scorecardresearch

भटक्या श्वानांच्या समस्येला माणूसही तितकाच जबाबदार

भटके श्वान हे आपल्या समाजाचाच भाग, त्यांच्याशी क्रूरतेने वागू नका, असे उच्च न्यायालय का म्हणते ते समजून घेऊया.

stray dogs , humans, responsibility
भटक्या श्वानांच्या समस्येला माणूसही तितकाच जबाबदार ( संग्रहित छायाचित्र )

सुनिता कुलकर्णी

माणसे आणि प्राणी यांच्या सहजीवनात कुत्रा अर्थात श्वान या प्राण्याचा वाटा इतर प्राण्यांच्या तुलनेत कदाचित सगळ्यात जास्त असू शकतो. पण वाढत्या शहरीकरणाने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांमध्ये रस्त्यांवर राहणारे भटके श्वान हा प्रश्न दिवसेंदिवस नुसता गंभीरच होत चाललेला नाही, तर माणूस आणि श्वान तसेच आणि माणूस आणि माणूस या संबंधांमध्येही तणाव निर्माण करताना दिसतो आहे.

अगदी अलीकडचे उदाहरण आहे मुंबईमधले. येथील कांदिवलीमधील एका सोसायटीत राहणाऱ्या पारोमिता पुरथन या प्राणीप्रेमी महिलेने श्वानांसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. तिचे असे म्हणणे होते की तिच्या सोसायटीच्या परिसरातील १८ भटक्या श्वानांची ती काळजी घेते. त्यांना खायलाप्यायला घालते, त्यांची काळजी घेते. पण ती राहते ती सोसायटी तिला सोसायटीच्या आवारात हे काम करण्यासाठी परवानगी देत नाही. श्वानांना सोसायटीच्या आवारात बोलावून खायला घालण्यासाठी मज्जाव केला जातो. एवढेच नाही तर तिने असे करू नये यासाठी बाऊन्सर नेमले गेले आहेत. बाऊन्सर नेमले जाण्याच्या मुद्द्याचा सोसायटीने इन्कार केला असला तरी पारोमिता पुरथन यांचे बाकीचे मुद्दे फेटाळून लावलेले नाहीत.

यातला चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे या प्रकरणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या मताचा. न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने भटक्या श्वानांशी क्रौर्याने तसेच तिरस्काराने वागणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. एवढेच मत व्यक्त करून न्यायालय थांबले नाही, तर भटके श्वान हे आपल्या समाजाचाच भाग आहेत आणि त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. ते करताना न्यायालयाच्या आवारातील भटक्या श्वानांचे आणि मांजरींचे उदाहरण देऊन या आवारात त्यांची कशी काळजी घेतली जाते हे देखील सांगितले.

न्यायालयाचे हे मत प्राणीप्रेमींमध्ये आनंद निर्माण करणारे तर इतरांमध्ये राग, तिरस्कार या भावना निर्माण करणारे आहे, कारण या प्रश्नाला मुळातच दोन बाजू आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पारोमिता पुरथन यांच्यासारखी भटक्या श्वानांवर प्रेम करणारी, भूतदया दाखवणारी, करूणा बाळगणारी मंडळी आसपास दिसतात, तशीच भटक्या श्वानांना घाबरणारी, त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली, त्यांच्या चाव्यामुळे रेबीज झालेली, त्यावर औषधोपचार घ्यावा लागलेली मंडळीही मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या शहरांमध्ये रात्री उशिरा कामाहून परतणारी किंवा सकाळी चालण्यासाठी बाहेर पडणारी मंडळी भटक्या श्वानांच्या उच्छादाला घाबरून असतात, कारण रस्त्यावर टोळीने वावरणारे हे भटके श्वान अनेकदा टोळीने अंगावर धावून येतात, असं त्यांचे म्हणणे असते. भटक्या श्वानांनी लचके तोडल्यामुळे लहानग्यांचा मृत्यू अशा बातम्याही अनेकदा वाचायला मिळतात. अशा वेळी माणूस महत्त्वाचा की रस्त्यावरचा श्वान असा प्रश्न प्राणीप्रेमी मंडळींना आवर्जून विचारला जातो. तुमच्या अंगावर जर भटक्या श्वानांची टोळी धावून आली तर तेव्हाही तुम्ही काय भूतदया दाखवत बसणार आहात की काय, असा मुद्दाही मांडला जातो. भटक्या श्वानांचा उपद्रव मोठा आहे, हा मु्द्दा नाकारण्याजोगा नाही, हे खरेच आहे. पण म्हणून या श्वानांना विष खायला घालून मारणे, त्यांना जिवंत जाळणे हे प्रकार अजिबातच समर्थनीय नाहीत. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुळात आपल्याला हे मान्य करावे लागेल की हा प्रश्न श्वाननिर्मित नसून मानवनिर्मित आहे.

