श्रीपाद कोठे
या वर्षीच्या विजयादशमीला (२ ऑक्टोबर) संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षी हिंदू कालगणनेप्रमाणे संघाचा जन्मदिवस आणि इंग्रजी कालगणनेप्रमाणे महात्मा गांधींचा जन्मदिवस एकाच दिवशी येतो आहे. याआधी असा योगायोग २००६ साली होता. या योगायोगातील एक आणखी गंमत म्हणजे; २००६ हे संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते, तर हे वर्ष संघाचे जन्मशताब्दी वर्ष आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीजी हा नेहमीच वादांचा, चर्चेचा, मतभेदांचा, गैरसमजांचा विषय आहे. संघ समर्थक आणि स्वयंसेवक, गांधीजींचे समर्थक आणि अनुयायी, तसेच दोघांच्याही प्रभावाखाली नसलेले लोक; या साऱ्यांमध्येच ‘संघ व गांधी’ या विषयाबाबत बराच गोंधळ आहे. संघाची हिंदुत्वाची भूमिका, मुस्लीम समाजाबाबतचे दोघांचे दृष्टिकोन आणि देशाच्या फाळणीनंतर सहा महिन्यांच्या आत झालेली गांधीजींची हत्या; या कारणांनी निर्माण झालेले संशयाचे धुके अद्यापही पूर्ण विरले आहे असे म्हणता येत नाही.

गांधीजी आणि संघ दोघांच्याही विचार- आचारातील स्पष्टता आणि ठामपणा हा अन्य व्यक्ती, विचार किंवा संस्था यांच्याबद्दल आकस आणि द्वेष बाळगत नाही. परंतु हे समाजाच्या पचनी पडत नाही. समाजाच्या या मर्यादेचा परिणाम त्याच्या ‘संघ आणि गांधीजी’ या विषयाच्या आकलनावरही झालेला आहे. सुदैवाने गांधीजी स्वत: आणि संघ नेतृत्व या विषयाच्या बाबतीत कधी एकांगी झाले नाहीत.

गांधीजी २५ डिसेंबर १९३४ रोजी सेवाग्राम आश्रमाजवळील संघाच्या वर्धा जिल्हा शिबिरात गेले होते. दुसऱ्याच दिवशी सेवाग्राम आश्रमात गांधीजी व डॉ. हेडगेवार यांची भेटही झाली होती. काँग्रेस अंतर्गतच संघासारखे दल का काढले नाही, या गांधीजींच्या प्रश्नावर काँग्रेसचे कार्य राजकीय आहे आणि संघ मात्र स्वयंप्रेरणेने देशासाठी काम करणारे स्वयंसेवक घडवतो आणि या कामात राजकारण हा अडथळा ठरतो, असे उत्तर डॉ. हेडगेवार यांनी दिले होते. त्यापूर्वी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून विदर्भातील जंगल सत्याग्रहात सहभागी होऊन डॉ. हेडगेवार यांनी कारावासही भोगला होता. महात्मा गांधी यांनी गोंदिया शहराला भेट दिली तेव्हाही संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले होते.

संघाचे कार्य, तसेच डॉ. हेडगेवार यांच्याविषयी गांधीजींच्या मनात आस्था आणि आदर होता. काँग्रेस संघटनेतील बेशिस्त आणि विस्कळीतपणाने ते व्यथित होत. संघाने उण्यापुऱ्या दहा वर्षात भरीव संघटन कसे केले याचे त्यांना आश्चर्य वाटे. हरिजन साप्ताहिकातील लेखात संघाशी आलेल्या आपल्या संबंधांवर गांधीजींनी लिहिलेही होते. परंतु गांधीजींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अधिक संबंध आला तो संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याशी. डॉ. हेडगेवार यांनी १९४० मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यावेळी जगातील स्थापित व्यवस्थांच्या उलथापालथीची सुरुवात झाली होती. त्यात भारताचे स्वातंत्र्य हा विषयही होता. गांधीजी आणि गुरुजी यांच्या संबंधांना ती पार्श्वभूमी होती. हिंदू मुस्लीम एकतेचे गांधीजींचे विचार आणि अहिंसा याबद्दल दोघा नेत्यांत काही मतभेद होते. वास्तविक गांधीजींच्या या दोन्ही विषयांच्या मूलभूत धारणेशी गुरुजींचा कोणताही मतभेद नव्हता. परंतु प्राप्त परिस्थितीत त्या विषयांची मांडणी आणि आग्रह किती तसेच कसा असावा याबद्दल गुरुजींची मते निराळी होती. कारण गांधीजी ज्या मूलभूत सखोल रीतीने हे विषय मांडत होते; ते तसे समजून घेण्याची समाजाची क्षमता नव्हती आणि त्यांना योग्य प्रतिसाद देण्याची जगाची क्षमता आणि परिस्थिती नव्हती. त्यामुळे व्यावहारिक भूमिका असायला हवी असे गुरुजींना वाटत असे. दोघांमध्ये या विषयांवर प्रत्यक्ष चर्चाही झाली. पण दोघांच्याही मनात परस्पर कटुता अजिबात नव्हती.

