चंद्रकांत काळे

बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना. जयंत नारळीकर तेव्हा ‘आयुका’ चे प्रमुख होते. ‘आयुका’तर्फे भारतातील शास्त्रज्ञांची, वैज्ञानिकांची परिषद होती. समारोपाला माझा ‘लोकसंगीतावर आधारित संतरचना- अमृतगाथा’ हा कार्यक्रम आयोजकांनी ठरविला होता. त्यानिमित्ताने जयंतराव, मंगलाताई, डॉ. दधिच इत्यादी नामांकित मंडळींची दोन-तीनदा भेटही झाली. बोलता बोलता जयंतरावांनी एक सूचना केली. म्हणाले, ‘‘कॉन्फरन्सला येणारी मंडळी वेगवेगळय़ा प्रांतांतील आहेत. तुमचे निरूपण मराठीत न करता इंग्रजीत करा. म्हणजे अभंग कळायला मदत होईल.’’ कार्यक्रम प्रतिष्ठेचा होता. थातूर-मातूर काही चालणारच नव्हते आणि डोक्यात नाव लकाकलं- मोहन आगाशे.

त्याला फोन केला. तो म्हणाला, ‘‘मी असे कधी या आधी केलेले नाहीये, पण करु या आपण. मला आवडेल.’’ मग मी पुरेशा गांभीर्याने अमृतगाथाच्या निवेदनाची संहिता घेऊन त्याला भेटलो. चर्चा झाली. तालीम वगैरंचे ठरलं. ‘‘भाषांतर झाले की एकदा भेटू’’ मी म्हटले. मला ते वाचायचं होतं. प्रयोगाचा दिवस जवळ आला होता. हा आपला ‘‘हो-हो तेच चाललंय.’’ करत होता. माझं टेन्शन भयंकर वाढलं होतं. मग ‘‘तालीम वगैरे नको. मी करतो. काळजी करू नको.’’ असा प्रयोगाच्या दिवशी याचा फोन.

माझी अस्वस्थता वाढत होती आणि हा थेट प्रयोगाच्या आधी आयुकात हजर. छान कुर्ता वगैरे घालून. बघितलं तर मी दिलेली मराठी संहिता घेऊन हा समोर बसला होता. मी पुन्हा हताश. ‘‘लक्षात आहे रे.. इंग्रजीत करतो.’’ हा बिनधास्त. प्रयोग सुरू झाला. इंग्रजीत अनाऊन्समेंट झाली आणि मोहन सुरू झाला. प्रत्येक अभंगागणित तो एकेक मराठी निवेदनाचे पान उलटत होता आणि कमाल इंग्रजीत तो त्याबरहुकूम निवेदन करत होता. प्रसन्न आणि अप्रतिम शैलीत. प्रयोग संपला आणि टाळय़ांचा प्रचंड कडकडाट, किती तरी वेळ.

मोहनच्या अनेक अचाट गोष्टींपैकी ही एक. ठार वेडा असा हा मानसशास्त्रज्ञ आहे. गेली ५० वर्षे त्याचा सहवास आहे. पण त्याच्याकडे बघून त्याचा पटकन अंदाज कधीही येत नाही. अगदी आजही नाही. निदान मला तरी. हा अंदाज ज्यांना आला आहे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! तसा तो माझ्या रोजच्या बैठकीतला नाही. १९९२ ला ‘घाशीराम कोतवाल’ बंद झाल्यावर नंतर आमची गाठभेट ‘बेगम बर्वे’च्या प्रयोगानिमित्त होत राहिली. तसेही त्याचे प्रयोग वर्षांतून चार-पाच. पण आधी दोन-तीन दिवस तालमी असायच्या. आता तर गेल्या १५ वर्षांपासून तेही बंद. मग हा कधी फोनवर छान भेटतो आणि बऱ्याचदा वर्तमानपत्रातून आणि कधी प्रसंगानुरूप. पण मला सतत असेच वाटत राहते की तो सगळीकडे व्यापून अजूनही खूप उरलेला आहे.

‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे बरेच प्रयोग मी त्याच्याबरोबर केलेत. प्रयोगाआधीसुद्धा, तो कुठून कसा इथे पोचला हे नवल वाटावे असे असायचे. थिएटरवर तो पोचला की चकाटय़ा पिटत पिटत तो तयार व्हायचा आणि तिसरी घंटा झाली की मात्र तो नाटकच व्हायचा. नाटय़शास्त्रातले नियम, विचार या गोष्टी मी त्याच्यात कधी बघितल्याचे आठवत नाही आणि तरीही प्रयोग सुरू झाला की तो अख्खे नाटक व्हायचा. हे सगळे चकित करणारे असायचे. तो भूमिकेत शिरलाय असे नसायचे तर भूमिका त्याच्यात शिरायची. ‘११ देशांत ६० प्रयोग’ हा ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा इतिहास त्याने घडवला. पण तेव्हा हा गडी पेठेतल्या पेठेत फिरावे तसा आमच्याबरोबर फिरताना बघितलाय मी. इतक्याच सहजतेने. प्रयोगाच्या वेळी कधीही कुठले अशक्य असलेले ताणतणावही मी त्याच्या बाबतीत पाहिले नाहीत. अगदी त्याची आई गेल्यावर स्मशानातून आल्यावर केलेल्या ‘बेगम बर्वे’च्या प्रयोगातसुद्धा.

कलात्मक काम करत असताना बाहेरच्या कुठल्याही ताणतणावांचा परिणाम त्याच्यावर होत नसतो. किमान तो तुम्हाला अजिबात जाणवत नसतो, हे शास्त्र त्याला व्यवस्थित जमलेले आहे. मधून-मधून कधी तरी कळते की तो बरा नाहीये. त्याला अमुक-तमुक त्रास होतोय. मला हे कळून दोन दिवसांत फोन करावा तर तो कुठे तरी परदेशात चार-पाच दिवसांसाठी गेलेला असतो. मग तो कधी तरी ऑस्ट्रेलियातील महाराष्ट्र मंडळाच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा असतो. मानसशास्त्राशी निगडित पुस्तक प्रकाशन याच्याच हस्ते झालेले असते. कधी अशक्य ठिकाणी हा शूटिंग करीत असतो. चाकोराबाहेरील सिनेमांचा हा निर्मातापण असतो. मग तोटा भरून काढण्यासाठी भारतात आणि परदेशात हा त्या चित्रपटांचे खासगी शोज करत फिरत असतो. विविध मानसशास्त्रीय विषयांवर तो पोटतिडकीने जाहीर व्याख्यानातून बोलत राहतो. ‘सिंहासन’ सिनेमाला ४२ वर्षे झाली म्हणून शरदराव पवारांनी आयोजित केलेल्या सोहळय़ाला हा मुंबईत जाऊन हजेरी लावतो. तर परदेशी मैत्रीण कधी पुण्यात आली तर तिला पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून दाखवायला नेतो. तो सतत हलत असतो. त्याच्या मराठी, हिंदी चित्रपटांची यादी खूप मोठी आहे आणि तीच या मुक्त संचाराचा पुरावा आहे.

कला आणि मानसशास्त्र या दोन क्षेत्रांमध्ये अजूनही कार्यरत असणे आणि त्यासाठी भिंगरीसारखी भटकंती करत राहणे हेच या वयातले त्याचे जबरदस्त टॉनिक आहे आणि तो ते मात्र न कंटाळता भरभरून घेतो आहे. ‘सहजसाध्यपण’ हे त्याचे अविभाज्य अंग आहे. ते कायम राहील. आपल्याला जाणवत राहणारे हे सहजसाध्यपण त्याच्या दृष्टीने अनेकदा कष्टप्रद असतेच, ही वस्तुस्थिती आहेच. पण आपल्याला ते अजिबातच समजून येत नाही, हीच तर मोहन आगाशे नावाच्या रसायनाची गंमत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्यभूषण’ हीही त्याला जाता जाता गाठ पडलेली पण अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. त्याचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मनभर शुभेच्छा!