शिव-शाईचा स्वार्थवाद!

मुळात अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे हेच शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे राजकारण राहिले आहे

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसौरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकून कथित शिवसैनिकांनी आपल्या पक्षभूत संस्कृतीचे जे दर्शन घडविले ते त्या शाईहून अधिक काळे आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना यामध्ये राष्ट्रभक्तीचा अंगार दिसतो आहे. या आधी ख्यातकीर्त गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमास विरोध करून शिवसेनेने आपला अंगार उधळला होता. तो प्रकार जितका निषेधार्ह होता तितकीच ही घटनाही आहे. अर्थात हे समजणे अनेक शिवसैनिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. धाकदपटशा आणि राडेबाजी हेच ज्यांच्यासाठी विचारांचे सोने असते त्यांना या अशा धांगडधिंग्यात कोणतीही राष्ट्रभक्ती नसते हे कळणे अवघडच. मुळात अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे हेच शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे राजकारण राहिले आहे. कोणत्याही राजकीय-सामाजिक-आर्थिक विचारांचा अभाव असल्याने शिवसेनेचे राजकारण नेहमीच हे असे प्रतिकात्मकतेच्या आडोशाने वाढत आले आहे. पाकिस्तानी कलाकारांना, क्रिकेटपटूंना आणि आता राजकीय नेत्यांना, मुंबई वा महाराष्ट्रात विरोध हा त्याचाच एक अविष्कार. यावर अनेकांना प्रश्न पडेल, की सीमेवर पाकिस्तानी गोळ्या आपल्या जवानांचे बळी घेत असताना आपण त्यांच्या कलाकारांची गाणी ऐकत बसायचे का? त्यांच्या नेत्यांचे येथे आगत-स्वागत करायचे का? प्रश्न अगदी बिनतोड वाटतो. शत्रूराष्ट्रातील नागरिकांना आपण का डोक्यावर घ्यायचे?

या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. ते समजून घ्यायचे तर पहिल्यांदा एक बाब नीट लक्षात घ्यावी लागेल, की पाकिस्तान हे काही आपले अधिकृत शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानशी आपण व्यापार करतो. लासलगावचा कांदा पाकिस्तानात विकतो आणि येथे भाव वाढले की तेथील कांदा आपल्या स्वयंपाकघरात येतो. हा व्यापार केवळ कांद्याचाच नाही. तिकडे आपण अनेक गोष्टींची आयात-निर्यात करीत असतो. पाकिस्तानशी आपले राजनैतिक संबंधही कायम आहेत. त्या राष्ट्राशी आपण विविध व्यासपीठावरून चर्चा करतो. त्यांच्या पंतप्रधानांना आपले पंतप्रधान आपल्या शपथविधी समारंभाला मानाने बोलावतात. ती साडीचोळीची मुत्सद्देगिरी आपल्या देशातील सर्व राष्ट्रभक्तांनी डोळे भरून पाहिली आहे. पाकिस्तानातील शिष्टमंडळांचेही येथे जाणे-येणे असते. हे सर्व होत असतानाच ते राष्ट्र आपल्या विरोधात दहशतवादी कारवायाही करीत असते. सीमेवरील गोळीबार ही तर अधुनमधून नेमाने होत असलेली बाब आहे. आणि पाकिस्तानच्या अशा सर्व कारवायांना आपणही नेहमीच जशास-तसे प्रत्युत्तर देत असतो. आज आपल्याकडे ५६ इंचाची छाती आहे. पूर्वी नव्हती. तेव्हाही पाकिस्तानला आपण नमवले आहे. त्याची फाळणी केली आहे आणि सिंधपासून बलुचिस्तानपर्यंत त्याच्या नाकात दम आणलेला आहे. ज्या ज्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून शक्य झाले तेथे तेथे पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचे आपण वस्त्रहरण केले आहे. पण हे सर्व सुरू असताना आपण पाकिस्तानबरोबरचे संबंध तोडलेले नाहीत. याचा अर्थ आपले केंद्रातील नेते आणि मुत्सद्दी ही मंडळी शिवसेनेच्या राष्ट्रवाद्यांहून कमी राष्ट्रवादी आहेत असा लावायचा का? तीनच महिन्यांपूर्वी, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केला जात असताना, धमक्या दिल्या जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली, तेव्हा मोदी यांना सीमेवर सांडलेल्या जवानांच्या रक्ताचा विसर पडला असे मानायचे का? ते तसे असेल तर राष्ट्रभक्त शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर का पडली नाही? आणि आज समाजमाध्यमांतून सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आणि त्यांना सहानुभूती दर्शविणा-या नागरिकांवर अश्लाघ्य टीका करणारांची तोंडे तेव्हा मोदींवर का सुटली नव्हती?
सर्वसामान्य नागरीक नेहमीच काळ्या-पांढ-यात विचार करीत असतात. दोष त्यांचा नसतो. दोष असतो तो त्यांच्या भावना भडकाविणा-यांचा. शिवसेनेचे सध्याचे उद्योग हेच आहेत. येथे ही गोष्टही लक्षात घेतल पाहिजे, की या उद्योगांमागे फायद्याचेही गणित आहे. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक हे त्यातील एक. मुंबई पट्ट्यातील कोणत्याही शहरातील निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असतो. ती निवडणूक जिंकायचीच असा चंग सेनेने बांधला आहे. कारण ती हातून गेली आणि भाजप बळकट झाला, तर त्या शहरातील तूपही गेले आणि राज्यातील सत्तेचे तेलही गेले अशी आपली अवस्था होणार असल्याचे शिवसेना जाणून आहे. त्यामुळेच भाजपला सतत डिवचण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी शिवसेना सोडू इच्छित नाही. सीमेवरील जवानांच्या रक्ताचा राजकीय वापर करीत इकडे मुंबईत शाईहल्ला होतो आणि आपल्या मुखपत्रातूनही शाई नासवली जाते, ती त्यातूनच. त्याकडे राष्ट्रवादाच्या चष्म्यातून पाहणे ही राष्ट्रवादाशीच केलेली प्रतारणा ठरेल. त्याला फार तर शिव-शाईचा स्वार्थवाद म्हणता येईल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: E edit on sudheendra kulkarni attacked by sena activists ahead of kasuri book launch