उत्पल व. बा.

महात्मा गांधी यांना अभिप्रेत नसलेले ‘धर्मविरहित राजकारण’ पं. नेहरू यांनी केले आणि म्हणून नेहरूंचे राजकारण हे सामाजिक (धार्मिक) भेदांवर आधारलेले होते, असे सुचवण्यातून वैचारिक गोंधळाच्या प्रदर्शनाखेरीज काहीही साधणार नाही, असे सांगणारा हा प्रतिवाद..

two senior citizens murder in kudal
कुडण येथे दोन जेष्ठ नागरिकांचा खून, आरोपी फरार
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

राम माधव हे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचं समर्थन आणि प्रशंसा करणारा लेख लिहितात आणि ‘लोकसत्ता’मध्ये ‘पहिली बाजू’ या सदरात या लेखाचा अनुवाद छापला जातो, यात काही नवल नाही. पण त्या लेखात (‘आपली ‘धर्मशाही’!’ – ६ जून) त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर- विशेषत: या मुद्दय़ांना आधारभूत असणाऱ्या राजकीय तत्त्वज्ञानावर- स्वतंत्रपणे लिहिणंच योग्य होईल. कारण तो विचारदृष्टीतील फरकाचा, सैद्धांतिक वेगळेपणाचा विषय आहे. हिंदूत्ववादी आणि उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष विचारांत एक मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. हे दोन्ही ‘वल्र्ड व्ह्यू’ वेगळे आहेत आणि त्याचा प्रमुख संदर्भ धर्मकारण हा आहे. काही बाबतीत संवादाच्या जागा असू शकतातच; किंबहुना काही सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात हिंदूत्ववादी उदारमतवादीदेखील असू शकतात, असतात. पण जिथं एकमत होणं शक्य नाही अशी धर्मकारण ही एक मोठी जागा आहे. या बाबतीत व्यक्तिश: मला संवादी भूमिका घेऊन चर्चा करणं आवश्यक वाटतं. परंतु असा संवादी सूर आसपासच्या प्रचंड गलक्यात विरून जातो हे वरचेवर अनुभवायला येतं. शिवाय राम माधव (किंवा रवींद्र साठे) यांच्या लेखांसारखे अगदी मूलभूत गोंधळ असलेले लेख समोर आले की विशेष हतबुद्ध व्हायला होतं. अशा वेळी स. ह. देशपांडेंसारख्या हिंदूत्वाचा (हिंदूसंघटन करण्याचा) पुरस्कार करणाऱ्या आणि त्याबाबतची सविस्तर मांडणी करणाऱ्या लेखकाची आठवण होते. देशपांडे यांच्या विचारांशी सहमत होणं शक्य नसलं तरी निदान धर्माधारित विचारपद्धतीला व्यवस्थित शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी केलं होतं हे मान्य करावं लागतं.   

राम माधव यांच्या लेखातील काही विधानं चक्रावून टाकणारी आहेत. उदा. ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ आणि ‘नेहरूवादी राजकारण फोफावले ते सामाजिक विभाजनाच्या आधारे’ ही दोन विधाने. या विधानांमधून जो धादांत खोटा संदेश जातो आहे त्याचा प्रतिवाद करावा अशीही इच्छा खरं तर होत नाही. पण तरी तो करणं आवश्यक आहे. कारण असाच विचार करत राहिलो तर ‘दुसरी बाजू’ लोकांसमोर कशी येणार, हा प्रश्न सतावत राहतो.

गांधींनी धर्माचं महत्त्व ओळखलं होतं हे खरंच आहे. त्यामागे त्यांची मूळची धर्मश्रद्ध वृत्ती होती. त्यांना धर्माला टाकून द्यायचं नव्हतं; पण म्हणून त्यांना धर्म थेट राजकारणातही आणायचा नव्हता. ते रामाचं नाव घेत असत; पण म्हणून त्यांनी रामाला स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आणलं नाही. त्यांनी कुठेही रामाच्या मूर्तीची स्थापना केली नाही. गांधींच्या आश्रमात सर्वधर्मप्रार्थना होत असे. धर्म हा त्यांच्या चिंतनाचा विषय असेल; पण त्यांनी त्याचा वापर दुसऱ्या धर्माविरुद्ध हत्यार म्हणून कधीही केला नाही. याउलट हिंदूत्ववादी राजकारणाने काय केलं हे जगजाहीर आहे. यातली मेख अशी आहे की हिंदूत्ववादी राजकारण एकाच वेळी अनेक तोंडांनी बोलण्यात वाकबगार आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी राजकारण मुस्लिमांच्या विरोधात आहे असं म्हटलं की मुस्लीम राष्ट्रीय मंचसारखं उदाहरण पुढे केलं जाऊ शकतं. एपीजे अब्दुल कलामांसारखे ‘गुड मुस्लीम’ आपल्याला हवे आहेत असं म्हणत दुसरीकडे आयटी सेलच्या मार्फत मुस्लीम कसे ‘बॅड’ आहेत याचे संदेश फिरवले जातात. याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात, किंवा ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ असं विधान करणं याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात. गांधींनी केलं त्याला धर्मकेंद्री राजकारण म्हणत नाहीत.

