इराणमधील ताज्या हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने घेतल्यावरही इराण म्हणतो की यामागे इस्रायलचा हात आहे. खुद्द इराणींचाही यावर विश्वास नाही..

‘अ’ हा ‘ब’चा शत्रू, ‘ब’ आणि ‘क’ यांच्यातील नातेही वैरभावाचे. त्यात ‘अ’ आणि ‘क’ यांचेही नाते कटू आणि ‘ड’ हा या तिघांचाही शत्रू. असे काहीसे चित्र आज पश्चिम आशियाच्या आखातात दिसते. तेथील परिस्थिती गेल्या शतकातील साठ-सत्तरच्या दशकाप्रमाणे पुन्हा एकदा कमालीची गुंतागुंतीची होऊ लागली असून इराणमधील ताज्या दहशतवादी हल्ल्याने हा गुंता अधिकच वाढतो. या हल्ल्यात शंभरभर दगावले आणि दोन-एकशे जायबंदी झाले. गेल्या सुमारे पाच दशकांत इराणमध्ये इतका नृशंस दहशतवादी हल्ला झालेला नाही. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने घेतली; पण इराणच्या मते यामागे इस्रायल आहे. इराणी सत्ताधारी धर्मगुरूच्या क्रांतिकारी सुरक्षा दलाची माध्यमशाखा असलेल्या ‘तस्नीम वृत्त सेवा’ या अधिकृत यंत्रणेने या संदर्भात इस्रायलवर असा आरोप केला. इराणचे अध्यक्ष इब्राहीम रेईसी यांनी तर थेट ‘झायोनिस्ट’ राजवटीस—म्हणजे इस्रायलला—‘गंभीर परिणामांस’ तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला. इस्रायल यहुदी धर्मीय. आयसिस ही कट्टरपंथी इस्लामी संघटना. या दोघांत ‘तसे’ नातेसंबंध असण्याचे काहीच कारण नाही. तथापि इस्रायलचा इतिहास अशा अनेक व्यभिचारी संबंधांनी भरलेला आहे. गेल्या शतकात दशकभर चाललेले इराण-इराक युद्ध हे त्याचे एक उदाहरण. त्या वेळी अमेरिकेने इराण आणि इराक या दोन्ही युद्धखोरांस शस्त्रपुरवठा केला आणि इस्रायल त्यात मध्यस्थ होता. पण म्हणून इराणमधील ताज्या हल्ल्यामागे इस्रायलचा हात आहे असे काही म्हणता येणार नाही. तसा काही पुरावाही अद्याप नाही. गाझातील युद्ध, हुथी समुद्री चाच्यांचे उद्योग, येमेन-सीरिया आदी देशांतील अशांतता इत्यादींमुळे पश्चिम आशिया कमालीचा अशांत बनला असून या परिसरातील शांततेचे महत्त्व लक्षात घेता हा गुंता समजून घेणे आवश्यक ठरते.

kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला
ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

ताज्या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य ठरलेला इराण हा ‘हमास’ आणि ‘हेझबोल्ला’ या संघटनांचा पाठीराखा आहे. या दोन दहशतवादी संघटना आणि इस्रायल हा एकमेकांविरोधात गाझा संघर्षांत समोर उभे ठाकलेले आहेत. हे सुरू असताना मध्येच उपटलेल्या हुथी बंडखोरांचा आधारस्तंभही पुन्हा इराणच. हा देश शियापंथीय. किंबहुना शिया पंथीयांचे सर्वोच्च शक्तिस्थान म्हणजे इराण. पश्चिम आखाताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न हा देश पाहतो. त्यास मोठे आव्हान आहे ते सौदी अरेबियाचे. हा तेलसंपन्न देश सुन्नी पंथीय. त्यात इस्लामला सर्वाधिक प्याऱ्या मक्का आणि मदिनेवर सौदीचेच नियंत्रण. या देशाची सूत्रे अनौपचारिकपणे का असेना महंमद बिन इब्न सलमान ऊर्फ ‘एमबीएस’ याच्या हाती आल्यापासून सौदी अरेबिया कमालीचा आक्रमक आणि हिंसकही झालेला दिसतो. वास्तविक एमबीएस अद्याप तरी राजपुत्र आहे; राजा नाही. पण विद्यमान सम्राटाच्या अनेक चिरंजीवांतील सर्वात लाडका उत्तराधिकारी असा त्याचा लौकिक. त्या अर्थाने आपण सम्राटपदी आरूढ झालोच, असे त्याचे वर्तन असते. त्याच्या या हडेलहप्पी वर्तनाची चुणूक येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात जेव्हा थेट ‘एफ १६’ डागण्याचा आदेश एमबीएसने दिला तेव्हा त्यातून आली. त्याच्या या कृत्याने एमबीएस आणि सौदीस ही विमाने देणारी पाठीराखी अमेरिकाही हादरली. येमेनमधील त्याच्या या आततायी प्रतिहल्ल्यापासून इराणने हुथी बंडखोरांची रसद वाढवली आणि त्या देशाचे सौदीबरोबरचे संबंध आणखी चिघळले.

