प्रा. दीक्षा कदम
सध्या चर्चेत आलेलं ‘वैष्णवी हगवणे प्रकरण’ ही फक्त एका मुलीची कहाणी नाहीये तर भारतातल्या असंख्य लेकी बाळीची करुण कथा आहे.. आणि हो, ही गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. २०२४-२५ चा राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणाचा अहवाल हे सांगतो की या वर्षात नोंद झालेल्या प्रकरणांची संख्या १३१७ आहे (एका वर्षात) आणि हे देखील सर्वाना माहीतच आहे की फक्त १० टक्के प्रकरणं नोंद होतात, नोंद न झालेल्या प्रकरणाचं काय?

देशात दर चार मिनिटाला एक घरगुती हिंसाचाराचा गुन्हा घडतोय, तर सुमारे ३२ टक्के महिलांना गरोदर असताना देखील घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतोय. याच पुरोगामी महाराष्ट्रात अंतरजातीय विवाहाची शिक्षा म्हणून मुलगा आणि मुलीचे खून पाडले जातात तर चार लग्नापैकी एक लग्न अजूनही बालविवाह असतो.

हुंडाबंदी कायदा काय म्हणतो?

हुंडाबंदी कायदा म्हणजेच हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ (The Dowry Prohibition Act, 1961) हा भारत सरकारने हुंडा देणे व घेणे यावर बंदी घालण्यासाठी तयार केलेला कायदा आहे. या कायद्याचं उद्दिष्ट विवाहामध्ये स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि आर्थिक शोषण थांबवणं हे आहे. परंतु खरंच या कायद्याचं पालन होताना दिसतं का? हुंडा ही सामाजिक वाईट प्रथा आहे, जी स्त्रीला वस्तूप्रमाणे वागवते. समाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आणि समानतेसाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण आज एकविसाव्या शतकातही मुलींना या वाईट प्रथेचा बळी बनवलं जातंय.

खरंतर सुशिक्षित म्हणजे पुढारलेले ही धारणा आहे आणि श्रीमंत म्हणजे दिलदार असा समज आहे परंतु सुशिक्षित हे रूढीवादी आणि श्रीमंत किती दरिद्री विचाराचे असतात हे या वैष्णवी हगवणे केसमध्ये दिसून आले. समाजात खोटी प्रतिष्ठा मिरवण्याच्या नादात यांनी स्वतःच्याच सुनेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. किती आघात झाले असतील त्या सुनेवर? यांनी एक नव्हे दोन सुनांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, या मुलींचे खच्चीकरण केलं. तिला दरवेळी तिच्या वडिलांकडून पैसे आण अशी जबरदस्ती केली. एवढ्यावरच हे थांबलं नाही. कहर म्हणजे या वैष्णवीवर तिचाच पती चारित्र्यावरून संशय घेतो. तिला गर्भवती असताना विष घेण्यासाठी भाग पाडतो. तशी परिस्थिती निर्माण केली जाते. मुलीच्या बापाकडून मिळतोय म्हणून दरवेळी दोन दोन महिन्याला पैसा उकळला जातो. मुलीच्या संसारासाठी म्हणून आईवडील देत गेले. पण मोह वाढतच गेला. त्यापायी तिला प्रचंड मारहाण, अपमान, आणि मानसिक शारीरिक त्रास देण्यात आला आणि या चक्रातून आपल्या बापाला सोडवण्यासाठी वैष्णवीला या जगाचा निरोप घ्यावा लागला. विशेष म्हणजे हा प्रेमाविवाह होता… प्रेमाचा अर्थ हाव, आत्यंतिक छळ हा आहे का?

कोणत्याही वडिलांना आपली मुलगी मोठ्या घरातली सून व्हावी, सुखाने नांदावी, असं वाटणं गैर नाही. हेच वैष्णवी च्या पालकांना वाटलं असावं. मुलीला होणारा त्रास कधीतरी कमी होईल, सुख तिच्या आयुष्यात परत येईल, या आशेवर हा मुलीचा बाप कधी हजारो कधी लाखो रुपये तिच्या सांगण्यावरून देत आला. परंतु वैष्णवीच्या सासरच्यांचे लाड पुरवण्यापेक्षा या पालकांनी आपल्या मुलीला आर्थिकरीत्या सक्षम बनवलं असतं तर कदाचित वैष्णवीनं दुसरा निर्णय घेतला असता. इथे सर्वच पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की समाज बंधन म्हणून लग्न करून जरी मुलीला सासरी पाठवलं तरी सासरी जर तिला त्रास असेल तर त्यांना जाब विचारण्याची हिम्मत मुलीच्या आई बापामधे असली पाहिजे. ती फक्त पैशाने येत नाही आणि प्रश्नही सुटत नाही. तसंच मुलगी माहेरी परत आली तर समाज काय म्हणेल ही भीती बाळगून मुलीला ‘सासरीच थांब’ किंवा ‘थोडे दिवस सहन कर’ असं म्हणणारे पालक त्या मुलीला नकळतपणे मृत्यूकडे पाठवत असतात.

