‘एक शोकान्त उन्माद’ हा अग्रलेख ( ३० जुलै) वाचला. यातील याकूब मेमनसंदर्भातील मताविषयी पूर्णत: असहमत असलेल्या लोकांनाही या अग्रलेखाचे एका वेगळ्या पातळीवर अभिनंदन करावे लागेल. आजच्या अत्यंत उन्मादी परिस्थितीत असा अग्रलेख लिहिणे हे धाडसच आहे. तुमच्यावर लगेच देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात येतो. तथाकथित राष्ट्रवादाचा उन्माद हा नेहमीच नागरी हक्काची गळचेपी करणारा असतो. या उन्मादाला कोणतेही वेगळे मत सहन होत नाही. अशा मतांवर अत्यंत असभ्य आणि शिवराळ भाषेत टीका केली जाते.
खरे तर आपल्या देशाच्या घटनेच्या गाभ्याचे मूल्य हे व्यक्तिस्वातंत्र्याचे असल्यामुळे उन्मादी, असहिष्णू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद ठरतच नाही. तो बेगडी राष्ट्रवाद असतो.
याकूबला फाशी देणे अयोग्य होते, असे मत असणारे लोक दोन गटांतील आहेत. एका गटाचे प्रतिनिधित्व आपला अग्रलेख करतो. दुसरा गट हा कोणालाही फाशी देऊ नये या मताचा असतो. आणि अशी भूमिका असणारे लोक मोठय़ा संख्येने जगभर आहेत. जगातील बहुसंख्य लोकशाही देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. फाशीची शिक्षा ही असंस्कृत गोष्ट मानली जाते. अशी भूमिका असणारे लोक प्रत्येक फाशीच्या शिक्षेच्या वेळी आपला निषेध नोंदवतात आणि तो त्यांचा हक्कच आहे. पण आजची उन्मादी परिस्थिती त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारते.
याकूबच्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार व्हावा, असे निवेदन ३०० लोकांनी काढले. त्यात प्रख्यात कलाकार नसिरुद्दीन शहाचादेखील समावेश होता. पण समाजमाध्यमावरील उन्मादी प्रतिक्रियेत नसिरुद्दीन शहाचा धर्म काढला गेला. त्याच्यावर शिवराळ भाषेत टीका करण्यात आली. हे अत्यंत चिंताजनक आहे. धर्माच्या या मुद्दय़ाचेही अग्रलेखात सूचन करण्यात आले आहे. आपल्या प्रतिक्रियेचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा हे अग्रलेखातील आवाहन अतिशय मोलाचे आहे. धर्मद्वेषाची ही लागण देशाची एकात्मता धोक्यात आणेल आणि मोठय़ा िहसेला उत्तेजन देईल.
शेवटी, या अग्रलेखातील आणखी एक महत्त्वाचा आणि अभिनंदनीय मुद्दा म्हणजे त्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या अभिनिवेशी भूमिकेवर केलेली टीका. हे करण्याचे धर्य कोणीही दाखवले नव्हते. दुसरा एकच अपवाद म्हणजे रविश तिवारी यांचा. त्यांनी निकम यांना, कसाबला तुरुंगात बिर्याणी दिली जात होती असे खोटे का सांगितले, असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. इतकी संवेदनशील प्रकरणे हाताळणाऱ्या सरकारी वकिलाकडून जबाबदार आणि संयत भूमिकेची अपेक्षा असते. पण दुर्दैवाने उन्मादी वातावरणाने या अपेक्षेला फोल ठरवले.
‘लोकसत्ता’च्या संपादकांची याकूबच्या फाशीबद्दलची भूमिका मान्य नसणाऱ्या लोकांनीही या शेवटच्या मुद्दय़ासाठी संपादकांचे अभिनंदन केले पाहिजे.
मिलिंद मुरुगकर, नासिक
सर्वत्रच देशप्रेमींचा संचार!
‘एक शोकान्त उन्माद’ हे संपादकीय वाचून आणि त्यापूर्वीची देशातील चर्चा/ बहकलेले वातावरण बघून खूप अस्वस्थता वाटली. सर्वसामान्य माणसापासून ते कट्टरपंथीयांपर्यंत- गेल्या काही दिवसांत ज्या प्रतिक्रिया येत होत्या, त्या पाहिल्या की ‘याकूब मेमनला फाशी देणे योग्य आहे का’ असा प्रश्न विचारणेही कठीण होते. इतका टोकाचा उन्माद देशभर भरून वाहत होता! २८ जुलैच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील मसीह रेहमान यांचा लेख वाचला होता. त्यामुळे फाशीची शिक्षा जाहीर होणे आणि शिक्षा होणे यात अंतर आहे, हेही लक्षात आले. अन्य खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराला काही सूट मिळते का, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आपण हे योग्य शब्दांत मांडले आहे. एका सामान्य मुस्लीम व्यक्तीने या संदर्भात म्हटले की, ‘जर मी काही वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली तर शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जातील.’ अशा तऱ्हेच्या भावना कोणाही नागरिकाने व्यक्त करणे लोकशाही देशाला शोभादायक नाही. यानिमित्ताने दिसून आले की, सर्वत्र देशभक्तांचा, देशप्रेमींचा संचार आहे. कुठेही काही कमी नाही, मग आता चिंता नाही.
