गेल्या १५ वर्षांत चार वर्षे दुष्काळ. सहा वेळा गारपीट. मग करोना काळातील अतिवृष्टी आणि आता ढगफुटीसदृश पाऊस. जोरदार कोसळणारा, सेकंदा सेकंदाला वाढत जाणारा, कधी प्रवाह बदलून जीवघेणा ठरणारा. पुरात माणसं, जनावरं, पिकं आणि अगदी मातीही वाहून नेणारा. मराठवाड्यात एवढे दिवस पाण्याचं कौतुकच. मोठ्या धरणातील एखादा टक्का पाणी वाढलं तरी एकमेकांना आवर्जून सांगणाऱ्या या दुष्काळी भागातील माणसाला पूर बघण्याची सवयच नव्हती. नदी उकरून किंवा नदी पात्रात डुबक्या घेऊन वाटीने पाणी घागरीत भरणाऱ्या भागातील शेतशिवार आता पाण्यात गेलं आहे. शासन दरबारी नसेल ओल्या दुष्काळाची व्याख्या. पण आहे तो ओला दुष्काळच. कारण शिवारातील पिकांची मुळं आता सडू लागली आहेत. सोयाबीनच्या शेंगा फुटून त्यांना कोंब आले आहेत. उभा ऊस आडवा झाला आहे. खरीप हातचा गेला आहे. जलमय मराठवाड्यातील माणूस पुन्हा हतबल झाला आहे. त्याची ही करुण कहाणी…
रात्रीतून पाणी वाढत गेलं. घरातील मंडळींनी जीव वाचवला. पण दारातील १७ जर्सी गायी दावणीला दगावल्या. १० गायी आणि त्यांची १५ वासरंही वाहून नेली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील विश्वनाथ आत्माराम दातखिळेचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. २७ गायी, वासरं सांभाळत दर महिन्याला एक लाख ८० हजार रुपयांचा दूध व्यवसाय करणारा हा शेतकरी आता हतबल झाला आहे. कडबाकुट्टीचं यंत्र, धारा काढण्याची दोन यंत्रंही वाहून गेली आहेत. आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांना सतावतो आहे. हे चित्र खव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सरमकुंडी गावाच्या परिसरातलं.
भूम तालुक्यातील पिंपळगावमध्ये राहणाऱ्या विश्वनाथ यांचा डी. फार्मसी झालेला मुलगा पुण्याहून आला. तो सांगत होता, काय करायचं तेच सुचत नाही. सगळं सुख आणि समृद्धी पूर घेऊन गेला. चिंचपूरच्या दूध डेअरीबरोबरचा दररोज २५० लिटरपर्यंतचा व्यवहार पूर्णत: थांबला आहे. ३६ रुपयांपर्यंतचा दर मिळायचा. त्यामुळे रोख रक्कम हाती येत होती. विश्वनाथ यांची हतबलता पराकोटीची आहे.
याच गावाजवळच्या चिंचपूर या गावात दुधाचा व्यवसाय करणारे अनेक जण. अमोल ढगे यांनी सहा महिन्यांपूर्वी पाच लाख रुपयांची उचल घेऊन १० गायी घेतल्या. त्यातील चार वाहून गेल्या आणि पाच दगावल्या. दररोज दीड हजार रुपयांच्या दुधाची विक्री करणाऱ्या अमोलचा पाय आता खोल चिखलात रुतू लागला आहे. घरात खाणारी सहा तोंडं आहेत. पुराने जगण्याची हिम्मतच वाहून गेली. आता पुढं कसं होईल काय माहीत, असं त्याचं पुटपुटणं अनुत्तरित प्रश्नांचं नवं संकटं तयार करणारं.
रब्बी हंगाम हाती लागेल?
