सौरभ तिडके
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने इस्कोट झाला आहे. गाव-शहर संपर्क तुटला आहे, घरांमध्ये पाणी शिरले आहे, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच पण जमीनही वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा गंभीर संकटाच्या काळात लोकांना मदतीची, आधाराची आणि संवेदनशील नेतृत्वाची सर्वाधिक आवश्यकता असते. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याच्या अनेक भागांतून होते आहे. पण नेत्यांचे लक्ष कुठे आहे?
होय, अनेक स्थानिक व मोठ्या स्तरावरील राजकीय नेते पूरग्रस्त भागात दाखल झाले आहेत. यात फक्त हेलिकॉप्टरी वरिष्ठ नेते नाहीत, गावातलेही नेते गुडघाभर पाण्यातून ट्रॅक्टर चालवत, पांढरे कपडे घालून गर्दीत उभे राहत, आणि त्याचे ‘रील’ काढण्यामध्ये व्यग्र असल्याचे वारंवार इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सॲप आदी समाजमाध्यमांतून दिसून येते. नेत्यांची उपस्थिती ही मदतीसाठी कमी आणि प्रचारासाठी जास्त असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून होतेच, ते आत्ताच्या गंभीर पूर परिस्थितीतही दिसते आहे. काही स्थानिक नेते विशेषतः पाहाणीसाठी आलेल्या मोठ्या नेत्यांशी ‘गप्पा मारणं’, ‘हात वर करणं’, आणि ‘रिळा’ शूट करत सोशल मीडियावर प्रचार करण्यात मग्न आहेत. हे प्रकार पावसाळी कवी किंवा हिरव्या डोंगरांचे ‘रील’ बनवणाऱ्या इन्फ्ल्युनसरांसारखे एकदा पाहून ‘आवडले तर फॉरवर्ड करा’ प्रकारचे असू शकत नाहीत… ते राजकीय नेतृत्वाच्या सामाजिक जबाबदारीचा गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
संवेदनशीलतेऐवजी प्रतिमा-वर्धन!
या नेत्यांच्या वर्तनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते लोकांना मदत करणे, प्रशासनासोबत समन्वय साधणे, पूरग्रस्तांचे प्रश्न ऐकून मार्ग काढणे यापेक्षा ‘दोस्त, गरिबांचा मसीहा, स्टार’ या प्रतिमांचे रील बनवणे आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचार करणे हाच त्यांच्या प्राथमिक हेतू दिसतो आहे. अशी स्थिती पाहून प्रश्न निर्माण होतो – खरोखरच या नेत्यांचे लक्ष पूरग्रस्त सामान्य जनतेकडे आहे का? की आपली प्रतिमा, फॉलोअर्स आणि लाइक्स वाढविणे हा निव्वळ एक ‘रील’ राजकारणाचा भाग बनला आहे?
किमान अशा संकटकाळात तरी राजकीय नेत्यांनी समाजाच्या भावनांचा आदर ठेवावा, अशी अपेक्षा असते. मात्र ‘रील’वर राजकीय प्रतिष्ठा शोधताना आणि आपले फॉलोअर वाढवण्यासाठी आटापिटा करताना अनेक नेत्यांचा समाजाभिमुखतेचा पाया ढासळतो आहे. पूर्वी पावसाळ्यात कवी, लेखक, विचारवंत परिसरात निसर्गाच्या सुंदरतेसाठी किंवा संकटावरील विचारांसाठी बाहेर पडत असत; उपरोधाने आपण पावसाळी कवी म्हणून देखील अशा काही लोकांचे पाय देखील खेचले आहेत मात्र; आज आपण निवडून दिलेले नेते प्रचारासाठीच ‘रील्स’चा आश्रय घेतात हे खेदजनक आहे. यांच्या ‘रील्स’वरच्या गाण्यांचाही ‘पॅटर्न’ही ठरलेलाच…
उदाहरणार्थ ही गाणी
- ‘अंबाबाई गोंधळाला ये – आई संकटातून तार, तुझ उघडून दार’
- ‘देवाक काळजी – होणारं होतलं जाणारं जातलं, मागे तू फिरू नको’
- ‘उधळीन जीव – रख रख झालं खळ, पेटलं उरी’
- ‘वाट दिसू दे , खेळ मांडला, देव कोपला’ …
ही यादी आणखी लांब होईल, पण कोणत्या भागातले, कोणत्या सामाजिक गटातले ‘फॉलोअर’ हवे हे ठरवूनच अशी गाणी निवडली जातात हे उघड आहे. तीच ती गाणी, त्याच प्रकारचे व्हीडिओ एडिटिंग, मधूनच दिसणारा नेत्याचा चेहरा, या साऱ्याचा पाऊस अतिवृष्टीच्याही आधीपासून पडतोच आहे.
प्रत्यक्ष मदतीचा अभाव
अनेक राज्यांमध्ये प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आणि सामान्य नागरिक पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात गुंतलेले आहेत. मात्र आपल्याकडे अनेक नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये प्रत्यक्ष मदत, संवाद, आणि समस्या सोडवण्यापेक्षा प्रचाराची घडामोड होत असल्याने लोकांच्या मनात असंवेदनशीलतेबद्दल आणि राजकीय ढोंगाबद्दल नाराजी वाढत आहे. यात भर म्हणून एका मोठ्या राजकीय पक्षाने पूर आला रे आला लगेच स्वत:च्या नावाचे, पक्षाचे बॅनर लावून मदतीच्या गाड्या धाडल्या. मदत विनाविलंब धाडली जाते ही गोष्ट चांगलीच आहे पण आतील पॅकेट वर स्वत:चे, नेत्याचे, पक्षाचे स्टिकर लावून जाहिरातबाजी. जणू काही, पूर येणार आहे स्टिकर- बॅनर छापून घ्या, असे यांच्या कानात परमेश्वरानेच येऊन सांगितले असावे.
आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे शब्द किंवा कृती व्हायरल होऊन लोकांचे मनोरंजन झाले आहे. कधीकधी त्यांचे वरिष्ठ नेतेसुद्धा कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा भाग मानून शाबासकी देतात. मात्र, या प्रवाहात काही नेते लोकांचे मनोरंजन करणे म्हणजेच जनसेवा अशी व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सध्या पूरपरिस्थिती किंवा इतर संवेदनशील प्रश्नांनी गांजलेल्या जनतेला ‘रील स्टार’ची गरज नाही, तर खऱ्या अर्थाने आमच्यासाठी उभा राहणारा ‘रीअल स्टार’ नेता अपेक्षित आहे – मग तो राज्य पातळीवरचा असो की स्थानिक पातळीवरचा.
सरते शेवटी इतकेच की, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती ही जरी ‘राजकीय संधी’ मानली तरी, ती सोशल मीडियावरचे ‘रीळ’ काढण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्या कृतीमुळे लोकांना आधार वाटावा यासाठीची संधी असते. राजकीय नेतृत्वाने समाजाभिमुख प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे; अन्यथा ‘रील स्टार नेत्यां’मुळे महाराष्ट्राची आर्थिक-सामाजिक धूप सुरूच राहील… त्यासाठी नैसर्गिक संकटाचीही गरज उरणार नाही… राजकीय असंवेदनशीलतेचे संकट पुरेसे ठरेल.
असे होऊ नये, एवढ्याचसाठी हे लिखाण.
tidakesourabh@gmail.com