भक्ती चपळगावकर
कधीकधी बातम्या येतात, आफ्रिकेतल्या अमुकतमुक देशात टोळधाड आली. या धाडीत आख्ख्या देशातलं पीक नष्ट झालं. वाऱ्याच्या वेगाने येणारे टोळ कोट्यावधी संख्येने येतात आणि क्षणार्धात शेतकऱ्यांनी वर्षभर खपवून पिकवलेले शेत गिळंकृत करतात. समाजमाध्यमांच्या जगात हे टोळ ट्रोल बनून टपून बसलेले असतात. खरं तर ट्रोल ही पाश्चात्य संकल्पना. लहान मुलांच्या गोष्टीत चांगल्या लोकांना त्रास द्यायला टपून बसलेले राक्षस. समाजमाध्यमांवरचे ट्रोल मात्र राक्षस आणि टोळ यांचे मिश्रण आहेत. ट्रोलिंग हा शब्द रूढ झाला तो आपल्या विचारसरणीपेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्या लोकांना शाब्दिक हिंसेने त्रास देणाऱ्या लोकांसाठी. आपण समाजमाध्यमांवर कितीही गरळ ओकली तरी पोलीस पकडत नाहीत हे लक्षात आल्यावर ट्रोल्सचा जन्म झाला. ट्रोल बनणं हे सोपं आहे हे समजल्यानंतर त्यांची संख्या वाढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा वर्षांपूर्वी मुंबई स्वयंपाकघर हा फेसबुक ग्रुप मी सुरू केला तेव्हा इथे साध्या सोप्या सकस पाककृतींची चर्चा व्हावी हा उद्देश होता. जमलं तर गावाकडे सहज मिळणाऱ्या पण महानगरांत न मिळणाऱ्या पदार्थांचा काही व्यवसाय करता येईल का हेही चाचपायचा प्रयत्न केला पण लवकरच तो उद्देश मागे पडला. ग्रुपला कोव्हिड काळात इतकी चालना मिळाली, की आम्ही पौष्टिक पाककृती, अंगणवाडी ताईंसाठी रेसिपी, विस्मृतीतले पदार्थ, ट्रॅव्हलॉग्ज अशा अनेक थीम्सवर ग्रुपमध्ये चर्चा घडवली. याच काळात माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र, कारवार, मंगलोर, गोव्याच्या संपन्न खाद्यसंस्कृतीचे अनेक अनोळखी कंगोरे इथं दिसत आहेत. दिवाळी फराळ या विषयावर चर्चा सुरू असताना एका पोस्टकर्तीने गोव्याच्या दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या पोह्यांची पद्धत सांगितली आणि नंतर गोव्यातल्या दिवाळीबद्दल चर्चा सुरू झाली. मंगलोर इथे असलेल्या हव्यक ब्राम्हण समाजातल्या व्यक्तीशी लग्न केलेल्या एका सदस्याने मंगलोर डायरीज लिहायला सुरूवात केली आणि हा ग्रुप आपल्याला ऑनलाईन मॅगझीन म्हणून विकसित करता येईल याची जाणीव मला झाली. त्या पोस्ट एवढ्या सुंदर, अनोख्या आणि व्यवस्थित फोटोंसकट लिहिलेल्या होत्या की आम्ही मंगलोर फूड सफारी केली. यानंतर आम्ही अनेक लेखकांना तुम्ही इथं खाद्यविषयक लिखाण करा असं सुचवले. अलंकारिक लिहू नका, लोकांना मदत होईल असंच लिहा, फोटो टाका असंही सुचवलं. ग्रुपवर येणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त मदत व्हावी म्हणून रेसिपीसकट पोस्ट लिहा, नुसते फोटो टाकू नका असंही सांगितलं. त्या अनुषंगाने काही नियम बनवले. त्यातला फेसबुकने सांगितलेला नियम म्हणजे एकमेकांशी आदरपूर्वक आणि दयाभावनेने वागा, असं सुचवलं. त्यात आमचे काही नियम समाविष्ट केले, उदाहरणार्थ राजकीय लिहू नका, धार्मिक लिहू नका, रेसिपी लिहा, लिखाण फक्त स्त्रियांना उद्देशून नको – स्वयंपाक सर्वांना येऊ शकतो – आवडू शकतो, अलंकारिक लिहू नका, सल्ले मागायच्या आधी सल्ला ज्याबद्दल हवा आहे तो विषय ग्रुपवर शोधा, वगैरे वगैरे.

