बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आपले आतापर्यंतचे पुरस्कर्ते गुरू नितीशकुमार यांना आव्हान दिले असून त्यातून जे काही नाटय़ निर्माण झाले आहे त्याने मांझी, नितीशकुमार आणि भाजप हे तिघेही किती समान दांभिक आहेत, हे दिसून येते.
भारतीय राजकारणातील प्रतीकात्मकता उबग आणणारी आहे. जनतेचे हित, दलित-मागासांचे कल्याण, पुरोगामी राजकारण, सबका साथ- सबका विकास वगरे घोषणा आणि भाषा ही केवळ शब्दांची फोलकटे असतात हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. बिहारात जे काही सुरू आहे, त्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. तेथे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आपले आतापर्यंतचे पुरस्कत्रे गुरू नितीशकुमार यांना आव्हान दिले असून त्यातून जे काही नाटय़ निर्माण झाले आहे त्याने मांझी, नितीशकुमार आणि भाजप हे तिघेही किती समान दांभिक आहेत, हे दिसून येते. कु. राहुलबाबा गांधी यांच्या कृपेने काँग्रेसला बिहारात काडीचेही स्थान नाही. त्यामुळे या खेळात काँग्रेसला काही भूमिका नाही आणि असती तरी तो पक्ष वरील तिघांपेक्षा गुणात्मकदृष्टय़ा काही वेगळा ठरला असता असे नाही. बिहार ही राष्ट्रीय राजकारणातील दांभिकतेची प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेत जे सिद्ध होते त्याचे राष्ट्रीय मापदंड तयार होतात. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह याच राज्यातला आणि पुढे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून सांगितले गेले ती आणीबाणी विरोधातील लढाई लढणारे जयप्रकाश नारायण हे याच राज्यातले. त्या राज्यातील कर्पुरी ठाकूर, मिश्रा बंधू यांच्या हाती एकेकाळी असलेली राजकारणाची दोरी पुढे लालूप्रसाद यादव, शरद यादव यांच्या हाती गेली. आधीच्या राजवटीत कथित उच्चवर्णीयांनी बिहारची लूट केली. नंतरच्या कालखंडात ही लूट मागासांनी केली. समानता आली असे म्हणायचे असेल तर ती इतकीच. परंतु आपल्याकडील राजकारणात लुटणारे कोण आहेत यावर त्या कृत्याचे मूल्यमापन ठरते. त्यामुळे लालूप्रसाद आदी गणंग हे कोणी दलित-मागासांचे उद्धारकत्रे, पुरोगामी आहेत अशा भाकडकथा रचल्या गेल्या आणि माध्यमांतील अर्धवटरावांनी त्या उचलून धरल्या. त्यामुळे त्यांच्या कृष्णकृत्यांकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले गेले. म्हणजे भाजपला पािठबा देणाऱ्याने भ्रष्टाचार केला तर जोरात बोंब ठोकायची आणि या असल्या बोगस पुरोगाम्यांच्या गरव्यवहारांकडे डोळेझाक करायची असे हे राजकारण होते. गेले दोन दिवस बिहारात जे काही सुरू आहे ते याच बनवेगिरीचा भाग आहे.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांत जनता दल युनायटेडला बिहारात अपेक्षित यश मिळाले नाही. तेव्हा त्याची नतिक जबाबदारी घेत तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पदाचा राजीनामा दिला. अर्थात त्याआधी त्यांचे आणि भाजपचे फाटले होतेच. भाजपशी तीनेक वर्षे संसार केल्यानंतर नितीशकुमार यांना भाजप जातीय वाटू लागला. वास्तविक तेव्हाही त्यांच्या या पुरोगामी बनावामागील कारण होते ते बिहारची प्रगती साधण्यात आलेले अपयश. त्याचे खापर फोडण्यासाठी त्यांनी भाजपचा जातीयवादाचा दगड शोधला. त्यातही त्यांची लबाडी ही की मुख्यमंत्रिपद सोडले तरी त्याची सूत्रे आपल्याच हाती राहतील याची काळजी त्यांनी घेतली. त्या लबाडीचाच भाग म्हणून मांझी हे रत्न त्यांनी शोधून काढले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. त्याही वेळी त्यांना हे काय लायकीचे आहेत, त्यांचा वकूब काय हे ठाऊक होते. तरीही त्यांनी हे केले कारण मांझी हे महादलित आहेत. म्हणजे एकाच वेळी नतिकतेचा आव आणत राजीनामा देण्याचे श्रेय घ्यावयाचे, महादलिताला