राजेंद्र भास्करराव  भोसले
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र, भारताच्या राज्यसभेचे माजी उपसभापती, रिपब्लिकन  पक्षाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक व माझे वडील दिवंगत भास्करराव  भोसले (माजी स्टेशन डायरेक्टर, आकाशवाणी पुणे) यांचे आंबेडकरी चळवळीतील मित्र बॅ. राजाभाऊ  खोब्रागडे यांची येत्या २५ सप्टेंबर  २०२५ रोजी जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही आठवणी  देत आहे.

आमच्या भोपाळच्या बंगल्याला भेट

बॅ. राजाभाऊ खोब्रागडेंना मी नऊ वर्षाचा असताना पहिल्यांदा १९६६ साली पाहिले. तेव्हा माझे वडील दिवंगत भास्करराव भोसले भोपाळ येथे आकाशवाणीचे असिस्टंट  स्टेशन डायरेक्टर होते व आमचा तेथील प्रोफेसर्स काॅलनीमध्ये टाॅगोर हाॅलसमोर सरकारी बंगला होते. तेथे राजाभाऊ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार दादासाहेब  गायकवाडांबरोबर आमच्याकडे आले होते. त्यावेळी  दादासाहेब पेरूमल हे कमिटीचे सभासद होते व त्या कमिटीबरोबर भोपाळला आले होते. आमच्या घरी  येताना त्यांच्याबरोबर १५-२० लोक आले. त्यात मध्यप्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ॲड्. हरिश्चंद्र ॠषी, भोपाळ शहराचे अध्यक्ष पटाईत, मध्यप्रदेशचे लाॅ सेक्रेटरी एस. टी. जांभुळकर (IAS),इंग्रजी दैनिक हितवादचे पत्रकार पी. पी.कऱ्हाडे व इतर चार-पाच स्थानिक कार्यकर्ते आले होते. वडिलांच्या बाजूने आकाशवाणीचे दोन मराठी भाषिक प्रोग्राम प्रोड्यूसर विठ्ठल धोपाटे व रमेश नाडकर्णी आले होते. कारण त्या दोघांना दादासाहेब गायकवाडांना पहाण्याची इच्छा होती.

अर्थात बॅ. राजाभाऊ  खोब्रागडे हे १९५८ सालीदेखील अहमदाबादला रिपब्लिकन पक्षाच्या वर्किंग कमिटीबरोबर आमच्या घरी चहापानासाठी आले होते परंतु त्यावेळी आलेल्या एन. शिवराज, जोगेंद्रनाथ मंडल,  दादासाहेब गायकवाड इत्यादी मोठ्या पुढाऱ्यांत त्यांचे अस्तित्व  फारसे जाणवले नाही. कारण एकतर जनरल सेक्रेटरी असले तरी नवखे होते व वडिलांची त्यांची फारशी ओळखही नव्हती. पुढे १९६० साली पटनाच्या सर्किट हाउसवर दादासाहेब गायकवाडांनी माझ्या वडिलांची राजाभाऊ खोब्रागडेंशी नीट ओळख करून दिली. तात्पर्य हे की राजाभाऊंची नेमणूक बाबासाहेबांनी पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणून १९५४ सालीच केली असली तरी माझ्या वडिलांची व त्यांची खरी ओळख बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर १९६० साली झाली.

