‘‘सांगे ‘वडिलांची’ कीर्ती!’’ या अग्रलेखात (२० एप्रिल) भारतीय मानसिकतेवर नेमकेपणाने भाष्य केले आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील तद्वत राजकारण्यांची पुढची पिढी राजकारणात हा एक अलिखित पायंडा पडला आहे. याचे मूळ आपल्या जीवनात आणि शिक्षणपद्धतीत आढळते. समाजात आजही श्रमप्रतिष्ठा ही कार्यप्रतिष्ठेपेक्षा दुय्यम दर्जाची मानली जाते. एखादी व्यक्ती एखादे काम व्यावसायिकदृष्टय़ा उत्तम करते का, यापेक्षा ती व्यक्ती कोणते काम करते याला आपल्याकडे महत्त्व आहे. यातून वलयांकित क्षेत्रांत घराणेशाही मूळ धरते. या क्षेत्रांत एकदा सत्ता प्राप्त केल्यावर, मग ती आपल्याकडेच कशी राहील, याकडे कटाक्ष असतो. सत्तेतून पैसा व पैशांतून प्रसिद्धी हे नित्याचे होते. ज्यांच्याकडे खरंच प्रतिभा आहे, अशी माणसे मग या व्यवस्थेतून बाहेर फेकली जातात. प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभा घेऊन आली आहे. ती प्रतिभा फुलण्यासाठी त्याला एक अवकाश द्यावा लागेल, हा विचार इथल्या व्यवस्थेत रुजत नाही तोपर्यंत आपल्या परिस्थितीला शरण जाण्यास पर्याय नाही.
– शैलेंद्र राणे, कळवा (ठाणे)
मोठय़ा पटलावरून घराणेशाही हटली ते बघा..
‘‘सांगे ‘वडिलां’ची कीर्ती!’’ हा अग्रलेख वाचला. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतात लोकशाही, हुकूमशाही आणि घराणेशाही एकत्र नांदताना दिसत. रथयात्रेनंतर हळूहळू त्यांच्यात कुरबुर होऊ लागली आणि घराणेशाहीचा वनवास सुरू झाला. केंद्रातील नेहरू-गांधी घराण्यामुळे, त्यांच्या कृतक समादवादी (स्युडोसेक्युलर) धोरणांमुळे बहुसंख्याक हिंदूंच्या मनात हळूहळू साठत गेलेल्या असंतोषाला साद घालणाऱ्या मोदींना भरभरून मते मिळाली. निवडणुकांच्या रूपाने लोकशाही आणि एकहाती विजय मिळवल्यामुळे हुकूमशाही एकत्र नांदत आहेतच. राजकारणाच्या मोठय़ा पटावरून घराणेशाही हटली ना, मग झाले तर!
भारत काँग्रेसमुक्त झाला, नेहरू- गांधी घराणे संपले की देशपातळीवर घराणेशाही संपली. मग राज्यात अगदी आमच्या पक्षातदेखील लहानसहान घराणी राहिली तर तेवढय़ावरच बोट ठेवून ‘निवडक नैतिकता’ वगैरे नावे ठेवणे योग्य नाही. कालांतराने, क्रिकेट हा परकीय खेळ असल्याने त्यावर बंदी घालून क्रिकेटमधील घराणेशाहीवर ‘मूले कुठार:’ असा घाव घातला तर उरलेले आक्षेप घ्यायला आपल्याला संधी मिळणार नाही.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर
गादीवर बसल्यानंतर नैतिकता सोयीपुरती
‘‘सांगे ‘वडिलांची’ कीर्ती!’’ हा अग्रलेख वाचला. घराणेशाही, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, उदयोन्मुख नेतृत्वाला डावलणारीच असते. गादीवर बसल्यानंतर नैतिकता ही मागे टेकण्यापुरती उरते. पूर्वीच्या काळी राजाचा मुलगा राजकुमार, प्रधानाचा मुलगा प्रधान, पाटलाची बायको पाटलीण, असा सरंजामी थाट असे. आज पेशवाई, मोगलाई, सरंजामशाहीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते.
