वाढीव चटईक्षेत्रापुरता ‘विकास’ राहू नये..

गृहनिर्माण नियामक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मार्गी लावला

गृहनिर्माण प्रकल्पास मंजुरी देण्यापूर्वी त्या प्रकल्पामुळे वाढणारी वस्ती विचारात घेता त्या परिसराचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे आवश्यक

गृहनिर्माण नियामक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मार्गी लावला असून महिनाभरात आयोग स्थापला जाईल, असे जाहीर केले आहे. मुकी बिचारी कुणी हाका अशी परिस्थिती घर खरेदीदारांची होती, त्यास या निर्णयामुळे निश्चित दिलासा मिळेल. बेसुमार, बेलगाम घरबांधणीवर आणखी नियोजन असावे म्हणून असाच आणखी एक निर्णय त्यांनी घ्यावा असे सुचवावेसे वाटते. कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पास मंजुरी देण्यापूर्वी त्या प्रकल्पामुळे वाढणारी वस्ती विचारात घेता त्या परिसराचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे आवश्यक असावे. जसे की या वाढत्या वस्तीसाठी रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, वीज, शाळा, मैदाने, वाहनतळ इत्यादींची काय तरतूद आहे आणि त्यांची पूर्तता कधी होणार आहे याबाबत नगररचना विभाग, पालिका, महानगरपालिका यांची मंजुरी प्रथम घेणे आवश्यक करावे. नुसते वाढीव चटईक्षेत्र देऊन हा प्रश्न सुटणार नाही. वस्ती वाढून तिचे रूपांतर नव्या काँक्रीट झोपडपट्टीमध्ये होईल.घर खरेदीच्या अडचणीतून सुटका करण्याचा निर्णय झाला, त्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाचा आणि प्राथम्यक्रमाचा असा हा विषय आहे. नाही तर भरमसाट वस्ती वाढूनही योग्य त्या सुविधांअभावी नियोजनाची अपेक्षा फोल ठरेल. तशी ती आजही आपण पाहातोच.
वि. रा. अत्रे, ठाणे

अशा समाजाचे गोडवे गाताना  तारतम्य राखणेच योग्य
‘करमणुकीचा पिंगा’ हे शनिवारचे संपादकीय (२१ नोव्हें.) वाचले. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील वादग्रस्त गाणे हा आता न्यायप्रविष्ट विषय असल्याने त्याबद्दल काही लिहिणे उचित ठरणार नाही. मात्र अठराव्या शतकातील भारतीय राज्यकर्त्यांची सामाजिक नीतिमत्ता हा निश्चितच चच्रेचा विषय होऊ शकतो. नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सख्खे बंधू रघुनाथराव यांचा बाहेरख्यालीपणा तर प्रसिद्धच आहे. पण पानिपत युद्धाचे कथानायक भाऊसाहेब पेशवे यांच्याबद्दलची उपयुक्त माहिती त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या ‘पानिपत १७६१’ या ग्रंथात (पृ.१६०) दिली आहे. ते लिहितात : ‘ सदाशिवरावभाऊला सतराव्या वर्षांपूर्वीच दोन मुले झाली होती व त्याबद्दल त्याला स्वत:लाच लाज वाटत असलेली दिसते. भाऊ स्वत: तालीमबाज, तापट माणूस होता. त्याची पहिली बायको उमाबाई अशक्त असून लहान वयातच वारली. द्वितीय विवाह लहान मुलीशीच झालेला असणार, पण या मध्यंतरीच्या काळात भाऊचा विवाहबाहय़ स्त्रीसंबंध चालू होता. मात्र भाऊ याबद्दल बोभाटा न व्हावा म्हणून फार काळजी घेताना दिसतो. यावरून बोध असा होतो की, तत्कालीन सामाजिक नीतिमत्ता याच पातळीची होती. कोणत्याही दोन कालखंडांतील सामाजिक नीतिमत्तांच्या पातळींची तुलना करणे अनुचित आहे. पण थोरल्या बाजीरावांची कथा यापेक्षा वेगळी आहे. त्यांनी मस्तानी रखेल म्हणून ठेवली असती तर ते त्या काळच्या समाजाला अजिबात खटकले नसते. पण त्यांना मस्तानी ही आपली समाजमान्य पत्नी म्हणून हवी होती व तिच्यापासून झालेल्या पुत्राची मुंज करून त्यास ब्राह्मण म्हणून मान्यता हवी होती, जे त्या काळाच्या नीतिमत्तेच्या पातळीप्रमाणे शक्यच नव्हते. मुस्लीम स्त्री रखेल म्हणून चालते, पण तिच्याशी विवाह केला की तो बदफैलीपणा ठरतो, अशा समाजाचे गोडवे गाताना काही तारतम्य राखणेच योग्य ठरेल.
प्रमोद पाटील, नाशिक