भटक्या श्वानांची संख्या वाढण्यासाठी मुळात दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे त्यांच्या निर्बीजीकरणातील अपयश आणि दुसरे म्हणजे शहरांमधली सामाजिक परिस्थिती. तीसेक वर्षांपूर्वी भटक्या श्वानांना सरळ मारून टाकले जात असे. त्यातून त्यांची संख्या नियंत्रणात रहात असे. त्यांना पकडून नेणाऱ्या डॉग व्हॅन हा एकेकाळी चर्चेचा विषय होता. पण त्यांना अशा पद्धतीने मारणे हे क्रौर्य आहे, असे सांगून न्यायालयाने त्यावर बंदी आणली. आणि त्यांचे निर्बीजीकरण करायला सांगितले. पण भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे हे अर्थातच अवघड नसले तरी सोपेदेखील नाही. आपल्या यंत्रणांवरील इतर कामांचा ताण, त्यांचे प्राधान्यक्रम आणि कामाच्या पद्धतीतील त्रुटी यामुळे या निर्बीजीकरणाला मर्यादा पडल्या आणि भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत गेली. रस्त्यावर राहणारी ही श्वानमंडळी बघता बघता टोळ्या करून रहायला लागली.

पण त्यांच्या या पद्धतीने राहण्या जगण्याला आपण म्हणजेच शहरवासीय देखील तितकेच कारणीभूत आहोत. असे म्हटले जाते की खाणे सहज उपलब्ध असेल तर कोणताही प्रजाती वेगाने आपली संख्या वाढवत जाते. शहरांमध्ये असलेल्या उकिरड्यांवर या भटक्या श्वानांसाठी अन्नपदार्थ सहज उपलब्ध असतात. ते मिळवण्यासाठी त्यांना फार यातायात करावी लागत नाही. त्यामुळे त्यांची प्रजाती वेगाने वाढत गेली आहे, असे सांगितले जाते. माणसांनी फेकून दिलेले उरलेले, शिळेपाके अन्न त्यांना उकिरड्यावर सहज उपलब्ध होते. गावखेड्यांमध्ये अशा पद्धतीने अन्न उपलब्ध नसल्यामुळे तिथे भटक्या श्वानांचा प्रश्न इतक्या तीव्रतेने भेडसावत नाही. असे असेल तर मग यात चूक कोणाची?

रात्री अपरात्री येताना भटक्या श्वानांची टोळी अंगावर धावून आली तर कुणीही घाबरणार हे स्पष्ट आहे. पण त्यात प्रत्येक वेळी दोष त्यांचाच असतो असे नाही. अनेकदा लहान मुले, तरूण मंडळी गंमत म्हणून भटक्या श्वानांना त्रास देतात. त्यांना दगड मारतात. त्यांच्या शेपटीला भटाके बांधून ते पेटवून देतात. यातून होणारा त्रास त्या मुक्या जिवांना कुणाला सांगता येत नाही. पण त्यातून आलेला राग ते येईलजाईल त्याच्यावर भुंकून, त्याच्या अंगावर धावून जाऊन व्यक्त करतात. काही भागांमध्ये विशिषट बनावटीच्या मोटारकार जात असतील तर तेथील भटके श्वान त्या गाडीच्या मागे त्वेषाने भुंकत धावत जातात. तशा दिसणाऱ्या एखाद्या गाडीने त्या श्वानाला किंवा त्याच्या टोळीतील भाऊबंदांना कधीतरी चिरडले असते, त्याचा राग ती व्यक्त करत असतात. अनेकदा असेही दिसते की रस्त्यावर एखादे श्वान वावरताना दिसते. ते भटके नाही, ते एखाद्या विशिष्ट ब्रीडचे आहे, हे दिसत असते. लोक पाळण्यासाठी हौसेने विशिष्ट ब्रीडचे एखादे श्वान घरी नेतात. पण ते पाळणे आपल्याला झेपत नाही, असे वाटले किंवा त्याला अगदी कॅन्सरसारखा असाध्य आजार झाला तर त्याला सरळ रस्त्यावर सोडून देतात. खरेतर घरात वाढलेले श्वान घरातल्या बाळासारखे सुरक्षित वातावरणात वावरत असते. त्याला असे अचानक रस्त्यावर सोडून दिले तर ते बावचळते. त्यात त्याला आधीपासून रस्त्यावर राहणाऱ्या आक्रमक श्वानांशी जुळवून घेणे जमतेच असे नाही. ते त्यांच्या आक्रमकपणाला बळी पडते नाहीतर तेही त्यांच्यासारखे आक्रमक होऊन जाते. घरी पाळलेल्या श्वानांशी असे वागणे हे माणसांमधले क्रौर्य नाही तर काय आहे?

केंद्र सरकारच्या प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ नुसार प्राण्यांशी कोणत्याही प्रकारे क्रूरतेने वागणे कायद्याला मान्य नाही. पाळीव प्राण्यांच्या मालकीचे कठोर नियम लागू करणे, लोकांना श्वानांना खायला घालण्यापासून रोखणे आणि प्राणी कल्याण संस्थांद्वारे निधी उपलब्ध करून देणाऱ्या सुविधा उभारणे हेच उपाय आहेत. भटक्या श्वानांना कुठेतरी नेऊन ठेवणे किंवा त्यांना मारणे हे अमानवी आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 11:07 IST

संबंधित बातम्या