भाऊ पाध्ये (६ नोव्हेंबर १९२६ ते ३० ऑक्टोबर १९९६)
सेक्स वर्ज्य करून तुम्हाला लिहिता येत नाही का, असा प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला मी सुप्रसिद्ध रशियन कथाकार अँतोन चेकॉव्ह यांच्याप्रमाणेच कथेतूनच उत्तर देईन- ‘एका तरुण-तरुणीचे प्रेम जमले. त्यांनी लग्न केले. (कदाचित त्यांचे प्रेम असफलही झाले असेल!) त्यामुळे ते सुखी झाले. (कदाचित ते दु:खीही झाले असतील!)’ या कथेमध्ये सेक्स मुळीच आलेला नाही की अश्लीलता नाही! पण ती वाचून वाचक मात्र एवढंच म्हणेल, ‘ठाऊक आहे आम्हाला ही गोष्ट ! पण एवढ्या गोष्टीसाठी आमच्या गळ्यामध्ये तुमचे नियतकालिक वा पुस्तक मारून आम्हाला गंडवता काय?’

सेक्स किंवा ‘लैंगिकता’ ही एक ईश्वरासारखी सर्वव्यापी बाब आहे, हे यापूर्वीच माझ्या लक्षात आलं होतं. अॅडम आणि ईव्हने जेव्हा ज्ञानफळ भक्षण केले, तेव्हा त्यांना प्रथम जाणीव झाली ती लैंगिक उघडेपणाची. तो त्यांनी झाकला आणि आता लैंगिक भाबडेपणापर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. परमेश्वर म्हणतो की स्वर्गात उघडेपणा आहे आणि तुला तो गाठायचा आहे. यासाठी फक्त तू इथे नीट वाग, मग तुला तिथे उघडेपणा अनुभवता येईल. मी म्हणतो, तू इथे भाबडेपणा टाकून दे, म्हणजे तुला इथेच स्वर्ग अनुभवता येईल.

हे साहित्यामध्ये आम्हाला सांगायचे आहे. म्हणजेच लैंगिकतेला सामोरे जायचे आहे. सेक्सबद्दल आम्हाला मोकळेपणाने आणि बिनधास्तपणे बोलायचे आहे. कशाला लपवून ठेवायच्या या गोष्टी?

सेक्स वर्ज्य करून कादंबरी लिहिणे म्हणजे एखाद्या सौंदर्यावतीबरोबर गवारीची भाजी मोडत बसणे होय. चेकॉव्ह म्हणत असे की रंगभूमीवर एकदा प्रॉपर्टी म्हणून बंदूक आणलीत की ती उडवावीच लागेल. त्याप्रमाणे बाईने एकदा आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रवेश केला की सेक्सचा करिष्मा दाखवणे हे कथा-कादंबरीकाराचे परम कर्तव्यच ठरते. सेक्स वर्ज्य करून ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहावं ना तसं. इथे प्रत्येक लेखकाला लेखनस्वातंत्र्य आहे.

सेक्ससंबंधी कुणाला आडपडद्यामागून बोलावंसं वाटतं, कुणाला सूचकतेने बोलावंसं वाटेल. कुणी कचरत-कचरत सांगतील- नाना परी. प्रत्येकाच्या मनावर एक ‘इनोसन्स’ (म्हणजे भाबडेपणा) चे दडपण असते. काही मंडळी या ‘इनोसन्स’चे आपले दडपण समाजहिताच्या गोष्टी बोलून झाकण्याचा प्रयत्न करतात. ‘वासू नाका’ लिहिल्यानंतर माझा एक खादीधारी मित्र मला भेटला. मला म्हणाला, ‘लिहू नये असं काही. त्याचा समाजावर दुष्परिणाम होतो.’ त्याच्या लेखी सेक्सवरील एकूणच लिखाण किंवा ‘गर्द’सारखे भयंकर रसायन हे तरुण पिढीच्या हातात पडणे हे सारखेच धोक्याचे आहे. मला त्या मंडळींची विकृत पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे ते असं का म्हणतात ते लक्षात यायला वेळ लागला नाही. लैंगिक वाङ्मय वाचून तरुण पिढी सहजच उद्दीपित होईल आणि त्यांचे आरोग्य गर्दसारखे बिघडेल, असा त्यांचा सरकारी खात्यातला दृष्टिकोन आहे. ते स्वाभाविकच लैंगिकतेच्या विषयावर ‘टची’ आहेत आणि त्यांनी जीवनात लैंगिकतेचा असा अनुभव आला आहे की त्यामुळे त्यांची सोसण्याची मानसिक शक्ती संपली आहे. ते वासूनाक्यावरील प्रति-क्रिया व्यक्त करताना इम्पेशंट वाटत होते.

