‘सर’ छोटूराम हे जाट समाजाचे नेते
सर छोटूराम यांच्याबद्दल शरद जोशी यांचे पत्र (लोकमानस, ३ नोव्हेंबर) वाचनात आले. त्यातील काही मुद्दे बिनतोड आहेत. विशेषकरून लोकांना कायदे मोडायला शिकवण्याला छोटूराम यांचा विरोध किती दूरदृष्टीचा होता हे आज आपण प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. मात्र, जोशी यांनी अन्य काही मुद्दे नोंदविलेले नाहीत. तेसुद्धा लक्षात घेणे जरूर आहे.
त्यातील पहिला म्हणजे छोटूराम हे जाट समाजाचे नेते होते. सर्व समाजाचे नव्हे. दुसरा म्हणजे लाला लजपत राय यांचे निधन १७ नोव्हेंबर १९२८ रोजी झाले. सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने करताना पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ते जबर जखमी झाले होते, हा इतिहास आपण शाळेत वाचला आहे. छोटूराम यांचा बहुचíचत जमीन विषयक (दुरुस्ती) कायदा १९३५ साली मंजूर झाला. तेव्हा लालाजी हयात नव्हते. शरद जोशी यांचा संदर्भ तपासताना काही तरी गोंधळ झाला, हे स्पष्ट आहे. या बाबत खुलासा होणे गरजेचे आहे. तथापि काँग्रेस पक्षाने अन्य स्वातंत्र्य सनिकाना अनुल्लेखाने इतिहासजमा केले, हा त्यांचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
त्याचबरोबर छोटूराम यांना ब्रिटिश सरकारने रावबहादूर आणि सर हे किताब दिले होते आणि ते त्यांनी स्वीकारले होते हेसुद्धा वास्तव आहे. त्या काळात असे बहुमान कोणास देण्यात येत हे उघड सत्य आहे. सर छोटूराम यांच्या नावे अनेक शिक्षण संस्था आज सक्रिय आहेत. एका विद्यापीठालाही त्यांचे नाव दिलेले आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १९९५ साली टपाल तिकीटसुद्धा प्रसिद्ध केले आहे. मूळ प्रश्न असा आहे की, कोणाचेही गुणगान करताना सर्व बाजू विचारात घेणे अगत्याचे असते. आजच्या विभूतिपूजेच्या जमान्यात काही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल असे करणे शक्य नसले तरी इतिहास ते करतच असतो.
दिलीप चावरे, अंधेरी, मुंबई
मर्जी वा खप्पामर्जीवर कर्तृत्वाचे मोजमाप नको..
‘सर छोटूराम दुर्लक्षित का?’ हे शरद जोशी यांचे पत्र (लोकमानस, ४ नोव्हें)वाचले. ‘सत्याग्रहाच्या नावाखाली लोकांना कायदे तोडायला शिकवू नका’ असे गांधीजींना सांगणारे छोटूराम खरोखर दूरदृष्टीचे असले पाहिजेत. कारण आज ज्यांचा काडीचाही दोष वा संबंध नसतो अशा सामान्य जनतेला वेगवेगळ्या दुराग्रही आंदोलनांमुळे त्रास, यातना भोगाव्या लागतात. आंदोलनांचे कारण, महत्त्व त्या त्या जागी योग्य असतेही पण जे त्या कारणाशी संबधित असतात ( उदा. मंत्री वा संबधित अधिकारी/संस्था इ.) ते नामानिराळे राहतात. कायदा पायदळी तुडविणे हे पारतंत्र्यात प्रभावी आयुध मानले गेले. पण ते परकीयांच्या विरोधात होते, आता आपले राज्य आहे, आंदोलनाचे मार्ग विघातक, विषारी वा आपलेच नुकसान करणारे नसावे एवढेही भान आपल्याला का येऊ नये? सर छोटूराम या गुणवैशिष्टय़ामुळे महान ठरतात.
स्वातंत्र्य संग्रामात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. अशा अनेकांची अवस्था ‘नाही चिरा नाही पणती’ अशी असते. केवळ शासनकर्त्यांच्या मर्जी वा खप्पामर्जीवर त्यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप होत राहाते.. अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे हे हिणकस दर्शन आपल्याला समाजात ठायी ठायी दिसते. त्यामुळेच आताही केवळ भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे वा ही थोर विभूती अमुक अमुक प्रांताची आहे, अमुक जातीची आहे म्हणून त्या विभूतीचा गौरव आता तरी व्हावा ही अपेक्षा त्याच मनोवृत्तीतून आपोआप जोपासली जाते की काय असा संशय येतो. अन्यथा शरद जोशी सारख्यांना तरी या काळाच्या पुढे गेलेल्या महान देशभक्ताची आताच आठवण का यावी?
तरीही अशा अनेक ‘छोटूरामांचा’ शोध घेणे उचितच होईल.
