इलॉन मस्क हे टेस्ला आणि स्पेस-एक्स या बड्या अमेरिकी कंपन्यांसह ट्विटरचेही मालक, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ही ओळख त्यांनी अलीकडेच गमावली असूनही दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत तेच आहेत… नेहमीच चर्चेत राहण्याचीही त्यांना सवयच. पण ट्विटरची मालकी मस्ककडे आल्यानंतर या ना त्या कारणाने ते वादग्रस्तच ठरू लागले- आता तर हे वाद ‘अति झालं नि हसू आलं’ या थराला पोहोचले आहेत. कारण परवाच या मस्क यांनी स्वत:च ट्विटरवर लोकांचा कौल घेतला : “मी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होऊ का?” – पावणेदोन कोटी लोकांनी यावर मतदान केलं, त्यापैकी ५७.५ टक्के लोक म्हणाले – होय, सोडा पद! त्यानंतर २४ तास उलटत आले तरी मस्क काही बोलेनात. उलट ‘हे पद सांभाळणं फार कठीण. कुणीच फारसं तयार होणार नाही’ असं एक ट्वीट त्यांनी आधीच करून ठेवलं होतं. हे सारं हास्यास्पद ठरतंय, पण हे फारच बालिश आहे, असं स्पष्टपणे लिहिलं ते पॉल क्रूगमन यांनी. पण हा खरोखरच बालिशपणा आहे का?

तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल आर्थिक लिखाण करणारे अमेरिकी तज्ज्ञ टिमथी बी. ली यांनी मस्क यांच्या लहरीपणाची यादीच दिली आहे… २०१८ मध्ये ‘टेस्लाचे (खासगी मालकीचे) समभाग ४२० डॉलर मोजून घेण्याचा माझा विचार आहे,’ असं जाहीर करून मग टेस्लावरली पकड घट्ट करणं, ट्विटर ताब्यात आल्यानंतर तिथल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरांना ‘तुम्ही गेल्या ३० दिवसांत काय ‘कोड’ लिहिलेत त्याच्या सगळ्याच्या छापील प्रती काढा- ३० दिवसांआधी तुमच्या कामाचा तपशील तुम्ही दिला नसेल, तर ६० दिवसांचे कोड दाखवा’ असं फर्मान सोडणं आणि नंतर ऐन वेळी – “थांबा- छापील प्रती नकोत. तुमच्या संगणकावरच हे काम पाहिलं जाईल,” असा बदल त्यात झाला. या प्रक्रियेत काही इंजिनीअर गळाले… त्यांनी नोकऱ्या गमावल्या. त्याच वेळी ट्विटरमध्ये भरती फार झालीय, अशा थाटात मस्क यांनी कर्मचाऱ्यांना सामूहिक नारळ देण्याचा सपाटाच लावला होता. या उदाहरणांखेरीज आणखी एक किस्सा ली यांनी, २०१५ सालच्या ‘इलॉन मस्क’ या ॲशली व्हान्सलिखित पुस्तकातून उद्धृत केला आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?

स्पेस एक्स’ कंपनीतर्फे सन २००४ मध्ये ‘फाल्कन-१’ हे पहिले रॉकेट बनवले जात असताना, त्याचा एक भाग स्टीव्ह डेव्हिस या अभियंत्याला हवा होता आणि बाजारात या भागाची किंमत १,२०,००० डॉलर होती. मस्क मात्र हटून बसले- फार तर पाच हजार डॉलरमध्ये आपल्याकडेच तयार होईल हा भाग! मग डेव्हिस यांनी अनेक तास खपून तो भाग अवघ्या ३९०० डॉलर खर्चात बनवला, आणि तसे ईमेलवर मस्क यांना कळवले. शाबासकीऐवजी मस्क यांचे ‘ओके’ एवढंच एकशब्दी उत्तर आलं.

वरवर अनाकलनीय किंवा वेडेपणाची वाटली तरी मस्क यांची प्रत्येक कृती पैसा वाचवण्यासाठीच असते, असे टिमथी ली यांच्या विश्लेषणाचे तात्पर्य. त्यामुळेच ‘ब्लू टिक’ची खूण कुणालाही विकतच घ्यावी लागेल असा हट्ट मस्क यांनी धरला, असे ली यांचे म्हणणे. पण यातून पैसा फेकून कुणीही ती खूण विकत घेऊ शकते, यातून कुणाही सोम्यागोम्याला कुणाचेही नाव मिळू शकते, ट्विटर हे अखेर ‘अभिव्यक्ती’चे साधन आहे आणि ती अस्सल असावी लागते… ही सारी नैतिक बाजू कोलमडून पडत होती. धंदाच करायचा तरी ट्विटरसारख्या कंपनीत इतका बिगर-नैतिकपणा कसा काय खपेल? अशाने तिच्या अस्तित्वालाच नख लागणार नाही का? हे प्रश्न उभे राहतात आणि ‘पैसा वाचवणारे’ म्हणून कितीही भलामण केली तरी मस्क यांचा वेडेपणा काही लपवता येत नाही. ही प्रवृत्ती येते कुठून?

हा प्रश्न काही अर्थशास्त्रातला नाही. पण नोबेल-मानकरी अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रूगमन यांचं सभोवार इतकं बारीक लक्ष असतं की, मस्क असे का वागतात, या प्रश्नाचा गांभीर्यानं विचार त्यांनी केला. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधल्या १९ डिसेंबरच्या लेखात क्रूगमन यांनी मस्कवर शाब्दिक कोरडे ओढताना, ही बालिश मनमानी येते ती अति-पैशातून, असं निदान केलं आहे. हे निरीक्षण फारच तोकडं किंवा कुणालाही करता येण्याजोगं वाटेल. ‘पैशाचा माज’ अशी कारणमीमांसा कुठल्याही काळात कुणाबद्दलही करता येतेच की! पण क्रूगमन यांचं स्पष्टीकरण असं की, हा माज १९२०-३०च्या दशकात, इतकंच कशाला १९८० मध्ये जेवढा होता, त्याहीपेक्षा कैक पटींनी आज जास्त असू शकतो, कारण जगातल्या ०.०००००१ टक्का अतिश्रीमंत व्यक्तींकडे आज, १९८० मध्ये होती त्यापेक्षा दसपटीनं अधिक संपत्ती एकवटली आहे. इतरांना मूर्ख समजून मनमानी करण्याचा अधिकार या संपत्तीनंच आपल्याला दिलाय, यावर मस्कसारख्या अतिश्रीमंतांचा गाढ विश्वास असतो आणि त्यातून त्यांच्या बालिश निर्णयांचा सामना इतरांना करावा लागतो, असं क्रूगमन यांचं प्रतिपादन.

पुढं क्रूगमन इशारा देतात : जग अशाच व्यक्तींच्या हातात चाललं आहे. ‘मी जाऊ की राहू’ या सवंग कौलानंतर मस्क जातात की पदावरच राहातात, याच्या कुतूहलापेक्षा क्रूगमन यांचा हा इशारा आणि त्यातून वाढणारी काळजी अधिक महत्त्वाची. कारण खरोखरच हा इशारा खरा ठरला, तर ‘हे असे का वागतात?’ असा प्रश्न आणखीही अनेकांबद्दल पडू शकतो!

(‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेख आणि वृत्तांतावर आधारित)