‘सं. म्युनिसिपालिटी!’ हे संपादकीय (९ मार्च) वाचले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेच्या मुळाशी ‘सत्तेच्या विकेंद्रीकरणा’चे तत्त्व आहे. शासनाच्या विविध विकास कार्यक्रमांमध्ये लोकांना सहभागी करून घेणे, सर्वसामान्य जनतेच्या राजकीय आकांक्षांची पूर्तता करणे, हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा उद्देश आहे. भारतामध्ये मात्र हा उद्देश सफल होताना दिसत नाही. महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबद्दल, कोणत्याही पातळीवर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया न उमटणे हे याचेच निदर्शक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची होणारी अवनती थांबविण्यासाठी तसेच त्यांच्या प्रति नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शासनामार्फत काही मूलभूत उपाययोजना होणे गरजेचे आहे. यात डबघाईला आलेल्या महानगरपालिका व नगरपालिकांना आर्थिक मदत करणे तसेच सहायक अनुदानात वाढ करणे आवश्यक आहे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समाजातील प्रत्येकाशी संबंध निर्माण करण्यासाठी विद्यमान कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. नागरी सत्तेत सर्व नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या दिशेने बदल व्हायला हवा. अन्यथा, फक्त राजकीय फायद्यासाठी म्हणून जातीपातीच्या प्रतिनिधित्वाबाबत केवळ सजगता दाखवून काहीही साध्य होणार नाही. या जातीच्या निष्क्रियांस त्या जातीचे निष्क्रिय येऊन मिळतील, हेच खरे. – गणेश शशिकला शिंदे, औरंगाबाद
या आस्थापनांचे संस्थानीकरण कसे रोखणार?
‘सं. म्युनिसिपालिटी!’ या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, सर्वसामान्य व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराबाबत अलिप्त असतात. कारण या आस्थापनांचे संस्थानिकीकरण कधीच झाले आहे आणि या संस्थानिकांच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे शिक्षण, ज्ञान आणि कायद्यांविषयी सामान्य नागरिकांना अनभिज्ञ आणि उदासीन ठेवणे याला सर्व राजकीय पक्षांचे आणि नोकरशहांचे मूक किंवा उघड प्रोत्साहन आहे. ही अनभिज्ञता आणि उदासीनता या सेवक आणि नोकरांच्या अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहेच आणि ज्या मूठभर नागरिक किंवा संस्थांना या पालिकांतील त्रुटी जनतेसमोर आणाव्याशा वाटतात त्यांच्यासमोर न्यायालयात जाऊन वेळ आणि पैसा खर्च करण्यावाचून गत्यंतर नाही. ही स्थिती खड्डेयुक्त रस्ते, विकास नामक भकासीकरण, अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टय़ा आणि फेरीवाले, पाणीचोरी, शहराची तुंबई यासाठी अत्यंत पूरक होऊन भ्रष्टाचारासाठी मोठी कुरणे तयार करणारी आणि सेवक, राजकीय पक्ष आणि नोकरशहांसाठी अत्यावश्यक आणि जीवनावश्यक आहे. न्यायालयांच्या आदेशांचीही कठोर अंमलबजावणी करण्याची वरील घटकांची तयारी नाही. या स्थितीत जातीय आरक्षणाने काय फरक पडणार? अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे १९२५ चे ‘संगीत म्युनिसिपालिटी’ प्रहसन आता रंगीत आणि संगीत झाले आहे. या रंगसंगतीवर जातीय आरक्षण हा उपाय नसून जनजागृती, माध्यम जबाबदारी आणि सेवक संवेदना ही त्रिसूत्री प्रामाणिकपणे अमलात आणणे शक्य झाल्यास सामान्यांना या स्थानिक संस्थांप्रति आत्मीयता आणि विश्वास वाटून आपल्या व्यक्तिगत जबाबदारीची जाणीव होण्यास हातभार लागेल. अन्यथा नागरिकशास्त्र २० मार्काच्या अभ्यासापुरते मर्यादित आहेच. – सुधीर गोडबोले, दादर, मुंबई</strong>
लोकांच्या प्रश्नांची आस्था कुणाला आहे?
