loksatta@expressindia.com  

‘हिजाबचा हिशेब!’ (१६ मार्च) हे संपादकीय वाचले. कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘हिजाबबंदी वैध’ ठरवणे हे तर स्वागतार्हच. आपला धर्म मुद्दामहून दाखवत फिरण्याचा अट्टहास करणे आणि तो नैसर्गिकरीत्या आपल्या वागण्या, बोलण्या-चालण्यातून सहज दिसणे, यात मोठा फरक आहे. संविधानाने धर्माच्या या आवश्यक नैसर्गिक सौंदर्यालाच प्राधान्य दिले आहे, धर्माधतेला नव्हे. शाळा-महाविद्यालयांत, सरकारी कार्यालयांत, संस्था-विद्यापीठांत प्रवेश करताना त्या त्या गणवेश नियमांचे पालन होणे हे लोकशाहीच्या समानतेच्या धाग्याचे तत्त्वच असायला हवे. मग कुणी मुख्यमंत्री असला म्हणून आपल्या धर्माचे प्रदर्शन भगवे वस्त्र घालूनही करू शकत नाही. कारण मुख्यमंत्रीपद हेही संवैधानिक.

अशा प्रकारच्या कपडे-खानपानाच्या आत्यंतिक द्वेषामुळे एका धार्मिक गटाची किंवा जातीची दुसऱ्या धर्माकडे पाहण्याची संकुचित वृत्ती लहानपणापासूनच मनात उगाच साठत जाते. त्याचे रूपांतर होते संशय-द्वेषात! हे रक्तपातापेक्षाही भयंकर. यात सर्वात जास्त नुकसान होते ते नैसर्गिक सहजतेने खऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या मानवी सत्प्रवृत्तीचे. निरनिराळय़ा रंगीबेरंगी फुलांनी नटलेली बाग आपल्याला जशी हवीहवीशी वाटते तसेच धर्म-जातींच्या संस्कृतींनाही आपल्याला आपुलकीने जपता यायला हवे!

– करणकुमार जयवंत पोले, वाळकी (ता.औंढा नागनाथ, जि. िहगोली)

स्त्रियांना धर्माच्या जोखडातून मुक्ती मिळावी

हिजाबच्या कथित अधिकारावर वाद हा उभयपक्षी अनाठायी असल्याचा ‘हिजाबचा हिशेब’मधील मुद्दा पटला. शाळकरी वयात मुलांची बुद्धी प्रगल्भ झालेली नसते. उंची कपडे परिधान करणारा विद्यार्थी, काही वेगळेच पोशाख घालणारा विद्यार्थी, शाळेच्या डब्यात पोळीभाजीव्यतिरिक्त काही न काही वेगळं आणणारा विद्यार्थी, हे बघून मुलांचे मन विचलित होऊ शकते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतात, वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते. पण कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वयाची व्यक्ती, अधिक योग्य विचार करू शकते, व म्हणूनच कॉलेजमध्ये गणवेश वगैरे प्रकार सहसा नसतात.

कालानुरूप धर्माचरणातील बदल त्या धर्माचे आचरण करणाऱ्याकडून व्हायला हवा. आपण तसा आग्रह धरणे हे व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यासारखेच आहे. उद्या, विवाहित विद्यार्थिनीने कपाळावर कुंकू लावू नये, बांगडया व मंगळसूत्र घालू नये वगैरे मागणी पुढे आली तर कशाच्या आधारे आपण विरोध करणार? हा सगळाच मुद्दा, मुसलमानांच्या कर्मठ धर्माचरणाबाबत असूया असणाऱ्या, तितक्याच मागास विचाराने भारावलेल्या, राजकारणात सुप्त महत्त्वाकांक्षा असलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींनी सुरू केला व उलटे धर्माध मुसलमानांच्या हातात कोलित दिले.  स्त्रियांना धर्माच्या जोखडातून मुक्ती मिळावी हे निश्चितच व त्यासाठी मुसलमानच काय अन्य धर्मीय स्त्रियांसाठीही सर्व समाजाने प्रयत्न करायला हवे. पण हे अशी निवडक बंधने आणून आपण न्यायोचित वागत आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो.