आणखी वाचा-‘भारत जोडो न्याय यात्रे’ने काय केले?

काही सदस्य इतके छान लिहितात काही त्यातल्या काही नियमांना बगल दिली तरी आम्ही त्या पोस्टना चर्चेत आणू लागलो. उदाहरणार्थ धार्मिक पोस्ट नको असे असले तरी गुरूवारी गजानन महाराजांसाठी बनवलेली चविष्ट पिठलं भाकरीची पोस्ट असेल तर त्यात हे ताट का सजलं आहे याचा उल्लेख येणं अपरिहार्य होते. दर आठवड्याला एखादी आई, माझं बाळ नीट खात नाही त्याला काय खायला देऊ असा प्रश्न विचारत होती, मग तिला कधी सांगितलं की बाई असे सल्ले आहेत, ते शोध, पण माझं बाळ त्या बाळापेक्षा वेगळ्या स्वभावाचं आहे, असं तिने म्हटल्यावर मग त्याही पोस्ट मंजूर होऊ लागल्या. गुढीपाडवा, दसरा, गणेशोत्सव, बर्थडे पार्टीज, दिवाळी, पौष्टिक पण पोटभरीच्या, किचन सजावट, उपकरणं, पाककृती पुस्तकं अशा अनेकविध विषयांवर उपयोगी चर्चा होऊ लागल्या. बिरयानी, आप्पे, घावन, दोसे, दिवाळी फराळ, हिवाळी रेसिपीज, अशा थीम्स कधी आम्ही दिल्या कधी सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केल्या. सणासुदीच्या काळात घरगुती उद्योजकांना बाजारपेठ लागते हे लक्षात घेऊन तुम्ही एनजीओला देणगी द्या आणि इथे जाहिरात करा असं आम्ही त्यांना सांगितलं.

गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात टाटा मेमोरियल आणि मुख्यमंत्री सहायता निधी असे दोन पर्याय सदस्यांना दिले. मी आणि माझे ॲडमिन सहकारी हे सगळं आपापली कामं सांभाळून करतो. पैसे घेऊन जाहिराती देणारे अनेक ग्रुप्स आहेत, व्यवसायाच्या दृष्टीने ते योग्य आहेत, पण हा ग्रुप सदस्यांना उपयोगी असला तरी व्यावसायिक नाही. या काळात कधी तरी बारीकसारीक तक्रारी होत, आमच्यावर तुम्ही त्याची पोस्ट मंजूर केली पण माझी नाही, असे आरोप होत. कधी आम्ही कुणाची कमेंट इतरांसाठी क्लेषकारक समजून काढून टाकली तरी ते सदस्यांना आवडत नाही, मत मांडले तर चूक काय असे त्यांचे म्हणणे असते, इतका अधिकार त्यांना ग्रुपबद्दल वाटतो. कधी काही सदस्यांना काढावं लागतं कारण त्यांनी महिला सदस्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी असतात. कधी वाद मिटवताना एखाद्याला बाहेर करावं लागतं, कधी लेख चोरणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. पण आम्ही तपशील कधी उघड करत नाही. कारण वाद वाढवला तर ग्रुपचा उद्देश बाजूला राहतो. हा उद्देश आहे इथल्या पाककृतींचा रोजच्या स्वयंपाकात उपयोग व्हावा, विस्मृतीतल्या पौष्टिक पाककृती पुन्हा स्वयंपाकात याव्यात, स्वयंपाकघर हे फक्त स्त्रीचं नाही तर पुरूष, घरातील मुलं या सगळ्यांचंच असावं.