 त्यात ढासळत्या इराण-अमेरिका संबंधांची भर पडली. इराणचे सत्ताधीश धर्मवादी आहेत आणि अमेरिकेस जुमानण्यास ते तयार नाहीत. या इराणींना माजी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शांत करून कराराच्या जाळय़ात ओढण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला होता. पण नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनेर याच्या सौदी आणि इस्रायली हितसंबंधांपोटी इराणला पुन्हा दुखावले. हे कुशनेर यहुदी- म्हणजे ज्यू – आहेत आणि त्यांचे इस्रायली नातेसंबंधही सर्वश्रुत आहेत. या सगळय़ातून इराण पुन्हा संघर्षांच्या भूमिकेत गेला आणि अमेरिकेने त्यावर आर्थिक निर्बंध लादल्याने त्या देशाची आर्थिक स्थिती चांगलीच चिघळली. आर्थिक संकटात आलेला कोणताही नेता करतो तेच मग इराणी नेतृत्वाने केले. त्या देशाचे धर्मवादी असलेले नेतृत्व अधिकच कट्टर धर्मवादी बनले. या मुद्दय़ावर इराणबाबत बरे बोलण्यासारखे काहीही नाही. त्या देशांतील महिलांविरोधात इराण शासकांच्या भूमिकेची निंदा करावी तितकी कमीच असेल. देशांतर्गत समस्यांवर गांजलेले आणि ग्रासलेले नेते नेहमीच परकीयांस बोल लावतात. इराणच्या राजवटीचे तसे झाले आहे. गेली पाच वर्षे या देशातील राजवट मागास इस्लामी मार्गाने निघालेली असून त्या देशातील नागरिक स्वपक्षीय सरकारविरोधात अक्षरश: हतबल झालेले दिसतात. त्याचमुळे आपल्याच देशाच्या सरकारकडून या हल्ल्यासाठी इस्रायलला बोल लावला जात असला तरी त्यावर खुद्द इराणींचाच विश्वास नाही.

हे खरे की इस्रायलविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हमास या संघटनेस इराणची मदत आहे. शेजारील लेबॅनॉनमधील हेझबोल्ला या दहशतवादी संघटनेसही इराण साहाय्य करतो, हेही खरे. पण तरी इस्रायल या इराणी हल्ल्यास जबाबदार असे म्हणता येत नाही. हा हल्ला झाला इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ८०० किमीवर असलेल्या शहरात. तेथे नागरिक कासिम सुलेमानी या इराणी दंतकथा बनलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चौथ्या स्मृतिदिनी एकत्र आले होते. हा सुलेमानी इस्लामिक रिव्हल्यूशनरी गार्ड या कराल संघटनेचा प्रमुख होता. चार वर्षांपूर्वी अमेरिकी द्रोण हल्ल्यात तो मारला गेला. इराणमधील अयातोल्ला खोमेनी यांच्या १९७९ सालच्या क्रांतीपासून स्थानिक सरकारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुलेमानी याने आखाती परिसरात अनेक छुपे हल्ले घडवून आणले. सीरिया आणि येमेन या देशांत प्रस्थापित सरकारांविरोधात जनतेत उठाव घडवून आणण्यामागेही त्याचा हात होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सुलेमानीस ‘अमेरिकेचा शत्रू’ ठरवले होते आणि इस्रायललाही त्याचे मोठेपण खुपतच होते. तेव्हा त्याच्या हत्येत या सगळय़ांचा हात असणार हे उघड आहे. तेव्हापासून इराणचे या प्रदेशाशी असलेले नातेसंबंध अधिकच बिघडले.

त्यात आता हा दहशतवादी हल्ला. तोही लेबेनॉनमध्ये ‘हमास’चा प्रमुख नेता सालेह अल अरिरी मारला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडवून आणलेला. सालेह यास इस्रायलने मारल्याचा वहीम आहे. पण त्या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलने अद्याप घेतलेली नाही. त्याच वेळी इराणमधील हल्ला आपण घडवून आणल्याचे ‘आयसिस’ सांगते. या हल्ल्यास तोडीस तोड उत्तर दिले जाईल असा इशारा इराणने दिला आहे. हे उत्तर म्हणजे काय हा प्रश्न. ते इस्रायलला दिले जाणार की ‘आयसिस’ला? आणि आयसिसला धडा शिकवायचा म्हणजे काय? या संघटनेचे ना कोठे कार्यालय आहे ना कोठे तळ! त्यामुळे अशा संघटनेस धडा शिकवायचा म्हणजे कोणाविरोधात कारवाई करायची हा प्रश्न.

या आणि अन्य अशा प्रश्नांच्या उत्तरात त्या प्रदेशातील आणि म्हणून जगातील शांततेची हमी दडलेली आहे. गेली हजारो वर्षे हा परिसर जागतिक स्थैर्यासाठी कायम महत्त्वाचा आहे आणि अनेकांच्या प्रयत्नांनंतरही या शांततेची हमी कोणास देता आलेली नाही. सध्या पंचाईत अशी की जागतिक स्तरावर ज्याचे काही ऐकावे असे पोक्त आणि शहाणे नेतृत्व नाही. अशा वातावरणात पश्चिम आशियाचे वाळवंट पुन्हा पेटल्यास युक्रेन-रशिया, गाझात हमास-इस्रायल युद्ध, चीन-तैवान तणाव आदीत आणखी एकाची भर. वर्षांच्या प्रारंभीच नमनात इतके घडाभर ‘तेल’ गेल्याने आगामी वर्ष कातरता वाढवणारे ठरते.