फुले, आगरकर

महात्मा फुले यांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता, तर तो ब्राह्मणशाहीला व पुरोहितशाहीला होता आणि तोही तत्कालीन विशिष्ट परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया म्हणून होता.

महात्मा फुले यांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता, तर तो ब्राह्मणशाहीला व पुरोहितशाहीला होता आणि तोही तत्कालीन विशिष्ट परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया म्हणून होता. मात्र त्यांनी निर्मिक या नावाने ईश्वराचे अस्तित्व मानले होते हे  खरे आहे. तर मानवी नीतिशास्त्राची उभारणी, धर्म किंवा ईश्वर या कल्पनांवर आधारित करणे आगरकरांना मान्य नव्हते. ईश्वराची व विश्वाची हेतुगर्भताही त्यांना मान्य नव्हती.
‘आधुनिक भारत देशाचे पहिले महात्मा’ हे स्थान ज्यांना खरेच शोभून दिसते असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले (इ.स. १८२७ ते १८९०) हे होत. अनेक चुकीच्या रूढी-परंपरांनी ग्रासलेल्या व त्यामुळे परकीयांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या, भारतातील बहुसंख्याकांचा धर्म असलेल्या ‘हिंदू’ या धर्मातील दोषांवर कडाडून पहिला हल्ला चढविणारे व त्याद्वारे ‘मानवी समानतेची’ घोषणा करणारे अशी व्यक्ती म्हणजे फक्त ‘महात्मा फुले’च होत. त्यांच्या नंतरच्या महात्मा गांधींनीही त्यांना ‘खरा महात्मा’ म्हटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना ‘थोर समाज क्रांतिकारक’ म्हणून गौरविले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गौतम बुद्ध व कबीर यांच्यासारखेच गुरुस्थानी मानले. खरेच जोतिबा हेच भारतीय समाजक्रांतीचे आद्य जनक होते.
जोतिबा फुले हे मोठे बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. हिंदू धर्मातील मध्ययुगीन समाजरचना ही नि:संशय ‘अन्यायकारक’ असून ती ‘उखडून टाकली पाहिजे’ असे सांगून त्यांनी स्वत: त्या दिशेने पावले टाकली. परंपरागत हिंदू समाज चातुर्वण्र्य व जातिभेदाच्या पायावर उभा होता व तत्कालीन विचारवंतांनासुद्धा त्यातील दोष दिसत नव्हते व अन्याय कळत नव्हते. उत्तरकालीन पेशवे जे मुळात बेजबाबदार राज्यकर्ते होते आणि उघडपणे ब्राह्मणी वर्चस्वाचे पुरस्कर्ते होते, त्यांचे राज्य जाऊन परकीय ब्रिटिश सत्ता आली होती; तरीही आम जनतेत वर्णीय अहंकार आणि विषमता टिकून होती. अशा त्या काळात, सामाजिक अन्यायांवर निकराने घणाघाती घाव घालण्याचे काम फक्त जोतिबांनीच केले.
एकीकडे जोतिबा ‘ब्राह्मणी वर्चस्वावर’ तुटून पडत होते आणि दुसरीकडे शूद्रांना ‘उठा, ज्ञान मिळवा आणि आपला समानतेचा हक्क बजावा’ असे जिवाच्या आकांताने सांगत होते. ख्रिस्ती, मुसलमान इत्यादी धर्माचे लोक जर त्यांचा धर्मग्रंथ केव्हाही वाचू शकतात, तर हिंदूंच्या पुरोहितांनी वेद आणि मनुस्मृतीची कशाला लपवाछपवी करावी, असा त्यांचा प्रश्न होता. याबाबत हे लक्षात ठेवावे लागेल की, फुल्यांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता, तर तो ब्राह्मणशाहीला व पुरोहितशाहीला होता व तोही तत्कालीन विशिष्ट परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया म्हणून होता. ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत फूट पडावी असे त्यांचे उद्दिष्ट नव्हते’ व तसे म्हणणे हा त्यांच्या विचारांचा विपर्यास म्हणावा लागेल. ‘मानवी समानता’ हे जोतिबांचे खरे उद्दिष्ट होते.
