कॅप्टन मिलिंद परांजपे
क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता, काटेकोर शिस्त, अभ्यासू वृत्ती आणि आपल्या क्षेत्राला अधिक सुनियोजित स्वरूप देण्यासाठीची धडपड ही कॅप्टन पुरुषोत्तम शंकर बर्वे यांची वैशिष्ट्ये. भारत सरकारचे नौवहन सल्लागार या अतिशय महत्त्वाच्या पदासह या क्षेत्राशी संबंधित विविध पातळ्यांवरील जबाबदाऱ्या त्यांनी याच गुणांच्या जोरावर सक्षमपणे पार पाडल्या.

पुरुषोत्तम बर्वे १९४८ साली वयाच्या १४ व्या वर्षी ‘डफरीन’ या ट्रेनिंग शिपवर कॅडेट म्हणून जॉईन झाले. पहिल्या म्हणजे सेकण्ड मेटच्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. १९६१ साली ते मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंटमध्ये नॉटिकल सर्व्हेयर म्हणून रुजू झाले. त्याकाळी फक्त इंग्लंडमध्ये होणारी ‘एक्स्ट्रा मास्टर’ परीक्षा ते ‘सर जॉन कॅस कॉलेजा’तून उत्तीर्ण झाले. भारतात कॅप्टन बर्वे सेकंड मेट, फर्स्ट मेट आणि मास्टरच्या परीक्षांचे परीक्षक होतेच. पण इंग्लंडमधील एक्स्ट्रा मास्टर परीक्षेचे एक केंद्र मुंबईत झाल्यावर तोंडी परीक्षा घेण्यासाठी त्यांची नेमणूक झाली. परीक्षा घेताना ते नेहमी सौम्य शब्दांत उमेदवाराला प्रश्न विचारत. नापास झालेल्यांनादेखील कधीच असे वाटले नाही की परीक्षकांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे किंवा ते गैरवाजवी प्रश्न विचारत आहेत.

‘इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन’ (आयएमओ) ही युनोची संस्था लंडनमध्ये आहे. तिच्या संपर्कात राहण्यासाठी भारतीय दूतावासात ‘फर्स्ट सेक्रेटरी शिपिंग’ हा हुद्दा सरकारने निर्माण केला आहे. बर्वे यांची तेथील १९८० ते ८५ या पाच वर्षांसाठीची नेमणूक भारतीय नौवहन उद्योगाला लाभदायक ठरली. आयएमओमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. लंडनमधील भारतीयांच्या नौवहनातील कार्यक्रमात बर्वे आवर्जून भाग घेत. तिथे ते सक्रिय होतेच पण गरज पडल्यास मार्गदर्शनसुद्धा करत. लंडनमधील वास्तव्यात भारतीय नौवहनाशी निगडित इंग्लिश आणि भारतीय या दोघांची ‘इंडियन मॅरिटाईम असोसिएशन’ त्यांच्याच कल्पनेतून साकार झाली.

‘डफरीन’ मोडीत निघून तिच्या जागी ‘राजेंद्र’ हे ट्रेनिंग शिप आले. १९९१ साली ‘राजेंद्र’च्या ऐवजी ‘टी.एस.चाणक्य’ ही मॅरिटाईम अकॅडमी नवी मुंबईतील नेरुळ येथे ४० एकर जागेत स्थापन झाली. या सर्व प्रक्रियांमध्ये कॅप्टन बर्वे यांचा सल्ला महत्त्वाचा ठरला. वास्तुविशारदाला वसतिगृहाची इमारत बांधण्यास सुद्धा त्यांच्या सूचना उपयोगी ठरल्या. मुख्य म्हणजे नव्या अकॅडमीत तीन वर्षांचा मुंबई विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा धर्तीचे अभ्यासक्रम इंग्लंड आणि अमेरिकेत आधीच सुरू झाले होते.

आयआयटीतून निवडलेल्या स्पर्धकांनाच ‘चाणक्य’ अकॅडमीत प्रवेश मिळतो. आता सुरुवातीलाच पदवी मिळत असल्यामुळे ज्यांना पुढे आणखी विद्यार्जन करायचे असेल (एलएलबी, आयएएस इत्यादी) तर त्यांना मार्ग मोकळा झाला. त्याआधी तशी सुविधा नव्हती. या सुविधेचा लाभ अनेक ऑफिसर घेत आहेत. भारतातील नॉटिकल अधिकाऱ्यांची एक पिढी ज्यांनी घडवली त्यात कॅप्टन बर्वेंचा यात महत्वाचा वाटा होता, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

निवृत्तीच्या बरीच वर्षे आधी कॅप्टन बर्वे यांची नेमणूक ‘नॉटिकल ॲडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ या सर्वोच्च पदी झाली. त्यांचे नौवहन प्रशासनातील स्पृहणीय कौशल्य त्या क्षेत्रात सर्वश्रुत आहे. एखादी बोट असुरक्षित आढळली तर महासागरी प्रवासास जाण्यास सुरक्षित होईपर्यंत ती थांबवून ठेवणे हा अवघड निर्णय ते खंबीरपणे घेत. बोट काही तास जरी थांबली तरी जहाज मालकाचे हजारो, लाखो रुपयांचे नुकसान होते पण सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड बर्वे करत नसत. लहानसहान कामांसाठी गरजूंना त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा फेऱ्या कधीच माराव्या लागल्या नाहीत. कायदेशीर कामे लालफितीत न अडकता कशी करून टाकावीत याचे उदाहरण ते त्यांच्या कनिष्ठांना घालून देत.

