गौरव सोमवंशी

ज्युलियन असांज आणि सातोशी नाकामोटो.. पहिला ‘विकिलीक्स’चा संस्थापक, तर दुसरा ‘बिटकॉइन’चा निर्मिक. या दोघांना जोडणारा दुवा आहे ऐंशीच्या दशकात जन्मलेली ‘सायफरपंक’ ही चळवळ. काय आहे ‘सायफरपंक’?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

जगविख्यात असलेल्या ‘विकिलीक्स’चा सहसंस्थापक ज्युलियन असांज आणि ‘बिटकॉइन’चे निर्माते सातोशी नाकामोटो या दोघांमध्ये काय साम्य आहे? सरकारने गोपनीय ठेवलेली माहिती ‘विकिलीक्स’ने अज्ञात पण विश्वसनीय सूत्रांकडून जगासमोर मांडून खळबळ उडवली; तर ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ने आजच्या राष्ट्रीय चलनांना एक स्वतंत्र आणि जागतिक पातळीवरील पर्याय देऊ केला आहे. दोन्ही आविष्कार विभिन्न क्षेत्रांत विभिन्न उद्देशांनी कार्यरत आहेत. मग यांना जोडणारा धागा कोणता? तर याचे उत्तर आहे- ऐंशीच्या दशकात जन्म घेऊन नव्वदच्या दशकात वाढलेली ‘सायफरपंक’ चळवळ! ज्युलियन असांज आणि सातोशी नाकामोटो हे दोन्ही याच चळवळीचा सुरुवातीपासून भाग होते. अर्थात अनेकांना हे माहीत आहे, की ज्युलियन असांजने २०१२ साली सायफरपंक चळवळीवर एक पुस्तकसुद्धा लिहिले होते. ‘सायफरपंक्स: फ्रीडम अ‍ॅण्ड द फ्युचर ऑफ द इंटरनेट’ हे ते पुस्तक. असांजने स्थापन केलेली ‘विकिलीक्स’ ही संस्था ‘बिटकॉइन’मध्ये देणगीसुद्धा स्वीकारते.

हे झाले ज्युलियन असांजबद्दल. पण ज्याने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित ‘बिटकॉइन’चा आविष्कार केला आणि जो स्वतला ‘सातोशी नाकामोटो’ म्हणून संबोधतो, तो अजूनही अज्ञातच आहे. खरे तर आपल्याला हेदेखील माहीत नाही की, सातोशी नाकामोटो पुरुष आहे की महिला, किंवा अनेक व्यक्तींचा समूह आहे- जे या नावाने स्वतला संबोधतात. तरीही आपण हे कसे सांगू शकतो की, सातोशी नाकामोटो हा या ‘सायफरपंक’ चळवळीशी निगडित आहे ते? तर.. याचे कारण असे की, सायफरपंक चळवळीची जी ‘मेलिंग लिस्ट’ होती, त्याचा सातोशी नाकामोटो हा प्रारंभापासून एक मुख्य घटक होता. ‘मेलिंग लिस्ट’ म्हणजे असा एक ऑनलाइन समूह, ज्याचे सदस्य एकमेकांशी ईमेलद्वारे संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करतात किंवा काही सामायिक प्रकल्पांवर कामदेखील करतात. सातोशी नाकामोटो या समूहात बराच सक्रिय होताच; पण ‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’वर इथे तो वारंवार चर्चा आणि विचारविनिमय करीत असे. आज ‘बिटकॉइन’वर काम करणाऱ्या मुख्य संगणकशास्त्रज्ञांचा एक समूहदेखील याच सायफरपंक चळवळीतून आलेला आहे.

हे पाहता.. ही सायफरपंक चळवळ नेमकी काय होती? त्यामध्ये सामील झालेल्या मंडळींची विचारसरणी काय होती? ती एक स्वतंत्र विचारसरणी होती की विविध विचारसरणींचे मिश्रण होते? आणि ती समजून घेणे का गरजेचे आहे? असे काही प्रश्न आपल्याला पडू शकतात. त्यांची उत्तरे आजच्या लेखात पाहू या..