गांधीजी व गुरुजी यांची अखेरची भेट १२ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्लीच्या बिर्ला भवनात झाली. त्या दिवशी गुरुजींना निरोप मिळाला की, गांधीजी त्यांना भेटू इच्छितात. त्यावेळी सुरू असलेल्या हिंदू मुस्लीम दंगलींच्या पार्श्वभूमीवर गुरुजींनी एखादे पत्रक काढावे अशी सूचना गांधीजींनी त्यांना त्या भेटीत केली. परंतु ‘आपण समाजाचे नेते आहात. त्यामुळे आपणच पत्रक काढावे आणि वाटल्यास त्यात माझा उल्लेख करावा’ असे उत्तर गुरुजींनी दिले. यानंतर १६ सप्टेंबर १९४७ रोजी संघाच्या शाखेत गेलेल्या गांधीजींनी या भेटीचा उल्लेख केला होता.

दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. नथुराम गोडसे या माथेफिरूने हे अविचारी आणि निंदनीय कृत्य केले. नथुराम हा हिंदुत्ववादी आहे आणि काही काळ संघाच्या शाखेत जात होता या बाबींचा आधार घेऊन; तत्कालीन काँग्रेस पक्षाने आणि सरकारने संघाविरुद्धच्या आपल्या द्वेषाला वाट मोकळी करून दिली. वास्तविक गांधीजींची हत्या हा गोळवलकर गुरुजी आणि संघ दोघांनाही मोठा धक्का होता. संघाच्या इतिहासात कधी नव्हे ते गांधीजींच्या हत्येचा शोक म्हणून संघाच्या देशभरातील शाखा १३ दिवस बंद होत्या. अगदी संघाचे सरसंघचालक निवर्तल्यावर देखील कधी शाखा बंद ठेवण्यात आलेल्या नाहीत. तत्कालीन शासनाने गांधीजींच्या हत्येचा आरोप ठेवून गुरुजींना अटक केली. नंतरचा संघ आणि तत्कालीन सरकार यांच्यातील संघर्ष मोठा आहे. परंतु एक मात्र खरे की, गुरुजी किंवा संघ यांच्यावर आरोपपत्र निश्चित करणे किंवा खटला दाखल करणे यात सरकारला यश मिळाले नाही. संघाविरुद्धच्या प्रचारात मात्र सरकार कमालीचे यशस्वी झाले. इतके की, परिणामी आजवर संघाकडे संशयाने पाहिले जात आहे. आता अनेकांनी वास्तव समजून घेतले असले तरीही समाजाच्या मनातून अद्याप तो संशय पुरता पुसला गेलेला नाही. गांधीजींशी संघाचे नाव अशा रीतीने कायमचे जोडले गेलेले आहे.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नेहरू व गृहमंत्री सरदार पटेल यांना लिहिलेल्या पत्रात गुरुजींनी गांधीजींना ‘महान समन्वयकर्ता’ म्हटले आहे. ६ ऑक्टोबर १९६९ रोजी गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगली येथे केलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींचे व्यक्तिमत्त्व प्रात:स्मरणीय असल्याचे म्हटले होते. त्यानिमित्ताने विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’च्या विशेषांकासाठी गुरुजींनी लेख लिहिला होता. गांधीजींच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय पैलूंची चर्चा करतानाच त्यांच्याबरोबरच्या मतभेदांचीही विस्तृत चर्चा गुरुजींनी त्यात केली आहे. गुरुजी म्हणतात, ‘महात्माजींच्या अशा विचारांशी मतभिन्नता असणे हे राष्ट्राचा शुद्ध विचार करणाऱ्याच्या दृष्टीने स्वाभाविक व योग्य मानले पाहिजे. पण महात्माजींचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंचे होते. त्यांच्या अगणित श्रेष्ठ, पवित्र गुणांची उपेक्षा व हेटाळणी पाहून मन उद्विग्न होते. त्यांच्या या गुणांमुळे जनमनात त्यांच्यासंबंधी अपार प्रीती व श्रद्धा होती व ती राहील. राहिली पाहिजे.’