मुख्यमंत्रिपदी बसवल्याचा समाजसुधारकी आव आणायचा, भाजपला नाकारून पुरोगामीपण मिरवायचे आणि तरी सत्तेची सूत्रे मात्र आपल्याच हाती राहतील याची काळजी घ्यायची अशी ही नितीशकुमारी लबाडी. परंतु हा राजकीय बदमाशीचा परमोच्च िबदू नाही. तो आहे लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करण्यात. चारा घोटाळ्यात ज्याच्यावरील गुन्हा सिद्ध झालेला आहे त्या लालूप्रसाद यांच्याशी स्वच्छ, पुरोगामी वगरे नितीशकुमार यांनी सोयरिकीचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलात आपला जनता दल युनायटेड हा पक्ष विलीन करण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. आणि हे सगळे कशासाठी? तर जातीय भाजपला दूर ठेवण्यासाठी. नितीशकुमार सत्तेवर आले ते याच भाजपबरोबर दोनाचे चार करून. त्या वेळी या दोघांचे समान लक्ष्य होते भ्रष्ट लालूप्रसाद यादव. लालूंच्या काळातील जंगलराज संपवण्याची हमी या दोघांनी बिहारींना दिली होती. त्याप्रमाणे त्यांना सत्ता मिळाली. परंतु दरम्यान गुजरातच्या खांद्यावरून नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय उदय झाला. मोदी हे काही अटलबिहारी वाजपेयी नव्हेत. त्यामुळे या शरद-मुलायम-लालू या यादवांच्या रुसण्या-फुगण्याकडे त्यांनी ढुंकूनही लक्ष दिले नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा अशी नितीशकुमार यांची मागणी होती. ती मोदी यांनी मान्य केली असती तर बिहारचा निम्म्यापेक्षा अधिक आíथक भार केंद्राला सोसावा लागला असता. यातील योगायोग असा की प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव आणि हे नितीशकुमार. या तिघांचीही मागणी एकच आहे. आपापल्या राज्यांना विशेष दर्जा हवा आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बाता मारत िहडायचे आणि केंद्राने यांचा संसार चालवायचा. केंद्र सरकारने त्यांची ही मागणी अमान्य केल्यामुळे मोदी जातीय असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि हे राजीनामानाटय़ घडले. ते एरवी खपूनही गेले असते. परंतु मांझी यांनी चांगलीच पाचर मारली. हे मांझी आपल्या तालावर नाचतील असे नितीशकुमार यांना वाटत होते. शेवटी त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवले ते नितीशकुमार यांनीच. परंतु सत्ता हाती आल्यावर या गरीब गाईचा वाघोबा झाला. त्याने आता नितीशकुमार यांच्यावरच डाफरायला सुरुवात केली. जे झाले ते बरेच झाले. कारण त्यामुळे नितीशकुमार यांचे पुरोगामित्व वगरे कचकडय़ाचे आहे, ते पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्रिपदावर नेमताना नितीशकुमार यांनी मांझी यांचे महादलितत्व मिरवले होते. आपल्याला या पदावरून दूर केले जात आहे हे लक्षात आल्यावर मांझी यांनी हेच अस्त्र नितीशकुमारांवर उलटवले असून महादलितावर अन्याय केल्याचे पाप आता त्यांना आपल्या शिरावर वागवावे लागणार आहे. या लबाडांच्या राजकारणात भाजपनेही आपले हात धुऊन घ्यायचा प्रयत्न चालवला आहे. भाजपतर्फे या मांझी यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा अर्थ जी चूक नितीशकुमार यांनी केली त्याच चुकीची पुनरावृत्ती करण्याचा मोह भाजपला होत असून तसे करणे हे संकटाला निमंत्रण देणारेच ठरेल यात शंका नाही.
याचे कारण बिहार विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असून त्याआधी ही असली हाराकिरी करण्याचे कोणालाच काहीही कारण नाही. निवडणुकीच्या आधी सत्ता हाती असावी या विचाराने मांझी यांना हटवण्याचा विचार नितीशकुमार यांनी केला आणि या मांझी यांना हाताशी धरून नितीशकुमार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. म्हणजे एकंदर स्पर्धा आहे ती कोण कोणापेक्षा अधिक बनेल याचीच. आगामी निवडणुका हाच या बनवेगिरीस उतारा ठरेल.