दिल्लीश्वरांच्या हट्टापायी काय काय पात्रांस जवळ करण्याची वेळ भाजपने स्वत:वर आणली हे पाहून त्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची कीव यावी.

प्रवासाची वेळ जवळ आली की रेल्वेच्या यार्डात बराच काळ उभे करून ठेवलेले डबे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू केले जाते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र हे असे रेल्वे स्थानकाचे स्मरण करून देणारे आहे. रेल्वे स्थानक आणि हे राजकीय चित्र यातील एक साम्य आणि एक फरक तेवढा नमूद करायला हवा. साम्य असे की रेल्वेच्या यार्डात बराच काळ दुर्लक्षित राहिलेल्या डब्यांप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांस स्वत:स कोणत्या ‘इंजिना’स जोडून घ्यावयाचे हे ठरवण्याचा अधिकार नाही. यातील एका गाडीचे दोन चालक दिल्ली-स्थित असून ईडी-पिडी, केंद्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणा आदी ‘रिमोट कंट्रोलां’च्या साहाय्याने यातील अनेक डबे एकाच भगव्या रंगाच्या गाडीस कसे जोडले जातील; याचे अव्याहत प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. ही गाडी अतिजलद मानली जाते आणि तिच्या चालकांचे सामर्थ्य लक्षात घेता तिला अखंड ‘हिरवा कंदील’ मिळत राहील याचीही व्यवस्था आहे असे म्हणतात. फरकाचा मुद्दा असलेली दुसरी गाडी सामान्य ‘पासिंजर’ असून तिचे चालक आपल्या गाडीस कोणता रंग द्यावा याच विचारात गर्क दिसतात. तसेच या गाडीस नक्की कोणते डबे लागले जाणार, किती लागणार आणि मुख्य म्हणजे या गाडीचे इंजिन कोणते आणि त्याची दिशा कोणती या प्रश्नांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्यता ही की पहिल्या अतिजलद गाडीने नाकारलेले अथवा सोडून दिलेले काही डबे स्वत:स या दुसऱ्या ‘पासिंजर’ गाडीस जोडले जातील. असो. रेल्वे यार्डातले डबे आणि राजकीय पक्ष यांतील रूपक येथे संपते. ते गंमत म्हणून ठीक. पण त्यानंतर या पक्षांच्या राजकीय अपरिहार्यतेचा विचार पुरेशा गांभीर्याने करायला हवा. कारण यातील राजकीय पक्षांचा संघर्ष आगामी निवडणुकांतील गांभीर्य दाखवून देतो.

या संघर्षाच्या एका बाजूस आहे ‘चारसो पार’चा दावा करून स्वत:च स्वत:च्या पिंजऱ्यात अडकलेला भाजप. या पक्षाचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास गेल्या निवडणुकांप्रमाणे राज्यातील ४८ जागांतील ४२ जागांची आशा बाळगणे त्या पक्षास दिवसेंदिवस अवघड वाटू लागले आहे. एके काळचा जोडीदार असलेल्या शिवसेनेस धडा शिकवण्याच्या ऊर्मीतून भाजपने शिवसेना फोडली खरी. पण त्यामुळे तयार झालेले विवर भरून काढण्यासाठी त्या पक्षास काय काय करावे लागत आहे हे पाहिल्यावर त्या पक्षाची आणि विवर भरून काढण्यासाठी त्यात उडी घेऊ इच्छिणाऱ्या पक्षांची अगतिकता लक्षात यावी. एकनाथ शिंदे आणि कंपूतील खुद्द शिंदे आणि एखाद-दुसरा सोडल्यास बाकीच्या राजकीय उडाणटप्पूंस स्वीकारण्यास भाजप तयार नाही. यातील बऱ्याच गणंगांविरोधात भाजपत मोठी अंतर्गत नाराजी असून त्याचा फटका भाजपच्या अंकगणितांस बसणार नाही; असे अजिबात नाही. उलट या सगळ्या गटातटांतील तणाव लक्षात घेता तो बसणार हे निश्चित. ठाकरे यांच्या गटातील १३ खासदार शिंदे यांच्यासमवेत आहेत. त्या सर्वांस उमेदवारी देणे म्हणजे भाजपने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणे. तो पक्ष असे काही आततायी कृत्य करणे अशक्य. तितकी दुर्दैवी परिस्थिती भाजपवर आलेली नाही. पण या गणंगगंपूंस हाताळताना ती लवकरच येईल. खेरीज भाजपच्या ‘गरज सरो, वैद्या मरो’ या वृत्तीमुळे उमेदवारी नाकारली गेलेले भिन्नपक्षीय अन्य उमेदवारांचे ‘दिल से’ स्वागत करतील याची सुतराम शक्यता नाही. ते राणा दाम्पत्य काय किंवा काही राजघराण्यांचे वंशज काय! दिल्लीश्वरांच्या हट्टापायी काय काय पात्रांस जवळ करण्याची वेळ भाजपने स्वत:वर आणली हे पाहून त्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची कीव यावी.

