श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, व्यसनी माणसालाही कधीतरी जाग येते आणि जाणवतं की आपल्या व्यसनामुळे आपलीच माणसं कशी कष्ट भोगत आहेत. त्यांच्या कष्टांच्या, त्रासाच्या, वेदनेच्या दु:खानं तो इतका कष्टी होतो की तो पुन्हा व्यसनात बुडून जातो! तसं अध्यात्मपथावरून विचलित झालेल्या माणसाचं मन भौतिक सुखाच्या व्यसनओढीनं व्यापलं असतं. त्याला कितीही समजावलं तरी ते सारे त्याला शब्दच वाटतात. त्या शाब्दिक ज्ञानानं त्याला जाग येत नाही. तरीही समर्थ सांगतात की, बाबा रे घरात कामधेनु असेल तर दारोदार ताक मागण्यासाठी फिरणारा मूर्खच असला पाहिजे. धेनु म्हणजे गाय ही दूध देते. त्या दुधाचंच दही, दह्य़ाचंच ताक आणि त्या ताकापासून लोणी मिळतं. इथं रामकृष्ण परमहंसांच्या रूपकाचीही आठवण येते. त्यांनी म्हटलं होतं की ताक कितीही घुसळत राहा लोणी वेगळं काढता येत नाही. एकदा ते लोणी काढलंत आणि मग लोण्याचा तो गोळा पाण्यात ठेवलात तरी तो बुडत किंवा विरघळत नाही. तो स्वतंत्रपणे तरंगतो. तर सारतत्त्व गवसलं तर धोका नसतो. ते गवसत नाही तोवर काही उपयोग नाही. तेव्हा इथे ताक शब्द वापरलाय तो प्रापंचिक ओढीसाठीच आहे. अशाश्वत प्रपंचातून शाश्वत तत्त्वाचं जे लोणी काढता येतं त्या लोण्याचा उल्लेख येथे म्हणूनच नाही! तेव्हा घरी म्हणजे हृदयात सर्वइच्छापूर्ती साधून देईल अशी सत्यसंकल्पाची शक्ती असतानाही अंतर्मुखता सोडून बहिर्मुख वृत्तीने दारोदारी लाचार होऊन प्रपंचसुख शोधत का फिरतोस? सत्संगती लाभूनही शाश्वत तत्त्व जाणून घेऊन त्या तत्त्वात रममाण होण्याऐवजी, हरिबोध म्हणजे सद्गुरूंचा बोध ऐकण्याचं आणि तो आचरणात आणण्याचं सोडून वितंडवादांत का रमतोस? हवं ते देणारा चिंतामणी लाभूनही त्याच्याकडे काचेचे तुकडे का मागतोस? हे काचेचे तुकडे म्हणजे रंगीबेरंगी प्रपंचासारखे. दिसायला मोहक, पण रूतले तर सहनशक्तीचा अंत पाहाणारे! जे आज ना उद्या सरणार आहे, नष्ट होणार आहे त्याचा कितीही संग्रह केला आणि तो कितीही जिवापाड जपला तरी त्यातून कायमचं सुख, कायमची निश्िंचती लाभणार नाही. मग कायमचं सुख, कायमची निश्चिंती, कायमचा आनंद मिळविण्याची क्षमता आपल्याच अंतरंगात असताना अशाश्वताची ओढ का, असं समर्थ विचारत आहेत. आता ६४व्या श्लोकात ते बुद्धीकडे, आत्मबुद्धीकडे वळतात आणि सांगतात की बुद्धी दृढ झाल्याशिवाय, स्थिर असल्याशिवाय प्रयत्नही दृढतेनं होऊ शकत नाहीत. जो अतिशय मूढ असतो त्याची बुद्धी अधिकच चंचल असते. त्यात चित्तात अशाश्वताशी जोडलेल्या, अशाश्वताच्या प्राप्तीच्या अनंत कामना प्रसवत असतील तर ते चित्त शाश्वत तत्त्वाच्या चिंतनात क्षणभरही स्थिर होऊ शकत नाही. नव्हे, असे चित्त त्या शाश्वताला क्षणभरदेखील धारण करू शकत नाही. मनात जर आत्यंतिक लोभ असेल, तर त्या हव्यासाचा अंत नाही. कारण लोभ हा कधीच तृप्त होत नाही. किती हवं म्हणजे पुरे, हे माणसाला माहीत नसल्याने कितीही मिळालं तरी त्याला ते पुरेसं वाटत नाही आणि त्याच्या हवेनकोपणातून निर्माण झालेला हव्यास संपत नाही. त्या लोभाची पूर्ती झाली नाही की मन क्रोधानं भरून जातं. त्यामुळे ज्याच्या मनात अत्यंत लोभ आहे त्याचं मन अखेरीस अत्यंत क्रोधानं भरून जाणार, यात काही शंका नाही. मन विषयांच्या ओढीनं भरून जात असेल तर त्या विषयांची पूर्ती ज्यायोगे होते, ज्या माध्यमातून साधते त्या माध्यमांची, त्या साधनांची लाचारी मनात निर्माण होणार. त्या लाचार भावनेतून विषयपूर्तीसाठी फरपट सुरू होणार. आत्मप्रतिष्ठा गमावलेलं जगणं अखेरीस दैन्यवाणंच होणार. मग तिथे शाश्वताचं चिंतन कसलं साधणार? एका मनात राम आणि काम हे दोन्ही नांदू शकत नाहीत!
-चैतन्य प्रेम