राजाभाऊंची राज्यसभेची कारकीर्द

राजाभाऊ  त्यांच्या राजकीय  जीवनात १९५८  ते १९८४  च्या दरम्यान १८ वर्षे राज्यसभेत होते. १९५८ ते १९६४ , १९६६ ते १९७२ आणि १९७८ ते १९८४ अशा तीन टर्म्स ते राज्यसभेचे सभासद होते.तसेच १९६९ ते १९७२ ते राज्यसभेचे उपसभापती होते. या काळात त्यांनी राज्यसभेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर अनेक विद्वत्ताप्रचूर  व विचारप्रवर्तक भाषणे केली. बॅरिस्टर असल्यामुळे त्यांचे  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व  होते व त्यांना  कायद्याचेही सखोल ज्ञान होते. म्हणून त्यांची  संसदेतली भाषणे गांभीर्याने ऐकली जात. त्यांच्या  राज्यसभेतील  भाषणांच्या अनुवादाचा पहिला खंड मराठीत निघाला आहे. राजाभाऊ राज्यसभेचे उपसभापती होण्याअगोदर पुण्याचे रघुनाथराव तथा आर. के. खाडीलकर हेही राज्यसभेचे उपसभापती होते. त्यावेळी लोकमान्यांचे नातू व माझे वडील भास्करराव भोसले यांचे मित्र  जयंतराव टिळक पण राज्यसभेचे सभासद  होते. त्यांनी  खाडीलकर व खोब्रागडे या दोघांचेही कामकाज पाहिले होते. ते वडिलांना सांगत आले की तुमचे खोब्रागडे खाडीलकरांपेक्षाही प्रभावीपणे राज्यसभेचे कामकाज चालवतात.

राजाभाऊंचे सर्वच पक्षात वैयक्तिक मैत्री होती. पण १९६७ ते १९७२ ही पाच वर्षे  सोडली तर राजाभाऊंनी आयुष्यभर काँग्रेस विरोधाचेच राजकारण केले. १९७२ ते १९७८ ते राज्यसभेत नव्हते. त्याकाळात  इंदिरा गांधींनी राजाभाऊंना वसंत साठे यांच्याकडे निरोप पाठवला होता की, चंद्रपूरच्या जंगलात काय जाऊन बसलात. दिल्लीला येऊन आमच्या काँग्रेस पक्षाचे काम करा. मी तुम्हाला  राष्ट्रपती करते. पण राजाभाऊ बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी इंदिरा गांधींच्या या ऑफरला ठामपणे नकार दिला. उलट १९७५ साली त्यांच्या आणिबाणीलाही विरोध केला. इंदिरा गांधी राजाभाऊंचे व त्यांच्या चंद्रपूरच्या खोब्रागडे घराण्याचे राजकारणातले महत्व ओळखून होत्या. राजाभाऊ बाबासाहेबांचे स्वतंत्र बाण्याचे व स्वाभिमानाचे राजकारण करत. त्यामुळे ते काँग्रेसच्या इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण किंवा विरोधी पक्षातले चंद्रशेखर व वाजपेयी यापैकी कोणाच्याही पुढे दबत नसत व झुकत नसत. तसेच यापैकी कोणीही राजाभाऊंना गृहीत धरू शकत नसत.

राजाभाऊंनी संसदीय शिष्ठमंडळांच्या व आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदांच्या निमित्ताने अनेक देशांना भेटी दिल्या. त्यातील काही शिष्ठमंडळांचे त्यांनी नेतृत्वही केले. तसेच १९६५ साली ते अमेरिकन सरकारच्या निमंत्रणावरून तेथील कृष्णवर्णीयांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तीन महिने अमेरिकेला गेले होते. तेथे त्यांनी कृष्णवर्णीय नेते मार्टिन ल्यूथर किंग ( ज्युनियर) यांची भेट घेतली व त्यांना आंबेडकरवादाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न  केला. तात्पर्य, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर अर्थाने गाजवली!

उत्तम वक्ते आणि प्रभावी भाष्यकार

राजाभाऊ  खोब्रागडे हे पट्टीचे वक्ते होते. बाबासाहेबांच्या आदेशानुसार ते आधीचे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पक्ष  संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात सहभागी झाला. त्यातील दादासाहेब गायकवाड, आर. डी. भंडारे बी. सी. कांबळे या नेत्यांबरोबरच राजाभाऊ खोब्रागडे यानींही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. संयुक्त  महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून राजाभाऊ अधिकारवाणीने बोलत. या काळात एस.एम.जोशी,आचार्य अत्रे वगैरे संयुक्त महाराष्ट्राचे मोठमोठे पुढारी त्यांच्या चंद्रपूरच्या घरात रहात. राजाभाऊंच्या लढयातील भरीव योगदानामुळे त्यांनाही संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार मानण्यात येते.

