‘पोरकट आणि प्रौढ’ या अग्रलेखातील ‘भाजपचे सरकार राज्यात येणार आहे, असे दिसताच त्या पक्षास पािठबा देऊ करण्याचे राजकीय चातुर्य शरद पवार यांनी दाखविले’ हे विधान अजिबात पटले नाही. पवार यांनी भाजपला तथाकथित ‘महाराष्ट्राच्या स्थिरते’साठी बाहेरून पािठबा देण्याच्या प्रस्तावास अनेक कंगोरे असू शकतात. या खेळीचा संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी किती व देशाच्या, प्रामुख्याने अर्थखात्याशी संबंधित राजकारणाशी किती, हा चच्रेचा मुद्दा होऊ शकतो. पवारांच्या नीतीस ‘लोकसत्ता’ने चढविलेला प्रौढतेचा मुलामा खेदजनक वाटतो.
सतीश भा. मराठे, नागपूर

कर्तृत्व आणि नेतृत्वालाच संधी!
मतदार विचारपूर्वक मतदान करतात, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांनीही दाखवून दिले आहे. महाराष्ट्रासारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात यापुढे, ज्याच्याकडे कर्तृत्व आहे आणि जो नेतृत्व करू शकतो, अशांनाच मतदान करण्याचा विचार मतदार करू लागले आहेत. राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला लोकांनी दाद दिली. तशाच प्रकारची दाद महाराष्ट्राच्या मतदारांनी दिली आहे. तसे नसते, तर मुंबईतील एका मतदारसंघात भाजप विजयी आणि अन्य उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त, यांसारखी उदाहरणे घडलीच नसती!
ल. गो. जोशी, मुलुंड पूर्व (मुंबई)  

स्वार्थसाधनाच्या प्रेरणेचा सन्मान हवा!
‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टोबर) आणि त्या अनुषंगाने भाषिक अस्मितेच्या राजकारणावर आलेले अभिप्राय वाचले. निवडणुकीच्या काळात ‘लक्ष्मी’ हा शब्द ‘आजचे लक्ष्मीदर्शन’ (आणि त्याखाली त्या-त्या दिवशी पकडल्या गेलेल्या बेहिशेबी पैशांची माहिती) अशा काहीशा वाईट अर्थाने सतत चच्रेत होता. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचा सकारात्मक अर्थ आणि त्याचे भाषिक अस्मिताकारणातील महत्त्व याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे असे मला वाटते. लक्ष्मीला देवतेचा दर्जा देणे आणि तिचे पूजन करणे हा एका अर्थाने ‘स्वार्थसाधन करण्याच्या अंगभूत प्रेरणेचा सन्मान’ आहे. भाषिक अस्मितेसारख्या भावनिक मुद्दय़ांना या निवडणुकीत जनतेने महत्त्व दिले नाही याचा विचार या संदर्भात केला पाहिजे.
जेत्यांची भाषा टिकते असे म्हणतात. जगभर इंग्रजी भाषा पसरली ती काही कोणा इंग्रजाच्या भाषिक अस्मितेमुळे नव्हे. अनेक भारतीय आज चिनी किंवा जर्मन भाषा शिकतात, कारण त्यात त्यांना अनेक संधी दिसतात. मराठी भाषा आत्मसात करण्यात आणि तिचा वापर करण्यात अनेकांना अनेक आकर्षक संधी दिसतील अशी परिस्थिती निर्माण करण्याकरिता आपण काय केले याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण भाषिक अस्मिताकारण ज्यांना करायचे आहे त्यांनी या निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावे.  
प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

हे आज तरी पटेल?
‘एक ज्वलंत प्रश्न’ हे शनिवारचे संपादकीय (११ ऑक्टो.)  विचार-प्रवर्तक आहे.  या निमित्ताने, हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वा. सावरकरांचे यासंबंधीचे विचार जाणून घेणे योग्य ठरेल. हिंदू धर्मात रूढ असलेल्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवर त्यांनी ‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ या लेखात घणाघाती टीका केली आहेच; पण सावरकर हे  केवळ दुसऱ्याला उपदेश करणारे सुधारक नसून कर्ते सुधारक होते. त्यांचे मृत्युपत्र या दृष्टीने वाचण्यासारखे आहे.
मृत्युपत्रात स्वा. सावरकर लिहितात, ‘माझा मृत्यू होताच माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवर जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे माझे प्रेत शक्यतो माणसांनी आपल्या खांद्यावर वाहून नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये तर ते यांत्रिक शव-वाहिकेतूनच विद्युत-स्मशानात नेले जावे. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत.माझ्या निधनाविषयी कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंड-प्रदान, त्या पिंडांना काक-स्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ सावरकरांचा मृत्यू १९६६ साली म्हणजे सुमारे अर्ध-शतकापूर्वी झाला. म्हणजे त्यांचे हे क्रांतिकारक विचार त्या आधीचे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
त्यांचे हे विचार इतके क्रांतिकारक आहेत की आता सुमारे अर्ध-शतक उलटून गेल्यानंतरही हे विचार पटणे आणि पचणे हे त्यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींसाठी फारच अवघड आहे. सावरकर हे केवळ हिंदुत्ववादी नेते नव्हते तर ‘डोळस’ हिंदुत्ववादी नेते होते. त्यांच्या इतर अनेक पलूंप्रमाणे हाही पलू उपेक्षित राहिला आहे. ते क्रांतिकारक ठरतात ते या व्यापक अर्थाने असे मला वाटते.
-डॉ. गिरीश पिंपळे, नाशिक.