लातूरच्या औराद शाहजानी येथे तेरणा आणि मांजरा नदीचा संगम होतो. तिथं शिवपुत्र आगलावे यांची २१ एकर शेती आहे. या वर्षी अगदी मृगापासून चांगला पाऊस झाल्याने मूग, उडीद ही पिकं त्यांनी घेतली. पुढं काढणीच्या वेळी पाऊस झाला. मूग काळे पडले. मांजरा नदीला तेरणाचं पाणी मिसळलं की तेरणा नदी शेतात पसरत जाते. या वेळी पुरात ११ एकर ऊस पाण्यात आहे. सोयाबीन पिवळं पडलं आहे. मुळं सडली आहेत. ही स्थिती नदीकाठच्या प्रत्येक गावाची. या वर्षीच्या पिकाचं नुकसान सहनही करता येईल. पण शेती दुरुस्त करून, आहे ते पीक काढून रब्बीची पेरणी होईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता रब्बीत पिकं घेता येणार नाहीत, याचं दु:ख अधिक आहे. अनेक ठिकाणी जमिनीला मोठे खड्डे, शेतात बहुतांश ठिकाणी आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला वैजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. पिकं भुईसपाट झाली. अनेक ठिकाणची जमीनच खरडून गेली. कांद्यासाठी केलेल्या वाफ्यात रोपं बुडून गेली. वैजापूरजवळचेच दीपक साळुंके कांदा उत्पादक. वैजापूरजवळच त्यांची चार ते पाच एकरवर कांद्याच्या रोपांची शेती. उन्हाळी कांद्याच्या रोपांची ते लागवड करतात. यातून त्यांचंही नफ्याचं गणित ठरलेलं असतं. अतिवृष्टीने एका रात्रीत ते बदलून गेलं. तीन महिन्यांनंतर लाखो रुपये पिकातून येतील, हे स्वप्न पुरात वाहून गेलं. एकट्या वैजापूर तालुक्यातील जवळपास १५ हजार एकरवरील कांद्याचं पीक नष्ट झालं.
पणन मंडळावरील संचालक सीताराम वैद्या यांची शेती वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावात. त्यांनी तीन एकरवर खरिपातील लाल कांद्याची पुनर्लागवड केलेली. तीन महिन्यांनंतर एकरी १२५ ते १३० क्विंटल उत्पादन अपेक्षित होतं. तीन एकरात साधारण पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न कांद्यातून मिळेल, ही आशा आता मातिमोल झाली आहे.
गाळात चालली शेती…
आष्टी तालुक्यातील पेटपांगरा गावातील तलाव अतिवृष्टीने फुटला. पावसाचा जोर एवढा होता की, तलावातील गाळ, पाणी सारं सोपान कारभारी मिसाळ यांच्या शेतात शिरले. सोपान आणि त्यांचे भाऊ यांच्या नावावर प्रत्येकी साडेतीन एकर जमीन. थोडीशी जमीन आईच्याही नावे. पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने कापूस, कांदा, तूर हे पीक लावले. पण एकाच पावसाने सारं पीक गेलं. विहिरीमध्ये गाळ शिरला. ती पूर्णत: बुजलीच. विहिरीतील मोटार, ३० पाइप वाहून चिखलात कुठं बुजले काय माहीत ? सोपानच्या शेतात आता मोठेमोठे दगड आहेत. सोपानला ऊसतोडणीला जाण्याचे वेध लागले आहेत. दसऱ्यापर्यंत जेवढे होईल तेवढे दगड हटवू. मग जमलं तर रब्बी पेरू असा त्याचा मानस. शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यावर ते जाणार आहेत. त्यांचा मुलगा राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला आहे. मुलगी १२ वी शिकते आहे. आता पुढं काय करायचं, हे कळत नाही. उसतोडणी हाच पर्याय समोर आहे. ते आणि त्यांची पत्नी पुन्हा स्थलांतराच्या तयारीला लागले आहेत. एक मोठी विहीर आता बुजली आहे. पावसाने सारं वाहून गेलं आहे. याच गावात नदीकाठच्या ४० विहिरी काही अंशत: तर काही पूर्णत: गाळाने भरल्या आहेत. आता गाळ काढायला पैसे हवेत. मोटार पाइपसाठी सुमारे ५० हजार रुपये लागणार आहेत. कोयता एवढंच पैसे मिळविण्याचं साधन हातात आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रामकुमार इंगोले आणि उत्तम जाधव यांचा बांधाला बांध. दोघांची शेती वाहून गेली. विहिरीच्या भोवतलाचे पाइप तर गेलेच, पण तुषार सिंचनाचे ३० पाइप, ६० नोजल गेले. पाण्याची मोटार बंद पडली. त्यात चिखल गेला. आता पुन्हा ती यंत्रणा उभी करायची असेल तर दीड लाख रुपये लागतील. पांडुरनी गावातील उत्तमराव जाधव यांना आता मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. कारण शेत दुरुस्तीला एकरी सहा ते सात हजार रुपयेही पुरणार नाहीत. एवढा पैसा आणायचा कोठून ?
