२८ सप्टेंबर हा कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. मी स्वत: ९५% कर्णबधिर आहे. परंतु कर्णयंत्र, स्पीचथेरपी व सर्वात महत्त्वाचे माझ्या आई-बाबांचे कष्ट यामुळे मी बराच चांगला बोलू शकतो. पण आमच्याशी मनापासून बोलणारे व आमचे मनापासून ऐकणारे कमी आहेत. काही संस्था वर्षांतून एकदा आम्हाला बोलण्याची संधी देतात, याचा मला आनंद वाटतो, पण उरलेल्या दिवशी काय करायचे असा प्रश्न पडतो. कर्णबधिर मुला-मुलींना वर्षांतून एकदा नव्हे तर सर्वच दिवस संधी व सन्मान मिळाला तरच अर्थ आहे. कदाचित आपणास माहीत नसेल परंतु कर्णबधिर नसलेल्यांना कर्णबधिर असलेल्यांशी बोलताना बरेच मोठय़ांदा बोलावे लागते. त्यामुळे या मोठय़ा आवाजाचा आसपासच्यांना त्रास होतो व त्यांच्या कामात व्यत्यय येतो, असे मला अनेकांनी सांगितले, अनुभवास आले. मला अशा कर्णबधिर नसलेल्या लोकांची काळजी वाटते, ती यासाठी की त्यांना मोठय़ाने बोलण्याचा एवढा त्रास होतो तर त्यांना दहीहंडी, गणपती, नवरात्र व इतर सणांच्या वेळी वाजणाऱ्या डीजे-बँजोचा किती भयानक त्रास होत असेल? कारण आम्हा कर्णबधिर व्यक्तींनासुद्धा डीजे-बँजोचा खूप त्रास होतो. तेव्हा इतरांचे काय होत असेल? अशाने सगळेच लोक कर्णबधिर होतील की काय, अशी भीती मला वाटत राहते. तसेच ‘असला’ समान न्याय काय कामाचा? लोक सांगतात की देवासाठी असे सण साजरे करायचे असतात. परंतु देव कर्णबधिर नसणार, कारण कुठल्याही देवाच्या कानात आम्ही कर्णबधिर घालतो तसे कर्णयंत्र दिसत नाही. तेव्हा हा मोठा आवाज खरं तर ‘विकृत गोंगाट’ कुणाच्या भल्यासाठी होतो, असा प्रश्न मला पडतो. तुम्हाला याचे उत्तर माहीत असल्यास मला जरूर कळवा.
– प्रसून भांगे, शेटफळ, ता. मोहोळ (सोलापूर)
भिकारतेच्या कारणांवर उपाय नाहीत
‘भिकारतेची कारणे’ या संपादकीयात (२५ सप्टेंबर) अमेरिकेत फोक्सवॅगन कंपनीने केलेल्या लबाडीबद्दल झालेली शिक्षा व या घटनेचा भारतातील सद्य:स्थितीशी केलेली तुलना आवडली. लेखाच्या शेवटी अपेक्षा व्यक्त केली आहे की, ही तुलना लक्षात घेतल्यास भारताच्या भिकारतेची कारणे आणि त्यावरील उपाय लक्षात येतील.
मला असे वाटते की लेखात व्यक्त केलेली तुलना योग्य असली तरी त्यावरील उपाय मात्र लक्षात येऊनदेखील त्यांची अंमलबजावणी शक्य नाही. त्याची कारणे त्याच दिवसाच्या अन्य बातम्यांमधून आपल्याला सहज दिसेल. त्यातील काही नमुन्यादाखल खाली देत आहे.
१. कल्याण येथील खडकपाडा भागात गुरुदेव अॅनेक्स या हॉटेलच्या परिसरातील निवाऱ्याचे बेकायदा बांधकाम तोडावयास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला याच भागातील भाजपसमर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला. कारवाई करण्यास अडथळा उभा करीत असतानाच गायकवाड यांनी थेट राज्य सरकारकडे धाव घेतली आणि या कारवाईला स्थगिती मिळविली.
२. मार्च २०१४ मध्ये मंत्रिपद जाऊनही विजयकुमार गावित यांनी मंत्र्यांसाठी असलेला बंगला अद्याप सोडलेला नाही.
३. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या साडेचार वर्षांत तब्बल ११७६ कोटी रुपयांची कमाई केली असून टोल आणि वाहनांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेता १६ वर्षांच्या या टोलवसुलीच्या ठेक्यात कंपनीस किमान तिप्पट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरील उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, या देशात जोपर्यंत हितसंबंध जपले जातील तोपर्यंत संपादकीयात अपेक्षा केलेले उपाय कधीही अमलात येऊ शकणार नाहीत.
– निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)
उत्तम विश्लेषणाला पक्षपातीपणाचे गालबोट
‘मोदींच्या अमेरिका भेटीचे महत्त्व’ या डॉ. श्रीकांत परांजपे यांच्या लेखात (२५ सप्टेंबर) दोन्ही देशांतील बदलत्या संबंधांचं समतोल व सखोल विश्लेषण आहे. मात्र या लेखांच्या शेवटच्या परिच्छेदात डॉ. परांजपे म्हणतात की, ‘जॉर्ज बुश यांनी सुरू केलेला संवाद डेमॉक्रॅटिक पक्षाचे ओबामा पुढे नेतात, अमेरिकन राजकीय व्यवस्थेतील परराष्ट्र धोरणांतील दोन्ही पक्षांतील असलेली ही सहमती भारताला महत्त्वाची आहे.’ पण आज जे मोदी करीत आहेत, त्याची सुरुवात काँग्रेसच्या कारकीर्दीतच झाली आणि त्या वेळी भाजप व खुद्द मोदी काय म्हणत होते? अणू कराराच्या विरोधात किती व कसं काहूर उठवण्यात आलं होतं? काँग्रेस जणू काही देशहिताचा सौदाच करायला निघाली आहे, असा मोदी व भाजपचा पवित्रा होता. प्रत्यक्षात सत्ता हाती आल्यावर या संदर्भातील काँग्रेसचीच भूमिका मोदी यांनी पुढे नेली.
अमेरिकी परराष्ट्र धोरणाबाबात त्या देशातील दोन्ही प्रमुख पक्षांत असलेल्या व्यापक स्तरावरच्या सहमतीचा उल्लेख करताना, अशी सहमती भारतात असण्याची गरज व तशी ती आकाराला आणण्यात भाजपने गेली १० वष्रे कसे पद्धतशीरपणे अडथळे आणले, याबद्दल डॉ. परांजपे एक शब्दही लिहीत नाहीत. त्यामुळे या लेखातील उत्तम विश्लेषणाला हे पक्षपातीपणाचे गालबोट लागले आहे. – प्रकाश गोखले, ठाणे</p>
हे खरे गणेश पूजन!
‘शाडूची माती पाण्यात विरघळत नाही’ हे पत्र (लोकमानस, २५ सप्टें.) वाचले. कुठलीही निसर्गनिर्मित माती पाण्यात विरघळत नाही हे सत्य आहे आणि त्यास शाडू अपवाद कसा असणार? नदीकाठी मिळणाऱ्या शाडूवर अनेक वनस्पती वाढतात. कारण त्यांना हव्या असणाऱ्या मूलद्रव्यांचा तो एक नैसर्गिक स्रोत असतो. कुठल्याही साठलेल्या पाण्यात माती मिसळली की ते पाणी प्रदूषित होते. शाडूच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. मात्र हीच माती अथवा शाडू वाहत्या पाण्यात मिसळली असता पाणी प्रदूषित होते असे म्हणणे चुकीचे आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात अतिद्राव्य आहे, म्हणूनच मूर्तीच्या रूपात पाण्यात विसर्जित झालेले हे मानवनिर्मित पीओपी तळास जाऊन घट्ट होते आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद करते. हजारो तलाव नष्ट होण्यामागे हे मुख्य कारण आहे. शाडूमुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद होतात हे विधान अशास्त्रीय वाटते. भूगर्भातील पाण्याचा स्रोत मातीस दूर करूनच पृष्ठभागावरयेतो. शाडूची मूर्ती व तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन हे वेदशास्त्रात सांगितलेले तत्त्व आपण बाजूस ठेवून तिचे साठविलेल्या पाण्यात विसर्जन केले तर जलप्रदूषण हे होणारच. निसर्गनिर्मित शाडू ही मानवनिर्मित प्लॅस्टर ऑफ पॅरिसला उत्तम पर्याय आहे. थांबलेल्या नद्यांना वाहते करून नैसर्गिक पद्धतीने शाडूची निर्मिती होणे आणि तिच्यापासून श्रींच्या मूर्तीची निर्मिती होऊन तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन होणे हे खरे गणेश पूजन आहे.
– डॉ. नागेश टेकाळे, मुलुंड (मुंबई)