– श्रीनिवास डोंगरे, दादर (मुंबई)
आवाजाच्या आनंदापुढे कायदा केविलवाणा
‘अजान बंदी, की आवाज बंदी’ हे विश्लेषण (२० एप्रिल) वाचले. एक सजग नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य किती जबाबदारीने पार पाडतो, याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्याकडे कोणीही, केव्हाही, कधीही कायदे आणि नियम पायदळी तुडवून प्रचंड मोठय़ा आवाजात आपला आनंद साजरा करतात. किंबहुना, आपल्याला मोठय़ा आवाजात भोंगा लावल्याशिवाय आनंदच साजरा करता येत नाही. डीजेचा आवाज किमान अर्धा किलोमीटपर्यंत पोहोचेल, एवढा असतो. स्थळ, काळ, वेळ कशाचेही भान राखले जात नाही. या डीजेंना परवानगी देणाऱ्या यंत्रणा एकदा परवानगी दिली, की आपली जबाबदारी संपली, अशा आविर्भावात असतात. रात्री १० नंतरसुद्धा हा धुडगूस बिनबोभाट सुरू असतो. तक्रार केली की तेवढय़ापुरते पोलीस येतात, पण त्यांची पाठ वळली की पुन्हा आवाज सुरू होतो. अशा वेळी कायदा वगैरे, जो आपल्याकडे क्वचितच पाळला जातो, तो केविलवाणा ठरतो.
– संजय जाधव, देवपूर (धुळे)
ध्वनिप्रदूषण सगळेच जण तर करतात
सध्या भोंग्यांवरून वाद सुरू असला, तरी मूळ मुद्दा हा न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजावरील मर्यादेचा आहे. आवाजाची पातळी ७० डेसिबलपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. भोंगे नसलेल्या अनेक मंदिरांत घंटा बडवून कित्येक तास पठण व आरत्या केल्या जातात आणि आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. त्या मानाने मशिदी व चर्चमध्ये फार थोडा वेळ आवाजाची पातळी वाढलेली असते. लाफ्टर क्लबसुद्धा पहाटे साखरझोपेतून जागे करतात. त्यांच्याविरोधात तक्रारीही होत असतात. सर्व धर्मीयांच्या सण समारंभांत, उत्सवांत आणि कार्यात आवाजाची मर्यादा नेहमीच ओलांडली जाते. सुजाण नागरिकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा.
– सुरेश चांदवणकर, मुंबई
धर्माचरणाचा हक्क जबाबदारीसह आहे
‘अजान’ बंदी की ‘आवाज’ बंदी? हे विश्लेषण (२० एप्रिल) वाचले. सध्या मशिदींतील ध्वनिवर्धकांना काही राजकीय पक्षांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. यामागे निव्वळ राजकारण आहे हे खरेच. परंतु तरीही त्यामुळे ध्वनिवर्धकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ मध्ये ‘धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क’ स्पष्ट केला आहे. नागरिकांना आपापल्या धर्माचा प्रचार-प्रसार आणि धार्मिक प्रथांचे पालन करण्याचा अधिकार आहे. परंतु असे करत असताना सामुदायिक हिताला बाधा येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीदेखील नागरिकांचीच आहे. मुळात प्रार्थना करण्यासाठी भोंग्याची आवश्यकताच नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धर्मस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी ‘स्वच्छ वातावरणात जीवन जगणे’ हादेखील अनुच्छेद २१ मध्ये अध्याहृत असलेला मूलभूत अधिकार आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील ध्वनिवर्धकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या या मूलभूत हक्काची पायमल्ली होत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर भोंग्यांचा वापर हा ‘ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यातील’ तरतुदींच्या अधीन राहूनच झाला पाहिजे.
नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याची तयारीही प्रशासनाने दाखवली पाहिजे. एकंदरीतच, धर्माचरणाच्या हक्काचा उपभोग हा व्यक्तिगत पातळीवर घ्यायचा असून त्यामुळे लोकस्वास्थ्य बिघडणार नाही, याची दक्षता घेणे ही समाजाची जबाबदारी आहे. ‘स्वच्छ आणि निरोगी वातावरणात जीवन जगण्याच्या अधिकारा’शी तडजोड होऊ शकत नाही.