मग सार्वजनिक व्यवस्थांचा बोजवारा का उडतो? स्थानिक कारभारापासून सर्वच प्रतिनिधीगृहापर्यंत आणि सार्वजनिक नोकरशाहीपासून ते खासगी आस्थापनांपर्यंत अशी बजबजपुरी का? आपल्याला समाज/ देश म्हणून कधीकाळी जबाबदार म्हणून वागता येईल का?
देशप्रेम, देशभक्ती यांचा देखावा करणे, तत्संबंधित प्रतीकांची पूजा करणे यातच आपल्याला रस आहे का? देशप्रेम आणि धर्मप्रेम, रूढी व परंपरानिष्ठा यातील अद्वैत दाखवणे हाच प्रमुख हेतू असतो? रूढी आणि धर्म यातील भेद मिटवणे हाच हेतू असतो का?
डॉ. अनिल खांडेकर, पुणे</strong>
देशद्रोह्य़ाला कशाचा धर्म?
अग्रलेख वाचून अत्यंत आश्चर्य आणि दु:ख वाटले. चांदीच्या तस्करीचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील सीए झालेल्या आणि पाकिस्तानला पळून गेलेल्या व्यक्तीबद्दल एवढा कळवळा? देशद्रोह्य़ाला शिक्षा व्हावी असे वाटले तर त्यात धर्म कुठे आला? कृपया आपण डोळ्यांवरची पट्टी काढा. सामान्य माणसांचे मत इतके स्वस्त समजू नका. तसे असते तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम, अल्लारखां, गुलाम अली, फैयाज हुसैन, चित्रकार एम एफ हुसेन या सर्वाना आम्ही ‘पूज्य’ म्हटले नसते. आज अनेक दग्र्यातून सामान्य माणसे श्रद्धापूर्वक प्रार्थना करताना दिसली नसती. जो माणूस देशविघातक काम करतो, तो हातात सापडल्यावर त्याला फाशीच द्यायला हवी. संजय दत्तला सामान्य करदात्या माणसाच्या करातून सर्व सुविधा भोगताना पाहून आम्हाला आनंद होतोय असे नाही. देशद्रोह्य़ाला, कुठल्याही खुन्याला, गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असेच सामान्य माणसाला वाटते. आम्ही आशा करतो की, गुन्हे करून नंतर कुणाला माफीचा साक्षीदार करावयाची वेळच आमच्या पोलिसांवर, गुप्तचर संस्थांवर येऊ नये. राजकीय हस्तक्षेप केला नाही, तर आमचे पोलीस आणि गुप्तचर विभाग कार्यक्षमता दाखवतील. त्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षेतून सवलत नको.
शशिकला सरदेशमुख
किती निष्पाप माणसे ही!
अग्रलेख वाचून हसावे की रडावे ते कळेना. याकूब हा माफीचा साक्षीदार झाला होता हे वृत्त आपणास कोणी सांगितले ते ठाऊक नाही. टायगरला वडिलांनी चोपले हे वाचून तर आमचे डोळेसुद्धा पाणावले. खरेच किती निष्पाप माणसे ही. जरा २५७ जणांना त्यांनी मारले म्हणून काय एकदम फासावर लटकवावे? आपल्या मनाला फारफार यातना झाल्या असणार.
श्रीराम बापट, माहीम (मुंबई)
अप्रस्तुत प्रतिक्रिया
अग्रलेखावर काहींनी व्यक्त केलेल्या कडवट आणि अतिसंवेदनशील प्रतिक्रियांचे मुख्यत: काही प्रयोजन नव्हते. तरीही, ‘लोकसत्ता’ने कोणताही किंतु न बाळगता अशा प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या याला दाद द्यावी लागेल. अग्रलेखात व्यक्त केलेली मते किंवा प्रतिपादन यांच्याशी एखादा सहमत असू शकतो किंवा नसतोही. मात्र, संपादक म्हणून विचार व्यक्त करण्याचे, तसेच आपल्याकडील तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था, राजकारणी आणि मुख्यत: लोकांची सर्वसाधारण मते यांतील दोष व त्रुटी यांवर बोट ठेवण्याच्या संपादकांच्या अधिकाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सर्वथा अप्रस्तुत ठरते.
सुभाष रेगे
भाजपकडून फाशीचे मार्केटिंग!
अग्रलेख वस्तुनिष्ठ आहे, तर त्याचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया (लोकमानस, ३१ जुल) भावनात्मक आहेत, असे वाटते. शेवटी हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. फाशीच्या निमित्ताने खटकलेली गोष्ट म्हणजे राज्यकर्त्यां भाजपने त्याचे केलेले मार्केटिंग. याकूबच्या गळ्याभोवती फासाचे दोर आवळले जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी होणार, याबाबतचा तपशील वाचून उबग आला. हे काय क्रिकेटच्या सामन्याचे धावते समालोचन होते?
संगीता जानवलेकर, मुंबई</strong>