राकेश शेटके

रेडिओबद्दल कितीतरी आठवणी मनात साठून आहेत. आमच्या घरात अगदी खूप पूर्वीपासून रेडिओ ऐकला जातो. आजोबांनी रेडिओ घेतला, तेव्हा रेडिओसाठी लायसन्स लागत असे. ज्यांच्या घरी रेडिओ असे त्यांच्याकडे शेजारपाजारी कुतूहलाने आणि उत्साहाने रेडिओ ऐकण्यासाठी जात. आजी आजोबा रेडिओबद्दल सुंदर आठवणी सांगत. ही आवड आमच्या घरी पुढे अशीच सुरू राहिली. घरातल्या सर्वांची रेडिओ ऐकण्याची विशेष आवड वाढतच गेली. नागपाल, अपर्णा आणि फिलिप्स कपंनीचे रेडिओ आमच्या घरी वापरले गेले. अगदी लहाणपणापासून रेडिओचा आवाज माझ्या कानांवर पडू लागला, हा एवढासा बारका रेडिओ आणि याच्यात माणसं कशी असतात, याचं त्या बालवयात मोठं कुतूहल होतं! रेडिओला अगदी निरखून बघायचो, काय जादू आहे असंच तेव्हा वाटून जात असे. यामध्ये नक्कीच काहीतरी मजा आहे असं वाटून ही माझी आवड वाढत गेली आणि अगदी जाणीवपूर्वक लक्ष देऊन रेडिओ ऐकण्याची सवय इयत्ता नववीपासून लागली.

पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी आकाशवाणीची म्हणून जी विशिष्ट धून आहे तिने आकाशवाणीची प्रसारण सभा सुरू होते. ही संकेतधून संगीतशास्त्राचे प्राध्यापक वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. संकेतधून झाली की वंदे मातरम आणि त्यानंतर आकाशवाणीची ओळख, दिवस, वार, वेळ, मंगलध्वनी या गोष्टींनी आकाशवाणीची प्रसारण सभा सुरू होते. प्रभातवंदनाच्या भक्तीगीतांनी सकाळ अगदी भक्तीमय आणि प्रसन्न होते!

त्यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाते. मला आठवते शाळेला जाण्याच्या वेळा, चहा-नाष्त्याच्या वेळा, जेवणाची वेळ, विश्रांतीची वेळ… रेडिओ टाईमवर सेट होत. रेडिओ हा आपला जिवलग सोबतीच आहे आणि रेडिओवरील निवेदक हे आपल्या घरचेच सदस्य आहेत, अशी भावना तेव्हापासून मनात व्यापून राहिली आहे. रेडिओवरील कृषिवार्ता ऐकून शेतकरी आपली शेती कुशलतेने करायचा प्रयत्न करतो. मला अजूनही चांगलं आठवतं सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी ‘इयम आकाशवाणी, संप्रति वार्ता:’ ‘श्रूयन्ताम! प्रवाचक: बलदेवानंद सागर:!’ हा आवाज कानावर पडे. संस्कृत बातम्या आणि बलदेवानंद सागर हे समीकरणच! भालचंद्र जोशी, मृदुला घोडके, मिलिंद देशपांडे यांची बातम्या देण्याची शैली कौशल्यपूर्ण असे! ते आवाज कानात साठून आहेत! ‘चिंतन’, ‘जागर’ या कार्यक्रमांतून काही चांगले शब्द, विचार कानांवर पडतात आणि पाच मिनिटांचा कार्यक्रम कितीतरी किमया करून जातो! ‘दिलखुलास’मध्ये विविध विषय ऐकण्याची संधी मिळते. आमच्या लहानपणी रेडिओची ‘बालसभा’ भरत असे. आम्ही सगळी बालमंडळी खूष होऊन जायचो. गम्मत जम्मतचे कितीतरी क्षण बालसभेतून रेडिओने दिले! ‘चला हसूया’ हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित विनोदाचा कार्यक्रम मजेदार होता! ‘प्रतिबिंब’ ही आकाशवाणी सांगलीवरील कौटुंबिक श्रुतिका मला खूप आवडायची. १० ते १५ मिनिटांच्या कौटुंबिक संवादामध्ये ‘प्रतिबिंब’ हा कार्यक्रम अक्षरशः खुलत असे. त्या त्या वेळच्या गोष्टींचं प्रतिबिंब त्या कार्यक्रमात असे! ‘प्रतिबिंब’ची एक खास संकेतधून होती.

‘गावाकडच्या गोष्टी’मध्ये ग्रामीण भागातल्या चालत्या बोलत्या गोष्टी असत. ‘उदयोगजगत’, ‘गांधीवंदना’, ‘संध्याछाया’, ‘विविधा’ हे आकाशवाणी सांगलीवरील कार्यक्रम किती लोकप्रिय! दत्ता सरदेशमुख, वामन काळे, चित्रा हंचनाळकर, दत्ता सरदेशमुख, सुनील कुलकर्णी, श्रीनिवास जरंडीकर, रियाज शेख, अनिल कोरे, सुभाष तपासे, गोविंद गोडबोले, निता गद्रे, मृणालिनी पाळंदे, नीना मेस्त्री – नाईक, संजय पाटील, प्रकाश गडदे, उज्वला कवठेकर, चंद्रकांत मांढरे… या सर्वांना विविधरंगी कार्यक्रमांत ऐकणं, ही श्रवणश्रीमंतीच असे. नभोनाट्य मध्ये ‘वाटसरू’ कधीच नाही विसरू शकत!

