मराठी रंगभूमीने एकोणिसाव्या शतकात सामाजिक व ऐतिहासिक नाटकांची समृद्ध परंपरा निर्माण केली. या प्रवाहात राजसंन्यास हे अपूर्ण नाटक एक महत्त्वाचा टप्पा ठरते. गडकरींनी या नाटकात शृंगार, वीर, शोक, व्यंग्य आणि वैराग्य या सर्व रसांचा संगम घडवला. मराठी साहित्यातील इतिहास ज्यांच्या नावांनी उजळून निघतो, त्यात राम गणेश गडकरी यांचे स्थान एक अनमोल रत्न म्हणून मान्य केले जाते. अत्यल्प आयुष्यात त्यांनी ज्या साहित्यकृतींना आकार दिला, त्या मराठी भाषेला आणि रसिकांना अद्वितीय ठेवा देणाऱ्या ठरल्या आहेत. कविता, नाट्यकृती, विनोद, ललित लेखन या सर्व क्षेत्रांत गडकरींचे साहित्यकौशल्य प्रकट झाले. ‘एकच प्याला’ हे व्यसनाधीनतेबद्दलचे त्यांचे नाटक तर अजरामर ठरले. अशा या शब्दप्रभू असलेल्या गडकरींच्या राजसंन्यास या नाटकाभोवती निर्माण झालेला विवाद – विशेषतः संभाजी महाराजांच्या एका स्वगतावरून झालेला राजकीय गदारोळ, हा केवळ साहित्याच्या अवगुणी वाचनाचे नव्हे तर आजच्या राजकारणाच्या उथळपणाचे द्योतक आहे.
गडकरींनी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारलेले राजसंन्यास हे नाटक लिहायला घेतले. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे हे नाटक अपूर्ण राहिले. यात छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व केंद्रस्थानी येते. संभाजी महाराजांची धडाडी, त्यांची शौर्यगाथा, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील काही व्यक्तिगत पैलू यांचा वेध घेण्याचा प्रयत्न गडकरींनी केला. यामध्ये संभाजी महाराजांचे एक स्वगत आहे, ज्यात त्यांनी आपल्या जीवनातील ताणतणाव, व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणे आणि राजकीय जबाबदाऱ्या यांचा उल्लेख करून अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्वगत साहित्यिक दृष्टीने अत्यंत कलात्मक आहे. नाटकाच्या कलेत स्वगताला महत्त्वाचे स्थान असते. नायकाच्या अंतर्मनातील गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी स्वगताचा उपयोग होतो. संभाजी महाराजांचे स्वगतही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अंतर्द्वंद्वाचे दर्शन घडवते. यातून त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे अवमूल्यन होत नाही, तर उलट त्यांच्या मानवी आणि मनस्वी रूपाचे दर्शन घडते.
स्वगत हा नाट्यरूप घटक प्रेक्षकाला नायकाच्या अंतरात्म्यात डोकावण्याची संधी देतो. शेक्सपियरच्या नाटकातील ‘हॅम्लेटचे स्वगत’ किंवा ‘मॅकबेथचे स्वगत’ ही जागतिक रंगभूमीवरील क्लासिक उदाहरणे आहेत. त्याच परंपरेत गडकरींनी लिहिलेले संभाजी महाराजांचे स्वगत येते. गडकरींची खासियत म्हणजे त्यांची सूक्ष्म विनोदबुद्धी आणि वक्रोक्ती. ‘बाळकराम’ या टोपणनावाने त्यांनी लिहिलेले व्यंग्यात्मक लेख आजही वाचकाला खळखळून हसवतात. पण तो हसवण्यापुरता विनोद नव्हता; त्यामागे समाजातील विसंगती दाखवून सामाजिक दोषांवर बोट ठेवणारे वास्तवाचे निर्भीड चित्रण होते. राजसंन्यासमध्येही गडकरींच्या विनोदी शैलीची झलक (विशेषत: जिवाजीपंत कलमदाने या पात्रातून) दिसते. संभाजी महाराजांच्या स्वगतामध्ये व्यसनाधीनता, स्त्रीआसक्ती, राजेपणाचे ओझे असे उल्लेख केवळ वास्तवदर्शी नसून त्यात किंचित व्यंग्यही आहे. ‘राजेपण म्हणजे लोकांना फक्त सुख देणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला दु:खही देणे’ असा भाव या स्वगतामध्ये अधोरेखित होतो. हे व्यंग्य राजेपणावर आहे, संभाजी महाराजांवर नाही.
