उत्तर प्रदेशच्या राजा-महाराजांना लाजवेल, असा आपला पंचाहत्तरावा, की शहात्तरावा वाढदिवस समाजवादी म्हणवून घेणाऱ्या मुलायमसिंह यादव यांनी साजरा करवून घेणे, ही आजच्या काळातील एक अतिशय निर्लज्ज घटना म्हणायला हवी. आजवर या मुलायमसिंहांचा वाढदिवस उत्तर प्रदेशात ‘समाजवादी दिवस’ म्हणून साजरा केला जात असे. ज्या पक्षाचे ते सर्वेसर्वा आहेत, त्या पक्षाचे नावही ‘समाजवादी पार्टी’ असे आहे. याचा अर्थ त्यांच्या रोमारोमांत समाजवाद भिनला आहे, असा घ्यायला हवा; परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने रामपूर येथे सत्तेचे आणि संपत्तीचे जे ओंगळवाणे प्रदर्शन झाले, ते बलात्काराच्या वाढत्या प्रकारांमुळे खिन्न, अस्वस्थ आणि भीतीच्या छायेत वावरणाऱ्या तेथील जनतेच्या चांगलेच स्मरणात राहील. मुलायम यांचा हा वाढदिवस शहात्तरावा असल्याचे समजून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर अखिल यादव ब्राह्मण महासभेने त्यांच्या सत्त्याहत्तराव्या वाढदिवसाचे कारण पुढे करून होमहवन आयोजित केले. दोन दिवस चाललेल्या या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने पंचाहत्तर फुटी केक तयार करण्यात आला होता. ज्या ब्रिटिशांनी या देशावर राज्य केले, त्यांच्या खुणा पुसण्यासाठी गेली सहा दशके कष्ट करणाऱ्या सगळ्या समाजवादी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मुलायमसिंह यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास इंग्लंडहून मागवलेली व्हिक्टोरिअन बग्गी पाहायला मिळाली. या बग्गीतून मुलायम, मुख्यमंत्री असलेले त्यांचे चिरंजीव अखिलेश आणि या सोहळ्याचे आयोजन करून सत्ताचरणी लोटांगण घालणारे आझम खान यांची मिरवणूक पाहताना तेथील गरीब आणि दीनवाण्या जनतेचे ऊर केवढे तरी भरून आले असणार! समाजवादी पार्टी हे नाव असले, तरीही प्रत्यक्षात माजवादालाच प्राधान्य देणाऱ्या नेत्यांचे असे वाढदिवस क्वचितच होतात आणि ते याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्यही दुर्लभ असते. मुलायमसिंह यादव हे देशाच्या राजकारणातील सत्ताकेंद्र बनल्यानंतर ही सत्ता समाजासमोर किळसवाण्या पद्धतीने दाखवण्याची ही हौस निंदनीयच म्हटली पाहिजे. एवढय़ा मोठय़ा सोहळ्याचे आयोजन सरकारी खर्चाने करण्याचे औद्धत्य दाखवणे हे अखिलेश यादव यांच्या अंगी भिनलेले आहे. सांस्कृतिक खाते आणि अन्य खात्यांनी लाखो रुपयांच्या खर्चाला यापूर्वीच मंजुरी देऊन टाकली आहे; परंतु पाहणाऱ्या कुणालाही हा खर्च लाखांपेक्षा जास्त असल्याचे सहजपणे लक्षात येणारे होते. याची शहानिशा करणाऱ्या पत्रकारांना आझम खान यांनी दिलेले उत्तर या राज्यातील सत्तेच्या दर्पाला किती दरुगधी असते, हे दाखविणारे होते. दाऊद इब्राहिम, तालिबान यांच्याकडून या सोहळ्याच्या खर्चासाठी पैसे मिळाल्याचे सांगून आझम खान यांनी नवा वाद अंगावर ओढवून घेतला. आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही तयारी आहे, असे कार्यकर्त्यांना वाटेलही कदाचित, परंतु या अशा प्रदर्शनाला सामान्य जनता मतपेटीतूनच विरोध करण्याची शक्यता अधिक. हा उत्सव मोहमदअली जौहर विद्यापीठात झाला. तेथील विद्यार्थ्यांना यासाठी वेठीस धरण्यात आले. आचरटपणासाठी प्रसिद्ध असलेल्या खान यांनी आपल्या मतदारांवर यानिमित्ताने जो दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तोही टीकास्पद आहे. दरबारी राजकारणाचा असला आविष्कार विकासाच्या पातळीवर मागास असलेल्या उत्तर प्रदेशातील जनतेच्या अंगवळणी पडलेला आहे. समाजातील असमतोल दूर करून सर्वाना प्रगतीच्या वाटेवर नेण्याचे मनसुबे किती खोटे आहेत, हे अशा घटनांमधून स्पष्ट होते. मुलायम यांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्यास मान्यता देऊन, या राजकारणालाही संमती दिली, हे अधिक वाईट आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2014 रोजी प्रकाशित
समाजवादी वाढदिवस
उत्तर प्रदेशच्या राजा-महाराजांना लाजवेल, असा आपला पंचाहत्तरावा, की शहात्तरावा वाढदिवस समाजवादी म्हणवून घेणाऱ्या मुलायमसिंह यादव यांनी साजरा करवून घेणे
First published on: 24-11-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Socialist birthday of netaji mulayam