तुरीचे हमीभाव वाढवा
सध्या डाळीचे भाव वाढलेले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यावरून बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. त्यात दलालीवर नियंत्रण ठेवणे ते ती आयात करण्यापासून सर्व उपायांवर चर्चा होत आहे, पण डाळ उत्पादकांना फायदा मिळवून देणारा उपाय सहसा समोर येत नाही. त्याची चर्चा होत नाही. सोयबीनमधून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागलेला आहे. तो कापसातून भरून निघेल इतके चांगले कापसाचेही पीक नाही. तूर अजून बाजारात यायचीच आहे, तर सहा-साडेसहा हजारावर तुरीचे भाव नाहीत. डाळींचे भाव स्थिर राहण्यासाठी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढावे, त्यासाठी पाण्याची सोय करावी, हेही ठीकच, पण येथील शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की, कमी पिकले तरी भाव नाही आणि अधिक पिकले तरीही भाव नाही. त्यावर उपाय म्हणून सरकारने लगेच ८ हजार रुपये क्विंटल तुरीचे हमी भाव जाहीर करावेत, ते बाजारात शेतकऱ्याला मिळतील अशी सोय करावी, म्हणजे मग पुढल्या वर्षी तुरीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून किमतीवर नियंत्रण मिळवता येईल.
वसुंधरा ठाकरे, नागपूर

पारदर्शकता फक्त कागदावरच?
‘विद्यापीठाच्या न्यायालयीन फेऱ्या पाच वर्षांत दुप्पट’ ही बातमी (२७ नोव्हें.) वाचली. विद्यापीठाने वकिलांच्या शुल्कासाठी ५ वर्षांत तब्बल २ कोटी रुपये खर्च केले आहेत.
वस्तुत: विद्यार्थ्यांच्या शुल्कातून प्राप्त निधीचा अपव्यय ही वर्तमान शिक्षण व्यवस्थेची संस्कृतीच झालेली आहे. विविध शैक्षणिक संस्थांचे ट्रस्टी सामाजिक योगदानासाठी फिरणे सुसह्य व्हावे म्हणून लाखाच्या आलिशान गाडय़ा घेताना दिसतात. सामाजिक (?) कामाचा शिणवटा घालण्यासाठी संस्थेच्या पशातून फार्महाऊस घेत आहेत. निधीच्या अपव्ययाचे एक ना अनेक अचंबित करणारे प्रकार समोर येत आसतात. पारदर्शकतेचा झेंडा फडकवत सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारची ही घोषणा अद्याप तरी केवळ कागदावरच दिसते आहे. शिक्षणमंत्री नुसत्याच बाता मारत फिरत असतात. आíथक आणि प्रशासनिक पारदर्शकतेअभावी आज शिक्षणक्षेत्र हे भ्रष्टाचाराचे माहेरघर झाले आहे. सध्या पूर्वप्राथमिक वर्गाचे (६ महिने आधी ) नामांकित शाळेतील प्रवेश सुरू आहेत आणि मुंबई-नवी मुंबईत या शाळांचे दर किमान ५० हजार डोनेशनपासून आहेत. लाखातील शुल्क वेगळे. विशेष म्हणजे हे अगदी उघडपणे आणि सर्रासपणे होते आहे.
आजवर जनतेला वाटायचे सरकारमधीलच नेत्यांच्या संस्था असल्यामुळे ‘पारदर्शकता’ आणण्यात अडथळा येत असेल. किमान वर्तमान भाजप सरकारमधील नेत्यांच्या स्वतच्या अशा संस्था नाहीत अशी जनतेची धारणा असल्यामुळे या सरकारकडून अपेक्षा आहेत. एक गोष्ट नक्की की जोपर्यंत राज्याची जडणघडण करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणली जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्तीचे, स्वच्छ प्रशासनाच्या सर्व घोषणा वांझोटय़ाच ठरतात.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर (नवी मुंबई)

