भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले. १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या लढ्यातील राष्ट्रवादी विचारांच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचा सहभाग हा लढा धर्मनिरपेक्ष होता हे अधोरेखित करणारा आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा धार्मिक लढा नव्हता. राजा मुस्लीम आणि प्रजा हिंदू हा निव्वळ योगायोग होता. हा लढा हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सामान्य जनतेने दिलेला लोकलढा होता. यात सर्व जनतेने शौर्याने, धैर्याने व प्राणपणाने झुंज दिली. यात सर्व धर्माच्या लोकांचा समावेश होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मुस्लीम धर्मीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्थानात जे चालले होते ते सर्वच मुस्लिमांना पसंद होते असे नव्हे. त्यात ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो ते म्हणजे हुतात्मा पत्रकार शोएब उल्ला खान. तसेच मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, फरीद मिर्झा, अकबर यार जंग, मीर अकबर अली खा, अली यावर जंग, काजी मोहम्मद अब्दुल गफ्फार, मेहदी अली यांचा समावेश करावा लागेल. यापैकी शोएब उल्ला खान तसेच मौलाना सिराजुल हसन तिरमिजी यांना सोडल्यास बाकी सर्व अधिकार पदावर होते व असे असताना ते निजाम सरकार, इत्तेहाद व रझाकारांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करत राहिले व त्यासाठी वाटेल तो त्याग ही त्यांनी केला.
निजामाने स्वतंत्र राहण्याची कल्पना सोडून देऊन भारतीय संघराज्यात सामील व्हावे, अशी मागणी करणारे पत्रक सात मुस्लिमांनी १३ ऑगस्ट १९४८ रोजी काढले. त्यावर सेवानिवृत्त मुख्य अभियंता अहमद मिर्झा, सेवानिवृत्त शिक्षण संचालक महंमद हुसेन जाफरी, एक जहागिरदारनवाब मंजूरजंग, बाकरअली मिर्झा, माजी तहसीलदार फरीद मिर्झा, खादिमचे संपादक मुल्ला अब्दुल बासित व सेवानिवृत्त लेखापरीक्षक एच. के. मुनीम यांचा समावेश होता. मौलाना सिराजुल हसन तिरमिजीचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. भल्या मोठ्या मिशा, खादीची शेरवागो, चुडीदार पायजामा, डोक्यावर गांधी टोपी, बोलका स्वभाव त्याला साजेशी सडेतोड भाषा. ते लोकांशी संवाद साधत व्याख्यान देत. ‘तुम्ही म्हणता हे राज्य तुमचं आणि तुमच्या वंशाचं म्हणजे आसिफजाही घराण्याचं आहे. तसं असेल तर मग हे राज्य मुसलमानांचं कसं? निजाम आपल्या मुलांना आणि साहिबजाद्यांना बाजूला सारून तुमच्यापैकी गरीब मुसलमानाच्या मुलाला आपला शहजादा (युवराज) बनविलं काय? निजामाजवळ अपार संपत्ती आहे. साऱ्या जगात तो श्रीमंत आहे. एवढे पैसे त्याला काय करायचे? तुम्ही येथे टांगे हाकता, गवत विकता, मोलमजुरी करता. तुम्ही मुसलमान आणि निजामही मुसलमान मग संपत्ती एकट्या निजामाची कशी?’ अशा प्रश्नांमुळे लोक विचार करू लागत. निजामापेक्षा आणि आसफिया खानदानपेक्षा मला भगतसिंह जवळचा आहे. असे म्हणणाऱ्या तिरमिजींवर सरकारचा आणि रझाकारांचा रोष असणे साहजिकच होते. ते बरीच वर्षे हैदराबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते.
हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही स्वातंत्र्याचा आवाज वर्षानुवर्षे निझामाच्या नगरीत घुमवीत ठेवणारे ते एक लोकविलक्षण नेते होते. हुतात्मा गोविंदराव विनायकराव पानसरे मारले गेल्याची बातमी हैद्राबादेत आली, त्यानंतर भरलेल्या कुंद्रास्वामी बाग येथील जाहीर सभेत तिरमिजींनी हैद्राबादच्या एकूण राजकारणावर आग ओकणारे भाषण केले. तिरमिजी म्हणाले, ‘पानसरे भाग्यवान ठरले. कारण त्यांना एका विशिष्ट दिवशी हुतात्मा होता आले. मी गेले एक तप रोजच मरणाच्या सावलीखाली आहे. हे माझे व्याख्यान आपण माझ्याही शोकसभेचे व्याख्यान समजावे.’ हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शेवटचे पर्व सुरू होण्याआधी मौलाना सिराजुल हसन तिरमिजी यांचे हैदराबादमध्ये आकस्मिक निधन झाले.
दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे फरीद मिर्झा. शिक्षण चालू असतानाच त्यांच्यावर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव पडला. शिक्षण संपल्यानंतर १९४० साली हैदराबाद सरकारने त्यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती केली. व्यापक दृष्टी असलेल्या फरीद मिर्झा यांना भारताच्या भवितव्याशी हैदराबादचे भवितव्य जोडले गेलेले आहे. व ते वेगळे असू शकत नाही असे वाटू लागले होते. १९४२ च्या मुंबई अधिवेशनावेळी ते वसमतला तहसीलदार होते. कौटुंबिक कारण सांगून त्यांनी रजा मंजूर करून घेतली व ते मुंबई अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यावेळी मुंबईत काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक झाली होती. दिवसभर मुंबईमध्ये फिरून अस्वस्थ मनाने ते संस्थानात परतले. १९४४ मध्ये गांधीजी पाचगणीला असताना मिर्झा आपल्या पत्नीबरोबर जाऊन गांधीजींना भेटले व त्यांचा आशीर्वाद घेतला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात ते तहसिलदार होते. तत्कालीन नांदेडचे जिल्हाधिकारी शहाबुद्दीन यांना रझाकारांबद्दल विशेष प्रेम होते. नांदेडचा रझाकार प्रमुख अखलाक हुसेन हा त्यांना जास्त प्रिय होता. या काळात परिसरातील अनेक गावांत हिंसाचार वाढला होता.