– डॉ. विराग गोखले, भांडुप (मुंबई)

धार्मिक दुराग्रह मुस्लिमांमध्येच अधिक

‘हिजाबचा हिशेब !’ हा अग्रलेख वाचला. काही मुस्लीम विद्यार्थिनींनी, बहुधा कोणाच्या तरी (राजकीय पुढारी, इ.) सांगण्यावरून, हिजाब घालून वर्गात येण्याचा ‘मागास’ हट्ट धरला. शैक्षणिक संस्थेने त्याला परवानगी नाकारल्यानंतर त्या विद्यार्थिनी त्यांच्या त्या ‘धार्मिक अधिकारा’साठी न्यायालयात गेल्या. इथे मुस्लीम समाजाचा मागासलेपणा, धार्मिक दुराग्रह, उघड उघड दिसत असूनही, हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांना सरसकट दोषी धरणे चुकीचे आहे. सगळय़ा वादाला विनाकारण धार्मिक रंग देण्याचे काम, मुस्लीम समाजानेच केले आहे.

‘ज्याच्या साधनेमुळे धर्म आदी परंपरांचा पगडा कमी होऊन माणूस आधुनिक विचार करू लागणे अपेक्षित, त्या शिक्षणालाच हा धर्माचा फास !’ – इथेही हे लक्षात घ्यावे लागेल, की आधुनिक शिक्षणाने धार्मिक परंपरांचा पगडा कमी होणे, हे इस्लामच्या बाबतीत मुळीच लागू होत नाही. आपल्या देशातील आधुनिक उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण, संगणकशास्त्र, व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले काही मुस्लीम तरुण इस्लामी मूलतत्त्ववादी प्रभावाखाली येऊन, इसिससारख्या दहशतवादी संघटनांत भरती झाल्याची उदाहरणे आहेत.

‘घरातून बाहेर पडताना आपली धर्मवस्त्रे खुंटीस टांगून ठेवण्याच्या सवयीची गरज उभयतांस वाटायला हवी’ – असे अग्रलेखात म्हटले आहे. इथेही ही गरज प्रामुख्याने मुस्लीम लोकांस वाटणे गरजेचे आहे, हे स्पष्ट दिसते. आज कुठला हिंदू घरातून बाहेर पडताना ‘धर्म वस्त्रे’ घालून बाहेर पडतो? कर्नाटकांतील त्या शिक्षण संस्थांत जे तरुण भगवी उपरणी, शाली वगैरे घालून आले, ती केवळ त्या विद्यार्थिनींच्या ‘हिजाब हट्टा’ची प्रतिक्रिया होती. एरवी कुठले हिंदू तरुण आज धोतर, उपरणे, शाल, गंध, तिलक, शिखा (शेंडी), असले धार्मिक उपचार पाळतात? याउलट मुस्लीम व्यक्ती तिच्या जाळीदार गोल टोपी आणि बिन मिशांची दाढी, पठाणी सूट, अशा पेहरावावरून आणि मुस्लीम स्त्री हिजाब, बुरखा यावरून, अजूनही ओळखली जाते.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे..

‘हिजाबचा हिशेब’ या अग्रलेखात वास्तविकतेच्या वर्मावर बोट ठेवले आहे. कितीही नाही म्हटले तरी प्रगतीच्या आड आपली तीव्र धार्मिक आस्था येते आहे, हे मुस्लीम बांधवांना आत्ताच कळले तर बरे होईल. किंबहुना याच कारणामुळे हा समाज इतरांपेक्षा मागे पडल्याचे दिसून येते. हिजाब वा तत्सम वाद बाजूला सारून या समाजाने स्वत:ला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या लक्षात येईल की आपण किती मागे आहोत (अर्थात याला काही अपवाद आणि शिवाय हे प्रमाण अत्यंत कमी).

