आजवर एकाही सरकारला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमीभाव देता आलेला नसला तरी त्या शिफारशीचा दबाव प्रत्येक सरकारवर राहिला आहे.. वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणारी भूक शमवण्यासाठी भारताच्या शेतीविषयक धोरणांत फार मोठा बदल घडणे, एवढा एकच पर्याय जेव्हा होता, त्या सत्तरच्या दशकात या बदलाचे नेतृत्व डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी केले. अमेरिकेच्या पीएल ४८० योजनेतून भारताला त्या काळात मिळालेले मिलो हे धान्य ज्यांनी खाल्ले असेल, त्यांना डॉ. स्वामिनाथन यांच्या या अथक प्रयत्नांचे महत्त्व अधिक कळू शकेल. तल्लख बुद्धिमत्ता, राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले मन आणि त्याच्या जोडीला संशोधनातून नवे काही मिळवण्यासाठीची धडपड यामुळे त्यांना या दुष्काळावरील एक उपाय सापडला. त्या उपायाची चळवळ घडवून आणण्यासाठी त्यांच्याकडे जे नेतृत्वगुण होते आणि पटवून देण्याचे कौशल्य होते, त्यामुळे त्यानंतरच्या काळात अन्नधान्याबाबत भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी झटू लागला. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी देशातील शेतीतून मिळणारे उत्पादन वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. याच तंत्रज्ञानाचा पुरस्कार करीत अमेरिकेतील शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी केलेले कृषी क्षेत्रातील संशोधन तेव्हा जगभरात वाखाणले जात होते. बोरलॉग यांच्या मदतीने भारतीय वातावरणात उपयोगी पडेल, असे वाण विकसित करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. पण हरितक्रांतीच्या पलीकडेही स्वामिनाथन आहेत, म्हणून ते महत्त्वाचे. प्रथम हरितक्रांतीबद्दल. स्वातंत्र्यपूर्व बंगालमधील भीषण दुष्काळात भुकेने मृत्यू पावलेल्या भारतीयांची संख्या वीस लाखांहून अधिक होती. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणांचे ते बळी होते. त्या दुष्काळाने स्वामिनाथन यांच्या विचारांवर फार मोठा परिणाम केला आणि घरात वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय असतानाही, ते कृषी संशोधनाकडे वळले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतातील गव्हाचे उत्पादन ६० लाख टन होते. त्यात वाढ होऊन ते एक कोटी टनांपर्यंत जाण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी जावा लागला. मात्र १९६४ ते ६६ या काळात या उत्पादनात प्रचंड वाढ होत ते १.७ कोटी टनांपर्यंत गेले. भारतातील हरितक्रांतीचा तो काळ मानला जातो. ज्या काळात भारताला अन्नधान्यासाठी आयातीवर विसंबून राहावे लागत होते, त्या काळात डॉ. स्वामिनाथन यांनी केलेल्या संशोधनामुळे भारतातील गहू आणि तांदूळ या पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करू लागला. भारतातील गव्हाचे पीक पाच फुटांपर्यंत उंच होते. त्यामुळे त्याच्या लोंब्या वजनाच्या भाराने जमिनीकडे वाकत. त्याचा परिणाम उत्पादनावर होई. या पिकाची उंची कमी करून त्याला अधिक प्रमाणातील रासायनिक खताची जोड देऊन उत्पादन वाढवणे शक्य आहे काय, याचा शोध डॉ. स्वामिनाथन घेत होते. धान्याची पोषण क्षमता कमी न होता, एकरी उत्पादन वाढणे ही गरज होती. त्यासाठी नवे वाण विकसित करणे आवश्यक होते. डॉ. स्वामिनाथन यांनी जगातील अशा प्रयोगांचा अभ्यास करून भारतीय हवामानात तग धरेल असे वाण विकसित केले. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतील शेतकऱ्यांना हे वाण देऊन, त्याचे लक्षणीय परिणाम जेव्हा दृष्टिपथात आले, तेव्हा या संशोधनाचा खरा कस लागला. त्यावेळचे केंद्रीय कृषिमंत्री सी. सुब्रमण्यम आणि जगजीवन राम यांच्यासारख्या देशाच्या धोरणकर्त्यांना या संशोधनाचे महत्त्व पटवून देत असतानाच बांधावरील शेतकऱ्यांच्या मनात त्याबद्दलचा विश्वास निर्माण करण्याची क्षमता स्वामिनाथन यांच्याकडे होती. त्यामुळे प्रयोगशाळेतील संशोधन सरकारदरबारी आणि प्रत्यक्ष शेतीत एकाच वेळी सर्वमान्य झाले आणि त्याचे विधायक परिणाम दिसू लागले. हे जरी खरे असले तरीही शेतीमालाचे उत्पादन वाढत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे शेतीचा उद्योग किफायतशीर राहिला नाही. त्यात दुष्काळासारख्या संकटांची