सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे. एकदा गुरुदेवांना विचारलं, भगवंत ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’, असं सांगतात तेव्हा इतर धर्म त्या वेळीही होते का? गुरुदेवांनी सांगितलं, ‘सर्व धर्म म्हणजे मनोधर्म!’ देहसुखासाठीच धडपडणे, हाच मनाचा धर्म असतो. आपलं पाहणं, बोलणं, ऐकणं, वावरणं सारं काही स्वसुखासाठीच असतं. त्या मनोधर्माचा त्याग करून मला शरण ये म्हणजे मी तुझं पाप नष्ट करीन, असं भगवंत सांगतात. आता हे पाप म्हणजे काय? आपण मागेच पाहिलं त्यानुसार भगवंताचं, शाश्वताचं विस्मरण आणि अशाश्वताचं सतत स्मरण, हेच सर्वात मोठं पाप आहे. सर्व भावनिशी, सर्व मनोधर्माचा त्याग करून सद्गुरूंना शरण गेलं तर ते या पापातून मला सोडवतात. म्हणजे शरणागतीची माझी ती स्थिती अखंड राखतात. गीतेचे जे दोन श्लोक आपण पाहिले ते ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत् प्रसादात् परां शांतिम् स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।।’ (श्लोक ६२) आणि ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यमि मा शुच:।।’ (श्लोक ६६) असे आहेत. या ६२ आणि ६६ श्लोकांच्या मध्ये बरंच काही घडलं आहे! भगवंत सांगतात की, सर्व भावनिशी मला शरण ये, मग तुला शाश्वत शांतीचं स्थान लाभेल. त्यानंतर ६३ व्या श्लोकात भगवंत सांगतात, हे अर्जुना, अत्यंत गुह्य़ असं ज्ञान मी तुला सांगितलं. आता तू तुला जे योग्य वाटतं ते कर! ‘यथा इच्छसि तथा कुरू’! एकदा सर्व भावनिशी शरण यायला सांगितल्यावर इच्छा कुठून उरणार? ज्ञानेश्वरी माऊली या श्लोकावर भाष्य करताना सांगतात, ‘तैसे सर्वज्ञेही मियाँ। सर्वही निर्धारूनियां। निकै होय ते धनंजया। सांगितले तुज।। आता तू ययावरी। निकै हे निर्धारी। निर्धारूनि करीं। आवडे तैसें।।’ हे अर्जुना, जे सत्य आहे ते मी तुला निर्धारपूर्वक सांगितले. आता तू निर्धारपूर्वक तुला आवडेल ते कर! हे ऐकताच अर्जुन स्तब्ध झाला. सत्य काय ते सांगितले. आता तू आवडेल ते कर म्हणजे पुन्हा घसरणीचा मोठाच धोका आहे. इथे सद्गुरूंचा स्पष्ट उल्लेख करीत माऊली भगवंताच्या माध्यमातून सांगतात की, हे अर्जुना, समोर ताट भरलं असूनही जो जेवत नाही आणि वर मी उपाशी राहिलो, असं सांगतो तर त्याला काय अर्थ? सर्व दोष त्याचाच आहे. त्याचप्रमाणे, ‘तैसा सर्वज्ञु श्रीगुरू। भेटलिया आत्मनिर्धारू। न पुसिजे जैं आभारू। धरूनियां।। तै आपणपेंचि वंचे। आणि पापही वंचनाचें। आपणयाचि साचें। चुकविलें तेणें।।’ सर्वज्ञ सद्गुरूची भेट होऊनही जो परमकल्याणाचा मार्ग विचारीत नाही तो स्वत:हून त्या मार्गापासून वंचितच होतो आणि वंचनेचे पापही त्याचेच होते. मग सर्व मनोधर्म सोडून मला शरण ये या श्लोकाआधीच्या ६५ व्या श्लोकात भगवंत सांगतात, ‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू। मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे।।’ माझे आणि तुझे मन एक कर, माझा भक्त हो, मलाच समर्पित हो, दण्डवत हो. मग तुझ्या माझ्यात भेदच राहणार नाही!