एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मोदीजींचा जीवनप्रवास म्हणजे नुसती यशोगाथा नाही तर करोडो गरीब आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी कथा आहे. सर्वसामान्य आणि साध्या परिस्थितीत जन्मलेला एक मुलगा पुढे संघाच्या मुशीत तयार होतो. संघाचे संस्कार लाभलेला स्वयंसेवक पुढे गुजरातचा मुख्यमंत्री आणि अखेरीस देशाचा सर्वोच्च नेता होतो. – हा त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी आदर्श गाथा आहे.
नरेंद्र मोदी हे नाव घेतले की, जनतेचा नेता, जगाचा आदर्श ही उक्ती आठवते. १७ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना करतो. ते पुढील अनेक वर्षे आपणा सगळ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यांची अकरा वर्षांची कारकीर्द देशाला अधिकाधिक उंचीवर नेणारी आहे.
मी मुख्यमंत्री झालो तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, पण त्याहीपेक्षा मला जास्त आनंद झाला कारण देशाचे आदरणीय पंतप्रधान आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेले आदरणीय मोदीजी यांच्याशी मला आता संपर्क आणि संवाद ठेवता येणार होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणेच मोदीजींचं कार्य माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आलं आहे , आणि आता त्यांचे मला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे ही कल्पना खरोखरच खूप सुखावणारी होती. आज प्रामाणिकपणे देशासाठी कार्य केलं तर, लोकांचा विश्वास सहज मिळतो, हा त्यांचा संदेश माझ्यासाठी कायम मार्गदर्शक असा आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी सर्वप्रथम मोदीजींशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘तुम्ही एक तळागाळातील नेता आहात, तुमच्या अनुभवावर महाराष्ट्राला तुम्ही निश्चितपणे नवी उंची द्याल. एकत्रितपणे चांगले काम करा, जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा नक्की सांगा, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू,’ हे त्यांचे शब्द खूप शक्ती देणारे होते.
लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नेता कसा असतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. मी शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षासारख्या बलाढ्य पक्षाचे नेते असलेले मोदीजी माझ्यावर विश्वास दाखवतात, ही मोठी गोष्ट होती. मुख्यमंत्री होण्याआधी त्यांच्याशी संवादाची संधी फार कमी मिळाली होती, मात्र मागील काही वर्षांत महाराष्ट्रात तसेच दिल्लीत अनेकदा भेट झाली. कधी काही क्षणांचा संवाद तर कधी तासभर चालणारी चर्चा – प्रत्येक भेटीत त्यांचा सुस्पष्ट विचार, हलक्याफुलक्या गमतीजमती आणि आत्मीयता अनुभवायला मिळाली.
मोदीजींचा जीवनप्रवास म्हणजे नुसती यशोगाथा नाही तर करोडो गरीब आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी कथा आहे. सर्वसामान्य आणि साध्या परिस्थितीत जन्मलेला एक मुलगा पुढे संघाच्या मुशीत तयार होतो. संघाचे संस्कार लाभलेला स्वयंसेवक पुढे गुजरातचा मुख्यमंत्री आणि अखेरीस देशाचा सर्वोच्च नेता – हा त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी आदर्श गाथा आहे. त्यांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कुठल्याही ऐश्वर्यसंपन्न घराण्यात न जन्मता सामान्यांमध्ये वाढल्याने त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रत्येक भारतीयाला आपलेपणाची जाणीव करून देतं.
गेल्या दशकात भारताने अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली. आज आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांनी देशाला आधुनिक ओळख दिली. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे कोट्यवधी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाने नागरिकांच्या मनात स्वच्छतेची जाणीव जागवली. आयुष्मान भारत योजनेतून गरिबांना आरोग्याची हमी मिळाली, तर उज्ज्वला योजनेने मातांच्या स्वयंपाकघरांना धूरमुक्त केले.
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात मोदीजींनी प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांसमोर देशाचं सामर्थ्य दाखवून दिलं. कोविडच्या कठीण काळात छोट्या राष्ट्रांना लस पुरवून भारताने जगाला मानवीयतेचा खरा चेहरा दाखवला. मेक इन इंडिया मोहिमेमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची नवी क्रांती झाली. दहशतवादाविरुद्ध केलेले सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हल्ला यामुळे जनतेच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून मोदीजींनी भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात देशातील सर्व विरोधी पक्ष आणि संघटनांनासुद्धा त्यांनी एका दिशेने विचार करावयास लावले.
महाराष्ट्राच्या प्रगतीतही मोदीजींचा मोलाचा वाटा आहे. मुंबईचे महत्त्व देशाला ठाऊक आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील पहिली ‘वेव्ह’ आयोजित करण्याचा मान मुंबईला मिळाला. दिवसभर पंतप्रधान स्वत: या परिषदेत उपस्थित होते. मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि अटल सेतू हे प्रकल्प त्यांच्या पाठिंब्यामुळे गतिमान झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने शेतकरी व उद्योग यांना नवी दिशा मिळाली. पीएम किसान सन्मान निधी तसेच राज्य सरकारच्या नमो सन्मान योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली. पुणे, नागपूर, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा विकास स्मार्ट सिटी योजनेमुळे साध्य झाला. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या शहरांची नावे बदलली गेली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यातही मोदीजींचे योगदान कुणीही मराठी माणूस विसरू शकणार नाही.
जागतिक आर्थिक परिषदेसाठी मी दावोसला दोनदा भेट दिली. मोदीजींच्या नावाचा प्रभाव मी स्वतः अनुभवला. जागतिक पातळीवरील गुंतवणूक महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यात त्यांचा जादूई प्रभाव स्पष्ट दिसून आला.
आज भारत विकासाच्या मार्गावर झेपावलेला आहे. महिलाकेंद्रित धोरण, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यामुळे नागरिकांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. अकरा वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. काही विरोधकांनी देशाबाहेर जाऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तरीही जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांचं भाषणकौशल्य, लोकांशी सहज संवाद साधण्याची कला आणि संवेदनशीलता यामुळे ते जागतिक स्तरावरही लोकप्रिय ठरले आहेत.
नरेंद्र मोदी हे नाव सातासमुद्रापलीकडे किती गौरवाने घेतले जाते ते आपण पाहतो. त्यांना परदेशांमध्ये मिळणारा मान आणि तेथील नागरिकांमध्येसुद्धा त्यांच्याविषयी असलेली उत्सुकता आपल्याला दिसते. अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लावल्यावरही भारताच्या आत्मनिर्भरतेवर दृढ विश्वास ठेवणारे आणि अतिशय संयमी पद्धतीने परिस्थिती सांभाळणारे मोदीजी प्रत्येक भारतीयांमध्ये आत्मविश्वास वाढवतात.
“सबका साथ, सबका विकास” हा मोदीजींनी दिलेला मंत्र आज देशाचा जीवनमंत्र झाला आहे. त्यांनी विकासाला दिलेली गती केवळ वर्तमानापुरती नाही, तर भावी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरणारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!