कंधार तालुक्यातील लोहा या गावी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी य मागणीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी कंधारमध्ये प्रचंड दंगल झाली. या दंगलीमध्ये गावच्या पोलीस पाटलासह तीन लोकांना मारून टाकण्यात आले होते. गोळ्या लागून जखमी झालेले लोक अद्याप अर्धवट जळत असलेल्या त्यांच्या घरातच पडलेले होते. महादेव नलगे या सावकाराच्या घरावर हल्ला झाला होता. फरीद मिर्झा यांनी या सर्वांना ट्रकमधून नांदेडला पोहोचवले आणि त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. इकडे लोह्यात परत पोलिसांच्या उपस्थितीत प्रचंड जाळपोळ, लुटमार आणि हिंसाचार झाला. फरीद मिर्झा दोषींवर कारवाई करत होते. मात्र हिंदुना साथ देत असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. ते रझाकारांच्या रानटी कृत्यांना विरोध करत राहिले. अधिकाऱ्यांच्या रझाकारांना असलेल्या पाठबळाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. निजाम सरकार, रझाकार संघटना व त्या माध्यमातून संस्थानांमध्ये सुरू होत असलेल्या अन्याय – अत्याचाराविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेणे आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार राहणे, यामुळे फरीद मिर्झा हे कायम लक्षात राहतील.
हैदराबाद संस्थानात निजामाच्या एकतंत्री कारभारास व रझाकारांच्या अन्यायाला जाहीरपणे विरोध करणाऱ्यामध्ये ‘इमरोज’ या उर्दू वर्तमानपत्राचे तरुण संपादक शोएब उल्ला खान यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. शोएब उल्ला खान आपल्या लेखणीच्या माध्यमातून निजाम सरकार व रझाकारांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध जाहीरपणे टीका करीत होते. आपल्या जाज्वल्य निष्ठांसाठी प्राणाचे मोल मोजणारे शोएब उल्ला खान हे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील एक संघर्षशील व तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीपासूनच शोएबची लेखणी अन्यायाच्या विरोधात प्रहार करीत होती. निजामाचे डावपेच, कटकारस्थाने, सामान्य जनतेची होणारी फरफट, कासिम रझवी व रझाकारांचे अन्याय अत्याचार व राजसत्तेचा त्यास असलेला पाठींबा असे चौफेर विषय ते लावून धरत. निजामाच्या ढोंगी राजकारणावर त्यांनी ‘दिन की सरकार और रात की सरकार’ या लेखामधून सणसणीत चपराक लगावली. दिवसेंदिवस शोएब उल्लाच्या लेखणीमधून जणू निजामशाहीला हादरे बसू लागले. त्यास धमकीची पत्रे येऊ लागली. पण हा काही धमक्यांना भीक घालणारा नव्हता. १९ ऑगस्टच्या रझाकारांच्या सभेत कासिम रझवीनी नाव न घेता शोएबवर जहरी टीका केली होती, ‘…आमच्याविरुद्ध उठणारे हात खाली खेचले जातील वा धडापासून वेगळे केले जातील.’ असे म्हणतात की, समझनेवालों को इशारा काफी होता है आणि तेच झाले.
२१ ऑगस्ट १९४८ ला आपले कार्य आटपून शोएब उल्ला खान व त्यांचे मेव्हणे इस्माईल खान कार्यालयातून बाहेर पडले. घरी परतणाऱ्या या दोघांवर रझाकारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शोएब उल्ला खान यांचे दोन्ही हात कलम करण्यात आले आणि जणू रझवीने केलेला संकल्प पूर्ण केला. इस्माईल खान मात्र वाचले. मृत्यूशय्येवर पडलेल्या आपल्या पुत्राला पाहून शोएबची आई उदगारली ‘आज मेरे बेटे ने शानदार मौत पायी…’ पत्रकारितेतील शोएबचे गुरु एम. नरसिंहराव यांनी म्हटले की, ‘शोएबने आपल्या हौतात्म्याने हैदराबादमधील पोलीस कारवाईची तारीख जवळ आणली.’ हैदराबादमधील पोलीस कारवाई संबंधी सरदार वल्लभभाई पटेल ठाम होते. शोएब उल्ला खान यांच्या हौतात्म्याने पंडित नेहरूजींच्या मनातील अस्थिरता संपली. मृत्युनंतरही रझवी व त्याच्या अनुयायांचे शोएबशी वैर संपले नाही. शोएबचे शव कबरीतून उकरून त्याची जाहीर विटंबना करू अशा जाहीर धमक्या रझाकार देत. ते पाहून शोएबचे वृद्ध पिताजी आगापुऱ्यातील शोएबच्या कबरीपाशी कित्येक दिवस बंदुकीसह पहारा देत. शोएबचे वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठीचे बलिदान हे हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञातील शेवटच्या सामिधांपैकी एक होते. त्यानंतर थोड्याच दिवसात हैदराबादमध्ये पोलिस कारवाई झाली. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील शोएब उल्ला खान यांचे हौतात्म्य आपल्या कायम स्मरणात राहील.
http://www.bhausahebumate.com
(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व वक्ते असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)