सरकारी सेवेत त्यांची बंदरविकास, दीपगृहविकास वगैरे समित्यांवर नेमणूक झाली होती. तिथे त्यांची मते नेहमी महत्वाची मानली जात. नौपरिवहन अधिनियम, जहाज बांधणी, दुरुस्ती, नौवहनासाठी वापरली जाणारी उपकरणे, जहाजांना होणारे अपघात अशा तांत्रिक विषयांवरची नियमावली तयार करणे व ती यशस्वीपणे राबवणे यात बर्वे यांचे मोठे योगदान आहे. नौपरिवहन उद्योगासाठी लोकसभेच्या खासदार समितीबरोबर वाटाघाटीत बर्वे यांचा सहभाग असे. आयएमओतर्फे अन्य राष्ट्रांना मार्गदर्शन करण्याकरीता त्यांनाच पाचारण केले जात असे. वाचन, निरीक्षण, बेरकी विनोदबुद्धी, ‘राखावी बहुतांची अंतरे’ अशी त्यांची वृत्ती होती.

भारताच्या नौवहन उद्योगासाठी त्यांचे योगदान-

  • जहाजातून क्रायोजेनिक माल आणि एलपीजी उतरवण्यासाठी कार्यपद्धती
  • जहाज ऑफिसरांची कमतरता जाणवू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना
  • बेरोजगारीच्या काळात भारतीय अधिकाऱ्यांना परदेशी जहाजांवर नोकऱ्या मिळवण्यासंदर्भात मार्गदर्शन
  • बंदराबाहेर जहाजांवर पायलट चढता उतरतानाची सुरक्षा पद्धत
  • मुंबई आणि न्हावाशेवा (जेएनपीटी) बंदरांसाठी एकत्र पायलट पद्धत
  • मुंबईतील नॉटिकल कॉलेजमध्ये अतिशय प्रगत सिम्युलेटर्स बसवण्यास जपान इंटरनॅशनल कोऑर्डिनेटिंग एजन्सी (जेआयसीए) एड प्रोग्राम बरोबर वाटाघाटी
  • बोटींवरील अधिकाऱ्यांच्या शिक्षणात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने आयोजित अधिवेशनात सहभाग (स्टँडर्ड ऑफ ट्रेनिंग सर्टिफिकेशन अँड वॉचकीपिंग)

निवृत्तीनंतर तोलानी शिपिंग कंपनीच्या माध्यमातून कॅप्टन बर्वेंनी बोटीवरील डेक अप्रेन्टिसकरता कॉरस्पॉन्डन्स कोर्स तयार केला आणि तो यशस्वीपणे चालवला. २००४ साली मुंबईत भरलेल्या जागतिक नौकानयन शिक्षण संस्थांच्या अधिवेशनास त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. ‘कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडिया’ ही भारतातील बोटीवरील सर्व कॅप्टन्सची असोसिएशन आहे. बर्वे अनेक वर्षे तिचे मानद ‘मास्टर’ होते. असोसिएशनचा पुणे चॅप्टर स्थापन झाला त्यावेळेस चॅप्टर सुरू करण्याची पद्धत सांगून त्यांनी प्रोत्साहन दिले. असोसिएशन दरवर्षी काहीतरी कार्यक्रम, परिसंवाद वगैरे घेते त्यात बर्वे यांचा सहभाग नाही असे कधीच होत नसे. तात्काळ आणि योग्य निर्णय घेणे या गुणांमुळे त्यांच्याबद्दल नौवहन क्षेत्रात आदरयुक्त आपुलकी निर्माण झाली.

२०१७ साली त्यांना ‘नॅशनल मेरीटाईम डे सेलिब्रेशन कमिटी’ने नौवहन क्षेत्रातील अत्युच्च समजला जाणारा ‘वरुण पुरस्कार’ दिला तेव्हा ‘हा पुरस्कार बरीच वर्षे आधी मिळावयास हवा होता’ अशी बहुतेकांची प्रतिक्रिया होती. पण त्याला खरे कारण होते बर्वे यांची प्रसिद्धी पराङ्मुखता. २४ ऑगस्टला त्यांचे मुंबईत ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय नौवहन क्षेत्राला दिशा दाखविणारा दीपस्तंभ हरपला.
captparanjpe@gmail.com