राष्ट्रवादीकार शिवसेनाकारांच्या स्मारकासाठी धावून आले असून आता त्या स्मारकास कोणी रोखू शकणार नाही. परंतु निवडणुकांचा आगामी काळ लक्षात घेता उद्धव ठाकरे यांना पवारसाहेबांच्या साह्याची गरज का लागली, या प्रश्नाचा ऊहापोह करणे आम्हास गरजेचे वाटते.
या महाराष्ट्र देशी अडल्या-नाडलेल्यांच्या साहय़ास धावून जाणारा शरद पवारसाहेब यांच्यासारखा अन्य दुसरा नेता शोधूनही सापडणार नाही. अडलेला कोणत्याही प्रांतातील, कोणत्याही प्रदेशातील असो, पवारसाहेबांनी त्याची सुटका केली नाही, असे फारच क्वचित झाले असेल. लेखक, कवी, कवडे, कलावंत, संपादक अशा कोणाहीपर्यंत पवारसाहेबांचा कायद्यापेक्षाही लांब असलेला मदतीचा हात पोहोचलेला नाही, असे कधीही झालेले नाही. मग ते ‘उपरा’कार लक्ष्मण माने असोत, साथी मृणाल गोरे असोत, निखारे विझलेली आणि विझायच्या आधीची पँथर असो, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असोत वा अर्कतीर्थ मनोहरपंत जोशी असोत, इतकेच काय विरोधी पक्षात असल्याचा उत्तम आभास करून ‘सामना’ करू पाहणारे काही पत्रकारसंपादक असोत. आपले असलेले-नसलेले सारे काही मतभेद दूर ठेवून पवारसाहेब नेहमीच जो जे वांच्छील त्याच्या मदतीस धावलेले आहेत. या संदर्भात त्यांचे मोठेपण दुहेरी आहे. एक म्हणजे अशी काही मदत केल्याचे त्यांच्याकडून या कानाचे त्या कानाला सांगितले जात नाही. म्हणजे मी याला हे केले, त्याला ते दिले असे कधीही सांगत बसत नाहीत. हा खास काँग्रेसी गुण. मदत केल्याच्या ओझ्याखाली समोरच्यास जन्मभर ठेवायचे ही शिवसेना शैली नव्याने काँग्रेसमध्ये आलेल्या अनेकांनी पवार यांच्याकडून शिकावयास हवी. परिणामी उपकृत झालेल्यास त्यांच्या मदतीचे दडपण कसे अजिबात येत नाही, याची साक्ष अनेक लेखक-कलावंत देतील. आणि दुसरे असे की आपले राजकीय मतभेद पवारसाहेब हे कधी अशा मदतीच्या आड येऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांचे कट्टर राजकीय विरोधकदेखील सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात पवारसाहेबांची भेट घेऊन मदतीची गरज व्यक्त करण्यात अनमान करीत नाहीत.
या अशा गरजवंतांत आता आणखी एक सन्माननीय भर पडेल. ती म्हणजे शिवसेनेचे नवोन्मेषशाली कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे. आपल्या तीर्थरूपांच्या स्मारक उभारणीत त्यांना कै. तीर्थरूपांचे जिगरी दोस्त पवारसाहेब यांची मदत हवी असल्याचे वृत्त असून ते फेटाळत असल्याची म्याँव म्याँव कोणाही सेनेच्या वाघाने केलेली नसल्याने ते खरे असावे, असे आम्ही मानतो. स्मारके उभारणे, मग ते राज्यभर गडकिल्ले उभारणारे गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे असो किंवा त्यांच्या नावाने आणि आई जगदंबेच्या कृपेने चौकोचौकी शाखा उभारणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे असो, हे या अत्यंत प्रगतिशील अशा महाराष्ट्रापुढील सर्वात महत्त्वाचे कार्य आहे याची जाणीव अलीकडच्या काळात राज्यातील जनतेस पुरेशा प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे राज्यातील समस्त नेतृत्वगण हा कोणत्या ना कोणत्या स्मारक उभारणीच्या राष्ट्रीय कार्यास स्वत:स झोकून देताना दिसतो. तेव्हा अशा कार्यतत्परांत शिवसेना मागे कशी असेल? त्याचमुळे सेनेनेही ही स्मारक उभारणी अत्यंत गांभीर्याने घेतली असून त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही तहानभूक विसरून, ऊन-पावसाची तमा न बाळगता रात्रंदिवस या स्मारक उभारणीच्या कार्यात स्वत:स वाहून घेतले आहे. स्वत:च्या तीर्थरूपांच्या स्मारकासाठी चिरंजीव उद्धव ठाकरे यांचा तीळ तीळ तुटणारा जीव पाहून शरद पवारसाहेबांचे अत्यंत तगडे पोलादी हृदय द्रवले आणि आपल्या एके काळच्या राजकीय शत्रूची स्मृती कायम कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे आता राष्ट्रवादीकार शिवसेनाकारांच्या स्मारकासाठी धावून आले असून आता त्या स्मारकास साक्षात काळ वा पृथ्वीराज चव्हाण आडवे आले तरी कोणी रोखू शकणार नाही. परंतु निवडणुकांचा आगामी काळ लक्षात घेता उद्धव ठाकरे यांना पवारसाहेबांच्या साहय़ाची गरज का लागली, या समस्त महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नाचा ऊहापोह करणे आम्हास गरजेचे वाटते.