‘पोषणा’ची बोगस उपस्थिती!
‘‘पोषणा’चे शोषण’ हा हेरंब कुलकर्णी यांचा लेख (२५ नोव्हेंबर ) वाचला. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करणे ही एक तारेवरची कसरत झालेली आहे; हे मी एक शिक्षक असूनसुद्धा मला खेदाने नमूद करावेसे वाटते. स्थानिक परिस्थितीनुसार त्याची कारणेदेखील अनेकच आहेत; असो. या योजनेतील ठेकेदार व शाळा या दोहोंच्या बाजूने होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी उपस्थित केलेला मुद्दा अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. शहरी शाळांमध्ये हा आहार नको असल्याचे अर्ज शाळांनीच भरून न घेणे आदी मुद्दय़ांची चर्चा लेखात आहेच; परंतु ग्रामीण भागातही या योजनेत शाळांच्या बाजूने भ्रष्टाचार होतो, त्याची कारणे निराळी आहेत.
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो महिन्याला एकूण शालेय दिवसांत ८० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा पोषण पुरवठा कमी प्राप्त होतो. याशिवाय ग्रामीण भागातील शाळेसाठी शेती कामाच्या दिवसात शालेय उपस्थिती चिंता करणारी असते. एकंदरीत, बोगस उपस्थिती व पर्यायाने बोगस लाभ दाखविण्यावर सर्वाचा भर असतो. ही मेख या योजनेत भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरते. याबाबत दोष योजनेला द्यावा की प्रशासनाला की आणखी शालेय उपस्थितीचे अर्थकारण समजावे, हा शिक्षण विभागापुढील यक्षप्रश्न ठरावा.
अनिल तायडे, सिल्लोड (औरंगाबाद)

विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी नाही..
शबरीमाला मंदिर-प्रवेशाच्या निमित्ताने मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या पवित्र-अपवित्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा चच्रेला आलाय.
‘हॅपी टू ब्लीड’ (मासिक पाळीचा अभिमान आहे) नावाने एक अभिनव मोहीमही सुरू झाली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचे अनेक मार्ग प्रचलित आहेत. खरे तर मासिक पाळी हे मानवी वंश पुढे चालवण्यासाठी निसर्गाने स्त्रीला दिलेले एक वरदान आहे. संभाव्य गर्भधारण गृहीत धरून स्त्रीचे शरीर दरमहा काही तयारी करीत असते. गर्भधारणा झाली नाही तर ही तयारी वाया जाते. मासिक स्रावाच्या रूपाने ती शरीराबाहेर विसर्जति केली जाते. ज्या अंत:स्रावाद्वारे पोटात गर्भाचे पालनपोषण केले जाणार आहे, त्याला अशुद्ध किंवा अपवित्र समजणे हास्यास्पद आहे. धार्मिक कार्यात आणि दैनंदिन कामात स्त्रीला दुय्यमत्वाची वागणूक देण्यासाठी जाणीवपूर्वक या पवित्र-अपवित्रतेच्या खोटय़ा कल्पना तयार केल्या आहेत. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही. प्रत्येक स्त्रीने अभिमानाने म्हटले पाहिजे ‘हॅपी टू ब्लीड’.
स्वाती कोरे, कोल्हापूर