‘सं. म्युनिसिपालिटी!’ हा अग्रलेख वाचला. शेवटी आरक्षणाच्या घोळावरून मुंबईसह राज्यातील इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आणि सगळीकडे ‘आयुक्तराज’ सुरू झालेले आहे, परंतु त्याचे नागरिकांना काहीही विशेष दु:ख झालेले नाही. कारण नगरसेवक निवडून आल्यानंतर दिलेल्या नियोजित पाच वर्षांच्या कालावधीत काय काम करतात, हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास मागील पंधरा दिवसांत मुंबईसह ठाणे परिसरात पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि भातसा येथील पाणी केंद्रावर काही तरी बिघाड झाला असे वाचावयास मिळाले. त्या वेळी किती नगरसेवकांनी भातसा येथे भेट दिली? त्याचा अभ्यास केला? निवडून आलेले नगरसेवक वॉर्डातील बांधकामांना, रिडेव्हलपमेंट बिल्डिंग्जना भेट देतील, परंतु पाणीप्रश्न, चांगल्या रस्त्यांचा प्रश्न, स्थानिक प्रश्नांच्या बाबतीत उदासीनता दाखवतात. त्यामुळे मग सर्वसामान्य नागरिकदेखील नगरसेवकांच्या निवडणुकांबाबत उदासीन होतात? निवडून आलेले नगरसेवक आपण आमदार/ खासदार, म्युनिसिपालिटीच्या एखाद्या कमिटीवर कधी येऊ याचीच स्वप्ने पाहतात? त्यामुळे मग स्थानिक निवडणुकांकडे कोणीच गंभीर होऊन पाहत नाही. यामुळेच ९७ वर्षांपूर्वी लिहिलेले ‘स्थानिक स्वराज्य’ अथवा ‘संगीत म्युनिसिपालिटी’ हे प्रहसन अजूनही ताजे आणि टवटवीत वाटते. – शुभदा गोवर्धन, ठाणे
लोकसभागृहात लोकांचा सहभाग शून्य
‘सं. म्युनिसिपालिटी’ हा अग्रलेख वाचला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात शून्य लोकसहभाग आहे आणि महानगरपालिकांचा कारभार काही मूठभर लोकांच्या हितासाठी चाललेला आहे या वास्तवावर त्यात अचूक बोट ठेवले आहे. पण हा शून्य लोकसहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांनी नव्हे तर सर्व सरकारी आस्थापनांनी त्याच मूठभर लोकांच्या इशाऱ्यावर नियोजनबद्ध पद्धतीने लादलेला आहे.
विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकांमधील ताज्या आकडेवारीनुसार भारत देश ‘अंशत: स्वतंत्र’ आणि ‘सदोष लोकशाही’ असणाऱ्या देशांच्या गटात आहे. नागरिकांना सरकारी व्यवस्थेपासून दूर ठेवणे आणि मूठभर लोकांच्या इशाऱ्यावर कारभार हाकणे हे या गटातील देशांचे एक वैशिष्टय़ आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्था या वैशिष्टय़ाचे प्रदर्शन अतिशय इमानेइतबारे करीत आहेत.
अग्रलेखात लोकसहभाग आणि लोकाभिमुख कारभार हवा असे योग्यपणे नमूद असले तरी आज याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवारात लोकांना सहज प्रवेश मिळत नाही. हा इतका सर्व खटाटोप कशासाठी? हे सर्व कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी? ५०-६० टक्के प्रशासकीय खर्च करणाऱ्या पालिकेत मोकळा आणि पारदर्शक कारभार याअगोदरही कुणाला नव्हता. मात्र गेल्या सात वर्षांत तो एकदम कोंडून ठेवलेल्या अवस्थेत आणला गेला आहे हे मुंबई आणि लगतच्या महापालिकांच्या आवारात गेलेल्या कोणालाही अनुभवता येईल. त्यामुळे ‘लोकनियुक्त’ प्रतिनिधी काय किंवा प्रशासकीय राजवट काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे कुणाला काहीही पडलेले नाही हेच खरे! – अॅड. किशोर र. सामंत, भाईंदर पूर्व, ठाणे
कसल्या भणंगांना निवडून दिले आहे आपण?
‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’ आणि ‘ईडी म्हणजे भाजपचे एटीएम’ या दोन बातम्या (९ मार्च) वाचल्या. कसल्या भणंगांना निवडून दिलेय आपण. ज्यासाठी यांना निवडून दिलेय, ते करताना कोणीच दिसत नाही. जो तो एकमेकांचे कपडे फाडायला उभे. पक्ष कोणताही असो, एकदा आमदार नावाचा शिक्का मिळाला की कोणालाच कसलाही अभिनिवेश नाही. कशाही उडय़ा मारून सत्ता मिळवायची, हेच एकमेव आणि अंतिम ध्येय. सत्तेत एकत्र असताना यांचे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ धोरण असते. फाटाफूट झाल्यावर मग कधीकाळी अंधारात केलेले एकमेकांचे पापकर्म यांना आठवते. कुणाला कुणाची पडलेली नाही. राज्याने केंद्राच्या नावाने बोटं मोडायची. केंद्राने राज्याला दूर लोटायचे. जमेल तसे ईडी, सीबीआय, आयकर इत्यादी तपास यंत्रणा बगलेत घ्यायच्या, काही मोजकेच अपवाद वगळता पत्रकारांनी तोंडात मिठाची गुळणी घ्यायची. जनतेच्या समस्या सोडवायची फुरसत नाही, प्रत्येकाला आपला पक्ष एवढाच अजेंडा. सगळय़ांजवळ सगळय़ांविरुद्ध पुरावे तयार आहेत. मग वाट कसली पाहता? आपल्या देशाच्या राजकारणाची आणि त्याच्याशी संबंधित लोकांची पातळी किती घसरली आहे, नव्हे पातळीच राहिलेली नाही, हे यांची रोजची पोपटपंची ऐकून, वाचून समजते. जनावर नसलेली आणि फक्त विदूषक असलेली ही वेळखाऊ सर्कस आहे. – संजय जाधव, देवपूर, धुळे</strong>
सूडमोहीम उलटते आहे, म्हणून हा कांगावा!
‘आरोपांची धुळवड’ हे वृत्त (९ मार्च) वाचले. त्यातील,‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’ हा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेला आरोप म्हणजे आपलीच कृती आपल्या अंगावर कधीतरी कशी उलटते याचा प्रत्ययदर्शक आहे. वास्तविक केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करुन सरकारी तपास यंत्रणांचा गेली दोन वर्षे भाजपने कसा गैरवापर चालवला आहे ते अवघा देश पाहात आहे. भाजप नेत्यांना अडकविण्यासाठी झालेल्या कथित संभाषणांच्या ध्वनिचित्रफिती इतर कोणाच्याही हाती न लागता फक्त फडणवीसांच्या ताब्यात येतात याचाच अर्थ रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोपपत्र दाखल झाले त्यात तथ्य असावे असाही होऊ शकतो. ज्या भाजप नेत्यांविरोधात राज्य सरकार कारस्थान रचते ते सारे भाजप नेते संतसज्जनांचे निर्मळ अवतार आहेत असे समजायचे का? भाजप केंद्रात सत्तेत असूनही विरोधकांशी उमदेपणानेच वागते असे समजून चालायचे असेल तर याच वृत्तासोबत ‘ठाकरे व परब यांच्या निकटवर्तीयांवर छापे’ हेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे त्याचा अर्थ काय लावायचा? ‘ईडी म्हणजे भाजपचे एटीएम मशीन’ असे वक्तव्य संजय राऊतांनी पुराव्यांसहित केले ते असत्य का मानावे ? एकूण काय, भाजपने सूडवृत्तीने चालविलेली मोहीम आता त्यांच्यावरच बूमरँगसारखी उलटताना दिसत आहे म्हणून हा सारा कांगावा! – उदय दिघे, विलेपार्ले, मुंबई
loksatta@expressindia.com