प्रत्येक तंत्रज्ञान हे साधीसोपी गरज भागविण्यासाठी बनवले जाते (पण गरज समजायला सोपी आहे याचा अर्थ असा नाही, की ती भागविणारे तंत्रज्ञानसुद्धा सोपे असावे!); किंवा असेही म्हणता येईल की, तंत्रज्ञान हे तत्त्वज्ञानाचे उपयोजन करण्याचे साधन असते. ‘विकिलीक्स’चे तंत्रज्ञान किंवा ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ यांच्यामागे सर्वप्रथम एक स्पष्ट तत्त्वज्ञान उभे होतेच, ज्याचे उपयोजन करण्यासाठी, ते अमलात आणण्यासाठी अनेकपरींनी धडपड करण्यात आली आणि त्यातले काही निवडक आविष्कार हे पुढे यशस्वी ठरलेच. उदाहरणार्थ, इंटरनेटवरून एखादा नवीन सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी अनेक मंडळी ‘टोरेंट’ नामक एक संगणकप्रणाली वापरतात; या ‘टोरेंट’चा जनकसुद्धा सायफरपंक चळवळीचा भाग होता! परंतु एखाद्या तत्त्वज्ञानाला आधार देण्यासाठी तयार झालेले तंत्रज्ञान यशस्वी झाले नाही, तर त्यामुळे ते तत्त्वज्ञानच पूर्णपणे निष्फळ ठरले असे म्हणता येणार नाही. ‘बिटकॉइन’ ज्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे तंत्रज्ञानसुद्धा त्याआधी आलेल्या अनेक ‘अयशस्वी’ प्रकल्पांकडून खूप काही शिकूनच उभारले गेले आहे.

तर.. या सायफरपंक चळवळीची सुरुवात त्याच्या ‘सायफरपंक’ या नावाहूनही जुनी आहे. या कहाणीची सुरुवात १९७० पासून होते. सत्तरच्या दशकात अमेरिकी सरकारने ‘डेटा इन्क्रिप्शन स्टॅण्डर्ड’ जाहीर केले होते. ‘क्रिप्टोग्राफी’ हे संगणकीय कूटशास्त्र वापरून सरकारची गोपनीय माहिती डिजिटल युगात सुरक्षित राहावी यासाठी योजना आखणे, हा त्यामागील उद्देश होता. सुरुवातीची बरीच वर्षे हे प्रयत्न केवळ लष्कर आणि सरकारपुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. मात्र, १९७६ मध्ये डॉ. व्हिटफील्ड डिफी आणि डॉ. मार्टिन हेलमन यांनी सामान्यजनांना सार्वजनिकरीत्या ‘क्रिप्टोग्राफी’ कशी वापरता येईल, यावर एक लेख प्रसिद्ध केला. त्यानंतर सरकार, लष्कर, खासगी कंपन्या आणि सामान्य जनता यांच्यात ‘क्रिप्टोग्राफी’ला धरून जणू सुंदोपसुंदीच सुरू झाली. माहितीवर अधिकार कोणाचा असेल, हा या सुंदोपसुंदीतील कळीचा प्रश्न होता.