पूर ओसरतोय, पाय मात्र गाळातच!
आता पुराचं पाणी ओसरू लागलं आहे. इथं काही तरी पीक होतं याच्या फक्त आता खाणाखुणा शेतात दिसू लागल्या आहेत. त्याबरोबरच येणाऱ्या दिवसांचं भीषण वास्तव गिरीश उत्तमराव शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दिवसासुद्धा अंधारी आणणारं आहे. पूर्णा तालुक्यातील मुंबर या गावात त्यांची चार एकर शेती आहे. गोदाकाठी असलेलं हे शिवार आहे. ऑगस्ट महिन्यातच एकदा या शिवारात ढगफुटी झाली होती. पारंपरिक पिकात काही उरत नाही म्हणून गिरीश यांनी एक एकर वांग्याचा प्लॉट तयार केला. त्यासाठी खर्चही केला. आजही ग्रामीण बँकेचं पीककर्ज गिरीश यांच्या डोक्यावर आहे. ऑगस्टमधल्या ढगफुटीत वांग्याला तडाखा बसला, एवढंच नाही तर वांग्यासाठी केलेलं ठिबक सिंचनाचं साहित्यही वाहून गेलं. हळहळत न बसता गिरीश यांनी वांगी काढून त्याच ठिकाणी पालक हे भाजीपाला वर्गीय पीक घेतलं. एक एकर भेंडीही केली. आता अतिवृष्टीचा फटका तर बसलाच पण गोदावरीला आलेल्या पुराचं पाणी शेतात घुसलं. दोन-तीन दिवस शेतात करून पावसाने पदरातलं सगळंच नेलं. सोयाबीनची पूर्ण माती झाली. आता केवळ काड्या शिल्लक आहेत. कापसाला बोंडं आलेली होती. ती पावसात भिजली, पुराच्या पाण्यात सडली. एक एकर मूग पेरलेला होता त्याचंही काहीच शिल्लक राहिलं नाही. गिरीश यांना ही सगळी वाताहत सांगण्याचं अवसानही शिल्लक राहिलेलं नाही.
पुराच्या पाण्याने शेतातल्या विहिरीत सगळा गाळ जाऊन बसला. आता तर जवळ फुटकी कवडीही नाही. खरिपातून एक रुपयाही निघाला नाही. उलट पुढं खूपच मोठा खर्चाचा खड्डा झाला आहे. पुढचे दिवस कशाच्या आधारावर ढकलायचे असा प्रश्न या तरुण शेतकऱ्याचा आहे. पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा शेतीत नवं काही तरी करावं म्हणून वांगी, भेंडी, पालक असं सगळं काही करून पाहिलं, पण सगळंच मातीमोल झालं आहे. दोघं नवरा-बायको शेतात राबतात. गिरीश यांना दोन मुली आहेत. त्या परभणीला शिकतात. मोठी मुलगी दहावीत तर धाकटी आठवीत आहे. एकीकडं शेतातल्या गाळात रुतलेले पाय, दुसऱ्या बाजूला डोक्यावर असलेलं पीक कर्ज, घराचा खर्च, मुलींचं शिक्षण असा सगळा विचार केला तर त्यांना डोळ्यासमोर अंधार दिसू लागतो. एक पाय गाळातून काढल्यानंतर दुसरा पाय गाळात रुतत जातो. गोदावरी, दुधना, पूर्णा या मोठ्या नद्या, इतरही छोट्या छोट्या नद्या, ओढे नाले यांच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांची गत गिरीशसारखीच आहे.