राजाभाऊंचा भारतीय राज्यघटनेचा स्वतंत्र अभ्यास होता व ते सोप्या भाषेत लोकांना घटना समजावून सांगत. उदाहरणार्थ पुण्याला समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या पुढाकाराने रिपब्लिकन पक्षाचे माजी महापौर भाऊसाहेब चव्हाण यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना पाठिंबा देण्यासाठी एक सर्वपक्षीय परिषद बोलवली होती. त्यात भाषण करताना राजाभाऊंनी स्पष्ट शब्दात सांगून टाकले की आम्हा एस. सीं ना आमच्या सवलती घटनेच्या अनुच्छेद ३३४ व ३३५ अनुसार आमच्या बाबासाहेबांनी आधीच देऊन टाकल्या आहेत. परंतु फक्त आपल्यापुरते पहाण्याची अप्पलपोटी वृत्ती त्यांची नव्हती. त्यांच्या लक्षात की समाजात एससी/एस.टीं च्या खेरीज पण ओबीसी हा एक मधला वर्ग आहे. त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे भावनेतून बाबासाहेबांनी घटनेत ३४० वे अनुच्छेद टाकले. त्यातूनच मंडल आयोगाच्या शिफारशी आल्या. त्याच सभेत त्यांनी असेही सांगितले की बाबासाहेबांनी १०  वर्षाची कालमर्यादा फक्त राजकीय राखीव जागांना घातली आहे. शैक्षणिक व नोकरीतील राखीव जागांना १०  वर्षाची कालमर्यादा घातलेली नाही. जोपर्यंत खरी सामाजिक समता येत नाही तोपर्यंत त्या आवश्यकच आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे वैशिष्ट्य  सांगताना ते पुण्यातील एका सभेत  म्हणाले,  ‘आमच्या  रिपब्लिकन पक्षात काँग्रेस किंवा इतर पक्षांसारखी चार -आठ आण्यांची वर्गणी भरून सदस्य व्हावे  लागत नाही. आंबेडकरी समाजात जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा जन्मतःच रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असतो. अर्थात वयात आल्यावर तो स्वतः ते सदस्यत्व सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर तो भाग वेगळा!’ मला नाही वाटत की पक्ष सभासदत्वाची इतकी व्यापक व सर्वसमावेशक व्याख्या  दुसऱ्या कोणत्या पुढाऱ्याने केली असेल.

रिपब्लिकन पक्षात पुढाऱ्यांचे नेमके काय  काम आहे हे सांगताना ते म्हणाले की बाबासाहेबांनी आधीच सर्व आखणी करून ठेवली आहे व या पक्षाला गती आणि वेग  दिला आहे. त्यामुळे हा पक्ष स्वतःच्या गतीने चालत राहतो. आम्हा पुढाऱ्यांचे काम एवढेच आहे की बाबासाहेबांनी पक्षाला दिलेली ती गती व वेग कायम ठेवणे!

पुण्यातील नेहरु मेमोरियल हाॅलमध्ये १९७७ साली झालेल्या भाषणाच्या वेळी  एकाने त्यांना चिठ्ठी पाठवली होती की जनता पक्षात आधी वेगवेगळे असलेले चार पक्ष एकत्र आले तसे तुम्ही तिघे  कांबळे, खोब्रागडे व गवई का एकत्र येत नाही? त्यावर  राजाभाऊ  म्हणाले की जे चार पक्ष एकत्र आले त्यांच्यापैकी  प्रत्येकाकडे स्वतःची माणसे व शक्ती होती. आता पुण्यापुरतेच पाहिले तर गवईंच्या मागे माणसेच नाहीत व कांबळेंचे दापोडी, बोपोडी व ताडीवाला रोड हे दोन तीन वार्ड सोडले तर शक्ती नाही. मग ज्यांच्याकडे माणसे नाहीत, शक्ती नाही अशांशी आम्ही का ऐक्य करावे? त्यापेक्षा त्यांनीच आमच्या पक्षात विलीन व्हावे. आणखी एकदा कलेक्टर ऑफीससमोरील आंबेडकर  पुतळ्यासमोर  सुरू असलेल्या सभेत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करा अशा कार्यकर्त्यांनी  घोषणा दिल्या तेव्हा राजाभाऊंनी कोणत्याही गटाचे नाव न घेता त्या  लोकांना समजावून सांगितले की सर्व आंबेडकरवाद्यांना एकाच निळ्या झेंड्याखाली आणू!

