विनेश फोगट

आमचा न्यायासाठीचा लढा सुरू होऊन जेमतेम एक महिना झाला आहे, पण असं वाटतं की, आम्ही जंतरमंतरवर वर्षभरापासून आहोत. आम्ही या उन्हात फुटपाथवर झोपतो, डास चावत असतात, संध्याकाळ झाली की भटके कुत्रे येतात, आसपास स्वच्छ स्वच्छतागृह नाही म्हणून असं वाटतं असं अजिबात नाही. न्यायासाठीचा आमचा लढा बराच काळ सुरू आहे, असं आम्हाला वाटतं आहे. कारण न्यायाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी लैंगिक छळ केला अशी तक्रार एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूसह सात महिला कुस्तीपटूंनी केल्यानंतर आमचा हा लढा सुरू झाला.खरं सांगायचं तर, आम्ही जानेवारीमध्ये महिला कुस्तीपटूंबाबत होणाऱ्या लैंगिक छळवणुकीबद्दल आणि फेडरेशनमधील गैरव्यवस्थापनाबद्दल बोलायचं ठरवलं, तेव्हा आमच्या बोलण्यामुळे फरक पडेल असा आम्हाला विश्वास होता. आणि थोड्या काळासाठी, तसं झालंसुद्धा. आमच्या आरोपांच्या चौकशीसाठी क्रीडा मंत्रालयाने एका निरीक्षण समितीची स्थापनादेखील केली, परंतु आता आमच्या लक्षात येत आहे की ती सगळी निव्वळ डोळेझाक होती.

जानेवारीमध्ये, बजरंग (पुनिया), साक्षी (मलिक) आणि मी जंतरमंतरवर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला खात्री होती की न्याय मिळण्यासाठी दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. लैंगिक छळाबद्दल बोलण्याचे टोकाचे धाडस दाखवणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या मान आणि सन्मानासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल, असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं.पण आता आम्हाला प्रश्न पडला आहे की, न्याय मिळवण्यासाठी पीडितांनी आधी किती वेळा बोलायचं असतं?

मी ‘बोलणं’ असं म्हणते तेव्हा पुढच्या सगळ्या गोष्टींची फक्त कल्पना करून बघा. या मुलींना त्या वेदनादायक घटनांबद्दल एकदा नव्हे तर निरीक्षण समितीसमोर, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन समितीसमोर, पोलिसांसमोर आणि नंतर जबाब नोंदवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांसमोर असं अनेक वेळा बोलावं लागलं आहे.आंदोलन सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी न्याय दिसत नाही. एखादीचा लैंगिक छळ झाला आहे आणि त्याबद्दल वारंवार बोलावं लागणं हे तिच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार होण्यासारखंच आहे.इतर अनेक मुलींप्रमाणे मलाही या माणसामुळे एवढी वर्षं मूकपणे अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. माझ्याकडे पर्यायच नव्हता. खासदार ब्रिजभूषण यांना का संरक्षण दिलं जात आहे, याचा कोणीही अंदाज बांधू शकतो.

पण, आम्ही म्हटल्याप्रमाणे, त्यांना अटक होईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. गेले काही महिने आम्ही अतिशय तणावाखाली घालवले आहेत. या काळात मी रडलेही आहे. पण मला माहीत आहे की महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी ही एक बराच काळ चालणारी लढाई असू शकते आणि ती लढताना आमची कसोटीही लागू शकते. या लढाईसाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे.खरं तर आशियाई क्रीडा स्पर्धा जवळ आली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्रता फेऱ्या सुरू होत आहेत. आम्हाला त्यात भारताचं प्रतिनिधित्व करून पदक जिंकायचं असलं तरी, या क्षणी ही लढाईदेखील तेवढीच मोठी आहे. कारण न्याय न मिळवताच आम्ही आमचा संघर्ष थांबवला तर लैंगिक छळाचा सामना करणाऱ्या महिला यापुढच्या काळातही गप्प बसतील आणि त्रास सहन करत राहतील.