आजच्या युगात धर्म, धर्मभावना वा आस्था यापेक्षा तुमची विद्वत्ता, बुद्धिमत्ता, शैक्षणिक आस्था, प्रगतीचा ध्यास या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असे वाटते. परंतु या साऱ्यासाठी या समाजाचे प्रबोधन करताना कोणीही दिसत नाही. ना स्वधर्मीय जाणकार, ना राज्यकर्ते, ना  समाजसुधारक, ना सुप्रसिद्ध कलाकार. प्रत्येक जण आपापली पोळी भाजून घेण्यात व्यस्त. सर्व धार्मिक आस्था वा धर्म निर्देशक साधने आपली आपल्यातच ठेवून खुल्या दिलाने मुख्य प्रवाहात आत्ताच सामील होता नाही आले तर, मात्र या समाजाची दुरवस्था होण्याची शक्यता अधिक आहे.

– विद्या पवार, मुंबई</p>

काँग्रेसने संस्थानिकांची मानसिकता सोडावी

‘चक्रधर व्हावे लागेल.. ’ हा अग्रलेख (१५ मार्च ) वाचला. इंग्रजांनी संस्थाने खालसा केल्यानंतर आणि संस्थानिक शब्दश: निवृत्तीवेतनधारक झाल्यानंतरसुद्धा आपल्या चिमूटभर हुजऱ्यांच्या गराडय़ात राजे असल्याच्या आवेशात जगत असत. काँग्रसची आज तशीच अवस्था झाली असल्याचे दिसते. पूर्वजांच्या पुण्याईचे स्मरण ठेवणे चांगलेच, तथापि त्या भ्रमातच वर्तमान व्यतीत करणे आत्मघातकी ठरू शकते. संत तुकाराम म्हणतात , ‘मिराशींचे जरी शेत। नाही देत पीक उभे ।।’ म्हणजे वारसाहक्काने शेतजमीन मिळेल, पण पीक तर मेहनतीनेच पिकवावे लागेल ना? याचा साक्षात्कार या पक्षास कधी होणार आहे?

    राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या वारूला लगाम घालण्याचे कार्य देशहितार्थ आपल्या पक्षास करावयाचे आहे, हा विचार गांभीर्याने घेण्याऐवजी हे लोक अध्यक्ष-अध्यक्ष खेळत आहेत, ही या देशाची शोकांतिका आहे. आधीच पक्षांतर्गत धोरणलकव्यामुळे हिमालयाची टेकडी करून ठेवली. आता सावध झाले नाहीत तर काँग्रेसची अवस्था तटबंदीच्या आतील अदृश्य शनिवारवाडय़ासारखी होईल. बरेच नेते फुटक्या जहाजातून पळाले असले तरी अजूनही काही तेजतर्रार बाशिंदे काँग्रेसकडे शिल्लक आहेत. त्यांना ऊर्जा हवी आहे.

 – पृथ्वीराज जाधव, आळंदी देवाची (पुणे)

दरेकरांची अंगमेहनत राजकीयच की काय?

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक निवडणुकीत मजूर गटातून निवडणूक लढविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राजकीय (सूड) बुद्धीची आठवण झाली (बातमी : लोकसत्ता – १६ मार्च). भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याविरुद्ध ईडी, सीबीआय, आयकर यांच्या सहकार्याने नोंदवलेले गुन्हे हे राजकीय सूडबुद्धीने नव्हते काय? त्या वेळी फडणवीस यांनी या तपास यंत्रणांची बाजू घेतली होती. पण स्वपक्षीयावर गुन्ह्याची नोंद झाली तर राजकीय सूडबुद्धीने म्हणून ओरड ठोकायची ही पद्धत कोणती? प्रवीण दरेकर हे दोषी आहेत की नाही याचा निर्णय न्यायालय देईल. फडणवीस यांना वकिली करण्याची गरज नाही. प्रवीण दरेकर हे समजा मजूर असतील तरीही त्यांना संपत्ती दाखवावी लागेल.

     मजुराची व्याख्या म्हणजे अंगमेहनत करणारा. पण प्रवीण दरेकर यांनी स्वार्थासाठी शिवसेना, मनसे आणि भाजप असा राजकीय प्रवास केला हीच त्यांची अंगमेहनत समजावी काय? भले दरेकर यांची शरीरयष्टी अंगमेहनतीची वाटत नसेलही, परंतु ते दरेकर हे श्रीमंत मजूर आहेत हे भाजपवाल्यांना मान्य करावेच लागेल.

– अरुण पां. खटावकर, लालबाग (मुंबई)