बेळगावची वस्तुस्थिती लक्षात घ्या..
‘कालबाह्य मराठी अस्मितेला शिवसेनेने कवटाळू नये’  हे पत्र (लोकमानस, २२ ऑक्टो.) वाचले, परंतु पटले नाही. बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य असल्याने सरकारी कागदपत्रे मराठीतून उपलब्ध करून द्यावीत असा केंद्र सरकारचा नियम आहे. कर्नाटकातील शासनाने या नियमास हरताळ फासल्याने व कन्नड भाषेचा दुराग्रह धरल्याने तेथे भाषिक संघर्ष तीव्र झालेला आहे. केंद्र सरकारकडे याबाबत महाराष्ट्राने तक्रार केली असता कर्नाटक सरकारने सरसहा खोटी माहिती पुरवली होती. तसेच बेळगावातील विविध आक्रमक कन्नड संघटना व त्यांच्या कार्याबद्दल पत्रलेखकास माहिती आहे काय?  सीमाभागात कन्नड संघटनांच्या कानडी अस्मितेच्या हुंकाराच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत असतात, ही वस्तुस्थिती पत्रलेखकाने लक्षात घ्यावी.
-विनायक सुतार, मुलुंड (मुंबई)

दिवाळी..  गावात कमी, शहरांत जास्त!
गावातली दिवाळी ही, शहरी शब्दांत सांगायचं तर ‘मार्केट डाउन’ आहे. उसाच्या दुसऱ्या हप्त्याने अनेकांचा केलेला भ्रमनिरास, हे यामागचे एक कारण. फटाके स्टॉल ओस पडलेत तर किराणा दुकानांत तुरळक गिऱ्हाईक दिसले. तिथेही काटछाट आणि खर्चाचा मेळ घालताना कुटुंबप्रमुखाच्या डोक्यावरच्या आठय़ा बोलतात. सोबत आलेल्या चिमुरडय़ाचा फटाक्यांचा हट्ट थोपवणारी माउली त्याला त्याच्या बापाकडे बघत रागाने व्यर्थ दरडावतेय. कपडय़ाच्या दुकानात गर्दी तर आहे, पण दर ऐकून नाकं मुरडणाऱ्यांची. ‘यापेक्षा कमीतलं, हलक्यातलं दाखवा’ हे वाक्य नेमकं कानावर येणारच. तो शेटजी भांडवल कधी ‘निकळणार’ या विचारात घाम पुसत एकदा गिऱ्हाइकाकडं, एकदा देव्हाऱ्याकडं बघतोय. महागाईने बेरंग केल्यानं रंगीत रांगोळीचीही विक्री तोलूनमापूनच.
तर चौकातल्या काका-दादापुढे सणासुदीला उसने मागून काकुळतीला आलेला माणूस हमखास दिसतोय. तसं आपल्यासह अनेकांच्या घरातील दिवाळी ही कपडेखरेदीला फाटा देऊनच आहे हे वेगळं काय सांगावं.. दगडमातीचा किल्ला बनवून, आपल्या किल्ल्यावर सन्य कधी येणार या आशाळभूत नजरेने पाहणारे बाळगोपाळ चिंताक्रांत आहेत. घरात सनिक मागितले तर फटाके मिळणार नाहीत हे त्यांना कळून चुकलंय.
शहरात, उपनगरांत मात्र मार्केट गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा विरोधाभास पाहावा लागला. इथे महागात महाग, श्रीमंतीच्या रुबाबात दिसले. हलका माल चढय़ा भावात दिला तरी कुणाची कुरकुर नाही, हे विशेष!
संदीप नाझरे, आमणापूर (सांगली)

विदर्भाचेही तेच कारण!
विधानसभा निकालानंतर अन्य पक्षांच्या विजयाइतकीच ‘एमआयएम’ने मिळवलेल्या दोन जागांविषयीची चर्चा चालू आहे. पण ही चर्चा एमआयएमचा पूर्वेतिहास व ओवैसी बंधू यांभोवती केंद्रित झाली आहे. महाराष्ट्रात एमआयएमचा उदय झाला तो ‘समाजातील एका घटकाचा राजकारण्यांनी नेहमीच केलेल्या अपेक्षाभंगामुळे किंवा उपेक्षेमुळे’ हे कारण वास्तवदर्शी आहे.
याचसारखा आणखी एक प्रश्न माहाराष्ट्रात निर्माण होत आहे तो म्हणजे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा. हा प्रश्न निर्माण झाला तो राज्यातील ‘एका प्रदेशाबाबत राजकारण्यांनी नेहमीच केलेल्या अपेक्षाभंगामुळे/उपेक्षेमुळे’ हेच कारण सांगण्यात येते आणि त्यात तथ्यही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्यात होणारे विभाजन टाळायचे असेल तर वेळीच या प्रश्नाकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
– सौरभ आढाव, अमरावती</strong>