मी नेहमीच स्पष्ट बोलते आणि अनेकांना असं बोलणं आवडत नाही. मग ते क्रीडा मंत्रालयातील लोक असोत, भारतीय क्रीडा प्राधिकरण असो की भारतीय कुस्तीगीर संघटना असो. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर, मी माझ्या मनातलं बोलू लागले लोक म्हणायला लागले की माझ्यात अहंकार निर्माण झाला आहे. पण अन्याय होत असेल तर महिलेने आवाज उठवणं चुकीचं आहे का?जानेवारीतील पहिल्या आंदोलनानंतर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे कळल्यावर खरंतर माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण आम्हाला यश येऊ नये असं ज्यांना वाटत होतं, ते आमच्यात फूट पाडू शकले नाहीत. आम्ही अधिक ताकदीने परत आलो आहोत.

पूर्वी आम्ही राजकीय खेळातील प्याद्यासारखे होतो. आता आम्ही आमचे निर्णय घेऊ लागलो आहोत.क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आमचा अनादर केला आहे. ‘मी क्रीडामंत्री आहे, तेव्हा मी जे बोलतो ते तुम्हाला ऐकावे लागेल’ अशी त्यांची वृत्ती आहे. लैंगिक छळाच्या बळींनी अनुराग ठाकूर यांना आपल्या कहाण्या सांगितल्या, तेव्हा अनुराग ठाकूर यांनी त्या मुलींच्या डोळ्यात पाहिलं आणि लैंगिक छळाचे पुरावे मागितले. निरीक्षण समितीच्या सदस्यांनीही तेच केलं.आम्ही जानेवारीत केलेलं तीन दिवसांचं आंदोलन क्रीडामंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर थांबवलं. परंतु आता आम्हाला माहीत आहे की आंधळा विश्वास ठेवणं ही आमची चूक होती.

सोमवीरने, म्हणजे माझ्या पतीने आणि मी, आम्ही एकमेकांना सांगितलं आहे की इतर कुणीही कोणत्याही कारणानं या लढ्यातून बाहेर पडलं तरी आम्ही हा लढा सुरूच ठेवू.जानेवारीमध्ये, आम्हाला व्यवस्था नेमकं कसं काम करते हे खरोखरच माहीत नव्हतं. आम्ही अगदी साधेसरळ आणि भाबडे होतो. आम्ही तेव्हाच म्हणजे जानेवारीत एफआयआर दाखल केला नाही, असा प्रश्न आम्हाला विचारला गेला. तेव्हा आम्हाला पोलिसांची भीती वाटत होती. आम्ही खेड्यातून आलेलो आहोत. आम्ही तिथं कसे राहतो ते तुम्ही कधी पाहिलं आहे का? पोलीस एफआयआर दाखल करतात, माध्यमं त्याबद्दल बातम्या देतात, त्यातून संबंधिताची नावं बाहेर येतात आणि प्रत्येकजण पीडितेला प्रश्न विचारत सुटतो. गावातल्या लोकांसाठी एफआयआर ही खूप मोठी गोष्ट असते. आणि तोसुद्धा इतर कोणत्या गोष्टीसाठी नाही तर लैंगिक छळाच्या गु्न्ह्यासाठी. आम्ही एफआयआर दाखल करताच ब्रिजभूषण आम्हाला मारून टाकतील असं आम्हाला वाटायचं.

ब्रिजभूषण यांच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करण्याचा विचार माझ्या मनात अनेक वेळा आला असला तरी धरणं- आंदोलनाची कल्पना मला कधीच सुचली नाही. मला माध्यमांशी बोलायचं होतं, विशेषत: टोकियो ऑलिम्पिकनंतर पण मी स्वत:ला रोखून धरलं कारण मला असं वाटत होतं की माझ्या बोलण्यानंतर लोक म्हणतील की पदक जिंकलं नाही, म्हणून तिच्यात कटुता आली आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये मात्र मी स्वत:लाच सांगितलं की आता हे सगळं बास झालं. मी सोमवीरशी, म्हणजे माझ्या नवऱ्याशी आणि बजरंगशी बोलले. आम्हाला असं वाटलं की आता बोलण्याची वेळ आली आहे. सध्या सात तक्रारदारच पुढे आल्या असल्या तरी, लैंगिक छळाच्या इतरही अनेक बळी आहेत. त्या पुढे यायला घाबरत आहेत.आता आमच्यासमोर एकच भीती आहे की कदाचित आम्हाला कुस्ती सोडावी लागेल. आपल्यामध्ये आणखी पाच वर्षे खेळण्याची क्षमता आहे, असं आम्हाला वाटतं, पण या आंदोलनानंतर भविष्यात आमच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे काय माहीत… आमच्या जीवाला धोका आहे, हेदेखील आम्हाला माहीत आहे. कारण केवळ ब्रिजभूषणच नाही तर इतरही काही बाहुबली आता आमच्या विरोधात आहेत.

