अशीच इच्छा अनेकांची असेल. कारण दाभोलकरांवरील हा हल्ला प्राणघातक ठरला आणि त्यांचे मारेकरी पकडण्यात जवळपास १८ महिन्यांनंतरही राज्य सरकारला यश आलेले नाही. तर कॉम्रेड पानसरे यांच्यावर उपचाराची संधी मिळाली आणि त्यातून ते बरे होऊन पुन्हा आपल्या खणखणीत वाणीने कामास लागतील अशी आशा करता येईल. त्याचप्रमाणे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचाही छडा लागेल, अशी आशा आहे. दाभोलकरांचे मारेकरीच सापडले नसल्यामुळे त्यांच्या हत्येमागील उद्देश अद्याप समजू शकलेला नाही. याव्यतिरिक्त आणखी एक साम्य दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर समोर येताना दिसते. ते म्हणजे प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा वैचारिक समतोल कसा ढासळतो आहे, हे या प्रतिक्रियांवरून समजून यावे.
दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कायद्यास सर्व धर्मातील कट्टरपंथीयांचा विरोध होता. त्यातही िहदू अधिक. त्यामुळे त्यांच्या हत्येमागे या उजव्या विचारांच्या शक्ती असाव्यात असे गृहीत धरून पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या बोलघेवडय़ांनी दाभोलकरांच्या हत्येनंतर जवळपास मारेकरी कोण हे सांगण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. यातील काहींना- यात काही बांधीलकीवाले संपादकही होते- तर इतका चेव आला होता की त्यांच्या अभिव्यक्तीतील िहसा ही प्रत्यक्ष हल्लेखोरांच्या कृत्याशी जवळीक सांगणारी होती. हा हल्ला झाला त्या वेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. नरेंद्र मोदी यांच्या धडका केंद्र सत्तेवर बसायला सुरुवात होण्यास अवधी होता. तेव्हा काहींना वाटत होते त्याप्रमाणे दाभोलकर यांच्या हत्येमागे खरोखरच प्रतिगामी शक्ती असत्या तर त्यांना उजेडात आणण्यात राज्यातील आणि केंद्रातीलही सत्ताधीशांना आनंद वाटला असता. परंतु ते झाले नाही. कारण या मंडळींना वाटत होते तसे काही आढळले नसावे. वास्तविक अशा वेळी या बुद्धिजीवींनी आपण प्रतिक्रिया देण्यात जरा घाईच केली, अशी कबुली दिली असती तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि वैचारिक निष्ठांचा सच्चेपणा दिसून आला असता. आताही नेमकी तीच गल्लत अनेकांकडून होताना दिसते. िहसा ही वाईट आणि िनदनीयच. मग ती डाव्या विचारींविरोधात झालेली असो वा उजव्या. आज कॉम्रेड पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी प्रसृत होताच जणू आपल्याला त्यांच्यावरील हल्ल्यामागे कोण आहेत हे ठाऊकच आहे, अशा थाटात प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. देशात प्रतिगामी शक्तींची वाढ होत असून त्याचमुळे पानसरे यांच्यावर असा हल्ला झाला असे मेधा पाटकर म्हणाल्या. सध्या प्रतिगामी शक्तींचा सुळसुळाट झाला आहे, हे मान्यच. परंतु तसा तो व्हायच्या आधीही आपल्याकडे िहसाचार होताच, हे कसे विसरणार? दाभोलकर यांच्या कन्येच्या मते पानसरे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता. आता हे उघडच आहे. हल्लेखोर पानसरे यांच्याशी चर्चाविनिमय करावयास गेले आणि निघताना त्यांना सहज म्हणून गोळ्या घातल्या, असे तर झाले नसणार. अशा प्रकारचे हल्ले हे पूर्वनियोजितच असतात. वास्तविक अशा प्रकारची घटना जेव्हा घडते तेव्हा अिहसेवर विश्वास असणाऱ्यांनी विचारांचे डावे-उजवेपण सोडून एकत्र यावयास हवे. परंतु तेवढी वैचारिक सचोटी आजच्या महाराष्ट्रात नाही. हत्या कोणाचीही होवो, हल्ला कोणावरही होवो, विचारी जनांनी एकत्र येऊन अशा घटनांचा निषेध करून त्यामागे असणाऱ्या शक्तींना उघडे पाडणे आवश्यक आहे. परंतु इतकी वैचारिक प्रगल्भता आजच्या महाराष्ट्रात आहे कोठे? आपल्याकडे हल्ला कोणावर झालेला आहे हे पाहून त्याविरोधात काय भूमिका घ्यावयाची हे बेतले जाते. वास्तविक पुण्यातील ंभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर झालेला हल्ला करणारे हे कोणीही असले तरी प्रतिगामीच होते आणि आहेतही. परंतु त्यांच्याविरोधात बोलताना काहींचा आवाज सोयीस्कररीत्या बसतो, याकडे कशी डोळेझाक करणार? माहिती अधिकारासाठी लढणारे सतीश शेट्टी यांच्या हत्येस जबाबदार असणारेही प्रतिगामीच होते. परंतु त्यांच्या मारेकऱ्यांचा शेाध अद्याप लागलेला नाही याबद्दल तितके दु:ख व्यक्त होताना दिसत नाही. त्यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात काही औद्योगिक आस्थापनांचीही नावे घेतली जातात. ते जर खरे असेल तर राजकीय पािठबा असल्याखेरीज आस्थापनेही अशी कृत्ये करू धजत नाहीत, हेही खरे आहे. परंतु या अशा राजकारण्यांचा निषेधही आपल्याकडे निवडकपणेच होतो. यातही या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचा दांभिकपणा असा की भाजप, शिवसेना आदी प्रतिगामी पक्षांतील व्यक्ती काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांत आली की ती धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणून घेण्यास प्राप्त ठरते. भाजप, सेनेत असताना ज्या व्यक्तीच्या वाऱ्यास उभे राहणेदेखील पाप आहे असे मानणाऱ्यांना ही व्यक्ती काँग्रेस, राष्ट्रवादीत गेली की तिच्या पंगतीत मांडीला मांडी लावून बसायलाही कमीपणा वाटत नाही. खेरीज, प्रतिगामी शक्तींना पाठीशी घालणाऱ्या ताकदींच्या बाबत जेवढी तीव्रपणे बोंब ठोकली जाते तेवढे पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांच्या कळपातील गुंडपुंडांचा आधार असणाऱ्यांविरोधात बोलले जात नाही.
तेव्हा महाराष्ट्राने ही निवडक नतिकता आता सोडायला हवी. याचे कारण सत्तेवर पुरोगामी म्हणवून घेणारे असोत वा प्रतिगामी. सत्तेमुळे येणाऱ्या राजकीय ताकदीचा आधार घेत आपली साम्राज्ये वाढवणाऱ्या शक्ती समानच असतात. त्यामुळे सरकार बदलले तरी ते चालवणाऱ्यांच्या आसपास घोंघावणारे दलाल बदलले जातात असे होत नाही. सत्तेमागील आर्थिक हितसंबंध तेच असतात. दाभोलकर, शेट्टी यांची हत्या, कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागेदेखील हे आर्थिक हितसंबंध असू शकतात. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाहय़ आणि निष्फळ चर्चात आपण रमतो. अशा परिस्थितीत विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्वानीच एकत्र यावयास हवे. कारण दाभोलकर, शेट्टी यांचे मारेकरी, कॉम्रेड पानसरे यांचे हल्लेखोर या महाराष्ट्राला इशारा देत आहेत :  खबरदार.. विचार कराल तर..

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comrade govind pansare shot at in kolhapur