आपल्याकडे सेक्स ही बदनाम चीज आहे. ती गर्द आहे! ती मद्या आहे! ती जहर आहे! आपल्या मंडळींचे हे विचार ऐकत ऐकतच मी लहानाचा मोठा झालो आहे.

पूर्वी आपल्या लेखकांचे नायक-नायिका बागेत, समुद्राच्या काठी किंवा निसर्गरमणीय जागेत भेटत आणि प्रेमसंवाद प्रॉम्प्टिंग केल्यासारखे घडाघडा बोलत. ते इतके अलंकारिक असत नि बोजड भाषा त्यांच्या तोंडात असे की या भाषेत प्रेम करता येतं या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसणार नाही. सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायक किशोर कुमार एकदा म्हणाला होता, ‘आमची चित्रपटातील गाणी काही खरी नाहीत. प्रेमात पडलेली तरुण-तरुणी कधीही बागेत गाणं गात, नाचत बागडणार नाहीत. ती प्रेमच करतील !’ हेच प्रेमसंवादांबद्दलही आहे.

उर्दूमध्ये ज्याला महसूस करणे म्हणतात, त्याप्रमाणे प्रेमाचा अनुभव हा महसूस करावा लागतो. लैंगिकता वर्णन करणे म्हणजे दोन प्रेमिकांमधील इंटेंसिटी महसूस करणे होय. यात एक सायकॉलॉजिकल फॅक्टर आहेच! – एखादा पुरुष स्त्री-बरोबर किंवा एखादी स्त्री पुरुषाबरोबर समागम करत असली तरी त्यांचे समाधान होतेच असे नाही. लैंगिकता म्हणजे भोग नव्हे, पूर्तता नव्हे, अपूर्तताही आहे, उदासीनताही आहे, कधीही शांत न होणारी प्यास आहे.

अखेर लैंगिकतेला साहित्यामध्ये आणण्याची गरज काय? माणूस वेगवेगळ्या पातळ्यांवर आयुष्य जगत असतो, त्याला वेगवेगळ्या गोष्टींत स्वारस्य असते. उदाहरणार्थ, तो खवय्या असू शकेल. आणि त्याला उत्तमोत्तम चिजांपुढे स्त्रीसौंदर्य महत्त्वाचे वाटणार नाही. तो खेळाडू असू शकेल. त्याचं मन खेळातच इतकं रममाण होईल की स्त्री ही जीवनात इतकी महत्त्वाची नसेलही कदाचित. आपली रॅकेट आपली बॅट, यांवर त्याचे मनोमन प्रेम असू शकेल. त्याच्या लेखी लैंगिकता येते-जाते. पण तरीही माणसाच्या जीवनात लैंगिक सुखाचा प्रवास अगाधच आहे. तो माणसाला सुखावतो, दुखावतो, तृप्त करतो किंवा विफल करतो. ह्यडार्लिंगह्ण नावाच्या एक चित्रपटाची नायिका म्हणते- लैंगिकता हा माझ्या जीवनाला मिळालेला शाप आहे. अनेक भोग घेऊनही तिच्या हाताशी काहीच लागत नाही. आणि तिची एक अतूट व्यथाच बनते.

कुठचाही प्रवास, बारीक-सारीक तपशिलांची एक मालिका असते. एक ‘माहोल’ असतो. लैंगिक सुखाचा प्रवास हादेखील एक माहोल आहे. स्त्री-सुख काय आहे? असे म्हणून त्याची महती नाकारणाऱ्यांना कदाचित ठाऊक नसते की एखादे चुंबन, जोडीदाराचा स्पर्श आपल्या मनामध्ये दिवसेंदिवस घर करून बसलेला असतो. तो महसूस करावा लागतो. त्यात एक विलक्षण तल्लफ असते. आणि म्हणून लैंगिकता वाङ्मयामध्ये आणायची म्हणजे ते सर्व तपशील – तो सर्व माहोल लेखकाने जिवंत उभा करावा लागतो. लैंगिक विषयावरील उत्तम लेखन कदाचित लैंगिक जीवनातील अपयशावरही असेल. लैंगिक समाधानाचे क्षण हजारामध्ये एक असतील. बाकीच्या ९९९ वेळा असमाधानाचाच भाग असेल. लैंगिकदृष्ट्या अशांत झालेली किंवा परिस्थितीच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेली प्रत्येक व्यक्ती मला अस्वस्थ करते. भुकेने तडफडणारा माणूस एकच वेदना सहन करतो; परंतु लैंगिक भुकेने तडफडणारा माणूस असंख्य वाटेने वेदना जगतो.