गुरुजींच्या काळातच संघात दररोज म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्रात गांधीजींच्या नावाचा समावेश करण्यात आला. गांधीजींच्या हत्येच्या आरोपाखाली जे भोगावे लागले त्यामुळे स्वयंसेवकांच्या मनात गांधीजींबद्दल एक अढी होती हे वास्तव आहे. त्यात गांधीजींचा काय दोष, या प्रश्नाशी त्यांना देणेघेणे नव्हते. त्यामुळे एकात्मता स्तोत्रात गांधीजींचा उल्लेख अनेक स्वयंसेवकांना रुचला नव्हता. परंतु संघाने आपल्या भूमिकेत बदल केला नाही. उलट स्वयंसेवकांची मने बदलण्याचा मार्ग स्वीकारला.

राष्ट्रीय विषयांच्या संदर्भात वेळोवेळी गांधीजींच्या विचारांचा मागोवा घेण्यात संघाने कमीपणा मानला नाही. दत्तोपंत ठेंगडी या ज्येष्ठ प्रचारकांनी ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना केली, त्यावेळी गुरुजींनी त्यांना कार्ल मार्क्स आणि गांधीजींच्या विचारांचा तौलनिक अभ्यास करण्यास सांगितले होते. संघ कार्यकर्त्यांच्या भाषणांमध्ये, बौद्धिक वर्गांमध्ये, लिखाणात गांधीजींच्या विचारांचा आदरपूर्वक उल्लेख असतो. वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही काही वर्षांपूर्वी गांधीजींनी सांगितलेल्या सात सामाजिक पातकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. अनेक सर्वोदयी व्यक्ती आणि संस्था यांच्याशी संघाचे नियमित संबंध राहिले आहेत. गांधीजींचे आध्यात्मिक वारस समजले जाणारे आचार्य विनोबा भावे त्यांच्या भूदान यात्रेच्या काळात उत्तर प्रदेशातील संघाच्या शाखेत गेले होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस विनोबांना पवनारच्या परमधाम आश्रमात जाऊन भेटले होते. आणीबाणीच्या काळातही संघाच्या नेत्यांचा विनोबांशी संपर्क होता. सेवाग्राम आश्रमात संघाचा प्रशिक्षण वर्गही झाला आहे. गांधी विचारांच्या, गांधीजींच्या प्रेरणेने काम करणाऱ्या अनेकांना संघाने विविध उत्सवांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले आहे. डॉ. अभय बंग हे त्याचे एक उदाहरण. अनेक गांधीवादीही स्वत:हून संघाच्या लोकांना भेटतात.

गोरक्षा, ग्रामविकास यासारखे गांधीजींचे विचार संघाने आपल्या कार्यात अंतर्भूत केले आहेत. गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग तर संघाने जगून दाखवला आहे. संघावरील तीन बंदींपैकी पहिल्या दोन बंदींच्या वेळी संघाने ज्या पद्धतीने सत्याग्रह केला; त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. एक मात्र खरे की, गांधीजींविषयीचे गैरसमज दूर करण्याचा किंवा त्यांच्याविषयीची अढी काढून टाकण्याचा विशेष प्रयत्न संघ करीत नाही. नथुराम गोडसेचे समर्थन करण्याच्या अतिउत्साहाचे खंडन संघ करीत नाही. संघाची याबाबत काही भूमिका असू शकते. परंतु तेवढ्याने संघ गांधीविरोधी आहे आणि संघानेच गांधीजींची हत्या केली असा निष्कर्ष काढणे हा आततायीपणा म्हणावा लागेल. संघ कोणत्याही व्यक्तीचा किंवा विचारांचा अनुयायी नाही. अन् कोणत्याही व्यक्तीचा व विचाराचा विरोधकही नाही. योग्य, अयोग्य विवेक करून समाजासाठी, राष्ट्रासाठी काय करावे याचा विचार संघ करतो. गांधीजींच्या संबंधातही संघाची हीच भूमिका आहे.

-श्रीपाद कोठे, संघविचारांचे अभ्यासक

shripad.kothe@gmail.com