‘मशिदींवरील भोंगे काढा’ ही बातमी (लोकसत्ता – ३ एप्रिल) वाचली. राज ठाकरे यांनी भाषणात अगदी योग्य मुद्दा मांडला. धर्मश्रद्धेतील आचरटपणा म्हणून आणि ध्वनिप्रदूषणाचा अतिरेक म्हणून असे भोंगे बंद व्हायलाच पाहिजेत. पण ‘भोंगे बंद नाही झाले तर त्याच्या डबल आवाजात हनुमान चालीसा वाजवा,’ असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले हे मात्र अजीर्ण झाले. म्हणजे भक्तीत, श्रद्धेत लोक/कार्यकर्ते आंधळे झालेले असतातच; काही दिवसांनी ते बहिरेही होतील. आजार आणि उपचार दोन्ही भयानकच.
शिवाजी पार्क हे तर घोषित शांतता क्षेत्र आहे. तिथे तास-तास भर भाषणे ठोकायची, तुताऱ्या वाजवायच्या, फटाके फोडायचे; तेव्हा नागरिकांना त्रास होत नसेल का? ‘भोंग्यासमोर भोंगा’ हाच तर्क लावायचा ठरवला तर शिवतीर्थाच्या (शिवाजी पार्क) चहुबाजूच्या इमारतीतील रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर ‘डीजे’ लावावा का? (सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहता कदाचित अशा इमारतींचेही कुणी संघटन करतील, विरोधाला विरोध म्हणून ‘डीजे’सुद्धा लावला जाईल. असच सुरू राहिलं तर शाश्वत उपाय मिळेल का?) वास्तविक भोंग्याबाबत कोर्टाने निर्णय दिलेला आहे, आणि ‘शिवाजी पार्कचा वापर राजकीय सभांसाठी नको’ असाही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहेच. आता गरज आहे ती त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची. कुणी अंमलबजावणी करण्याचे धाडस दाखवले तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची. पण ध्रुवीकरणाच्या राजकारणात एक नवी झुंड निर्माण करणे सोयीचे दिसते आहे. झुंडीला विवेकाचे वावडे असतेच पण नेतृत्वानेही विवेक सोडला तर मात्र समस्या अजून गंभीर होत जातील.
– शिवप्रसाद महाजन, ठाणे
आम्ही म्हणू तेच आणि तसेच..
मुंबई मेट्रोच्या पुढील टप्प्याच्या उद्घाटनाचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या त्या प्रसंगीच्या भाषणावर आधारित ‘बुलेट ट्रेनला जागा मागता, मग कारशेडला का देत नाही?’ या शीर्षकाखालील वृत्त (लोकसत्ता- ३ एप्रिल) वाचून, काही दिवसांपूर्वी संसदेतील चर्चेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कारभाराविषयी केलेल्या, ‘आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे, आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे..’ या वक्तव्याची आठवण झाली. केंद्रातील सत्ताधारी व महाराष्ट्रातील विरोधी पक्ष ‘आम्हीच फक्त विकास करू, इतरांना तो अधिकार नाही’ या अहंगंडाने पछाडलेले दिसते आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली खंत हेच सांगणारी आहे. दिल्ली राज्यातील (केजरीवाल यांच्या) सरकारची काहीशी अशीच मुस्कटदाबी होताना आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी राज्याच्या प्रश्नांबाबत एकत्र न येता विविध पक्षांत विभागले गेलेले, तसेच पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळणारे असल्याचे दृश्य पाहावे लागणे जनतेच्या नशिबी असणे खरोखरीच दुर्दैवी आहे.
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)
नेत्यांनी आता तरी परिपक्वता दाखवावी
एकाला सत्ता राखायची आहे तर दुसऱ्याला येनकेनप्रकारेण सत्तेवर यायचे आहे आणि इतरांना फक्त गोंधळ घालायचा आहे म्हणजे राज्यातील परिस्थिती बिघडली की हे शिमगा करायला मोकळे! समजदार म्हणवणाऱ्या नेत्यांनी पोरकटपणाची हद्द ओलांडली असून भडकत्या महागाईकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. आज सामान्य माणसाची संसाराचे गाडे ओढताना दमछाक होत असून सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या पुढल्या पिढय़ांची सोय करून ठेवल्यामुळे त्यांना महागाईशी सोयरसुतक नाही. कुणी ‘टोला बॉम्ब’, कुणी ‘टोमणा बॉम्ब’ तर कुणी ‘भडकाऊ बॉम्ब’मध्ये मश्गूल असताना राज्यामधील चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनाही ‘टीआरपी बॉम्ब’ने पछाडलेले आहे, पण कुणालाही विकासाचा मुद्दा हातात घ्यावासा वाटत नाही आणि एवढे करूनही प्रत्येकजण साळसूदपणाचा आव आणून जनतेला मूर्ख बनविता येते या खुशीत आपापले चेहरे टीव्हीवर झळकण्यासाठी आटापिटा करीत आहेत. थोडक्यात महाराष्ट्राची प्रतिमा नेत्यांमुळे बिघडली असून या नेत्यांनी आता तरी परिपक्वता दाखवावी एवढीच अपेक्षा.
– अरुण का. बधान, डोंबिवली
असे ‘प्रश्नचिन्ह’ लोकशाहीसाठी मारक
‘सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह : सरन्यायाधीश’ हे वृत्त (लोकसत्ता – २ एप्रिल) वाचले. एकीकडे आपण लोकशाही राष्ट्र म्हणून मिरवत असतो आणि दुसरीकडे नकळत आपले वागणे हे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत असते. हेच सध्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लागू पडत आहे. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असू दे; सीबीआय, ईडी यांसारख्या संस्था या केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनत चालले आहेत. याआधीही- संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत होते त्यावेळीही- या यंत्रणांचा वावर संशयास्पद होता.