तसं लैंगिकतेच्या संबंधात आता वातावरण बरंच मोकळं झालंय. याचे श्रेय कुटुंबनियोजनाला प्रथम, मग पानापानावर ब्रेसिअर्स आणि अंडर वेअर्स फेडणाऱ्या लेखकांना, नंतर हिट अँड हॉट नाटकांना व त्यानंतर वासूनाका, चक्र, माहीमची खाडी वगैरे पुस्तकांना. आता जे वातावरण आहे, त्या वातावरणात अश्लीलता नको असे म्हणणाऱ्या संपादकांचं राहू द्या, परंतु सेक्समुळे समाजावर दुष्परिणाम होतात असे म्हणणाऱ्यांची संख्या थोडीफार घटली असेल. थोडा फार समजंसपणा निर्माण झाला असेल.

पिवळ्या कव्हरमधली पुस्तके कुठेही फुटपाथवर मिळतात, नव्या व्हिडीओ, व्ही.सी.आर.मुळे गावोगावांत नील चित्रपटांचे मुक्त प्रदर्शन चाललेलेच आहे. त्यापुढे आता कथा-कादंबऱ्यांची मातबरी कोण सांगणार? म्हणून जेव्हा मला एखाद्या दिवाळी अंकाकडून अश्लील कथा लिहू नका असे सांगण्यात येते, त्यावेळी त्याचे हसू येते. कोणत्याही वाचनामुळे वाचक डिस्टर्ब झाला तर त्या लेखकाचा तो करिष्माच मानला पाहिजे आजच्या जगात. सेक्सवरील वाचन किंवा रुपेरी पडद्यावरील दर्शन आता अशा स्टेजपर्यंत येऊन पोहोचलं आहे की त्याच्या सान्निध्यात माणूस जांभया देऊ लागतो. मी लैंगिकतेवर लिहितोच. माझे वाचक ते वाचून अस्वस्थ झाले, तर त्याचे क्रेडिट मी घेणारच आहे. वाचकाने अस्वस्थ होणे हाच कथेचा हाय वॉटर मार्क आहे.

वासूनाक्यावर ज्याप्रमाणे प्रतिक्रिया झाल्या, त्याप्रमाणे इतर कथांवरही झाल्या. माझ्या मते ही गोष्ट अत्यंत समाधानाची होती. मी अधिक गंभीरपणे वाचणाऱ्या वाचकांसाठी लिहितो. पण अलीकडचे संपादक ज्या वेळी ‘अश्लील लिहू नका’ अशी खास अट घालतात तेव्हा कुठेतरी काहीतरी बिघडलंय हे लक्षात येतं. कदाचित या मासिकांना जाहिरात देणारे, कदाचित सल्लागार मंडळावरचे किंवा संपादकाच्याच प्रगल्भतेचा अभाव यापैकीचं कुठचं तरी कारण यामागे असावे. दूरदर्शनवरील रात्रीच्या चित्रपटांबद्दल जो गदारोळ उठला होता, तसाच वासूनाक्यासारख्या पुस्तकाबद्दलही उठला. त्यांचे म्हणणे असे की भाऊ पाध्ये यांनी त्यांना लैंगिकतेवर जे लिहायचे असेल ते लिहू नये. (थोडक्यात, लेखणीच मोडावी !) पण आम्ही काही आमच्या मुलांना वळण लावण्याचे काम करणार नाही. आमच्या हातात ‘वासूनाका’ आला तर खुशाल टेबलावर टाकू. मीही याच मताचा आहे की त्यांनी तो टाकावा- आणि मुलांनी तो वाचावा. बिघडले कुठे?… निदान त्यांच्या मुलांच्या वाचनामुळे ती प्रगल्भ वाचक झाली आणि मराठी जीवन काहीसे मोकळे झाले तर कुठे बिघडले?

(ललित दिवाळी अंक १९८७ मधील लेखाचा संपादित अंश)