आणि आता हे सर्व कमी पडतात म्हणून की काय राज ठाकरे यांच्या मनसेचे ‘इंजिन’ भाजप मागच्या बाजूने आपल्या गाडीस जोडताना दिसतो. अन्य काही पक्षीय डब्यांप्रमाणे हे इंजिनही बराच काळ यार्डात होते. त्यामुळे त्यास गती देण्यात काही काळ जाईल. या मनसेच्या इंजिनास भाजपच्या गाडीस ढकलण्यात जितका रस आहे त्यापेक्षा अन्य गाड्यांची ‘तुतारी’ बुजवण्याची आणि ‘मशाल’ विझवण्याची अधिक निकड आहे. अलीकडच्या काळातील स्थितीवादामुळे हे इंजिन स्वत:हून धावू शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. आताही ते किती ताकदीने धावेल हा प्रश्न आहेच. पण रेल्वे गाडी घाटातून जाताना मागे इंजिन असण्याची म्हणून एक उपयुक्तता असते. त्याचा विचार करून भाजपस हे मनसे इंजिन आपल्या गाडीस जोडून घेण्यात स्वारस्य असणार. राजकारणात असे प्रसंग येतात. पण त्यामुळे भाजपची घाट-कोंडी झाल्याचा संदेश राजकीय वातावरणात पसरत असून ठाकरे नावाच्या इंजिनाच्या मदतीशिवाय दुस्तर हा घाट ओलांडणे त्यास शक्य नाही, असे दिसते.

दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांस कोठे जायचे आहे हे ठाऊक आहे; पण मार्गाबाबतचा त्यांच्यातील गोंधळ लपवणे अवघड होत असावे. मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेस सहानुभूती आहे; पण तिचा सुयोग्य वापर करण्यासाठी उमेदवारांची वानवा! जे नेते अजून त्यांच्यासमवेत आहेत त्यांच्याबाबत ‘‘आत्ता होते; गेले कुठे’’ असा प्रश्न कधी विचारावा लागेल हे सांगता येत नाही अशी स्थिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीस सुप्रिया सुळे यांच्या बारामतीचा घोर लागलेला आणि उरलेला वेळ अजितदादांकडील नाराज गळास लावण्यात चाललेला. काँग्रेसची अवस्था याहून बिकट. उरल्या-सुरल्या पांघरुणात पाय झाकावयास जावे तर डोके उघडे पडते आणि ते डोक्यावर ओढून घ्यावे तर पाय पांघरुणाबाहेर. असा हा पेच. या सगळ्याच्या जोडीला आपल्या भुणभुणीने सतत झोपमोड करणाऱ्यांसारखी वंचित आघाडी. वास्तविक प्रकाश आंबेडकर डावीकडे पाहत उजवा रस्ता कसे निवडतात हे जगास माहीत. आपण तन-मनाने भाजपविरोधात आहोत, असे ते दाखवतात. पण प्रश्न तन-मनाचा नसतो. त्यानंतरच्या ‘न’चा असतो हे समस्त राजकीय वर्तुळातील उघड गुपित. तेव्हा त्यांना हाताळण्याचा अनुभव ‘ओला’, ‘उबर’ टॅक्सी सेवेचे स्मरण करणारा ठरतो. या टॅक्सीचालकांस जेव्हा आपणासाठी यावयाचे नसते; तेव्हा ते येत नाहीतच पण तरी भाडे रद्द करण्याचे पाप आणि भुर्दंड मात्र ते आपल्या गळ्यात घालू पाहतात. त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांस भाजपविरोधात ‘इंडिया’ आघाडीचा घटक होण्याची ‘आतून’ इच्छा नाही, पण आपण युतीस तयार नाही असेही त्यांस दाखवावयाचे नाही. हा दुसरा पेच.

त्यातून विरोधक कसा मार्ग काढतात हे पाहणे महाराष्ट्राचे राजकीय उद्बोधन करणारे ठरेल, यात शंका नाही. हा या राज्यातील राजकारणाने गाठलेला नवा तळ. इतके दिवस काही एक राजकीय विचार, तात्त्विकादी मतभेद राजकीय फाटाफुटीमागील कारण ठरत. आता तो काळ इतिहासजमा झाला. आजचा काळ उद्याचे वा परवाचे राजकारण पाहण्याचा नाही. तर आजचे आणि त्यातही आताचे काय ते बोला, यावर आपले राजकारण येऊन ठेपलेले आहे. म्हणून आजच्या राजकारणास रेल्वे स्थानक आणि यार्डातील डब्यांची उपमा चपखल ठरावी. निवडणुकांच्या हंगामात या दोन्ही रेल्वे गाड्या आता धावू लागतील. तथापि या रेल्वे गाड्यांतील किती डब्यांत ‘प्रवासी’ आहेत आणि किती डबे प्रत्यक्षात मालगाडीचे- त्यातही रिकामे- आहेत इतके कळणे फक्त आता बाकी.