रशियाचे युद्धखोर अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराची गर्भित धमकी दिल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणांना शीतयुद्धाच्या काळाची आठवण होणार, हे फारच स्वाभाविक आहे. ही आठवण असेल ती अमेरिकेनेच त्या काळात ‘कमी क्षमतेच्या अण्वस्त्रां’ची चाचपणी सुरू केली होती, याची! पुतिन यांचा रशियादेखील आता हे करील, याची कुजबुजती खात्रीच अमेरिकी संरक्षण यंत्रणांमध्ये काम केलेले काही जण नाव न सांगण्याच्या अटीवर आता देत आहेत. हिरोशिमा- नागासाकीवर अणुबॉम्ब डागून ती शहरेच नव्हेत तर तो परिसर नासवून टाकणाऱ्या अमेरिकेने ऐन शीतयुद्धाच्या काळातही अण्वस्त्रांचा वापर थांबवला नव्हता, हे तर आता जगजाहीर आहे. अमेरिकाप्रणीत ‘नाटो’कडे १९७० च्या दशकात ७,४०० हून अधिक लहानमोठी अण्वस्त्रे होती आणि रशियाकडे त्या वेळी नाटोपेक्षा चौपटीने कमी अण्वस्त्रे होती, ही माहिती जुनीच आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे.

कमी क्षमतेचे, लहान अणुबॉम्ब?

आता पुतिन हे ‘१९४५ मधील त्या स्फोटांनी पायंडा पाडलाच आहे’ असे म्हणत रशियन हितसंबंधांच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवण्याची धमकी देत आहेत आणि युक्रेनयुद्धाचा त्यांना समाधानकारक वाटणारा अंत अद्याप दूरच असल्यामुळे ही धमकी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरायला हवी, अशी आताची परिस्थिती आहे. त्यामुळेच ‘कमी क्षमतेचे, लहान अणुबॉम्ब’ हा पुन्हा एकवार चर्चेतला विषय ठरला आहे आणि ही चर्चा गांभीर्यानेच होते आहे. रशिया कदाचित मोठ्या क्षमतेचेही अण्वस्त्र वापरेल आणि ‘इस्कंदर-एम’सारख्या क्षेपणास्त्राद्वारे ते डागले जाईल- तसे झाल्यास हिरोशिमाच्या एकतृतीयांश संहार तरी ठरलेलाच आहे, ही शक्यता अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांच्या चर्चेत नसली तरी, युरोपात ती गृहीत धरली जाते आहे.

याउलट, कमी क्षमतेचे अण्वस्त्र मर्यादित प्रदेशाला बेचिराख करू शकते. त्याने तात्काळ होणारी पडझडवजा हानी जरी प्रचंड व्याप्तीची नसली तरी, किरणोत्साराचा धोका मात्र तेवढाच संहारक असू शकतो. अशा प्रकारच्या ‘सूटकेस बॉम्ब’ची भीती शीतयुद्धाच्या काळात कायमच होती. त्या वेळी ‘पेंटागॉन’मध्ये काम करणारे आणि पुढे या अमेरिकी संरक्षण विभागाच्या अधिकारी पदावरून निवृत्त झालेले मायकल व्हिकर्स यांनी १९७० च्या दशकात स्वत: पाठीवरील ‘बॅकपॅक’मध्ये मावेल इतका- साधारण कलिंगडाएवढ्या आकाराचा आणि साधारण ७० पौंड म्हणजे ३१ किलो वजनाचा – अणुबॉम्ब वाहून नेण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एखाद्या जीपवरूनही हा बॉम्ब डागता येईल, अशी क्षमता अमेरिकेने तयार ठेवली होती. जमिनीवरूनच सोडली जाणारी ही क्षेपणास्त्रे रशियाच्याच भूमीवरूनही युक्रेनमधील लक्ष्यापर्यंत मारा करू शकतात.

संहार टाळला जाईल…

मात्र पुतिन यांच्या रशियाने अण्वस्त्रांचा वापर समजा केलाच, तर तो युक्रेननजीकच्या काळ्या समुद्रात, समुद्रतळाशी स्फोट घडवून घबराट वाढवण्यापुरता असेल, असाही काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. स्फोट निर्जन ठिकाणीच घडवला जाईल, असे त्याहून अधिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही चर्चा गंभीरपणे सुरू असली, तरी सज्जतेच्या शक्यता नेहमी गृहीत धराव्यात एवढाच आधार तिला आहे. प्रत्यक्षात अण्वस्त्राचा वापर ही रशियाची धमकीच राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अण्वस्त्राचा वापर खरोखरच रशियाने केला, तर रशियावर निर्बंध लादण्याची संधी नाटो व अमेरिका सोडणार नाहीच, शिवाय चीन वा भारतासारख्या देशांवरही रशियाशी कोणतेही संबंध न ठेवण्यासाठी दबाव आणला जाईल. हे परिणाम कुणालाही- अगदी रशियालाही नकोच आहेत.

(न्यू याॅर्क टाइम्समधील डेव्हिड सेन्गर आणि विल्यम ब्रोड यांच्या वृत्तलेखावर आधारित)