-दिलीप रा. जोशी, नाशिक
मोठय़ा मनाचा,मोठा अभिनेता
ही गोष्ट १२-१३ वर्षांपूर्वीची, नांदेड ते मुंबई हा प्रवास एसी टू टायर डब्यातून करीत असतानाची.. ‘सदाशिव अमरापूरकर आपल्याच डब्यात आहेत’ असे कोणीतरी म्हणाले, म्हणून पाहायला गेलो तर खरेच ते होते. त्यांनीच सहजपणे ‘कुठे असता, काय काम करता,’ वगरे विचारले. मीही मग विचारले, ‘तुम्ही या बाजूला कुठे गेला होतात, मुंबई सोडून?’ ते हसले, ‘शूटिंगला गेलो होतो,’ म्हणाले. ते एक इंग्रजी कादंबरी वाचत होते. मी ती वाचलेली होती, चांगली होती (नाव नाही आठवत). त्यावरून आणि मग वाचण्यावरून आमच्या गप्पा ज्या रंगल्या, त्या जवळपास दीड तास! त्यांचे जेवण आले, तेव्हा मी उठलो. मला अप्रूप वाटले की एक एवढा मोठा, नावाजलेला अभिनेता आपल्यासारख्या सामान्य माणसाशी बोलला आणि तेही दीड तास! ही साधीसुधी गोष्ट नाही. मला तर तेव्हा स्वप्नात असल्यासारखे वाटत होते.
आजही मला तो प्रसंग आठवला आणि बातमी वाचून डोळ्यांत अश्रू आले. एक महान कलाकार, मोठय़ा मनाचा माणूस आपल्यांतून गेला. अशी माणसे आजकाल बोटांवर मोजण्याइतकीदेखील नाहीत.
अनिल जांभेकर, मुंबई
विचार ‘रेडीमेड’ नसून, ती वाचकाला मिळणारी दृष्टी!
‘प्रबोधन पर्व’ सदरात (१ नोव्हें. रोजी) प्रा. मे. पुं. रेगे यांच्याविषयीच्या टिपणात ‘त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही,’ असे लिहिलेले वाचून मौज वाटली. प्रस्तुत टिपणात रेगे यांच्या पुस्तकांची नावे बरोबर दिली आहेत. त्यांपैकी मे. पुं. रेगे यांचे ‘िहदू धार्मिक परंपरा आणि समाजपरिवर्तन’ आणि ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ ही पुस्तके महत्त्वाची आहेत.
जगभरातील वैचारिक साहित्याची, तत्त्वज्ञानाची ओळख मराठी वाचकांना करून देणे, त्यासाठी अभ्यास-संशोधन करणे वगरे गोष्टी सातत्याने करणे या सगळ्याचे मूल्यमापन त्या क्षेत्रातील इतर अधिकारी व्यक्तींनी स्वतंत्रपणे करणे ही वेगळी गोष्ट आहे. पण मराठीतील प्रबोधनपर्वाची ओळख करून देणाऱ्या छोटय़ा सदरातून अशी ‘स्वीिपग स्टेटमेंट्स’ करण्याचे प्रयोजन कळत नाही. ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या पुस्तकाच्या ‘विज्ञान, विज्ञाननिष्ठा आणि अध्यात्म’ या दुसऱ्या विभागातील पाच लेख आणि ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ हे परिशिष्ट वाचले तरी याबाबतच्या शंका दूर होऊ शकतील.
मुळात संशोधन करून काही लिहिले तर वाचकांसाठी तोच एक ‘संदेश’ असतो. रेग्यांचे लेखन ‘अभ्यास करावा, चिंतन करावे’ हे लेखांच्या शीर्षकांपासून सांगत असताना त्यांनी ‘विचार कसा करावा हे सांगितले नाही’ असे म्हणणे अतिशय अप्रस्तुत वाटते. आणि मुळात ‘विचार’ ही रेडीमेड गोष्ट असते असे नाही. रेग्यांनी किंवा इतर अभ्यासकांनी जे मांडले आहे, विविध विचारप्रवाहांचा जो वेध घेतला आहे त्यातून वाचकाला जी दृष्टी मिळते त्याला काय म्हणायचे?
उत्पल वनिता बाबुराव, पुणे
‘राजकीय’ पूजा नको!
एकनाथ खडसे विठ्ठलाच्या पूजेला गेले आणि त्यानंतर विठ्ठलाच्या पायाशी बसून त्यांनी आपला अहं किती मोठा आहे हे दाखवले. खडसे म्हणतात, ‘बहुजन समाजाची इच्छा मी मुख्यमंत्री व्हावे अशी होती (म्हणून) त्यांनी भाजपला मते दिली’. आपल्या मतदारसंघात ७५ टक्के मतेदेखील मिळवता येत नाहीत. तसेच इतर पक्षाचे इतके आमदार निवडून आले ते काय बहुजन समाजाच्या मतांविना?
एकच व्हावे, शासकीय पूजेचे नाटक बंद करावे आणि जे भक्तदर्शनासाठी दिवसदिवस अगोदर रांगेत थांबतात त्यांनाच हा मान मिळावा. किमान विठ्ठलाची घुसमट तरी थांबेल.
सुहास शिवलकर, पुणे
न ऐकणारे सहकारी
‘पण ते मी ऐकलेले नाही’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर (लोकसत्ता, ४ नोव्हें.) वाचले आणि फडणविसांचे पूर्वसुरी मनोहरपंतच आठवले! मंत्रिमंडळातील सहकारी एकनाथ खडसे जे काही बोलले ते फडणवीसांनी मुंबई-नागपुरात ऐकले नसेल, हे जरी खरे धरले तरी, कोंबडा आरवलेला आपण ऐकला नसला तरी सूर्य उगवायचा राहत नाही, हे त्यांनी विसरू नये.
मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नेहमीच काटेरी राहत आलेली आहे. ही काही काँग्रेसचीच परंपरा नाही. कोणताच पक्ष या परंपरेला अपवाद ठरू शकत नाही.. मग तो (काही वर्षांपूर्वी) ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणारा भाजप का असेना!
मुकुंद परदेशी, देवपूर (धुळे)