आणखी वाचा-मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

एकूण आपली विचारबुद्धी आणि सदस्यांची गरज या दोहोंची सरमिसळ करून पोस्ट मंजूर करतो. या कामासाठी माझ्याबरोबर अजून चार ॲडमिन काम करतात. ग्रुपची सदस्यसंख्या ७० हजार आहे. फेसबुकच्या दृष्टीने ही संख्या मोठी नाही, पण एकदिलाने चालविण्यात येणाऱ्या आणि ज्या ग्रुपचा वापर लोक नियमित करत आहेत अशा दृष्टीने ही संख्या मोठी आहे. एकूण फेसबुकचं स्वरूप किती सवंग आहे अशा चर्चा होत असतानाही आपला ग्रुप सर्वसमावेशक राहणार याची खात्री आम्हाला आहे. या खात्रीला ट्रोल्सनी ठेचायचा प्रयत्न केला.

निमित्त साधं होतं, रमजान महिन्यात आपण सेहरी आणि इफ्तारीला कोणते पदार्थ मुस्लिम धर्मियांना सुचवू शकतो असं आम्ही सदस्यांना विचारलं. त्यावर प्रतिक्रिया सकारात्मक आल्या, पण काहींनी मुस्लिमांबद्दल इथं बोलू नये असं मत मांडलं. विरोधी प्रतिक्रियांची सवय असल्याने आम्ही शक्य तिथं समजावलं आणि क्लेशकारक कॉमेंट करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रोल्स झुंडीने चालून आले. मुस्लिम धर्मियांत केली जाणारी माखंडी हलवा ही पाककृती कुणीही हिंदू स्त्री कशी करते, असा ट्रोल्सचा मुद्दा होता. त्यानंतर मुंबई स्वयंपाकघरवर कुणीही हिंदू स्त्रीने मुस्लिमांची पाककृती लिहू नये या दृष्टीने भीतीचे वातावरण तयार केलं गेलं. या ट्रोल्सचा वेग इतका होता, की अनेक स्क्रीन शॉट्स आमच्याकडे येऊ लागले. या काळात आम्ही सांगत होतो, हे वाईट आहे, पण आपण याचा सामना करू. राजकीय पटलावर मध्यात, डावीकडे, उजवीकडे असणारे आमचे अनेक सदस्य ग्रुपवर, बाहेर आमची बाजू घेऊन भांडत होते, पण ट्रोलधाडीला थांबवणं अवघड होतं.

आणखी वाचा-लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

समाजमाध्यमातल्या द्वेषाची एव्हाना आपल्याला सवय झाली आहे. पण हा हल्ला पाककृतीच्या निमित्ताने केला गेला. इथे शाकाहार किंवा मांसाहार हा प्रश्न नव्हता, ते आणि आपण असा द्वेष होता. हा हल्ला करणाऱ्यात पुरूष ट्रोल्सबरोबर स्त्रियांचाही तेवढाच सहभाग होता. अचानक आलेल्या या हल्ल्यामुळे आम्ही ताबडतोब फायर फायटिंगच्या कामाला लागलो. पोस्ट कोण करतंय आणि त्यात इथले काही सदस्य आहेत का याचा शोध सुरू झाला. कारण ट्रोल्सना काही सदस्य इथली माहिती पुरवत होते, त्यांना बाहेर काढलं. विरोधी मत असू शकतं पण ट्रोलिंग सहन केलं जाणार नाही हे सांगितलं. पण ट्रोल्सना फेसबुक काहीही करत नाही. सायबर कायद्यालाही त्यांना थांबवता येत नाही हे लक्षात आलं. या सगळ्यांत आम्ही ट्रोल्सच्या नाकावर टिच्चून माखंडी हलवा ही पाककृती असलेल्या पोस्ट मंजूर करत होतो. एका मुलीने फोन करून सांगितलं, ताई, तो हॅशटॅग काढा, थीम काढा. आम्ही रेसिपी देऊ, पण आमच्या नावाचे स्क्रीन शॉट नको फिरायला. तो फोन माझ्यासाठी फार दुखःदायक ठरला. मला ट्रोल्सना उत्तर द्यायचं आहे पण हिला मी कसं वाचवू? हिला उद्या शिवीगाळ झाली तर त्याला मी जबाबदार आहे अशा विचाराने ग्रासले आणि मग आम्ही जाहीर केलं, ही थीम आपण रद्द करत आहोत. हॅशटॅग रमजान रद्द. आम्ही पोस्टच्या शेवटी लिहिलं- ट्रोल्स, आज यशस्वी झालात तुम्ही. स्वयंपाकघरात जाऊन बायकांवर हल्ला केलात. तुम्ही हलवा खाऊ नका, शिरा खा आणि तोंड गोड करा. त्यानंतरही शिवीगाळ सुरू आहे. पण निदान अजून परत बायकांचे स्क्रीन शॉट फिरणं कमी झालं. आम्हा ॲडमिन्सवर वैयक्तिक हल्ले सुरू झाले. पण त्यांचा सामना करायला आम्ही तयार आहोत.

