गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन आपल्याला काही शिकवून जाणार आहे का? मुंबई व दिल्ली या शहरांमध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यात मोटरसायकलचा वाटा मोठय़ा प्रमाणांत आहे. पूर्वी सिग्नलजवळ दिसणारा वाहतूक हवालदार आता गायब झाला असून त्याची नेमणूक आता टोचण-वाहनांत बसून कमाई करण्याच्या धंद्यावर झाली आहे. तसेच सिग्नल सकाळच्या वेळेस चालू ठेवून आपली जबाबदारी संपली असे वाहतूक खाते समजत असेल तर ते साफ चूक आहे. सिग्नलमध्ये दिवसाच्या वेळेनुसार व वाहतुकीच्या घनतेनुसर वेळ कमी जास्त करण्याची सोय असते. काही ठिकाणी हाताने सिग्नलचे नियमन करता येते. हे वाहतूक खाते सोयीस्करपणे विसरते आहे.
वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे बावळटपणा असे एक समीकरण मिथ्या तयार झाले आहे. यांत पोराटोरांपासून ते वयस्क माणसांपर्यंत सर्वच सामील असतात. िलगभेद, धर्मभेद, श्रीमंत/ गरीब, चारचाकी/ दुचाकी या सर्व भेदाभेदां पलीकडील असे हे कार्य सर्वजण मिळून करीत असतात. सध्या जरी मुंडे यांच्या गाडीला ठोकर देणाऱ्याने सिग्नलचे उल्लंघन केलेले असले तरी सरकारी गाडय़ा या बाबतीत अग्रेसर असतात व त्यांना हे उल्लंघन माफ असते हा सर्वसाधारण अनुभव आहे. तरी वाहतुकीच्या नियमांचे सर्व समाजघटकांकडून पालन होईल याची सर्वतोपरी काळजी घेणे हीच गोपीनाथजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

मागच्या सीटबेल्टची सक्ती हवी
गोपीनाथ मुंडे  यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक चर्चा होत आहेत, तर्कवितर्क होत आहेत. तथापि याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणे जरुरी आहे.  मुंडे  कारच्या मागील बाजूस डावीकडे बसले होते. दुसऱ्या कारचा धक्का याच दारावर बसल्यााने ते खाली पडले.
भारत सरकारने २००४ सर्व मोटरकारना  मागील बाजूस सीट  बेल्ट असावेत अशा सूचना केल्या होत्या त्यानुसार सर्व कारना मागील बाजूस सीट बेल्ट असतात. आपल्याकडील नियमांनुसार चालक व शेजारील माणसाने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. मागील सीटवर  बेल्ट लावणे बंधनकारक नाही.  युरोप , अमेरिका , जपान  आदी  देशात मागील बाजूस बसलेल्या माणसाने सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे.  
जर मुंडेसाहेबांनी मागील बाजूस सीट बेल्ट लावला असता तर  ते खाली पडले  नसते  व धक्काचा जोर काही प्रमाणात कमी झाला असता. सध्याचे नवीन सरकार शास्त्रीय पद्धती वापरणार आहे. तेव्हा सर्व कारमध्ये मागील बाजूस बसणाऱ्या माणसाने सीट  बेल्ट लावणे बंधनकारक करावे. यामुळे हानी नक्कीच कमी होऊ शकते.  भारत सरकारने  व महाराष्ट्र सरकारने याच विचार करून योग्य तसे कायदे करून अपघातातील हानी कमी करावी .
डॉ अरुण बापट

वाहतुकीची स्थिती चीड आणणारीच
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून वाईट तर वाटलेच, पण त्यांच्यासारख्या नेत्याचे निधन हे एका वाहन अपघातात व्हावे हे पाहून आपल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल थोडी चीडही वाटली. कारण आपल्या इथे फार कमी वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळताना दिसतात. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूप आहे. थोडा तौलनिक अभ्यास करायचा झाल्यास अमेरिकेच्या राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा विभागानुसार (NHTSA) अमेरिकेत २०११ साली २,५७५ लाख वाहने होती व ३२,३६७ जण रस्त्यावरील अपघातात दगावले. भारताच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवरील अधिकृत माहितीनुसार त्याच कालावधीत भारतात १,४४७ लाख वाहने होती व ४९८ अपघातांमध्ये १.४२ लाख लोक दगावले. म्हणजे अमेरिकेत भारताच्या ७८ टक्के अधिक वाहने असूनही त्यांच्या देशात रस्त्यावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण भारताच्या २३ टक्के एवढे कमी आहे.
सिग्नल न तोडणे, एकदिशा रस्त्यावर विरुद्ध दिशेने गाडी न चालवणे, महामार्गावर आपल्या माíगकेतूनच प्रवास करणे, दुभाजक असलेल्या रस्त्यावर दुसऱ्या बाजूस जायचे असल्यास येणाऱ्या वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने न जाता पुढे जाऊन यू टर्न घेऊन मागे येणे असे साधे नियम जरी सर्वानी पाळणे आवश्यक आहे. ज्या चौकामध्ये सिग्नल नसेल तिथे दुय्यम (किंवा दोन्ही) रस्त्यावरील वाहनांना अनिवार्य थांबण्याचा नियम (परदेशातील STOP Sign प्रमाणे) वाहतूक विभागाने अमलात आणावा असेदेखील सुचवावेसे वाटते. असे नियम पाळले गेल्यास अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण नक्कीच कमी होईल असे वाटते.
-निमिष जगताप, डोंबिवली