रेडिओवरील जाहिरातीदेखिल चांगल्याच लक्षात आहेत. नवीन वर्ष सुरू होण्याआधी काही दिवस ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ आणि ‘महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे’ या जाहिराती हमखास कानी पडत. ‘माझं घर माझं शेत’ या शेतीविषयक कार्यक्रमात ग्रामीण ढंग असणारे संवाद खुलत! ‘पांडबा, येऊ का रं घरात, काय निवांत हाईस! शेतीमधी अवंदाच्या वर्षी काय रं करतोस?’ या मास्तरांच्या किंवा डॉक्टरांच्या प्रश्नावर पांडबा उत्तर द्यायचा : ‘डाक्टर, त्योच तर प्रश्न पडलाय बघा, अवंदाच्या वर्षी शेतीत काय करायचं? हवा पाणी तर असं हाय.. या समद्या गोष्टींनी टक्कुरं फिरलंया बघा, तुम्हीच आता काय त्यो मार्ग दाखवा…’ असा संवाद आम्ही कित्येक वेळा ऐकला आहे. किती आपुलकीचा संवाद! याच कार्यक्रमात मग ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेती पिकली सोन्यावानी’ ही जाहिरात ऐकायला मिळे.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य असणारी ही आकाशवाणी! नैसर्गिक आपत्तीच्या काळातदेखिल रेडिओचं महत्त्व कित्येक वेळा कळलं. महापुराच्या आणि कोविडच्या काळात रेडिओने आपली किती काळजी घेतली. रेडिओ अशा आपत्तीच्या वेळी आपल्याला सजग आणि सतर्क करतो! भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये रेडिओची महत्त्वपूर्ण भूमिका होती. उषा मेहता आणि भूमिगत रेडिओ स्टेशन, महात्मा गांधी यांनी तर रेडिओला ‘दैवी आवाज’ म्हटलं होतं. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओवरून भारतीयांना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा!’ असं म्हटलं. यावरूनच आपल्याला कळतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रेडिओची किती महत्त्वपूर्ण भूमिका होती.

चित्रपटांतूनदेखिल रेडिओशी असलेलं नातं वेळोवेळी दिसतं. ‘अभिमान’ या चित्रपटात जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित असलेली ‘तेरे मेरे मिलन की ये रैना…’ तसंच ‘लुटे कोई मन का नगर…’ ही गाणी अनेकांना चांगलीच लक्षात आहेत! गणेश चतुर्थी, गणेश जयंती आणि संकष्टीला अष्टविनायक चित्रपटातली ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा…’, ‘प्रथम तुला वंदितो…’ ही गाणी कानी पडत. ‘दिसते मजला सुखचित्र नवे…’ या गाण्यातील थोडे चित्रीकरण आकाशवाणीवरच झाले आहे. याच चित्रपटातील ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ या गाण्याशिवाय आपली दिवाळीच पूर्ण होत नाही. हे गाणं ऐकलं की दिवाळी आणखीनच प्रकाशमय होऊन जाते! ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये विद्या बालन ‘गुड मॉर्निंग मुंबई’ म्हणते.

‘आपली आवड’, ‘आपकी पसंद’, ‘सप्रेम नमस्कार’, ‘स्नेहांकित’ या पत्रांवर आधारित कार्यक्रमांत आपलं पत्रं निवडलं जाणं हा कोण आनंद असे. यातून अनेक श्रोतामित्रांची ओळख झाली. रेडिओची क्रेझ अशी होती की जे श्रोते रेडिओला पत्रं पाठवतात त्यांची त्यांच्या सायकलवर लिहिलेली नावं वाचून इतर लोक आवर्जून विचारत ‘रेडिओला नाव ऐकलं ते आपलंच ना!’ तो प्रतिसाद बघून श्रोते जाम खूष झाल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत! निवेदकांना ऐकणं, त्यांच्या आवाजात आपण लिहिलेलं पत्र ऐकणं हे खूप समाधान देणारं असे माझं पहिलं पत्र रेडिओवरती जेंव्हा निता गद्रे यांनी वाचलं होतं, तेव्हा मला खूपच आनंद झाला होता आणि मग रेडिओसाठी खूप पत्रं लिहिली! श्रोता म्हणून रेडिओशी नातं होतंच आणि मग काही दिवसांनी आकाशवाणी सांगलीवर कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तोपर्यंत रेडिओ केंद्रात जाण्याची संधी केवळ मकर संक्रांती आणि वर्धापनदिनी मिळे. स्नेहमेळाव्याला श्रोते खूप लांबून येत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅज्युअल अनाउन्सर झाल्यावर श्राव्य माध्यम असणाऱ्या आकाशवाणीत शब्दांना किती महत्त्व आहे हे कळू लागलं! नियमित निवेदकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून रीतसर प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही प्रसारण कक्षात प्रत्यक्ष बोलायला बसलो तेव्हा सुरुवातीला अंगावर रोमांच यायचे! प्रसारणकक्षात निवेदकासमोर रेडिओ कॉन्सोल असतो, समोर मोठं घड्याळ असतं! सिग्नल आल्यावर बोलणं, निवेदनातील प्रसारण आणि सहक्षेपण या शब्दांकडे लक्ष ठेऊन निवेदन देणं, प्रसंगानुरूप फिलर देणं, रूपरेषेच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम क्रमाने संगणकावर लावून घेणं, ज्या त्या वेळच्या जाहिराती ज्या त्या वेळी