‘क्रिप्टोग्राफी’ म्हणजे एका माहितीला किंवा संदेशाला अशा प्रकारे संरक्षित/बंदिस्त (लॉक) करून ठेवणे, की ही माहिती वा संदेश पाहायचा अधिकार नसणाऱ्यास ती माहिती/संदेश बघताच येणार नाही. ज्या माहितीला आपण गणिताच्या काही नियमांना धरून ‘लॉक’ केले आहे, ती माहिती फक्त अधिकृत व्यक्तीच पाहू शकतील. ‘क्रिप्टोग्राफी’ खरे तर फार जुनी आहे; कारण माहिती वा संदेश गोपनीय राहावेत ही इच्छा मानवी सभ्यतेइतकीच जुनी आहे. इतिहासात नोंद असलेला ‘क्रिप्टोग्राफी’चा पहिला वापर हा रोमन सेनापती ज्युलिअस सीझरने केला आहे; आणि ती ‘क्रिप्टोग्राफी’ची पद्धत त्याच्याच नावाने प्रसिद्ध आहे. सीझरला एक संदेश पाठवायचा होता. असे मानू की, त्याला ‘ं३३ूं‘’ हा संदेश द्यायचा होता. त्यासाठी तो प्रत्येक अक्षराला वर्णमालेत तीनने पुढे ढकले आणि नव्याने लिहून काढी. म्हणजे ‘अ’ला तीनने पुढे ढकलले की त्याचे ‘ऊ’ हे अक्षर होते. असे प्रत्येक अक्षराबाबत केले की ‘६ि६ऋिल्ल’ असा गोंधळात टाकणारा संदेश पाठवला जाईल. ज्यास तो संदेश पाठवला जाई, त्याला हे माहीत असायचे की प्रत्येक अक्षराला तीनने मागे नेल्यास सीझरचा मूळ संदेश दिसेल. या पद्धतीला ‘सीझर सायफर’ असे म्हटले जाते.

असाच काहीसा प्रकार मी लहानपणी अनुभवला आहे. माझी आई आणि मावशी धुळ्यात काहींमध्ये प्रचलित असलेली ‘ढ’ची भाषा बोलत. उद्देश हा की, नको त्या लोकांना ती ऐकूनसुद्धा कळू नये. यामध्ये प्रत्येक मराठी शब्दाला उलटे करून त्या शब्दाअगोदर ‘ढ’ हे अक्षर जोडले जात असे. आई आणि मावशी ही भाषा एकदम ओघवती बोलत आणि मला मात्र त्यातले काहीच कळायचे नाही. नंतर कुठे कळायला लागले की, त्या क्रिप्टोग्राफिक संभाषणामध्ये मीच तो नकोसा तिसरा माणूस होतो! या उदाहरणात मला बाजूला सारून तुम्ही सरकार किंवा खासगी कंपन्या यांना मधे आणा; म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की सायफरपंक चळवळीची सुरुवात कोणत्या मुद्दय़ावरून झाली होती ते. प्रचलित पैसे वा चलन यांना बाजूला सारून नवीन जागतिक चलन सुरू करणे हा दृष्टिकोन नव्वदच्या दशकात प्रगल्भ होत त्याचे २००८ साली ‘बिटकॉइन’मध्ये रूपांतर झालेच; पण या साऱ्याची सुरुवात झाली होती एका साध्या गोष्टीवरून- ती म्हणजे, नको त्या व्यक्तीला किंवा सरकारला अथवा एखाद्या संस्थेला गरजेपेक्षा अधिक माहिती वा संदेश कळू नये.

हेच ध्येय समोर ठेवून १९९२ साली तीन जण एका चर्चेत सहभागी झाले आणि त्यांचे नाव ‘सायफरपंक’ असे पडले. त्यांनी मिळून एक जाहीरनामासुद्धा प्रकाशित केला, ज्यामध्ये हे अधोरेखित केले की- गोपनीयता पाळणे आणि नियंत्रण पूर्णपणे स्वतकडे असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. या हक्काची गरज डिजिटल युगात सर्वाधिक जाणवेल हेसुद्धा भाकीत त्यांनी ईमेल किंवा समाजमाध्यमे प्रचलित होण्याच्या बऱ्याच आधी केले आणि तेव्हापासूनच त्यावर कामदेखील सुरू केले होते. या मंडळींचे काय काय योगदान आहे, ते आपण पुढील लेखात पाहू या. कारण याच योगदानाच्या आधारावर आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित ‘बिटकॉइन’ उभे आहे!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

Story img Loader