सौरभ नरेंद्र धनवडे
एक गाव माझ्याच महाराष्ट्र राज्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातलं, माझ्या गावापासून जेमतेम १०० किलोमीटर दूर, जंगलाच्या कुशीत वसलेलं असं निसर्गसंपन्न गाव! गाव तरी कसं म्हणायचं म्हणा तीन वाड्यांचा मिळून एक धनगरवाडा. पहिल्या वाडीपासून दुसरी वाडी दोन किलोमीटर तर तिथून चार किलोमीटर दूर तिसरी वाडी.




गावाला रस्ता नाही त्यामुळे या तिसऱ्या वाडीपर्यंत तर, दळणवळणाच्या सुविधेचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राच्या कोपऱ्या-कोपऱ्यात दिमाखात जाणारी ‘लालपरी’सुद्धा आजपर्यंत त्या गावात कधी पोहोचली नाही. पावसाळ्यात तर घरातून बाहेर पडणं म्हणजे सुद्धा जिकिरीचं, पाऊस असा पडतो-असा पडतो की वाटेत जे काही सापडेल ते सगळं काही वाहून नेतो. भात आणि नाचणी ही प्रामुख्यानं पिकवली जाणारी पिकं, पण अतिवृष्टी आणि तीने महिने चादर पसरवणाऱ्या धुक्याच्या तावडीतून सुटली तर ती पिकं लोकांच्या हातात येतात. त्यात तिसऱ्या वाडीतील लोकांच्या जमिनी वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या जमिनी सुद्धा त्यांच्या नावावर नाहीत. शेतीसाठी कर्ज घेऊन सारं काही वाहून गेल्यानंतर दारात उभा ठाकलेला एखादा पतसंस्थेचा वसुली अधिकारी जाताना शेळ्या, कोंबड्या, गायी यांना सोबत घेऊन जातो.
गावात प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत. चौथीनंतर शाळेसाठी १७ किलोमीटर पायपीट करत जावं लागतं. बरीच किशोरवयीन मुलं तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये, धाब्यावर वेटर म्हणून कामाला जातात. मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण नगण्य. जिथं आपल्याकडच्या- शहरातल्या मुली दहावी झाल्यानंतर स्वप्नं बघायला सुरुवात करतात, तिथे या गावातल्या मुली दहावीला जाईपर्यंत त्यांच्या गळ्यात मंगळसूत्राचं ओझं टाकून स्वप्न पाहण्याअगोदरच त्यांचा चुराडा केला जातो. तिसऱ्या वाडीतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या एका भगिनीच्या चेहऱ्यावर आत्ता दिसणारं निखळ-निर्मळ हसू काही दिवसांत हिरावलं जाईल याची भीती सतत मनात घर करून जाते.
गावात आरोग्याची कोणतीही आधुनिक, सरकारी सुविधा नाही. तिसऱ्या वाडीतून आपत्कालीन प्रसंगी रुग्णाला किंवा एखाद्या गर्भवती स्त्रीला दवाखान्यात न्यायचं असेल तर डोलीतून ६ किलोमीटर पळवत रुग्णवाहिकेपर्यंत आणावं लागतं.
एकीकडे कित्येक लाख भारतवासी सुखवस्तू आयुष्य व्यतीत करत असताना, दुसरीकडे कुणी रोज असंख्य अडचणींचा सामना करत, तरीही आनंदानं जगत असतं. एकीकडे चंद्रावर मानवी वसाहत वसवण्याची तयारी सुरू असताना असे कितीतरी धनगरवाडे यापेक्षाही वाईट परिस्थितीत नुसत्या कोल्हापूर जिल्ह्यात आपलं अस्तित्त्व टिकवून आहेत तर अशा हजारो वाड्या, वस्त्या, गावं अख्ख्या भारतभर आहेत… जिथे आजपर्यंत प्राथमिक शाळा वगळता कोणतीच यंत्रणा पोहोचलेली नाही, त्यांच्या अस्तित्वाचा कोणालाच काही फरक पडत नाही, ते अजूनही आधीच्या युगात असल्यासारखे आयुष्य कंठत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या गावी त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार झाल्यानंतर वीज पोहोचते असं वाचलं… हे खरंच दुर्दैवी आहे.
महागाई, बेकारी, गरीब-श्रीमंत यांच्यात वाढत चाललेली दरी, रोज बाहेर पडणारी लोकप्रतिनिधींची कोट्यवधींची भ्रष्टाचाराची प्रकरणं, प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील उदासीनता… माझ्या भारताची अशी परिस्थिती असताना हे सारे प्रश्न बाजूला पडून कुणीतरी काडी टाकतं आणि माझा देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आली तरी धर्म-जात या गोष्टींसाठी भांडत राहातो…
… आपण विकासाच्या वाटेवर आहोत, याची आठवण करून दिली जात असताना त्या गावातली तिसरी वाडी आठवत राहाते!
sourabhdhanawade5@gmail.com