नैतिकता रसातळाला गेली, पुढे काय? 

‘तीन पक्षांचा तमाशा’ हा संपादकीय लेख (१२ नोव्हेंबर) वाचला. गोवा, मणिपूर, मिझोराम, कर्नाटक आणि हरियाणा येथे भाजपने जनमताची केलेली पायमल्ली आणि मागील पाच वर्षांत भाजपचे केन्द्रीय नेतृत्व व मुख्यमंत्री यांनी शिवसेनेला आणि पक्षांतर्गत विरोधकांना खच्ची करण्याचा केलेला प्रयत्न आणि इतर पक्षांतून ज्यांना भ्रष्ट म्हणून हिणवले त्याच नेत्यांची केलेली आयात हे सारे लक्षात घेतले तर, शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी ही भाजप व पीडीपीएवढीच ‘अनैसर्गिक’ ठरते! भाजपने घडविलेल्या रालोआमध्ये समाजवादी साथी, अकाली दल, अण्णाद्रमुक तेलुगु देसम इ. २४ पक्ष ‘काँग्रेसविरोध’ या मुद्दय़ावर एकत्रित आणले होते. मग ‘भाजपविरोध’ या मुद्दय़ावर प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत आघाडीत सामील झाले तर ती अनैसर्गिक कशी? एकपक्षीय सरकारपेक्षा आघाडी सरकारांचा कारभार अधिक लोकाभिमुख असतो हा आपला अनुभव आहे.

वाजपेयी यांच्या काळात भाजपने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून ‘नॅशनल अजेंडा ऑफ गव्हर्नन्स’आधारे कारभार केला होता. तसेच महाराष्ट्रात ‘किमान समान कार्यक्रम’आधारे तीन पक्षांचे सरकार कारभार करू शकेल. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे घोडेबाजाराला अटकाव करण्यासाठी ते आवश्यक ठरते.

राजकारणात नैतिकता रसातळाला गेली असताना कमीत कमी वाईट निवडणे एवढाच प्राप्त परिस्थितीत पर्याय आहे. राष्ट्रपती राजवट किंवा पुन्हा निवडणुका यापेक्षा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सरकार स्थापनेसाठी संधी देणे हेच योग्य.

– अ‍ॅड्. वसंत नलावडे, सातारा

आता शहाणपणाची अपेक्षा पवारांकडूनच

‘तीन पक्षांचा तमाशा’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. जर आपल्या विरोधकांसोबतच सत्ता स्थापन करायची असेल तर निवडणुका तरी कशाला? आणि कशाला त्या पोकळ विचारधारा ज्या राजकीय समीकरणे पाहून बदलल्या जातात? मागील पाच वर्षे दुय्यम वागणूक मिळाली तरी सेनेने भाजपचा हात सोडण्याची हिंमत दाखवली नाही. विधानसभेत कमी जागा दिल्या तरी सेनेने ते गोड मानून घेतले आणि आज मात्र भाजप कोंडीत सापडल्यावर शिवसेनेचा आत्मसन्मान जागा झाला. सत्तास्थापनेच्या घोडेबाजारात आपले आमदार फुटतील याची काँग्रेस पक्षाला भीती आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनदेखील कोणतीही चांगली अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात शहाणपणाची अपेक्षा सध्या तरी शरद पवार यांच्याकडून आहे.

– ऋषिकेश क्षीरसागर, कोंढवा, पुणे

काँग्रेस, राष्ट्रवादीचाही फायदाच!

‘तीन पक्षांचा तमाशा’ हा अग्रलेख वाचला. भाजपने व त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधकांबरोबर मित्रपक्षही संपवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम आहे की, भारतीय जनता पक्ष आज १०५ जागा जिंकूनही सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजपने गेल्या पाच वर्षांत शिवसेनेला केंद्रात ना कुठले चांगले खाते दिले ना राज्यात सत्तेचा योग्य वाटा दिला. आज भाजप महाराष्ट्रात सत्तेच्या बाहेर राहत असेल तर यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांचाही मोठा फायदा आहे.

