अवनीश पाटील
भारतातील समाजव्यवस्थेबद्दलच्या आकलनाला सखोल आणि विस्तृत संशोधनाने एक नवी दिशा देणारे अभ्यासक, प्राध्यापक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी लंडन येथे निधन झाले. लंडनमध्ये १९२२ साली जन्मलेल्या डॉ. मायर यांनी ज्ञानक्षेत्रात सात दशकांहून अधिक काळ भरीव योगदान दिले. विशेषतः, त्यांनी भारतातील जातिव्यवस्था, नातेसंबंधांची रचना आणि संस्थानिकांच्या शासनपद्धतीचा सखोल अभ्यास केला होता.

डॉ. मायर यांचा भारताशी असलेला आयुष्यभराचा संबंध दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुरू झाला. तरुणपणी ते ‘फ्रेंड्स ॲम्ब्युलन्स युनिट’मध्ये सामील झाले आणि १९४४ ते १९४६ ही दोन महत्त्वपूर्ण वर्षे त्यांनी भारतात घालवली. सुरुवातीला त्यांचे कार्यक्षेत्र कलकत्ता होते. त्यांनी पूर्व बंगालमध्ये (आजचा बांगलादेश) काम केले. तेथे त्यांनी सल्फा औषधांचे वाटप करण्याबरोबरच दुष्काळ निवारणाच्या कार्यातही मदत केली. त्यानंतर ते दक्षिण भारतातील केरळ प्रांतात गेले. कोझिकोडे (कालिकत) हे त्यांचे मुख्यालय होते, जिथून त्यांनी गरजू वस्त्यांमध्ये दूध वितरणाची व्यवस्था सांभाळली.

याच काळात त्यांना महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या दोघांनाही भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची अपूर्व संधी मिळाली. या भेटींमुळेच त्यांच्या मनात भारताविषयी एक सखोल आणि चिरस्थायी रुची निर्माण झाली.या सुरुवातीच्या अनुभवानेच त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाची दिशा ठरवली. इंग्लंडला परतल्यानंतर, त्यांनी ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ (एसओएएस) येथून हिंदी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ (एलएसई) मधून मानववंशशास्त्रात डिप्लोमा आणि पीएचडी पदवी संपादन केली. त्यांच्या पीएचडी संशोधनाचे क्षेत्रीय कार्य फिजीमधील भारतीय समुदायावर आधारित होते. याच संशोधनाने पुढे गुंतागुंतीच्या समाजांमधील स्पर्धात्मक गट आणि उपगटांचा अभ्यास करण्याच्या त्यांच्या पद्धतींवर प्रभाव टाकला. अत्यंत बारकाईने केलेले क्षेत्रीय कार्य, प्रगल्भ वैचारिक योगदान आणि मानवी संबंधांची सखोल जपणूक ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. याच घट्ट संबंधांमुळे त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनात आणि प्रत्यक्षानुभवात एक सुंदर मेळ साधला गेला.

‘सगेसोयरे’चा जातीशी संबंध

भारतीय मानववंशशास्त्रातील डॉ. मायर यांचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे, १९५४ आणि १९५५ साली त्यांनी केलेले अत्यंत महत्त्वाचे क्षेत्रीय कार्य. या संशोधनाला ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीकडून मिळालेल्या फेलोशिपचा आधार होता. त्यांनी मध्य प्रदेशातील जामगोद नावाच्या गावात काम केले, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात ‘रामखेरी’ असा केला आहे. हे गाव देवास (थोरली पाती) संस्थानाच्या हद्दीत होते. तेथे केलेल्या सखोल अभ्यासातूनच त्यांचा १९६० साली प्रकाशित झालेला, ‘कास्ट अँड किनशिप इन सेंट्रल इंडिया: अ व्हिलेज ॲण्ड इट्स रीजन’ हा प्रसिद्ध ग्रंथ जन्माला आला. या महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक ग्रंथाने अनेक महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. जातिव्यवस्था जरी पारंपरिक नातेसंबंध आणि प्राचीन धार्मिक श्रद्धांशी जोडलेली असली तरी, ती संपत्ती किंवा सामाजिक वर्गावर आधारित विभागणीपेक्षा वेगळी आणि स्वतंत्रपणे कार्य करते, हे डॉ. मायर यांनी दाखवून दिले.