सरकारची भूमिका आतासारखी नव्हती..
आमिर खान व त्याच्या विरोधातील लोकांची मते यांचा परामर्श ‘आमिरचा ‘किरणो’त्सर्ग’ या अग्रलेखात आहे. परंतु आमिरने व्यक्त केलेली भावना खरी आहे. नुकतेच आसामच्या राज्यपालांचे वक्तव्यही चच्रेत होते. आसामच्या राज्यपालांसारखी व्यक्ती समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करते हे भारतीय एकात्मतेस बाधा आणणारे आहे. हे पद घटनात्मक आहे. हा त्यांच्या राजव्यवहाराचा भाग नाही किंवा घटनेत सांगितलेली राज्यपालांची कर्तव्ये याच्याशी त्यांच्या वक्तव्याचे भिन्नत्व आहे. आमिरला चूक ठरवून चालणार नाही किंवा साहित्यकारांनाही चूक ठरवून चालणार नाही. या अगोदरच्या सरकारच्या काळात अशा घटना घडल्या होत्या, पण यात सरकारची भूमिका आतासारखी नव्हती. सध्या एकीकडे पंतप्रधान एकात्मतेची भाषा बोलतात आणि दुसरीकडे त्यांचे मंत्री व राज्यपाल चुकीची विधाने करतात. हे विकासाच्या दृष्टीने, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने बाधक आहे. त्यामुळे आमिरच्या वक्तव्याचा गंभीरपणे विचार करावा. राज्यपालांचे चुकीचे वक्तव्य कसे विसरलेच गेले, याचीही चर्चा व्हावी.
भास्करराव म्हस्के, पुणे

हा दांभिकपणा नाही?
अनुपम खेर हे लोकपाल आंदोलनात उतरले होते तेव्हा सरकार कॉँग्रेसचे होते. मोदी सरकारने अजूनही लोकपालाविषयी काहीही केलेले नाही. तरी हे कलावंत त्यांच्या बाजूने मदानात उतरले आहेत. हा दांभिकपणा नाही का? हे आणि अशा लोकांचे हेतू कोणते आहेत ते नीट कळत नाही. तरीही हे दुसऱ्यांच्या हेतूंबद्दल शंका घेत आहेत.
हृषीकेश कुलकर्णी, राहुरी (अहमदनगर)

आशाताईदेखील जाहीरपणेच बोलल्या होत्या..
वाढती असहिष्णुता या मुद्दय़ावर गेल्या काही महिन्यांत अनेक लोकांनी विधाने केली होती उदा. नारायण मूर्ती, किरण मुजुमदार शॉ, अमिताभ बच्चन, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन.. ही यादी खूप मोठी आहे.. त्या वेळी फार वाचाळपणा न केलेल्या मंडळींनी आता ‘आमिर खान’विरोधात ‘पाकिस्तानातच जा’ वगैरे बेताल विधाने करून झाल्यावरही ‘त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरा’ अशी भाषा सुरू केली आहे. यापूर्वीही देश सोडण्याच्या धमक्या ज्या सेलिब्रिटीजनी दिल्या होत्या; त्यांत ‘माझ्या घरासमोरून फ्लायओव्हर गेला तर देश सोडून जाईन’, असे जाहीर कार्यक्रमात म्हणणाऱ्या आशा भोसलेदेखील होत्या.
नितीन कोंडिबा महानवर, बीड

असहिष्णुता आहे, पण कशामुळे?
‘‘आमिरचा ‘किरणो’त्सर्ग’’ हा अग्रलेख (२६ नोव्हेंबर ) आमिरच्या वाढत्या असहिष्णुतेच्या विधानाचा आणि त्यावर उठलेल्या अनावश्यक वादळाचा उत्तम परामर्श घेतो. गेले काही महिने सुरूअसलेल्या राजकीय असंतोषातून निर्माण झालेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांबरोबर लेखक, विचारवंत, कलाकारही सामील झाले आणि त्याचा उद्देश आणि त्याला असलेला मोदीविरोधी दर्प जाणवल्यामुळे तटस्थ नागरिकांनी यांच्या ऱ्हस्वदृष्टीवर प्रश्न चिन्ह उभे केले आणि ते नसíगक आहे.
प्रश्न राहिला या देशात खरंच असहिष्णुता वाढत आहे का? तर त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे, पण ती असहिष्णुता ही सामाजिक, आíथक आणि राजकीय अधिक आहे. आणि त्याचा या मोदी सरकारशी थेट संबंध नसून त्याचा संबंध हा वाढत्या शहरीकरणाशी, बेरोजगारीशी, दारिद्रय़ाशी, शैक्षणिक मागासलेपणाशी आहे. जमिनीच्या गगनाला भिडलेल्या भावातून एक बेमुर्वतखोर, कायद्याची चाड नसलेला नवश्रीमंत समाज जन्माला आलेला आहे आणि त्याच्या भोवतीचे वाढत्या गुन्हेगारीचे िरगण पुण्या-मुंबईसारख्या मोठय़ा शहरातील सर्वसामान्यांना आपल्या कह्यात घेत आहे. आज घराबाहेर पडलेला माणूस सुरक्षितपणे परत येण्याची शाश्वती वाटत नाही. आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी आपली सर्वाचीच आहे आणि सरकारची ती जास्त आहे आणि समाजातील विचारवंतांनीही खरा गुजरात दाखवतो असे म्हणण्यापेक्षा तो कसा असावा याचे मार्गदर्शन करण्यात आपली शक्ती आणि बुद्धी खर्च करावी.
अविनाश माजगावकर, पुणे