एका सभेत ते दलित पँथर बद्दल प्रतिक्रिया  व्यक्त  करताना  म्हणाले की क्रांतीदल, दलित पँथर  अशा वेगवेगळ्या  नावाच्या  संघटना स्थापून आंबेडकरी समाजाचे शेवटी नुकसानच होणार आहे. ज्या तरूणांना पुढारपणाची हौस भागवायची ती त्यांनी खुशाल भागवावी पण समाजाचे नुकसान मात्र करू नये. पँथर ही समाजवाद्यांची पैदास असून त्यांना कम्युनिस्टांचीही फूस आहे. या दोनही पक्षांनी त्वरित त्यांचे हे उद्योग थांबवावेत नाहीतर यापुढे त्यांच्याशी कसे संबंध ठेवायचे याचा आम्हालाही विचार करावा लागेल! आणखी एका सभेत ते म्हणाले, ‘बाबासाहेबांची चळवळ ही खऱ्या अर्थाने  लोकचळवळ  होती. लोकचळवळ म्हणजे  आपल्या  राजा ढाल्याची नव्हे! ती चळवळ खरी लोकचळवळ होती कारण बाबासाहेबांच्या काळातल्या तिन्ही चारही पिढ्या त्यात  सहभागी झाल्या होत्या.’ वरील सर्व  भाषणे वाचली तर वाचकांच्या सहज लक्षात येईल की राजाभाऊ हे नुसते उत्तम  वक्तेच नव्हे तर आंबेडकरी चळवळीचे एक प्रभावी भाष्यकार देखील होते.

१९६४ चा देशव्यापी  सत्याग्रह

रिपब्लिकन पक्षाने भूमिहीनांच्या मागण्यांसाठी १९६४ साली देशव्यापी सत्याग्रह पुकारला. ‘कसेल त्याची  जमीन’ ही त्या सत्याग्रहाची घोषणा होती. त्या सत्याग्रहात  पक्षाने भूमिहीनांच्या मागणीसह एकून १४ मागण्या  मांडल्या होत्या. त्यासाठी पक्षाने १ आगस्ट १९६४ रोजी  संसदेवर एक लाखाचा मोर्चा नेला होता.परंतु सरकारने प्रतिसाद न दिल्याने पक्षाने ‘जेल भरो’ आंदोलन सुरू केले आणि देशभरातून ३ लाख ४० हजार लोक तुरुंगात गेले. त्यापैकी अडीच लाख एकट्या महाराष्ट्रातले होते. ते पाहून महाराष्ट्र सरकारचे डोळे पांढरे झाले. कैद्यांना ठेवण्यासाठी सरकारला शाळा व काॅलेजेस् घ्यावी लागली. तसेच कैद्यांच्या जेवणासाठी पुरवणी अंदाजपत्रक मांडावे लागले. या सत्याग्रहात बौध्द, ब्राम्हण, मुसलमान, ख्रिश्र्चन, शीख, पारशी इत्यादी सर्व जाती धर्माच्या लोकांनी भाग घेतला. इतक्या मोठ्या संख्येने लोक तुरुंगात गेल्यावर केंद्रातील शास्त्री सरकारला जाग आली व त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब गायकवाड  व जनरल सेक्रेटरी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांना वाटाघाटीसाठी बोलवले व १४ पैकी बहुतेक मागण्या मंजूर करून टाकल्या. आता नंतर स्थापन  झालेल्या इतर काही पक्ष व संधटनांचे लोक सांगत फिरतात की आम्ही  हे मिळवले, ते मिळवले पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की संसदेत बाबासाहेबांचे तैलचित्र, संसदेसमोर बाबासाहेबांचा पुतळा,आंबेडकर  जयंतीला सार्वत्रिक सुट्टी व धर्मांतरित बौद्धांना सवलती इत्यादी मागण्या करणारा देशातील पहिला पक्ष हा बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्षच होता.