जोतिबा स्त्री-शिक्षणाचेसुद्धा कट्टे पुरस्कर्ते होते. सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांनी पहिली स्त्री-शिक्षिका घडवली. सोवळ्याओवळ्यावर आणि अंधश्रद्धांवर ते तुटून पडले. प्राथमिक शिक्षण सर्वाना सक्तीचे केले जावे, अशी मागणी त्या काळात त्यांनी केली (आणि तसे करणारे ते पहिलेच भारतीय होते.) त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे व कामगारवर्गाचे दु:खही त्यांनीच सर्वापुढे ठेवले. त्यांचे ‘सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक’ हा ग्रंथ ‘मानवी स्वातंत्र्याचा जणू जाहीरनामा’च म्हणावा लागेल. त्यांची ‘सत्यशोधक चळवळ’ हीच महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांपर्यंत पोहोचलेली पहिली समाजसुधारक चळवळ होय.
सगळेच धर्म व धर्मग्रंथ ‘मानवनिर्मित’ आहेत आणि विशिष्ट वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी ते तसे निर्मिलेले आहेत, असे जोतिबांनी सांगितले. फलज्योतिष, जारणमारण, भूतबाधा, कर्मकांड, संस्कार विधी, दैव, शुभाशुभ वगैरे सर्व श्रद्धा खुळचट आहेत आणि मंत्रतंत्रांची शक्ती, साधुसंतांचे चमत्कार, बाबाबुवांचे अंगारेधुपारे हे सर्व साफ ‘खोटे’ आहे, असे जोतिबांनी लोकांना ठणकावून सांगितले.
साधारणपणे असे मानले जाते व जात असे की, हिंदू समाजात दिसून येणारी उच्च-नीचता, ही पूर्वजन्मींच्या पाप-पुण्यामुळे किंवा ईश्वरी संकेतानुसार आलेली आहे. हजारो वर्षे जनमनात रुजलेली अशी ही समजूत जोतिबांनी साफ धुडकावून लावली. तसेच ‘अवतार’ म्हणजे ‘स्वत: ईश्वर मानवी रूपात अवतार घेतो’ ही हिंदूंची सुप्रसिद्ध व वैशिष्टय़पूर्ण कल्पनाही त्यांनी पूर्णत: त्याज्य ठरविली; परंतु त्यांनी निर्मिक या नावाने ईश्वराचे अस्तित्व मानले होते हे मात्र खरे आहे व त्यामुळे त्या अर्थाने त्यांना नास्तिक म्हणता येणार नाही. त्यांनी निर्मिक या नावाने ईश्वरच मानला होता, याबाबत काही शंका नाही; परंतु तो परंपरेने मानलेल्या ईश्वरासारखा मुळीच नव्हता; त्यांनी किंवा कुणी असा ‘निरुपद्रवी निर्मिक’ मानल्यामुळे काही नव्या-जुन्या अंधश्रद्धा निर्माण होण्याची शक्यता नव्हती, असेही म्हणता येईल. महात्मा फुलेंच्या निर्मिकाला मी ‘निरुपद्रवी’ म्हणतो ते अशासाठी की, तो काही जादू, चमत्कार करीत नाही, माणसाचे भविष्य ठरवीत नाही, रागावून आपल्याला ‘शाप’ देत नाही, की आपल्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन आपल्याला काही ‘वर’ही देत नाही. वेगळ्या शब्दांत असे सांगता येईल की, त्याला ‘अस्तित्व’ असले तरी ‘कर्तृत्व’ (उपयुक्त किंवा उपद्रवी किंवा कसलेही कर्तृत्व) मात्र नाही. काही आस्तिकांनी मानलेला असा, आपले भाग्य न ठरविणारा हा निरुपद्रवी ईश्वर, कदाचित अनेक निरीश्वरवाद्यांनाही मान्य होईल असा होता, पण ते सर्व राहो.