यात कसली सहिष्णुता?
आमिर खान यांच्या एका वाक्यामुळे लगेच ‘सहिष्णुताकारणा’ला जाग आली.. आणि लागले तोफ डागायला! ते वाक्य असे होते की, देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढत असताना त्यांच्या अर्धागिनीने देश सोडून जाऊ अशी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली होती (भूतकाळ).. त्यांच्या या वाक्यामध्ये दोन वेगवेगळी वाक्ये आहेत.. पहिले असे की, देशात असहिष्णुतेचे वातावरण होते (भूतकाळ). आणि दुसरे असे की, त्यांच्या पत्नीने देश सोडून जायचा विचार बोलून दाखविला होता (भूतकाळ).. पत्नीला कदाचित त्यांनी समजावलं असेल.. कारण त्यांनी देश सोडलेला नाही.. तरीदेखील, आमिर यांची ‘वेळ’ चुकलीच! जर कोणी ‘थंडी वाजत होती म्हणून स्वेटर घालायचा विचार केला होता’ असे म्हणाला, तर ‘त्याच्या अंगावरचे कपडे काढून घ्या अथवा त्यांना हिमालयात पाठवा’ अशा छापाचे प्रत्युत्तर देण्यात कुठली सहिष्णुता? शांतपणे प्रतिवाद करण्याइतपत आपण सहिष्णू आहोत ना? मग आमिर यांचे चुकले म्हणून काय आपणही चुकायचे? बरे, ती चूक इतकी कुठे मोठी आहे की त्यामुळे स्वतला सहिष्णुतेचे पुरस्कत्रे म्हणवणारे त्यांच्यावर जहाल टीका करताहेत.. यात कसली हो सहिष्णुता?
धनराज अंधारे, बार्शी (सोलापूर)