जाति आणि पोटजात यांतील फरक स्पष्ट करणारे ते सुरुवातीच्या मानववंशशास्त्रज्ञांपैकी एक होते. जातीय संघटनेचे खरे केंद्र केवळ एका गावात नसून, ते कौटुंबिक संबंधांच्या प्रादेशिक जाळ्यांमध्ये अस्तित्वात असते, हे त्यांनी ओळखले होते. या संदर्भात त्यांनी ‘विवाहक्षेत्र’ किंवा ‘ओळखीचे नाते’ ही संकल्पना मांडली. हे क्षेत्र अनेक गावांमध्ये विस्तारलेले असे आणि विवाहसंबंध जुळवण्यासाठी व सामाजिक नियंत्रणासाठी हेच प्रमुख केंद्र असते.

जातिव्यवस्थेच्या दोन पातळ्या

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जातिव्यवस्था दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करते, हे डॉ. मायर यांनी स्पष्ट केले. पहिली पातळी म्हणजे, विविध जातींमधील परस्परसंबंध. हे संबंध प्रामुख्याने गावाच्या मर्यादेतच दिसून येतात, जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपूर्ण जातीचे प्रतिनिधित्व करते. दुसरी पातळी म्हणजे, एकाच जातीतंर्गत असलेली रचना. ही रचना त्या जातीच्या प्रादेशिक पातळीवर पसरलेल्या नातेसंबंधांवर अवलंबून असते. त्यांचा हा सिद्धांत मानववंशशास्त्रासाठी एक मोठी झेप ठरला. यामुळे अभ्यासाचा केंद्रबिंदू केवळ गावापुरता मर्यादित न राहता, तो अधिक व्यापक झाला आणि भारतीय समाजरचनेची गुंतागुंत समजण्यास मोठी मदत झाली.

त्यांच्या भारतातील कृषी समाजाच्या अभ्यासाची सुरुवात यापूर्वीच झाली होती. १९५२ मध्ये त्यांनी ‘लॅण्ड ॲण्ड सोसायटी इन मलबार’ हे पुस्तक प्रकाशित केले. या ग्रंथात त्यांनी मलबार प्रदेशातील जमीन मालकी आणि भाडेतत्त्वाच्या संदर्भात तेथील समाजरचनेचे विश्लेषण केले होते. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जातिव्यवस्थेच्या जागी हळूहळू संपत्तीवर आधारित नवीन व्यवस्था कशी निर्माण होत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. याचा पुढला भाग म्हणून , कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी स्पर्धात्मक गट आणि उपगटांची संकल्पना वापरून देवास या बाजारपेठेच्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष आणि नागरी प्रशासन यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करण्याची योजना आखली होती.

राजेशाही : प्रतिष्ठा आणि अधिकार

डॉ. मायर यांनी आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर आपले लक्ष केंद्रित केले : भारतीय राजेशाही. लेखक ई. एम. फॉर्स्टर यांच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या देवासच्या महाराज तुकोजीराव पवार यांचे सुपुत्र महाराज विक्रमसिंह पवार यांच्याशी झालेल्या संवादामुळे त्यांच्या मनात या विषयाबद्दल रुची निर्माण झाली. श्रीमंत विक्रमसिंह तुकोजीराव पवार यांना ३१ मार्च १९४७ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यात आले . दत्तक विधानानंतर त्यांचे नाव शहाजी छत्रपती असे ठेवण्यात आले.

डॉ. मायर यांनी १९८० च्या दशकात महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिण भारतात दूरवर प्रवास करून व्यापक क्षेत्रीय कार्य हाती घेतले. तिथे त्यांनी राज्याभिषेकाचा विधी आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. या संशोधनाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे, कोल्हापूरचे शहाजी छत्रपती महाराज यांच्याशी असलेली डॉ. मायर यांची १९५४ पासून सुरू झालेली घनिष्ठ आणि विलक्षण मैत्री. ही मैत्री पुढे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी दृढ नात्यात विकसित झाली.

डॉ. मायर यांच्या या घनिष्ठ संबंधाचा आणि महत्त्वपूर्ण कार्याचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने विशेष गौरव केला. त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त, १२ डिसेंबर २०२२ रोजी हा सन्मान करण्यात आला. या दिवशी, कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांनी राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना ‘करवीर स्टार’ हा किताब प्रदान केला.