– संकेत सतीश राजेभोसले, शेवगांव (जि. अहमदनगर)

दिल्लीत बसून महाराष्ट्राचे राजकारण!

महाराष्ट्रात काँग्रेसचे जे वाटोळे होत आले ते केवळ याच दिल्लीतील तथाकथित नेतेमंडळींमुळे, जे कधीही स्वत: निवडून येत नाहीत, ना कुणाला निवडून आणू शकत. आजचे जे आमदार आहेत त्यांपैकी काही स्वत:च्या कर्तृत्वावर, तर बाकीचे शरद पवारांच्या झंझावातावर निवडून आले आहेत. त्यात या एसीत बसून महाराष्ट्राचे राजकारण करणाऱ्यांचे योगदान ते काय!

– मिलिंद तांबे, मुलुंड

तेलही गेले आणि तूपही..

मुरब्बी राजकारण्यांच्या डावपेचात शिवसेना पूर्णपणे मुरली गेली नाही आणि वैयक्तिक अट्टहास करताना स्वबळाच्या अभ्यासाभावी सत्तेचे तेलही गेले आणि तूपही.. अशी अवस्था ओढविलेल्या शिवसेनेने स्वत:च आपली कोंडी करून घेतली आहे.

– राजन पांजरी, जोगेश्वरी (मुंबई)

(शिवसेनेसंदर्भात, ‘तेलही गेले आणि तूपही’ याच म्हणीचा उल्लेख अखेरच्या वाक्यात करणारी पत्रे अजित परमानंद शेटय़े – डोंबिवली पूर्व, अनिरुद्ध बर्वे- कल्याण पश्चिम, प्रवीण हिर्लेकर- मुंबई यांनीही पाठविली आहेत.)

तीन नव्हे, चार पक्षांचा तमाशा

‘तीन पक्षांचा तमाशा’ हे संपादकीय (१२ नोव्हें.) वाचले. अमित शहा यांच्यासमोर फडणवीस यांनी कबूल केले होते की, सत्तेचे समसमान वाटप होईल. (या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे.) मग इतके ताणून धरण्याचे कारण काय? निवडणुकीपूर्वी अमित शहा महाराष्ट्रात येऊन म्हणून गेले की, भाजप आणि शिवसेना यांचे नाते राजकारणाच्या पलीकडचे आहे! नक्की युती आणि मत्रीचा अर्थ काय होतो ते भाजपने सांगावे.  राजकारणातील आकस्मिक मत्रीची उदाहरणे कमी नाहीतच. पण बाळासाहेब ठाकरे यांनी तीन वेळा काँग्रेसला मदत केलेली आहे- (१) आणीबाणीच्या वेळी. (२) प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या तेव्हा बाळासाहेबांनी ‘मराठी माणूस’ हा मुद्दा पुढे केला व भाजपच्या विरोधात जाऊन काँग्रेसला मदत केली. (३) प्रणब मुखर्जी काँग्रेसतर्फे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते तेव्हा शरद पवार मुखर्जीना ‘मातोश्री’वर घेऊन गेले व बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. तसेच पुणे महानगरपालिकेतील ‘पुणे पॅटर्न’ हा बाळासाहेबांच्या हयातीतला आहे.

सेना-भाजप युती ही आजच्या घडीला साप आणि मुंगसाची युती आहे, हे दोन्ही पक्षांच्या वक्तव्यांतून समजून येते. जर शिवसेनेची अट भाजपने मान्य केली असती तर आता सरकार कामाला लागून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तरी मिळाली असती.

त्यामुळे हा तीन नव्हे तर चार पक्षांचा तमाशा झालेला आहे आणि यास भाजपचा आडमुठेपणाच कारणीभूत आहे! आणि याचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसला आहे.