गडकरींनी लिहिलेल्या राजसंन्यासमधील संभाजी महाराजांचे स्वगत (ज्यावरून वाद उद्भवला) नेमके आहे तरी काय, हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. कारण ते त्यांनी वाचलेलेच नसते. राजसंन्यास नाटकात संभाजी महाराज आपल्याच मनाशी संवाद साधताना केलेल्या स्वगतात मदिरेचा, रमणीचा उल्लेख करून पुढे म्हणतात, “…पण हे सारे क्षणिक आहे. मर्त्य शरीराचे हे चाळे आहेत. या सर्वांपलीकडे राजकारभाराची जबाबदारी, जनतेची कर्तव्ये, स्वराज्याचा भार माझ्या खांद्यावर आहे, हे मला विसरता कामा नये. तरीही मनुष्य म्हणून माझ्या दुर्बलता माझ्या मागे लागतात. या देहाच्या मोहाला मी कंटाळलो आहे. राजेपणाची ही जबाबदारी सोडून संन्यास घेऊन टाकावा, असे कधी कधी वाटते. पण मी माघार घेऊ शकत नाही, कारण माझ्या मागे जनतेचा विश्वास आहे.” हे वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल की, यात संभाजी राजांची प्रतिमा मलिन होण्यासारखे काय आहे? हा तर खऱ्या मानवी मनाचा गुंता आहे. पण आजचे राजकारणी हे समजून घेत नाहीत. प्रत्यक्षात गडकरींनी संभाजी राजांच्या या स्वागतातून हाती असलेल्या सत्तेच्या जबाबदारीवर भाष्य केले होते.
‘राजा म्हणजे प्रजेचा उपभोगशून्य स्वामी. राज्य उपभोग म्हणजे राजसंन्यास’ हे कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यव्यवस्थेतील लोकनेत्यांसाठी मार्गदर्शक ठरावे असे वाक्यही या नाटकात संभाजी महाराजांच्या तोंडी, त्या स्वगतानंतर आहे. त्याआधीच्या स्वगतामध्ये गडकरींनी संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला मानस्वी स्वरूप दिले आहे. इतिहासातील राजे हे केवळ दैवत नव्हते, तर तेही माणूसच होते. त्यांना मोह होता, त्यांच्या आयुष्यात गोंधळाचे क्षणही येत, हेही खरेच आहे. परंतु त्याचवेळी राजकारणाची जबाबदारी, जनतेचा विश्वास, आणि स्वराज्याची धुरा सांभाळणे ही त्यांची खरी ताकद होती. गडकरींनी या स्वगतामध्ये मानवी दुर्बलता आणि राजकीय ताकद यांचा संगम दाखवला आहे. त्यामुळे हे स्वगत संभाजी महाराजांचा अवमान करणारे नसून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या गहनतेचे दर्शन घडवते. हा फरक लक्षात न घेणारे जेव्हा गडकरींवर हल्ला करतात, तेव्हा असा हल्ला करणाऱ्यांचे उथळ ज्ञान उघडे पडते. म्हणून आजच्या राजकारणात या स्वगताचा अर्थ विकृत करून मांडला जातो. संभाजी महाराज मद्यपी होते, स्त्रीसंग करीत होते, असे म्हणत गडकरींनी त्यांचा अपमान केला, असा आरोप केला जातो. काही राजकीय नेत्यांनी या स्वगतावरून गडकरींना अक्षरशः देशद्रोही ठरवले, त्यांच्या पुतळ्यांची मोडतोड केली. हा प्रकार केवळ हास्यास्पदच नाही तर त्यांच्या साहित्यविषयक अज्ञानाचे द्योतक आहे आणि पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्यांच्या अज्ञानाची कीव करणारा आहे.
नाटककार पात्राला त्याच्या मानवी दुर्बलतेसह दाखवतो, म्हणजेच त्याने त्या पात्राचा अपमान केला, असे होत नाही. उलट साहित्यकृतीचे सामर्थ्य हेच असते की ती व्यक्तिरेखेच्या अंतर्मनातील सत्य दाखवते. राम गणेश गडकरींच्या या स्वगतावरून आक्षेप घेणाऱ्या राजकारण्यांनी जर खऱ्या साहित्यविषयक जाणिवेने विचार केला तर त्यांना दिसेल की, नाटकातील हे स्वगत संभाजी महाराजांच्या प्रतिमेला मलिन करणारे नसून, त्यांना अधिक मानवी आणि अधिक महान बनवणारे आहे. पण आजचे राजकारणी इतिहास आणि साहित्य यांचा वापर केवळ जनतेला भडकवण्यासाठी करतात. ऐतिहासिक व्यक्तिरेखा ‘देवतां’सारख्या दाखवायच्या, मग त्यांच्याबद्दल एकही मानवी कमतरता दाखवणारा उल्लेख चालत नाही, अशी प्रवृत्ती दिसते. परंतु इतिहास हा केवळ दंतकथा नसतो. त्यात माणसांचे गुणदोष, त्यांच्या चुकाही असतात. त्या दाखवल्या तर ते अपमान नसून वास्तवाचे दर्शन असते. गडकरींनी केलेले हे साहित्यिक कार्य आजच्या राजकारण्यांना समजत नाही किंबहुना ते समजण्याची त्यांची पात्रताच नाही. त्यामुळे ते उगीचच गदारोळ निर्माण करत असतात.
संभाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, आणि त्यांचा मृत्यू अत्यंत क्रूरपणे केले गेला. त्यांची प्रतिमा एका भक्कम योद्ध्याची आहे. ही प्रतिमा खऱ्या अर्थाने मलिन करणारे ते लोक आहेत जे त्यांच्या नावावरून राजकीय लाभ उठवतात, पण त्यांच्या शिकवणुकीची अंमलबजावणी करत नाहीत. गडकरींनी संभाजींना मानवी स्वरूपात दाखवले. हे मानवी स्वरूप त्यांचा गौरवच वाढवते. पण राजकारणी जेव्हा गोंधळ घालतात, पुतळे पाडतात, साहित्यकृतींवर बंदी घालतात किंवा वगळण्यची भाषा करतात तेव्हा जनतेच्या मनात ते संभाजी महाराजांबद्दल एकांगी चित्र निर्माण करत असतात. त्यामुळे त्यांचा खरा अपमान गडकरी करत नाहीत, तर राजकारणीच करतात.
मुळात नाटक हा इतिहास नसतो. इतिहासकार जसा पुराव्यांवर आधारित तथ्य मांडतो, तसा नाटककार मांडत नाही. नाटककार ऐतिहासिक घटनांवर आधार घेऊन त्याची कलात्मक पुनर्रचना करतो. उदा. शेक्सपियरचे ज्युलियस सीझर वाचताना आपण रोमन साम्राज्याचा ‘इतिहास’ शिकत नाही, तर सीझरच्या व्यक्तिरेखेचे नाट्यमय दर्शन अनुभवतो. त्याचप्रमाणे गडकरींचे राजसंन्यास वाचताना आपण संभाजी महाराजांचा अचूक इतिहास आपण शिकत नाही, तर त्या व्यक्तिरेखेचे नाट्यमय चित्र पाहत असतो. या पार्श्वभूमीवर कलात्मक मांडणीच्या नावाखाली जेव्हा ‘केरला स्टोरी’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ सारखे तद्दन उथळ खोटे प्रचारपट तयार केले जातात तेव्हा देशाच्या लोकशाहीची प्रतिमा मलीन होत नाही काय? की ते सध्याच्या परधर्म द्वेषी राजकारण्यांना सोयीचे आहे म्हणून त्यांना चालते? हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही तोपर्यंत गडकरींसारख्यांच्या साहित्यावर सतत आरोप होत राहतील. साहित्य हे इतिहास नसून कला आहे, आणि कलेचे मूल्य तिच्या सौंदर्य, प्रभाव आणि विचारमंथन निर्माण करण्याच्या उंचीवर ठरते. साहित्य हे प्रश्न विचारते, अंतर्मनात डोकावते, मानवी गुंतागुंत दाखवते. त्याला सोयीने इतिहासाच्या कठोर चौकटीत बंद करून ठेवणे म्हणजे साहित्याला प्रचारकी रूप देणे होय… साहित्याचा अपमान होय. म्हणून गडकरींवरील आरोप आजच्या काळात पूर्वग्रहदूषित ठरतात. त्यातून आज लेखक, नाटककार, चित्रपटकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. महामानवांना माणूस समजत लिखाण करणाऱ्या लेखकांनाही शिव्याशाप सहन करावे लागत आहेत. त्यामुळे साहित्यिक स्पष्टपणे व्यक्त होण्यास कचरू लागलेले आहेत. असे घाबरट जिणे हे एकूणच आजच्या समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. मान्य आहे की, सरकार मराठी साहित्य संस्कृती मंडळाला साहित्य संमेलनासाठी लाखो रुपयांची मदत करते. पण म्हणून साहित्य महामंडळानेही सरकारचे मिंधे व्हावे की काय? या मंडळातील सगळेच साहित्यिक एवढे कणा मोडलेले कसे?
राम गणेश गडकरींचे राजसंन्यास हे नाटक, विशेषतः संभाजी महाराजांचे स्वगत, हे मराठी नाट्यपरंपरेतील मौलिक योगदान आहे, हे नाकारण्याचा करंटेपणा आपण का करावा? त्यातून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन होत नाही; उलट मानवी पैलूंमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी ठरते. आजचे राजकारणी या स्वगतावरून जेव्हा वाद निर्माण करतात, तेव्हा ते स्वतःची उथळता दाखवत असतात. गडकरींनी संभाजी महाराजांच्या तोंडी हे स्वगत घालून त्यांच्या मनाची कुतरओढ आणि राजकीय जबाबदारीची जाणीव दाखवून त्यांचा गौरव कमी नाही केला, तर अधिक उंचावला आहे.
म्हणूनच आजच्या राजकीय नेत्यांना सांगावेसे वाटते की, संभाजी महाराजांच्या नावावरून गोंधळ घालण्यापेक्षा, त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करा. गडकरींसारख्या साहित्यिकांवर आरोप करण्यापेक्षा, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करा. आणि मराठी जनतेला भडकवण्यापेक्षा, तिच्या विचारशक्तीला चालना द्या. गडकरींना समजून घेणे म्हणजे मराठी साहित्याला समजून घेणे. आणि संभाजी महाराजांना समजून घेणे म्हणजे भारतीय इतिहासाच्या एका तेजस्वी अध्यायाला समजून घेणे होय. या दोन्ही गोष्टींचा संगम राजसंन्यास या नाटकात घडला आहे, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे.
jetjagdish@gmail.com