डॉ. मायर यांनी भारतातील राजेशाहीच्या संकल्पनेचा आढावा घेणारा एक महत्त्वाचा संशोधनपर निबंध लिहिला. हा निबंध त्यांनी १९७८ व १९७९ साली कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराज यांच्या औपचारिक मुलाखतींच्या आधारे लिहिला होता. या निबंधातून त्यांनी, शासक स्वतःच्या सत्तेकडे आणि राज्य करण्याच्या हक्काकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, याचा वेध घेतला. आपल्या इतर लेखनातून डॉ. मायर यांनी आधुनिक हिंदू संस्थानांमधील राजेपदाच्या हस्तांतर प्रक्रियेचे विश्लेषण केले. यासाठी त्यांनी या प्रक्रियेतील विधी, प्रतीके आणि महत्त्वपूर्ण भौतिक वस्तूंचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर, राजाची लौकिक सत्ता आणि ब्राह्मण पुरोहितांचे धार्मिक अधिकार यांच्यातील परस्परसंबंधांचाही त्यांनी अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी असा सिद्धांत मांडला की, आधुनिक काळात ‘सामाजिक प्रतिष्ठा’ आणि ‘राज्य करण्याचा अधिकार’ या दोन गोष्टी भिन्न असू शकतात. त्या काळातील मानववंशशास्त्राच्या प्रस्थापित सिद्धान्तांना आव्हान देणारा हा एक महत्त्वाचा विचार होता.

अविरत प्रवास

डॉ. मायर यांची शैक्षणिक कारकीर्दही तेवढीच उल्लेखनीय होती. सुरुवातीस ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास सहा वर्षे संशोधक फेलो म्हणून काम केल्यानंतर, १९५६ मध्ये ते स्कूल ऑफ ओरिएंटल ॲण्ड आफ्रिकन स्टडीज (एसओएएस) मध्ये रुजू झाले. येथे पुढील २९ वर्षे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे सेवा बजावली आणि १९८५ मध्ये ‘आशियाई मानववंशशास्त्राचे प्राध्यापक’ या पदावरून निवृत्त झाले. या कालावधीत त्यांनी आठ वर्षे विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

त्यांचा प्रभाव केवळ अध्यापन आणि संशोधनापुरता मर्यादित नव्हता. १९६४ ते १९६९ दरम्यान त्यांनी ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञांच्या अग्रगण्य नियतकालिक ‘मॅन’चे संपादकपद भूषवले. १९७३ ते १९७९ या काळात ‘सोशल सायन्स रिसर्च कौन्सिल’चे सदस्य म्हणून काम केले, तर १९८३ ते १९८५ दरम्यान ‘रॉयल अँथ्रोपोलॉजिकल इन्स्टिट्यूट’चे अध्यक्षपद सांभाळले.

अधिकृतपणे निवृत्त झाल्यानंतरही डॉ. मायर यांचा प्रवास अविरतपणे सुरू होता. त्यांनी भारतभरातील अनेक अपरिचित आणि फारशा ज्ञात नसलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत व्याख्यान दौरे केले. या देशाच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पटलाला समजून घेण्याप्रती असलेली त्यांची आयुष्यभराची निष्ठा यातून दिसून येते.

ॲड्रियन सी. मायर यांचे विद्वत्तापूर्ण कार्य त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे चिरस्मरणीय राहील. अत्यंत सूक्ष्म आणि अचूक संशोधन पद्धती, अभिनव सैद्धांतिक दृष्टिकोन आणि मानवी संबंधांचे सखोल आकलन ही त्यांच्या विद्वत्तेची प्रमुख वैशिष्ट्ये होती. जातिव्यवस्थेवरील त्यांच्या संशोधनाने संपूर्ण पिढीच्या अभ्यासकांना या व्यवस्थेचे अंतरंग उलगडून दाखवले. राजेशाहीवरील त्यांच्या अभ्यासाने मानववंशशास्त्रातील मूलभूत प्रश्नांना समकालीन राजकीय वास्तवाशी जोडले. भारतीय मानववंशशास्त्रात डॉ. मायर यांचे योगदान पायाभूत मानले जाते. त्यांनी विकसित केलेल्या संशोधन पद्धती आजही प्रासंगिक व प्रभावी आहेत. दक्षिण आशियाच्या अभ्यासकांसाठी त्यांचे कार्य कायमच प्रेरणादायी ठरेल.