सामाजिक विभाजन या शब्दाचा अर्थ काय? दोन समूहांमध्ये बेबनाव निर्माण करणं. नेहरूप्रणीत राजकारणानं हे कधी केलं? या देशात अनेक धर्माचे, जातींचे लोक राहतात आणि त्यामुळे देशाची सामाजिक वीण टिकवून ठेवण्यासाठी शीर्षस्थ नेत्यांकडून जे संतुलित, विचारी वर्तन अपेक्षित असतं ते नेहरू आणि नंतरच्या नेत्यांमध्ये दिसून येतं. आज काय स्थिती आहे? सामाजिक विभाजन कोण करतंय? हे सगळं स्पष्टपणे इथं लिहायलाच हवं का? ऐंशी-नव्वदच्या दशकात माध्यमिक इयत्तांच्या पुढलं शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे आठवत असेल की त्या वेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी शासकीय प्रसारमाध्यमं प्रयत्न करत असत. लघुपट, गाणी प्रसिद्ध होत असत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखं अजरामर गाणं आणि त्याचं चित्रीकरण माझ्यासारख्या अनेकांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. आज ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द तरी ऐकू येतो का? आज पद्धतशीरपणे मुस्लीम द्वेष पसरवला जातोय ते सामाजिक विभाजन नसून सामाजिक ऐक्याचा प्रयत्न आहे का?

मग ‘नेहरूवादी विभाजन’ कुठलं?

हिंदू कोड बिल हा सामाजिक विभाजनाचा प्रयत्न होता असं राम माधव यांना वाटत असण्याची दाट शक्यता आहे. वर जो ‘वल्र्ड व्ह्यू’चा उल्लेख केला आहे तो इथं लागू होतो. हिंदू कोड बिल आणलं याचा अर्थच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभाजन आहे हे जर गृहीतच धरलं असेल तर पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. आणि हिंदू कोड बिल आणून तुमच्यावर अन्याय केला आहे हे हिंदूंच्या मनात आपोआप आलेलं नाही. ते पद्धतशीरपणे निर्माण करून दिलं गेलं आहे. हिंदू-मुस्लीमसंदर्भात इतिहासात जे झालं ते कुणीही अमान्य करणार नाही. पण त्यासाठी आपलं संपूर्ण राजकारण, आपला संपूर्ण ‘डिस्कोर्स’ एकांगी ठेवणं, धर्माधारित ठेवणं हे विभाजनाचं राजकारण आहे. इतिहास खोदत न बसता आता पुढे जाऊ असं म्हणत असणाऱ्यांना पुन्हा पुन्हा मागे नेणं हे विभाजनाचं राजकारण आहे. ‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे.

‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, १९९१’च्या कलम ३ मध्ये म्हटलं आहे की कोणत्याही धर्माच्या किंवा धर्माच्या पंथाच्या प्रार्थनास्थळाचे किंवा त्याच्या भागाचे त्याच धर्माच्या दुसऱ्या पंथाच्या अथवा अन्य धर्माच्या वा त्याच्या पंथाच्या प्रार्थनास्थळामध्ये कोणालाही रूपांतर करता येणार नाही. कलम ४ मध्ये जाहीर करण्यात आलं आहे की, प्रार्थनास्थळ १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या स्वरूपात अस्तित्वात असेल, त्याचप्रमाणे ते ठेवण्यात येईल. मात्र याच कायद्याच्या कलम ५ मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की ‘अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थनास्थळाला.. त्यासंबंधीच्या दाव्याला, अपिलाला किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेला या कायद्यातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही.’ आता यावर राम माधव काँग्रेसला काय म्हणणार? हिंदू कोड बिल आणल्याने सामाजिक विभाजन झालं आणि ‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, कलम ५’ नुसार सामाजिक ऐक्य साधलं गेलं? 

राजकारण करायला हरकत नाही. पण विस्तृत कालपटावरील घटनांकडे बघताना मागचे-पुढचे संदर्भ, काळाचा संदर्भ, कारणमीमांसा, उद्देश इ. मध्ये न जाता भलतेच अर्थ लावत लावत, सोयीची निवड करत करत आपला आणि इतरांचा मूलभूत वैचारिक गोंधळ तरी करू नये!

utpalvb@gmail.com