पूर वाढत जाताना…
रात्रीचे दीड वाजलेले. देवगड, नागमठाण आणि माळुंजा या सरिता मापन केंद्रातून किती पाणी येऊ शकेल, याचा अंदाज आला. पूरपरिस्थिती निर्माण होईल, असं लक्षात आलं. जायकवाडीतून एक लाख १३ हजार प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडावं लागलं. आधी जायकवाडीच्या उजव्या बाजूचे १८ दरवाजे उघडण्यात आले. पुढे २७ दरवाजे उघडण्यात आले. चार फूट दरवाजे उघडण्यात आल्यानंतर पुढे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले. पुढे हे पाणी माजलगाव धरणात जातं. माजलगावच्या पुढे मंद्रस या गावाजवळ गोदावरी आणि सिंदफणाचा संगम. सिंदफणा नदीला उतार अधिक. त्यामुळे या नदीचं पाणी लवकर पुढं जातं आणि तुलनेने गोदावरीचं पाणी संथ वाहतं. त्यामुळे पाणी पात्राबाहेर यायला सुरुवात होते. सकाळी पाथरी, गंगाखेडमध्ये पाणी शिरलं. सायरन वाजला. २४ तास कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे उघडण्याचं काम करण्याआधी धरणाखालील भागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली जाते. या महिन्यात ही प्रक्रिया तीन वेळा घडली. गोदापट्ट्यात नदीकाठच्या शेतशिवारात पाणीच पाणी झालं. जायकवाडीच्या ३५ हजार हेक्टरवर किती पाऊस पडला, याचं मोजमाप घेता येत नाही. तो अंदाज बांधावा लागतो. पूर नियंत्रणाचा हा खेळ कधी रात्री सुरू होतो तर कधी पहाटे. पुराने अधिक विध्वंस करू नये, याची काळजी घेतली तरी जे घडते आहे त्याची भीषणता खूप अधिक आहे. कधी जायकवाडी, कधी मांजरा, कधी सिना, विष्णुपुरी या पुराच्या पाण्याबरोबर तलाव फुटले आणि निम्मा मराठवाड्यात ओला दुष्काळ आला आहे. पावसाने जणू जगणंच वाहून नेलं. पण याला फक्त पाऊसच जबाबदार नाही. शेती खालच्या बाजूला आणि सिमेंट रस्त्याची कामं वरच्या बाजूला, नदीपात्रातील अतिक्रमणं आणि वाळू उपसा करणारी अजस्रा यंत्रणा हे सारंदेखील तितकंच जबाबदार आहे.
दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि आता ढगफुटी
मराठवाड्यातील ४८३ महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली मंडलं आहेत ४५१. यात एक वेळा अतिवृष्टी झालेली मंडलं ८५, दोन वेळा अतिवृष्टी झालेली मंडलं ११७, तीन वेळा ११३ मंडलांमध्ये अतिवृष्टी, तर ८७ मंडलांमध्ये चार वेळा, २८ मंडलामध्ये पाच वेळा, १५ मंडलांमध्ये सहा वेळा अतिवृष्टी झाली आहे. सात वेळा अतिवृष्टी झालेली सात मंडलं आहेत. गेल्या १५ वर्षांत सहा वेळा गारपीट झाली आहे आणि चार वेळा दुष्काळ पडला आहे. २०१२ मध्ये ६९ टक्के, २०१४ – १५ मध्ये ५३ टक्के, २०१५ मध्ये ५६ टक्के, २०१८ – १९ मध्ये ६४ टक्के एवढाच पाऊस नोंदवला गेला होता. परिणामी २०१६ मध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ४०१५ टँकरने पिण्याचं पाणी पुरवावं लागलं होते. ७६ पैकी ७१ तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी किमान अडीच ते तीन मीटरने घसरली होती. आता त्याच मराठवाड्यात अतिवृष्टीही झाली आणि ढगफुटीही. हवामान बदलाचा लंबक एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पोहोचला आहे. नव्या पर्यावरणीय अभ्यासाची गरज आहे. हे मान्य असूनही साधं डॉपलर रडार बसवण्यासाठी गेली पाच वर्षे प्रशासकीय पातळीवर कागदपत्रं पळताहेत. त्याचं श्रेय घेणारी मंडळी ढोल, ताशे आणि नगारे वाजवताहेत.