– गणेश शशिकला शिंदे, औरंगाबाद
आवाज नाही, प्रार्थना महत्त्वाची
मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद करण्यात आल्याची बातमी वाचनात आली. खूप चांगला निर्णय आहे. खरेतर मशिदींवरील भोंगे सरसकट कायद्याचे उल्लंघन करत असताना याआधी या विषयावर कोणीच कसे बोलले नाही, याचे आश्चर्य वाटते. ध्वनिप्रदूषणाला धार्मिक रंग नको, पण कायदा सर्वाना समान असतो ना? मोहम्मद पैगंबरांनी किंवा त्यांच्या शिष्यांनी अजानसाठी भोंग्यांचा वापर केला नव्हता. त्या काळी भोंगाच अस्तित्वात नव्हता. मग इस्लामचे मूळ स्वरूप टिकवू इच्छिणाऱ्या मुल्लामौलवींवर भोंग्याचा वापर करण्याची वेळ का बरे यावी? सौदी अरेबियात मशिदीबाहेरील भोंग्यावर बंदी आहे. मुळात प्रार्थना महत्त्वाची आहे, प्रार्थनेचा कर्कश आवाज नाही. कोणत्याही जात-पात-धर्म-पंथांच्या प्रार्थनास्थळांवर ध्वनिवर्धक लावता येऊ शकतो, पण आवाजाच्या पातळीवर मर्यादा हवी. हिंदू किंवा मुस्लीम म्हणून या प्रश्नाकडे न पाहता, भारताचे जबाबदार नागरिक म्हणून याकडे पाहिले पाहिजे. ध्वनिप्रदूषण हा गंभीर विषय असून तो सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे. सर्वानी एकत्र येऊन ध्वनिप्रदूषणाविरोधात काम करणे आवश्यक आहे.
– विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप (मुंबई)
प्रतिसादाचा वापर लोककल्याणासाठी व्हावा..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाणे येथे झालेल्या सभेत व याआधीही नमाजसाठी लावण्यात आलेल्या भोंग्यांविषयी जोरदार आवाज उठवला. त्यानंतर महाराष्ट्रासह काही राज्यांत ध्वनिप्रदूषणाविरोधात तातडीने पावले उचलली जाऊ लागलीत. मुंबईत ही ७२ टक्के मशिदींनी पहाटेचा भोंगा बंद करून प्रतिसाद दिला. याबद्दल राज ठाकरे यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
परंतु भोंगे न हटवल्यास मशिदींपुढे हनुमान चालीसा पठण वगैरे पद्धत रूढ करणे, हे जरा अतिच होत आहे. देव हा मनात असावा. त्याच्या भक्तीचे जाहीर प्रदर्शन सर्वथा अनुचित वाटते. एखादी समस्या आग्रहपूर्वक पुढे नेली तर ती नक्कीच मार्गी लागते. हे या घटनेवरून सिद्ध होते. तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा योग्य फायदा जनकल्याणहितार्थ अनेक गोष्टींसाठी करून घ्यावा असे वाटते. दादरचे कीर्तिकर भाजी मार्केट, जे कधीकाळी मराठी विक्रेत्यांचे होते ते पुन्हा त्यांना मिळवून देता येते का पाहावे. आज मराठी बेरोजगार युवक वडापाव गाडीच्या पलीकडे जाऊ शकलेला नाही. तो पुढे जावा यासाठी प्रयत्न करावेत. धर्मपूजेपेक्षा कर्मपूजा महत्त्वाची आहे हे जनतेच्या मनावर बिंबवावे. सध्याचे ज्वलंत प्रश्न- इंधनदरवाढ, भाज्या, अन्न- धान्य दरवाढ, महागाई, बेरोजगारी इत्यादीवर जोरदार आवाज उठवावा. आपला करिष्मा वापरून संबधित सरकारांना आता जागे कराच.
विद्या पवार, मुंबई