scorecardresearch

साम्ययोग : विनोबांचा साम्यबोध

साम्ययोगात विनोबांनी नेमकी कोणती भर घातली, हे पाहण्यासाठी त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान जाणून घ्यायला हवे.

vinoba

अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

वेद-वेदांत गीतेतुनी विनू घेई बोध

ब्रह्म तेचि सत्य जगत ती स्फूर्ती

जीवनाचे गति सत्यशोध ।।

साम्ययोगात विनोबांनी नेमकी कोणती भर घातली, हे पाहण्यासाठी त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान जाणून घ्यायला हवे. आद्य शंकराचार्याचा ‘ब्रह्म सत्यं’ हा श्लोक प्रसिद्ध आहे. आचार्याचे अवघे तत्त्वज्ञान आणि जीवनचरित्र त्या श्लोकात आढळते. विनोबांनीही असाच एक डिंडिम केला. त्याचा पद्यानुवाद वर आला आहे.

ब्रह्म, जग आणि जीवनाची दिशा यांचा परस्पर संबंध त्या श्लोकात मांडला आहे. शिवाय आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव आणि गांधीजी यांचे तत्त्वज्ञानही त्यात सामावले आहे. विशाल ध्येय, त्याचे व्यावहारिक उपयोजन आणि त्याचे ध्येय या तीनही गोष्टी हा श्लोक सांगतो.

ब्रह्म म्हणजे मोठे, विशाल त्याच्याखालचे कोणतेच ध्येय विनोबा मानत नाहीत. ही विशालता पाहायची तर या जगामध्ये पाहायची. तिथे ती असेल तर ती सखोल करायची आणि नसेल तर कामाला लागायचे. ध्येय आणि व्यवहार यांना सत्याच्या मदतीने जोडायचे. यातील एकही गोष्ट बाजूला सारली तर विनोबांचे तत्त्वज्ञान उभे राहात नाही. त्यांचे आचरण, साहित्य, लौकिक समस्यांची त्यांची हाताळणी, गीतेवरील चिंतन आणि प्रेमपूर्वक समन्वय या त्यांच्या जीवित चरित्राचा पाया म्हणजे हा श्लोक होय.

या श्लोकाचे सूत्ररूप साम्यसूत्राच्या आरंभी आले आहे. ‘अभिध्येयं परम साम्यम्।’ ही साम्यसूत्रांची सुरुवात आहे. आपले अंतिम ध्येय परमसाम्य असले पाहिजे, असा याचा अर्थ आहे. परमसाम्य या शब्दांमध्ये उपनिषद ते गांधीजी असे व्यापक तत्त्वज्ञान येते.

आपल्या परंपरेमध्ये चार महावाक्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यातील ‘तत्त्वमसि’ या महावाक्याची विनोबांनी चिंतनासाठी निवड केली. मी ब्रह्म आहे याच्या इतकेच तू देह नाहीस तर आत्मतत्त्व आहेस, हे जाणणे महत्त्वाचे आहे. विनोबांच्या विचारविश्वात ही भूमिका सतत दिसते. मी देह नसून आत्मा आहे, ही धारणा व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही रूपांत विनोबांनी पाहिली.

तू आणि मी समान नाही तर एकच आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती ते अंतिम तत्त्व आहे ही भूमिका विनोबांच्या साम्ययोगाचा विशेष आहे. त्यांचे अन्यत्र आढळणारे एक सूत्र आहे. ‘वंदे भ्रातरम।’ आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती केवळ आपली बांधव किंवा भगिनी नसून ती आदरणीयही आहे. हा अर्थ समत्वाची भूमिका आणखी उंचीवर नेतो.

आपल्याला स्वातंत्र्य, समता ही मूल्ये महत्त्वाची वाटतात मात्र बंधुता या मूल्यावर साधी चर्चाही करता येत नाही. बंधुता आपण स्वत:मध्ये कशी विकसित करावी, याचा आदर्श विनोबांनी समाजासमोर ठेवला आहे.

बंधुभाव विकसित केला नाही, तर खऱ्या स्वातंत्र्याची आणि समतेची स्थापना करता येणार नाही. साम्ययोगाला विनोबांनी दिलेला आयाम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी साम्ययोगाचे तिहेरी रूप समोर ठेवले. व्यक्तिगत साधना, लौकिकाशी जोडणी आणि सामूहिक साधनेचा आविष्कार. हे साम्ययोग दर्शन समग्र म्हणावे लागते. त्यामुळे साम्ययोगाचा त्यांना झालेला बोध अपूर्व म्हणावा लागतो.

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave philosophy of life zws

ताज्या बातम्या