अजातशत्रु राजाभाऊ

राजाभाऊ खोब्रागडे हे मोठ्या मनाचे व दिलदार राजकारणी होते. २३ सप्टेंबर  १९७० साली त्यांचा रिपब्लिकन  खोब्रागडे गट स्थापन झाल्यावर  त्यांना  जन्मभर विरोध करणाऱ्या आवळेबाबूंनी स्वतःचा  गट खोब्रागडे गटात विलीन केला. राजाभाऊंनी त्या आवळेबाबूंना पुढचे मागचे सगळे विसरून पक्षाचे उपाध्यक्ष तर केलेच पण १९७१ च्या निवडणूकीत  नागपूरहून लोकसभेचे तिकिट दिले. परंतु दुर्दैवाने आवळेबाबूंचे निवडणूक प्रचाराच्या काळातच निधन झाले. तरी राजाभाऊंनी आवळेबाबूंबरोबर पक्षात आलेल्या सूर्यकांत  डोंगरे, रामरतन जानोरकर, उमाकांत रामटेके, संधप्रिय गौतम व एल.आर.बाली इत्यादींना पक्षात सन्मानाची वागणूक दिली व त्यांच्यापेकी बहुतेकांचे राजकीय पुनर्वसन केले.

दुसरे उदाहरण दादासाहेब  गायकवाडांचे! ते १९७१ साली खूप आजारी होते व पुण्याला डाॅ. चिपळूणकरांकडे ट्रीटमेंट घेत होते. एक वर्षापूर्वीच १९७० साली खोब्रागडे व गवई गट झालेले. काहीही मनात न ठेवता राजाभाऊदेखील टी.बी भोसले, आर.डी.भंडारे व बी.सी.कांबळेंप्रमाणे  पुण्याला येऊन भेटून गेले. तसेच दादासाहेबांचे निधन झाल्यावर ते नाशिकला जाऊन  दादासाहेबांच्या अंत्ययात्रेत सामील झाले व शोकसभेत म्हणाले की दादासाहेबांच्या निधनाने सामाजिक  समतेसाठी अहोरात्र जळणारे अग्निहोत्र आज कायमचे शांत झाले.

माझे वडील  भास्करराव  भिकाजी भोसले आकाशवाणीतून रिटायर झाल्यावर  बॅ.राजाभाऊ राजाभाऊ  खोब्रागडे, ॲड. दत्ता कट्टी व ॲड .अशोक निळे यांनी १९७७ साली त्यांची नेमणूक रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे) च्या पुणे शहर अध्यक्ष पदावर केली. त्या काळातील व त्याही आधीच्या  राजाभाऊंच्या अनेक आठवणी आहेत. पण विस्तार भयास्तव त्या या लेखात देता येत नाहीत.

बॅ. राजाभाऊ खोब्रागडेंचे निधन

१९८४ च्या एप्रिल महिन्यात राजाभाऊ दिल्लीला गेले व अचानक आजारी पडले. तेथे त्यांना मेयो हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पण त्यांची प्रकृती ढासळली व काविळीच्या विकाराने त्यांचे ९ एप्रिल  १९८४ ला निधन झाले. त्यांचा मृतदेह  विमानाने नागपूरला, तेथून मोटारीने चंद्रपूरला नेण्यात आला व लाखो लोकांच्या उपस्थितीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानसपुत्राला त्याच्या जन्मशताब्दी निमित्त  भावपूर्ण अभिवादन!

r.b.bhosale6@gmail.com