– चंद्रशेखर चांदणे, मु.पो. निमगाव केतकी (ता. इंदापूर, जि. पुणे)

ध्येयधोरणांना मूठमाती हाच योग्य पर्याय

‘तीन पक्षांचा तमाशा’ हे संपादकीय (१२ नोव्हेंबर) वाचले. त्यात म्हटल्याप्रमाणे, खरोखरच आपापल्या पक्षांच्या ध्येयधोरणांना मूठमाती देत काही तरी ठोस निर्णय घेऊन, मतदारांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांना तरी जे काय करायचे ते विनाविलंब करा. आपली ध्येये, आपली धोरणे यांना पाच वर्षांसाठी मूठमाती द्या व तात्काळ राज्य स्थापन करा.

– धोंडिरामसिंह ध. राजपूत, वैजापूर (औरंगाबाद)

युतीच्या विरोधकांनीच राष्ट्रपती राजवट आणली!

भाजपला ७२ तास दिले आणि आम्हाला २४ तासच दिले हे म्हणणे बालिशपणाचे आहे. देशपातळीवरील ज्येष्ठ नेते हे तात्कालिक फायद्याचा विचार करत नाहीत हे ओळखायला शिवसेना पक्षप्रमुख कमी पडले असे वाटते. जोवर भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत तोवर आपले भवितव्य उज्ज्वल होणार नाही हे विरोधकांना पक्के माहीत आहे. शिवाय, भाजपने काश्मीर, राम मंदिर, तीन तलाक हे वर्षांनुवर्षे भिजत ठेवलेले प्रश्न सोडवल्यामुळे आता या विरोधकांकडे मुद्देच शिल्लक राहात नाहीत. त्यामुळे सेनेचे परतीचे दोर कापून त्यांना वेगळे ठेवायचे आणि राष्ट्रपती राजवटीनंतर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे हे राजकारण यामागे आहे.

– रमण गांगल, कर्जत, रायगड

ठिसूळ पायावरील युती

युतीला स्पष्ट बहुमत आणि काँग्रेस आघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा स्पष्ट कौल राज्यातील मतदारराजाने दिला. मात्र राज्यातील जनतेला १६-१७ दिवस उलटूनदेखील ‘आपले सरकार’ मिळू नये? केवळ मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना यांनी अगदी तुटेपर्यंत ताणले. तेव्हा या युतीचा पाया किती ठिसूळ होता हे दिसून आले आहे.

– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

राजकीय खेळींत ‘अनैतिक’ काही नाही..

‘तीन पक्षांचा तमाशा’ (१२ नोव्हेंबर) या अग्रलेखातून सोमवारी संध्याकाळपर्यंत ज्याची चर्चा सुरू होती त्या तीनपायी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यासाठी भूतकाळातील काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे, पण राजकीय खेळी या भूतकाळावर अवलंबित नसून त्या वर्तमानाचा ‘योग्य’ वापर करून भविष्याचा वेध घेण्यासाठी खेळल्या जातात. राजकारणात नैतिकता असलीच पाहिजे, पण राजकीय खेळीत नैतिकता पाळण्याची फोल अपेक्षा करणेच चुकीचे. शिवसेनेची विचारसरणी आणि काँग्रेसची विचारसरणी जुळेल का? ही आघाडी टिकेल का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भूतकाळातील दाखले देणे राजकीयदृष्टय़ा योग्य नाही. सद्य:स्थितीचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची ‘भाजपविरोध’ ही एक सामाईक विचारसरणी आहे. सूडबुद्धीने पेटलेल्या भाजपची कोंडी करण्यासाठी सर्व नैतिकता बाजूला ठेवणे हीच राजकारणातील गुरुकिल्ली ठरेल. नाकासमोर चालणाऱ्याच्या हाती राजकारणात काहीही मिळत नाही, उलट चालतचालता शेजारच्याचे नाक दाबून तोंड उघडायला लावणे म्हणजे राजकारण! आणि यात अनैतिक असे काहीच नाही.

– अमोल जनार्दन देसाई, गारगोटी (जि. कोल्हापूर)