अशावेळी मुलीच्या आईची फार मोठी भूमिका असते. या वेळी मुलीला समजून घेऊन तिची बाजू वडिलांसमोर मांडणंदेखील फार महत्वाचं असतं.

विशेष म्हणजे याच घरातली मोठी सून याच कारणासाठी घरातून बंड करून बाहेर पडली आणि ती जिवंत आहे. मोठी सून बाहेर पडू शकते मग वैष्णवीच्या बाबतीत हे का नाही घडू शकलं? कोण आहे याला जबाबदार? फक्त हगवणे कुटुंब, तिचे आई वडील, ती स्वतः की ही समाजव्यवस्था?

अशा हजारो वैष्णवींना वाचविण्याची एक समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे… तो बदल आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो.

मुलीच्या पालकांनो, एक विनंती, हुंडा किंवा कुठल्याही स्वरूपात हुंडा देणं घेणं हा गुन्हा तर आहेच परंतु तो देऊनही जर मुलगी तिकडे जाळली जात असेल, मारली जात असेल किंवा तिला प्रचंड वेदना देणारा छळ होत असेल तर ज्या पद्धतीनं तिला वाजत गाजत सासरी पाठवलं होतं त्याच जोमात वाजत गाजत माहेरी परत घेऊन या आणि तिच्या परतीचे दरवाजे कृपया बंद करू नका. अशा वेळी तिला तुमच्या आधाराची गरज असते.

जग काय म्हणेल? आमची इभ्रत, आमची प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत. जर तुमची मुलगीच या जगात नसेल तर त्या समाजाचं आणि त्या इभ्रतीचं काय लोणचं घालणार का तुम्ही?

आपण समाज म्हणून काय करू शकतो?

मुलींनी शिक्षण घेऊन, उच्च शिक्षित होऊन घरची भांडी घासत न राहाता बाहेर पडणं, आर्थिक स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. माहेरी आणि सासरी जरी तिला काही त्रास असेल तरी ही मुलगी स्वतः कमावून स्वतःच पोट भरू शकते. पाच रुपये जरी असतील तरी ते स्वतःचे असतात आणि त्यामध्ये एक प्रकारचा आनंद आणि आत्मविश्वास असतो. पोरीचा स्वाभिमान खूप महत्वाचा असतो! अर्थात यासाठी आई वडिलांनी मुलगी सासरी गेली म्हणून तिकडेच मेली ही मानसिकता सोडून दिली पाहिजे. जर तिला खरंच त्रास असेल तर तो त्रास सहन नं करता त्यांनी तिला परत घरी बोलावण्यात कुठलाच अपमान बाळगू नये.

बाकी आपण सर्वच शहाणे आहाेत परंतु सुज्ञ बनण्याचीही गरज आहे. अशा केसेस वरती बोलण्याची, चर्चा करण्याची गरज आहे, कारण हे फक्त एकच प्रकरण नाही. ही गोष्ट त्या प्रत्येक वैष्णवीची असू शकते. फरक एवढाच आहे की ही वैष्णवी लाखो रुपये देऊनही आपल्यातून गेली; आपल्या आजूबाजूची एखादी वैष्णवी काही हजारांसाठी, गाडीसाठी, काही तोळे सोन्यासाठी, आणि अशाच कुठल्यातरी कारणासाठी जीव तर देत नाही ना? हे पाहा इकडे तिकडे.

मुलींना फक्त शिक्षणच नही तर सर्व अर्थानं सक्षम करण्याची गरज आणि जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

लेखिका इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिका, समाज अभ्यासक, कवयित्री आणि समुपदेशक आहेत

deeks10@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

((समाप्त))