कांदा सडला…
नाशिकला लागून असलेल्या पट्ट्यात वैजापूर तालुक्यात वर्षाला ५०० नव्या कांदा चाळीची भर पडते. वैजापूर तालुक्यात आतापर्यंत सहा ते सात हजार कांदा चाळींना मंजुरी दिली होती. बहुतांश कांदा भिजला आहे. आधीच दर घसरले होते. आता कांदा सडला आहे.
शेतात पाणी
सिंदफणा आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेकांच्या शेतात पाणी आलं. विहिरी गाळाने भरल्या. अगदी पाणीपुरवठ्याच्या २८ विहिरी बुजल्याने माजलगाव, आष्टीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. आजही अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे.
आभाळच फाटलं, संसाराला आधार तरी कसा द्यायचा?
घट बसले तेव्हा पहिल्या माळेला पाऊस सुरू झाला. सविताबाईंचं पाऊस मोजण्याचं तंत्र वेगळं. आता सहावी माळ आहे. पाऊस काही थांबला नाही. नदीला पाणी आलं. घराघरात घुसलं. आता सगळं काही भिजलं आहे. अंथरूण, पांघरूण, घरातील भांड्यांमध्ये चिखल जाऊन बसला. धान्य भिजलं. मुलांची दप्तरं भिजली. हे कपडे वाळले तरी पुन्हा विरून जातील… सविता पाटील सांगत होत्या. वाहेगव्हाणमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुन्हा गोळा केलेला संसार आवरायची त्यांना घाई होती. त्या घाईघाईत एवढंच म्हणाल्या, ‘आता आवरायचं काय आणि सावरायचं काय…’ काही जणी मदतीला आल्या. सगळ्यांनी मिळून काही कपडे कोरड्या ठिकाणी नेले. गावातील समाजमंदिरात सारे जमले. गेल्या सहा दिवसांपासून तिथेच गावकरी जेवण शिजवतात. पण चिंता आता पुराची नाही. होणारे नुकसान होऊन गेले आहे. सविताबाई सांगत होत्या. गावात जवळपास ५० हून अधिक जणी मजुरीला जाणाऱ्या. कधी खुरपणी, कधी निंदणीसाठी जाणाऱ्या. आता गावातील शिवारात पीकच राहिले नाही. त्यामुळे चिंता आहे आता संसाराला आधार तरी कसा द्यायचा?
परंडा तालुक्यातील तांदुळवाडीच्या सारिका शिंदे यांचं दोन एकर शेत. दोन दिवस स्वत: शेतात राबायचं आणि उरलेले दिवस मजुरी करायची. महिनाभरापूर्वी पिकं बहरात होती. मजुरी २५० वरून ३०० रुपयांपर्यंत आपोआप गेली. बडे शेतकरीही मजुरी वाढवायला तयार होते. पण पाऊस सुरू झाला आणि काम थांबलं. आता गेल्या महिन्यापासून गावातील सगळ्या महिलांचा रोजगार पूर्णत: थांबला आहे. शेतीच खरवडून गेली आहे. बहुतांश शेतात पाणी आहे त्यामुळे आता कोणाकडे कामच उपलब्ध नाही. मजुरी मिळण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे संसाराला आधार म्हणून मजुरीला जाणाऱ्या सारिका शिंदे हैराण आहेत. त्यांना दोन मुलं. सातवीला मुलगा आणि दहावीला मुलगी. दोन्ही मुलांपैकी एकाची काही पुस्तकं भिजली. आता जशी उघडीप होईल तसा संसार वाळवायचा, आवरायचा आणि सावरायचा. पण पुढं काय करायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही. ज्यांच्या घरात पाणी शिरलं ते शेजाऱ्याच्या घरात जाऊन राहिले आहेत. काहीजणांना दुसऱ्याच्या घरातून जेवणाचा डबा येतो आहे. थोडीफार तातडीची मदत मिळत आहे. पण प्रश्न आहे पुढे हाताला काम कसं मिळणार? या परिस्थितीचं वर्णन करता करता त्यांच्या डोळ्यात पूर साठतो.
या लेखामध्ये आसाराम लोमटे आणि बिपीन देशपांडे यांचेही योगदान आहे.
suhas.sardeshmukh@expressindia.com