पण आमच्या या पोस्टनंतर गुण्यागोविंदाने रेसिपी लिहिणाऱ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. त्यांना सांगितलं की कुणालाही रेसिपी लिहायला बंदी घातली नाही. कोणत्याही विषयावर बंदी नाही, याकाळात तुम्ही निनावी पोस्ट पण लिहू शकता. ही झाली आमची बाजू. पण काही स्त्रियांचं रक्षण करायचं, या काळजीने आम्ही थीम मागं घेतली, त्या स्वयंपाकघरातल्या रणरागिणींनी फालतू ट्रोल्सकडे काडीचं लक्ष न देता माखंडी हलवा करून त्याची पाककृती, छायाचित्रं टाकायला सुरूवात केली. आमच्याकडे माखंडी हलव्याच्या असंख्य पोस्ट येऊ लागल्या. ट्रोल्समुळे आलेली विषण्णता या सदस्यांनी दूर केली. आम्हीही ठरवलं, तोंड गोड पडून मधुमेह झाला तरी चालेल पण त्यांच्या लढ्याचं प्रतीक असलेला हा हलवा इथं आलाच पाहिजे. इतक्या रेसिपीज आल्या की नंतर ग्रुपचं नेहमीचं कामकाज सुरू करायचं म्हणून आजपासून फोटो पोस्ट बंद करतोय, असं आम्हाला जाहीर करावं लागलं. एखाद दुसरं सॉफ्ट ट्रोलिंग ग्रुपवर सुरू आहे, ते सदस्य शोधून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

हा गदारोळ थांबेल, किंवा ग्रुप समाजमाध्यमांचा विखारी उपयोग करणाऱ्यांचं नेहमीचं लक्ष्य बनेल, मला माहीत नाही. पण माझा प्रश्न फेसबुकला आहे. माझ्या देशाने मला विचार स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. मी माझं मत मी मुक्तपणे मांडू शकते हा विश्वास भारतीय राज्यघटनेने मला दिला आहे. हा माझा आणि सर्व भारतीयांचा घटनात्मक अधिकार आहे. तो असा सरसकट हिरावण्याचा अधिकार फेसबुकला कुणी दिला? आज या माध्यमाला आम्ही अब्जावधी रुपये मिळवून देतो. हव्या असलेल्या आणि नको असलेल्या जाहिराती आम्ही इथे बघतो. आमचा आवाज, आमचे विचार फेसबुक रेकॉर्ड करून विकतं. अमेरिकन संसदेने मार्क झकरबर्गला नाक घासायला लावलं. आपल्या संसदेत तशी व्यवस्था नसेल, पण आपली न्यायव्यवस्था माझी ही कैफीयत ऐकू शकते का? तिला मला विचारायचं आहे, माझ्या देशात एवढा द्वेष पसरवण्याचा अधिकार एखाद्याला कुणी दिला? माझ्या मित्रमैत्रिणींना दोन टोकांना खेचून त्यांच्यात द्वेष पसरवणारी यंत्रणा या देशात उघडपणे कशी चालू शकते?

bhalwankarb@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dealing with anti recipe trolls on social media mrj
First published on: 27-03-2024 at 09:20 IST