ढोंगी भक्तीने देवाचा ठाव कळणे अशक्य!
शरद बेडेकर यांचा लेख (२३ नोव्हें.) वाचला. त्यांनी आपल्या लेखाच्या शेवटच्या दोन ओळीत, चार्वाक ऋषींची मतप्रणाली आणि शेवटी ‘आज आपल्याला उपलब्ध असलेल्या भौतिक ज्ञानाच्या आधारे ईश्वराचे अस्तित्व नाकारणे सहज शक्य आहे’, असे प्रतिपादन करून कुठे आहे तो ईश्वर? असे प्रश्न केले आहेत. ते वाचताक्षणी मला पुराणकाळातील हिरण्यकश्यपाने हाच प्रश्न प्रल्हादाला विचारल्याचा प्रसंग आठवला.
चार्वाकांनी प्रतिपादन केलेला ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हे तत्त्व आज भारतात घरोघरी पसरलेले आहे. दुचाकी घेणे आहे. ‘लोन’ घ्या, चारचाकी घेणे आहे ‘लोन’ घ्या, घर घेणे तर ‘लोन’व्यतिरिक्त होणे नाही. करोडपती असला तरी त्याच्या नावे ‘लोन’ ही उपाधी असणे भूषणावह गोष्ट झालेली आहे. असे लोन देणाऱ्या कित्येक संस्था बुडीत खात्यात गेल्या आहेत. तसेच येनकेनप्रकारेण अनेक आमिषे दाखवून ‘लोन’ देणारी मंडळी कमी नाहीत. गोल्ड लोन, प्रॉपर्टी लोन देणाऱ्यांची जाहिरात हर एक मीडियामधून सतत मारा होत आहे. आणि त्याचे फलस्वरूप तारण ठेवलेल्या हजारो लोकांची मालमत्ता वेळोवेळी हराज होत आहे ही गोष्ट सर्वश्रुत आहे. आजमितीला भारतातल्या अनेक राज्यातील हजारो गरीब शेतकरी याच ‘ऋणं कृत्वा’मुळे आत्महत्येसारखा शेवटचा उपाय हाताळीत आहेत. या साऱ्यांची फलश्रुती काय? याचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे आवश्यक आहे.
‘कुठे आहे तो ईश्वर?’ हा एक २४ कॅरेट सोन्यासारखा प्रश्न. हाच प्रश्न अनादिकालापासून विचारवंतांना सतावीत आहे. ईश्वर कुठे आहे या शोधातूनच उदयास आलेले साहित्य म्हणजे वेद, पुराण, भागवत, रामायण, महाभारतासारख्या अप्रतिम ग्रंथसंपदा. हजारो वर्षांनंतर आजही या भारतभूमीचा अभिमानाचा विषय आहे. भगवद्गीता हा जगभरात मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. केवळ ७०० श्लोकांच्या या ग्रंथात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. भारतातील अनेक संतांनी देव कुठे आहे हे जाणून जनसामान्यांनाही त्याची जाण देऊन या भौतिक जगात समाधान, शांतीने जगण्याचे मार्ग दाखविले. त्या साऱ्या संत माहात्म्यांच्या जीवन पद्धतीतूनच ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती’ या उक्तीची प्रचीती येते.
या संत जनांना त्यांच्या अंतरी दिसलेला देव कोण? तो कसा आहे याचे विवेचन हजारोहून अधिक काळापूर्वी व्यास महर्षीनी महाभारतातील श्रीकृष्णाच्या मुखातून वदविलेल्या भगवद्गीतेत सापडते. त्यातील सातव्या अध्यायात याचे स्पष्टीकरण आहे. पण केवळ वाचनातून त्याचे आकलन होण्याएवढे ते सोपे नाही. त्यातील विचारधारा अंतरातून जाणून घेणे आवश्यक आहे. संत ज्ञानदेवांनी पसायदानात आता विश्वात्मकेदेवे असे परमेश्वरास संबोधून या ब्रह्मांडाची जाणीव असल्याचे सिद्ध केले आहे. याच विश्वाचा आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शनातून संक्षिप्त पणे करून दिलेली आहे. त्या भगवंताची जाणीव होण्यास अंतरातून ओढ आणि त्याच्यावरील नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. ‘‘मत्त: परतरंनान्यत्किंचिदस्ति धनंजय। मयी सर्व मिदं प्रोनं सूत्रे मणिगणा हव।।’’ (अ.७ श्लोक ७) ‘‘यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमद्वर्जितमेव वा। तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंश संभवम्।। (अ १० श्लोक ४१) असे सांगून भगवंताने आपण चराचर प्रकृतीहून वेगळा नाही असे जाणीव करून दिले आहे. आपल्यात सुयोग्य दृष्टी निर्माण केल्यास हिंस्रातल्या हिंस्र पशूतही त्याला देवत्वाची प्रचीती येईल. (पहा. इंटरनेटवरील सिंहिणीचा एक नवजात हरीण शावकाला जिवापाड रक्षण करण्यास केलेल्या प्रयत्नाचा नैज चित्रण) बाबा आमटे, प्रकाश आमटे असे अनेक नि:स्वार्थ सेवाभावींच्या कार्यातून त्यांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याचे दर्शन घडते. यासाठी आपल्यात पात्रता निर्माण करणे आवश्यक आहे.’’
दु:खाची गोष्ट की, आज आपण सारे काही तरी मिळविण्यासाठीच केवळ ढोंगी भक्तीच्या आहारी गेलो आहोत. अशा ढोंगी भक्तीने देवाचा ठाव कळणे अशक्य आणि तो देव कुठे आहे असे टाहो फोडणे सहज आहे.
 अरविंद वें. हेब्बार, बोरिवली (मुंबई)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Letter to editor