आमच्या मते उद्धवजींच्या मदतीसाठी पवारसाहेब धावले यांस अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख हे की स्मारक उभारायचे तर त्यास जागा लागते आणि हवी ती जागा वा भूखंड कसा मिळवायचा यावर या समस्त महाराष्ट्रात फक्त दोन अधिकारी व्यक्ती आहेत. पहिले अर्थातच दस्तुरखुद्द पवारसाहेब आणि दुसरे त्यांच्याहीपेक्षा कांकणभर सरस सर मनोहर जोशी. परंतु यापैकी जोशी यांचा भर्वसा उद्धव यांना नाही. स्मारकासाठी म्हणून जागा शोधण्याच्या कामी ते लागावयाचे आणि अंतत: तेथे कोहिनूर इमला दिसणारच नाही याची शाश्वती उद्धव यांना नसल्याने त्यांना जोशी पर्यायावर फुली मारावी लागली. वस्तुत: जोशी हे उद्धवजींसाठी घरचेच. परंतु या ठाकरे घराण्यास बाहेरच्यांपेक्षा घरातीलांकडूनच अधिक धोका संभवत असल्याने उद्धव यांचा मूळचा साशंकी स्वभाव अधिक शंकेखोर बनला. खेरीज, दुसरे असे की मुदलात हे स्मारकाचे पिलू सोडले ते जोशीबुवांनीच. वडिलांच्या आजारपणात त्यांची सेवा करून शिणलेल्या उद्धव यांची अवस्था घरचे झाले थोडे.. अशी असताना हे स्मारकाचे लचांड जोशीबुवांनी सेना नेत्यांच्या गळय़ात मारले आणि स्वत: मात्र दूरवरून मौज पाहात राहिले. खरे तर हे जोशीबुवांचे नेहमीचेच. परंतु तरीही त्याचा अंदाज न आल्याने उद्धव हे सरांच्या स्मारकस्वप्नास भुलले. पण स्वप्नच ते. हेरिटेज आदी दगडांवर आपटून ते फुटले. त्यामुळे उद्धव ठाकरे कासावीस झाले नसते तरच नवल. त्यास कारण पुन्हा जोशीबोवाच. सेनाप्रमुख असते तर स्मारक उभारण्यास त्यांना इतका वेळ लागला नसता, असे जाहीर विधान करीत जोशीसरांनी उद्धव यांच्यासाठी आणखी एक पाचर मारून ठेवली. ती इतकी चपखल बसली की निघता निघेना. त्यात बंधू जयदेव ठाकरे हे स्मारकासाठी शिवाजी पार्कच का असे विचारते झाले. तेव्हा उद्धव यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली. हे होत नाही तोपावेतो बाळासाहेबांचा प्रथम स्मृतिदिनही नजीक येऊन ठेपला. तरी स्मारकाचे घोडे काही पुढे जाईना. अशा परिस्थितीत सेना कार्यकर्त्यांस ते कसे बरे तोंड दाखवणार? घरात मदत मागावी तरी पंचाईत. बाळासाहेबांच्या अंत्यविधीप्रसंगी परत या.. परत या.. असा टाहो फोडणारे आमदार अरविंद सावंत आदी नेते सर्व दिसेनासे झालेले. तेव्हा अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सर्व करतात तेच उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी पवारसाहेबांना साकडे घातले. ते निराश करणार नाहीत, याची खात्रीच होती उद्धव यांना. अखेर तसेच झाले. साक्षात पवारसाहेबांनी हा प्रश्न आपला मानला आणि स्मारकाच्या कामास गती आली. पवारसाहेबांनी थेट महापौर बंगल्यास ससाजिंदे भेट देऊन स्मारकासाठी काय काय करता येईल याचा आढावा घेतल्याचे सांगितले जाते. पवारसाहेबांच्या हातास राज्यात यश आहे. हेरिटेज, पर्यावरण वगैरे जनसामान्यांना भेडसावणारे क्षुल्लक प्रश्न ते स्मारकाच्या मार्गात येऊ देणार नाहीत आणि या स्मारकाच्या मार्गातील सर्वच अडथळे दूर होतील याबद्दल समस्त शिवसैनिकांच्या मनात तिळमात्रही शंका नाही.
वस्तुत: कोणत्याही नेत्याचे खरे समर्थ स्मारक ही त्याने मागे ठेवलेली संघटना. परंतु ती कितपत समर्थ आहे अशी शंका संबंधितांना वाटत असल्याने सिमेंट क्राँकीटचे तरी मजबूत स्मारक असलेले बरे असे वाटल्याने हा मुद्दा पुढे आला, असे बोलले जाते. तेव्हा काका मला वाचवा.. अशी हाळी उद्धव ठाकरे यांना का द्यावी लागली हे यावरून पुरेसे स्पष्ट व्हावे.