गोपाळ गणेश आगरकर (१८५६ ते १८९५)
सुधारकाग्रणी आगरकरांना लाभलेल्या अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या धर्मविषयक चर्चेने, तत्कालीन आत्मसंतुष्ट महाराष्ट्रीय समाजाला त्यांनी असे काही हलवून सोडले, समाजाच्या खुळचट धार्मिक समजुतींवर त्यांनी असे काही प्रहार सातत्याने केले, की त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक विचारवंत आत्मपरीक्षण करून ‘पुरोगामी’ दिशेला वळले असे म्हणावे लागते. त्यांच्यानंतरच्या पिढीतील सर्व पुरोगामी लेखक आणि कार्यकर्ते त्यांना सुधारकाग्रणी म्हणतात व त्यांना आपले स्फूर्तिस्थान मानतात ते त्यामुळेच होय. हिंदू धर्मातील विचारांमध्ये व कर्मकांडांमध्ये काल्पनिक ‘पारलौकिक जीवनाला’ दिले जाणारे महत्त्व व भर त्यांना अजिबात मान्य नव्हता. परलोकविषयक तर्ककुतर्क करीत, ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष करणे त्यांना आत्मघातकीपणाचे वाटले. आमचे आजचे निर्णय घेण्यासाठी, जुन्या ग्रंथांवर विसंबण्याऐवजी, ते काम आपण विज्ञानावर सोपविले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. समाजशिक्षक या त्यांच्या भूमिकेतून ते समाजाला असे सांगू इच्छित होते की, पुढे येणाऱ्या काळात जुन्या ग्रंथांचे प्रामाण्य नष्ट होईल, व्हावे आणि कुठल्याही परिस्थितीत आपण नवीन काळाला नवीन विचारांनी सामोरे गेले पाहिजे.
‘मनुष्य केव्हा तरी परिपूर्ण अशा सत्ययुगात सुखी होता आणि आता तो दुर्दैवी कलियुगात दु:खी आहे’ हा हिंदू धर्मातील विश्वासही आगरकरांना अमान्य होता. याउलट माणसाचा प्रवास हा रानटी अवस्थेतून हळूहळू सुधारणांकडे होत आहे हा पश्चिमी प्रबोधनातील विश्वास त्यांना मान्य होता. त्याचप्रमाणे ‘धर्म व धार्मिक वृत्ती’ ‘दैवी’ नसून ‘मानवी’ आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. आजचे धर्म उद्या नाहीसे होऊ शकतील, असे ते म्हणत. जग परिवर्तनशील आहे व परिवर्तनाचा कर्ता माणूस आहे, अशी त्यांची धारणा होती.
मानवी नीतिशास्त्राची उभारणी, धर्म किंवा ईश्वर या कल्पनांवर आधारित करणे आगरकरांना मान्य नव्हते. ईश्वराची व विश्वाची हेतुगर्भताही त्यांना मान्य नव्हती. ‘नीती’ हे धर्मनिरपेक्ष शास्त्र मानले जावे आणि मानवी समाजाच्या नीतीला दैवी अधिष्ठानाची काहीही गरज नसावी, असे त्यांचे म्हणणे होते. थोडक्यात असे की, ‘नीती हा मनुष्य-समाजाचा प्रश्न असून त्यात ईश्वराच्या हेतूचा काही प्रश्नच उद्भवत नाही,’ असे ते म्हणत. त्यांच्या मते ‘मनुष्यतेचे ऐहिक सुखसंवर्धन’ हाच ‘सार्वत्रिक भावी धर्म’ असून त्यासाठी उपयुक्ततावादी व व्यक्तिस्वातंत्र्यवादी नीती असली पाहिजे.
आकाशातून देव येथे कधी आले नाहीत आणि येथून परत कधी गेले नाहीत; आम्हीच त्यांना येथे निर्माण करतो, त्यांचे गुणगान, भक्ती, तपश्चर्या करतो आणि वाटेल तेव्हा त्यांना विसरून जातो, असे आगरकर म्हणतात. ‘सत्याचा विजय होतो’ असे जे आपण मानतो त्याविषयी आगरकर म्हणतात की, ‘सत्यावलंबन हे बहुतेकांना मुळातच हितावह असल्यामुळे, जेव्हा त्या बहुतांचे प्राबल्य होते तेव्हा सत्याचा विजय होतो व उलटपक्ष प्रबळ असला तर सत्य दडपले जाते. आगरकर असेही म्हणालेले आहेत की, ‘आमच्या सांप्रतच्या इंद्रियास ‘ईश्वरस्वरूप’ अगम्य आहे.’ याचा अर्थ असा होतो की, आगरकर ‘ईश्वराचे अस्तित्व’ नाकारीत नाहीत व त्या अर्थी ते ‘नास्तिक किंवा निरीश्वरवादी’ नाहीत, तर ते ‘अज्ञेयवादी’ आहेत; परंतु कुठल्याही धर्माने वर्णिलेला ईश्वर व त्याचे कर्तृत्व मात्र त्यांना मुळीच मान्य नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahatma phule and gopal ganesh agarkar