पण मला मरणाची भीती वाटत नाही.इतर क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी आम्हाला पाठिंबा द्यायला, खेळाडूंची एकी दाखवायला जंतरमंतरवर यायला हवं होतं असं मला वाटतं. त्यापैकी काहींनी ट्वीट करून आम्हाला पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्या या कृतीचं कौतुकच आहे, पण फक्त एकदा ट्वीट करणं पुरेसं नाही. व्यवस्थेची भीती वाटत असल्यामुळे ते आम्हाला पाठिंबा द्यायला पुढं आले नाहीत. पण खरंतर पुढं येऊन ते जास्तीतजास्त काय गमावतील? पण त्यांनी तडजोड करणं स्वीकारलं. पण असं आहे की बहुतेकदा ९९ टक्के लोक तडजोडच करतात.

पण आम्हाला मात्र असं वाटतं की आम्ही आत्ता गप्प बसलो असतो तर उरलेल्या सगळ्या आयुष्यात आम्हाला त्याचा पश्चात्ताप झाला असता. तुम्ही न्यायासाठी लढू शकत नसाल तर तुमच्या गळ्यात पदकांचा काय उपयोग? महिलांच्या पुढच्या पिढीला सुरक्षित वातावरणात कुस्ती खेळता यावी आणि मुक्तपणे स्पर्धांमध्ये सहभागी होता यावं म्हणून आम्ही व्यवस्थेविरुद्ध लढत आहोत.२३ एप्रिलपासून आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कधी कधी मला स्वतःला मी कोण आहे याची आठवण करून द्यावी लागते. कारण सगळ्या गोष्टी खूप वेगाने घडत आहेत. आणि त्यामुळे मला गोंधळल्यासारखं होत आहे.आम्ही इथं जंतरमंतरवर फुटपाथवर झोपतो. सकाळी उठून सराव करतो. शेकडो हितचिंतक आम्हाला रोज भेटायला येतात. बसून आमच्याशी बोलतात. सल्ला देतात. आशीर्वाद देतात. हे सगळं आम्ही पहिल्यांदाच अनुभवतो आहोत. पण हेदेखील तितकंच खरं आहे की कधी कधी आम्हाला आता पुढं आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, हा प्रश्न पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधी कधी असंही वाटतं की हा सगळं जग विरुद्ध आम्ही असा संघर्ष आहे. पण देवाच्या कृपेने आम्ही अजूनही इथेच आहोत आणि कुठेही जाणार नाही आहोत. आमचं आंदोलन बदनाम करण्याचे प्रयत्न झाले आहेत. आमच्यात फूट पाडण्यासाठी आम्हाला उघडउघड धमक्या दिल्या जात आहेत. पण आमचा लढा सुरूच राहणार आहे.आमच्या आईवडिलांनाही या सगळ्याची आता भीती वाटयला लागली आहे. माझा भाऊ इथे येतो पण त्याला माझी काळजी वाटते. माझी आई घरी सतत आमच्यासाठी प्रार्थना करत राहते. तिला जे काही सुरू आहे त्यातलं सगळं समजतंच असं नाही. पण ती “बेटा, कुछ होगा?” (बेटा, काहीतरी मार्ग निघेल ना?) असं विचारत राहते. मला तिला विश्वास द्यायचा आहे की आमचा लढा व्यर्थ जाणार नाही आणि आम्ही जिंकू…