चैतन्य प्रेम

माणसाचं मन हे त्याच्या आंतरिक ऊर्जेचं मोठं भांडार आहे. अगदी त्याचबरोबर हेच मन नकारात्मक विचारांच्या वावटळीत सापडलं, तर त्याच्यासाठी जणू नरकयातनांनी भरलेला तुरुंग आहे. मन जर सकारात्मक विचारांनी प्रेरित असेल, तर माणसाचा स्वभाव आनंदी होतो. शारीरिक तक्रारीही कमी होतात. पण हेच मन न्यूनगंडानं पछाडलं, नकारात्मक विचारांत गुंतलं, खचलं, धास्तावलं, काळजीनं व्यापलं, तर त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो! आता वैद्यक शास्त्रज्ञसुद्धा या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत, की मानसिक चिंतेमुळे अनेक रोगांची पकड घट्ट होते. स्वामी जगदात्मानंद यांच्या ‘जगण्याची हातोटी’ (रामकृष्ण मठ प्रकाशन, नागपूर) या पुस्तकात डॉ. पीटर ब्लेथ यांचे, तणावातून निर्माण होत असलेल्या शारीरिक रोगांबाबतचे संशोधन उद्धृत केलं आहे. ‘‘उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, दमा, वातरोग, अर्धशिशी, भूक न लागणे, त्वचारोग आदी अनेक रोगांची कारणं मनोदैहिक असतात,’’ असा डॉ. ब्लेथ यांचा निष्कर्ष आहे. आपल्या अर्ध्याहून अधिक रोगांची कारणं मानसिक असतात, हे याच ग्रंथात नमूद आहे. अगदी मानदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता यांचं मूळ बरेचदा मानसिक तणावांत लपलेलं असतं. पण ते न जाणवल्यानं आपण मनाकडे पुरेसं लक्ष न देता शरीराकडे लक्ष देतो. शरीरावर औषधांचा मारा करतो, पण मन दुर्लक्षितच राहतं. बरं मानसिक तणावांचं मूळ तरी कशात आहे हो? तर, ‘न होता मनासारिखे दु:ख मोठे’ यात आहे! मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, यातच दु:खाचं मूळ आहे. निसर्गदत्त महाराजांनी यावर अंतर्मुख करणारा प्रश्न केलाय! ते म्हणतात, ‘‘गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, यात दु:खाचा उगम आहे की मुळात त्या गोष्टीच मनात आहेत, हे दु:खाचं कारण आहे?’’ तर गोष्टीच मनात आहेत, हेच तगमगीचं कारण आहे. बरं, त्या नुसत्या साध्या अपेक्षा नाहीत, तर कमालीच्या अवास्तव अपेक्षांचाही त्यात भरणा आहे. मग त्या कशा पूर्ण होतील? आणि मागे म्हटलं ना? ‘जे आहे त्यात आनंद नाही आणि जे नाही त्याची आस आहे,’ ती गत आहे! त्यामुळे जे नाही त्यासाठी झुरण्यानंच अंत:करणात असमाधान भरून आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘असमाधान हा रोग सर्वानाच आहे. त्यामुळे रोगाच्या यादीतून त्याचं नावच गेलं आहे.’’ तेव्हा आपल्या मनात सतत असमाधान आहे, सतत काळजी, चिंता, भीती आहे. मन या गोष्टींनी सदोदित व्यापून असणं हा मनाचा रोग आहे, याची जाणीवच नाही. जाणीव नाही म्हणून त्यावर काही उपाय करायला हवा, याचं भानही नाही. त्यामुळे जे आता आपल्यापाशी नाही त्यातच आनंद असला पाहिजे, या जाणिवेनं मन सदैव त्यामागे धावत आहे. ती गोष्ट खऱ्या सुखाची आहे की नाही, याची खात्रीही नसताना हे धावणं सुरू आहे. त्या धावण्यातच दमछाक होत आहे. ओशो म्हणत, ‘‘तुमच्याजवळ काय आहे आणि काय नाही, याच्याशी सुखाचा काही संबंध नाही. तुम्ही काय आहात, याच्याशी सुखाचा संबंध आहे. वस्तू कितीही गोळा केल्या तरी त्यानं सुख मिळेल असं नाही. उलट कदाचित तुमच्या काळजी वाढतील, वैताग वाढेल. पण सुख वाढेलच, असं नाही.’’ तेव्हा आपण मनानं आनंदी आहोत का, यालाच खरं महत्त्व आहे. फकिरापाशी काही नसतं व त्याला फिकीरही नसते, म्हणूनच तो आनंदात असतो. आपल्यापाशी खूप काही आहे, सुख मात्र नाही! ते हवं असेल, तर सुखाभासांमागे न धावता ज्यांनी खरं सुख मिळवलं व ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ अशी प्रतिज्ञाही केली, त्या संतांच्या बोधाकडेच आपल्याला वळावं लागेल.