या संस्थांतील पारदर्शकता दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. सरन्यायाधीशांनी या सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे या संस्थांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट लक्षण. केंद्र सरकारनेही या संस्थांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेणे लोकशाही राष्ट्रासाठी मारक आहे. यापुढेही या संस्था अशाच पद्धतीने कार्यरत राहिल्यास केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्यातील गुन्हेगार बेफिकीर राहतील आणि विरोधी बाकावर असणारे कायम या यंत्रणांच्या रडारवर असतील हे मात्र निश्चित!
– श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे
केंद्र सरकारवरील आरोपांना बळकटी
‘सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह’ या शीर्षकाची बातमी (लोकसत्ता- २ एप्रिल) वाचली. काही प्रकरणांतील कृतिशीलता आणि निष्क्रियता यांमुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त कोहली स्मृती व्याख्यानात बोलतानाच नोंदविले आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘िपजऱ्यातील पोपट’ म्हणून संबोधले होते. अलीकडच्या काळात केंद्र सरकार सीबीआय, ईडी, प्राप्तिकर खाते यांच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचे आरोप होत आहेत. सरन्यायाधीशांच्या टिप्पणीमुळे वरील आरोपांना बळकटी मिळत आहे.
– शान्ताराम मंजुरे, अंबरनाथ पश्चिम (जि. ठाणे)
आनंद आहेच, पण काळजीही घ्यावी
‘तरिही वसंत फुलतो..’ हे रसपूर्ण काव्यपंक्तींनी ओथंबलेले ‘शनिवारचे संपादकीय’ (२ एप्रिल) वाचले. वसंताच्या आगमनाची दवंडी पिटणारा गुढीपाडवा सोबत ग्रीष्म ऋतूही घेऊन येतो. पण आपण जशी कडूिलबाची चटणी प्रथम खाऊन नंतरच गोडाचे गुढीपाडव्याला खातो तसेच उन्हाळय़ाचेही स्वागत करतो. यावर्षी तर गुढीपाडवा खास आहे .. यंदा करोना महामारीपासून लांब येण्याचा आनंद नक्कीच आहे; पण त्याचवेळी तो पुन्हा जवळ येऊ नये म्हणून काळजी घेणेही आवश्यक आहे.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)
कोकिळेने शिकवावे वसंताचे गीत!
‘तरिही वसंत फुलतो..’ हे संपादकीय (२ एप्रिल) मनाला उभारी आणणारे होते. करोनाकाळात आप्तेष्टांच्या अकाली निधनामुळे, दु:खित मनोवस्थेत, प्रदूषण कमी झालेल्या पार्श्वभूमीवरील वसंत ऋतूचे आगमन होऊनही त्याकडे आपले लक्षच गेले नाही. हा वसंत त्या भयशंकांपासून दूर आहे. ‘पिको वसन्तस्य गुणं न वायस:’ म्हणजेच कोकिळेला सर्वप्रथम वसंतऋतूची चाहूल लागते. ऋतुराज वसंतातच फळांचा राजा आम्रवृक्षावर मोहोर बहरतो व आपण सगळेच आमरसाची उत्सुकतेने वाट बघत असतो. हा वसंत ऋतू आपल्याला निसर्गाकडे परत जाण्यासाठी प्रेरणा देतो. पानगळ या गीतात कवयित्री इंदिरा संत यांनी वसंत ऋतूचे परिपूर्ण असे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेत देवचाफा, मोगरा, जास्वंदी, बहावा अशा बहुरंगी फुलांच्या वर्णनानंतर कोकिळेचा उल्लेख येतो..
‘‘‘कुहू’ गाऊन कोकिळा । करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते । शिकव ना मला गीत’’ (कवयित्री इंदिरा संत)
– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली
ही तर ‘स्युडो हिंदूत्वा’ची रणनीती!
रवींद्र माधव साठे यांना (‘राष्ट्रभाव’ सदरातील १ एप्रिलच्या लेखात) या देशात अस्तित्वात असलेली संमिश्र संस्कृती नाकारून केवळ ते सांगतात ती एकारलेली संस्कृती देशात निर्माण करायची आहे व त्यास ते भारतीय संस्कृती हे नाव देत आहेत. साठे जे सांगतात तेच संघाचे ध्येय आहे. देशात विविध प्रांतांत जी संस्कृती आहे ती नाकारून त्यांना एकच संस्कृती निर्माण करायची आहे. यालाच संघ हिंदूुत्व म्हणतो, जे सावरकर यांच्या विचारापेक्षा वेगळे आहे.
वस्तुत: विविध प्रांतांत राहणाऱ्या जनसमूहांच्या चालीरीती, पूजा पद्धती, खाद्य व वेश परिधान पद्धती यात विविधता आहे. ती त्यांची संस्कृती आहे. हे सर्व जनसमूह स्वत:ला हिंदू म्हणत असले तरी एकमेकांचा सम्मान व आदर करणारी ही माणसे उदारमतवादी हिंदू आहेत. पण संघाला हे मान्य नाही, त्यांना कट्टरता मान्य असलेली नवी हिंदू संस्कृती निर्माण करायची आहे. आज रणनीती म्हणून ‘भारतीय संस्कृती’ असे साठे त्यास म्हणत आहेत.
एकंदरीत, साठे यांचे प्रतिपादन हे ‘स्युडो हिंदूत्व’ आहे. सामान्य जनता जो धर्म मानते तो हिंदू धर्म विशाल व उदारमतवादी आहे व संघापेक्षा वेगळा आहे. – संजीव साने, ठाणे