बोर्डाचे इंग्रजी
बारावीचा निकाल जाहीर झाला. माझ्याच शेजारचा एक विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून  चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला. पण त्याच्या बोर्डाकडून प्रसृत झालेल्या गुणपत्रिकेत शेरा आहे : Congratulations!!! you are passed
माझे इंग्रजीचे ज्ञान बरोबर असेल, तर You are passed प्रस्तुत संदर्भात चुकीची रचना आहे. त्याऐवजी You have passed अशी रचना हवी. You are passed हा कर्मणी प्रयोग आहे व त्याचा अर्थ तुम्ही (बोर्डाच्या किंवा आणखी कुणाच्या कृपेने) उत्तीर्ण झाला आहात, तुम्ही स्वतच्या मेहनतीने उत्तीर्ण झाला नाहीत, असा ध्वनी त्यातून उमटतो.
बोर्डच जर अशा इंग्रजीचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवीत असेल, तर विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार?
प्रा. सीताराम भा. दातार, अंधेरी (मुंबई)

कप्पेबंदीच्या पलीकडले पटवर्धन
विदर्भात १९६५-७५ च्या दरम्यान, मुंबई-पुण्याच्या एकूणच साहित्य क्षेत्रात कंपूशाही, ब्राह्मण-ब्राह्मणेतर गटबाजी असल्याची सार्वत्रिक भावना पसरलेली होती. मौज-सत्यकथा हा तर अड्डाच समजला जात होता. त्यातच प्रा. भाऊ भालेराव यांच्या शैला देशमुख या टोपणनावाने सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या कवितेविषयी नागपूर- तरुण भारतात त्यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तर विदर्भात वरील गरसमजाला चांगलेच उधाण आले. अशा वेळी सहज चाळा म्हणून अकोल्यात असताना जून १९७० मध्ये मी एक कथा सत्यकथेकडे पाठविली. कथेचे काय होणार हे गृहीत धरलेच होते. पण सत्यकथेकडून छापील स्वीकृतीपत्र नव्हे, तर चक्क राम पटवर्धनांच्या सहीचे आंतरदेशीय पत्र मिळाले  आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांनी कथेचे कौतुक करून वर पुन्हा कथेचे शीर्षक बदलण्याची परवानगी मागितली. अकोल्यासारख्या गावात राहणाऱ्या एका २५ वर्षांच्या मुलाला साक्षात राम पटवर्धनांनी कथेच्या अन्वर्थक शीर्षकासाठी परवानगी मागणे हे अद्भुत होते, अविश्वसनीय होते आणि त्या वेळी माझ्यासाठी रोमांचकही. राम पटवर्धनांनी माझी जात विचारली नाही. वय, शिक्षण, िलग काहीही नाही.
त्या वेळची वैदर्भीय मानसिकता, कोतेपणा आजही कायम नसेल अशी आशा आहे.
-जनार्दन मुऱ्हेकर, ठाणे.

हा पटवर्धनांचाच करिष्मा!
एका वाचनालयातून सत्यकथा मासिकाचा पत्ता मिळवून १९७०  साली माझ्या  कथा पाठवू लागलो. त्या तितक्याच तत्परतेने ठळक अक्षरांत ‘साभार परत’ अशा सुंदर क्लिपनं जोडलेल्या लेखी स्लिपसह माघारी येऊ लागल्या.( त्या काळात य.गो.जोशी यांनी वेगवेगळ्या मासिकांकडून सा.प. आलेल्या त्यांच्या कथांचा संग्रह ‘साभार परत’ असा मथळा देऊनच छापला होता ! त्यांच्याइतका मोठा मी खचितच नव्हे) १९७२ साली सत्यकथेक्डून एक कथा परत आली पण तिच्यासह साक्षात मोठय़ा गोल अक्षरात लिहिलेलं पत्र होतं . ते अर्थातच राम पटवर्धन यांच होतं. त्यांनी अतिशय बारीक सारीक सूचना करून त्या मान्य असल्यास पुनल्रेखन करून उलटटपाली कथा पाठवावी असं लिहिलं होतं. मी अचंबित झालो.
एकूण लेखनाबद्दल मला नवी दिशा अन उर्जा मिळाली. पहिल्या कथेचं माझं शीर्षक त्यांना पसंत नव्हतं पण माझ्या खुलाशानं ते त्यांनी स्वीकारलं. दुसऱ्या कथेचं त्यांनी सुचवलेलं शीर्षक उचित होतं. मग, १९७३  मध्ये माझी कथा ‘सत्यकथे’त प्रकाशित झाली आणि माझ्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला. अनेकांनी अभिनंदन केलं. पार्टी देऊन -घेऊन आनंद साजरा केला गेला.
राम पटवर्धन यांच्या पत्रांनी मला वाक्यरचनेचं नवं भान आलं. त्याचवर्षी एम.ए. झाल्यावर प्राध्यापकाच्या मुलाखतीसाठी गेलो. तिथं ‘सत्यकथा’ लेखनाचा संदर्भ देताच इतर प्रश्नोत्तरं न होता माझी नोकरी कायम झाली. हा करिष्मा राम पटवर्धन यांचाच आहे असं मला नेहमी वाटतं.
-विजय काचरे , कोथरूड, पुणे</strong>