भर पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. हा प्रश्न उग्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर २००४ मध्ये डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली. आयोगाने ऑक्टोबर २००६ मध्ये अंतिम अहवाल आणि २००७ मध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरणाचा मसुदा सादर केला. शेती क्षेत्रातील प्रगतीचे मोजमाप केवळ उत्पादनाच्या आकडय़ांनी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीने करायला हवे, असे आयोगाने ठामपणे मांडले. आयोगाने किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देण्याची अत्यंत महत्त्वाची सूचना करतानाच, शेतकऱ्यांना शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव दिला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. शेतकऱ्याची व्याख्या करताना त्यात शेतमजुरांचाही समावेश करावा, अशीही शिफारस केली. देशातील लागवडीखाली असलेले क्षेत्र १९२ दशलक्ष हेक्टर आहे. त्यापैकी ६० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. या कोरडवाहू क्षेत्रातून एकूण शेती उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. याकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांना शाश्वत आणि समन्यायी पाणी मिळण्यासाठी धोरणात्मक सुधारणा कराव्यात, पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा, शेती वित्तपुरवठय़ाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी चार टक्के सरळ व्याजाने पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, पीक वाया गेल्याच्या काळात कर्जाची वसुली प्रलंबित ठेवणे आणि त्यावर व्याजमाफी, अशी कायमस्वरूपी व्यवस्था असावी, अशीही शिफारस त्या अहवालात होती. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने कर्ज, महाराष्ट्रात तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज योजना सुरू झाल्या. केंद्र सरकारला शेतीमालाचा हमीभाव जाहीर करताना कायमच स्वामिनाथन यांच्या शिफारशींचा विचार करावा लागला. मात्र आजवर एकाही सरकारला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमीभाव देता आलेला नाही. महागाई वाढेल, असे कारण देऊन सरकारने नेहमीच स्वामिनाथन यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, सरकारवर कायमच या आयोगाच्या शिफारशींचा दबाव राहिला आहे, हेही कमी नाही. स्वामिनाथन यांनी तांदूळ आणि गव्हाची संकरित, जास्त उत्पादन देणारी वाणे विकसित केली. संकरित वाणांपासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होऊ लागला. त्यातून पंजाबसारख्या राज्यात जमिनीचा कस कमी होत असल्याचे आणि भूगर्भातील पाण्यात रसायनांचे अंश धोकादायक पातळीवर पोहोचल्याचेही दिसून आले. कोटय़वधी भारतीयांची भूक भागविण्यास प्राधान्य असल्याने बेसुमार रासायनिक खतांच्या वापराकडे पहिल्या टप्प्यात दुर्लक्ष झाले. पण दुष्परिणाम दिसून येताच डॉ. स्वामिनाथन यांनी शाश्वत शेतीसाठी संशोधन, प्रचार, प्रसिद्धी सुरू केली. त्यांनी ‘सदाहरित क्रांती’ची कल्पना मांडली, पोषणमूल्य-युक्त आणि पर्यावरणीयदृष्टय़ा शाश्वत शेती उत्पादनांवर त्यांनी भर दिला. शेतीमध्ये पर्यावरणास अनुकूल कृषी पद्धतीचा अवलंब करावा. मातीचे आरोग्य टिकून राहावे. जलसंवर्धन आणि संसाधनांचा जबाबदारीने वापर करावा, यासाठी डॉ. स्वामिनाथन कार्यरत राहिले. त्यासाठी त्यांनी ‘स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठातून कृषी आनुवंशिक आणि वनस्पती प्रजननशास्त्रात पीएच. डी. पदवी संपादन केल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी तांदळावर संशोधनाला सुरुवात केली, तेव्हाच्या भारताची प्रतिमा कटोरा घेऊन दारोदारी फिरून धान्य गोळा करणारा देश अशी होती. ती कधीच बदलली आहे. पण त्यापुढले- शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीसह शाश्वत शेतीची दिशा दाखवणारे स्वामिनाथन हे बदलत्या परिस्थितीला नेमका प्रतिसाद देणारे होते. या देशाची माती आणि माणसे यांच्याशी नाते जोडणाऱ्या, शास्त्रज्ञाचा ताठा सोडून वास्तव पाहणाऱ्या या धुरीणाने दाखवलेली ती ‘सदाहरित’ दिशा धोरणकर्त्यांना सापडणे, ही डॉ. स्वामिनाथन यांना उचित आदरांजली ठरेल.